डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रोखे गैरव्यवहार झाला तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग म्हणाले की, हे सिस्टीमचे फेल्युअर आहे, पण सिस्टीम सुधारण्याचे प्रयत्न झाले नाहीत. भारतात सर्व प्रकारच्या यंत्रणा आहेत; पण प्रतिबंधक उपाय योजना केली जात नाही. म्हणजे गैर व्यवहाराचा कुणी प्रयत्न केला, तरी तो शोधून लगेच कारवाई होत नाही. गुंतवणूकदार, ठेवीदार वा ग्राहकांच्या प्रभावी संघटना नाहीत. घोटाळ्याचेही राजकारण होते व मग सगळे मिळून प्रकरणच दाबून टाकतात! घोटाळे झाले की उदारीकरणावर बरसणारे नेते पुढे येतात. याचा त्याच्याशी काही संबंध नाही. देखरेख मंत्रणेच्या कार्यक्षमतेशी व एकूण औद्योगिक संस्कृतीशी याचा संबंध येतो.

भारताच्या आयटी क्षेत्रातील द्वितीय क्रमांकावरील ‘सत्यम कम्प्युटर्स’ या कंपनीत 8000 कोटी रुपयांचा गडबड घोटाळा झाला असून,  त्यामागील सूत्रभार रामलिंगम राजू यांना अटक झालेली आहे. राजू हे सत्यमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी ‘मी कित्येक वर्षे खोटारडेपणा व गैरव्यवहार करीत होतो’ अशी कबुली दिली आहे. विशेष म्हणजे 2008 सालचा कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दलचा ‘कौन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ डायरेटरर्स’ चा गोल्डन पीकॉक पुरस्कार सत्यमला मिळालेला आहे! असल्या बोगस कंपनीला हे बक्षीस दिले गेलेच कसे, असा प्रश्न उद्‌भवतो. पण आजकाल भारतरत्नापासून ते सटाणाभूषणपर्यंतचे अनेक पुरस्कार मॅनेज केले जातात. चित्रपट असो वा पत्रकारिता विषयक पारितोषिक असोत; कोणाचाही गौरव केला जातो. भल्या बुऱ्या मार्गाने, फिक्सिंग करून एकमेकांच्यापाठी खाजवायच्या ही प्रचलित संस्कृती आहे. तिला धरून राजूंनी कित्येक बक्षीसे पटकावली, आपली आरती करणारे लेख छापून आणले. या जगात पैशाच्या बळावर काम वाट्टेल ते करता येते, हे त्यांनी दाखवून दिले. परंतु डिसेंबर 2008 मध्ये त्यांनी मुलांनी स्थापन केलेल्या दोन इन्फ्रास्ट्रचर कंपन्यांच्या खरेदीचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यामुळे त्यांना व्यवस्थापकीय संचालकपदाचा त्याग करणे भाग पाडले. 7 जानेवारी 2009 रोजी सेन्सेस 749 नी कोसळला व सत्यमचा भाव 78% नी आदळला.

गेली काही वर्षे सत्यम आपला नफा वाजवीपेक्षा जास्त फुगवून दाखवत होती. नफ्याची चूक सुधारून ताळेबंद पत्रकातील उणीवा दूर करण्याचे सारे प्रयत्न फसले. ‘मी वाघाच्या पाठीवर स्वार झालो होतो. त्या मुळे वाघाकडून फस्त झाल्याविना खाली कसे उतरावे हे मला माहीत नव्हते. त्यामुळे आता मी कायद्याला शरण जात असून, कोणत्या ही परिणामाचा सामना करण्याची माझी तयारी आहे’, असे उद्‌गार राजू यांनी काढले आहेत.

30 सप्टेंबर2008 रोजी कंपनीच्या ताळेबंदपत्रकात दाखविलेली शिल्लक रोख व बँकेतील ठेव असे मिळून होणारी 5040 कोटी रुपये गंगाजळी ही वाजवीपेक्षा फुगविलेली आहे. 376 कोटींचे व्याज उत्पन्न व 1२30 कोटी रुपयांचे कर्ज दायित्व आणि 490 कोटी रुपयांचे ऋणही अवास्तव असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. बनावट हिशेब सादर केले जात असताना, त्यांना लेखी संमती देणारे ऑडिटर्स ढाराढूर झोपले होते का? ‘प्राइस वॉटर हाऊसकूपर्स’ ही जगविख्यात कंपनी ऑडिटचे काम बघते. याबद्दल तिला जबाबदार ठरवून तात्काळ व्यवसायातून हद्दपार केले पाहिजे. एन्रॉन व इतर अनेक कंपन्यांची देशविदेशांतील उदाहरणे बघितल्यास चार्टर्ड अकौंटंटस व ऑडिटर्स हे फसवाफसवीच्या उद्योगात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. पुन्हा तोंड वर करून ‘सरकारने अमुक करावे, तमुक करावे’ असा सल्ला देण्यात तेच अग्रभागी असतात.

राजू यांच्या बोगसगिरीमुळे सत्यमचे करोडो गुंतवणूकदाीं पुरते खड्‌ड्यात गेले आहेत. कंपनीच्या 51 हजार कर्मचाऱ्याचे भवितव्य अंध:कारमय आहे. कंपनीचे पुरवठादार गर्तेत लोटले गेले आहेत. भारतीय आयटी उद्योगाची व एकूणच भारताची लाज गेली आहे. डाव्होसच्या परिषदेत आपण ब्रँड इंडियाचा ढोल कितीही पिटला, तरी त्याचा उपयोग आता शून्य आहे.

आपल्याकडे मुळात आयटी कंपनी म्हटले की, लोक पहिल्या प्रथम कानाच्या पाळ्या पकडून वंदनच करतात. सिव्हिल वा मेकॅनिकल इंजिनिअर्स, वैज्ञानिक यांच्या पेक्षा आयटीला पहिले स्थान मिळाले. आयटीतून निर्मात उत्पन्न मिळते, पगार चांगले असतात हे ठीक आहे, पण म्हणून इतर क्षेत्रातील कंपन्यांपेक्षा आयटी कंपन्या अधिक आदर्श व सरस ठरतात, असे नव्हे. मुलीसाठी आयटीतलाच नवरा पाहण्यापर्यंत आपली मजल गेली आहे!

सत्यमने वास्तवातल्या पेक्षा कागदावर जास्त राखीव निधी दाखविला. नफा फुगवून दाखविला. शिवाय सत्यममधील निधी आपल्याच पोरांच्या ‘मेटास प्रॉपर्टी’ व ‘मेटास इन्फ्रास्ट्रचर’ या कंपन्या खरीदण्यासाठी वापरण्याचे ठरविलेले. या दोन कंपन्यांचे व्हॅल्यूएशन फुगवून दाखविले.

रामलिंगम राजू यांनी हे सारे असत्यम का केले? एकतर ताळेबंद चकचकीत करून दाखविल्या सल्ला कंपन्यांच्या आयपीओला किंवा नवीन भांडवल विक्रीस चांगला प्रतिसाद मिळतो. कंपनीची प्रतिमा सुधारते. विदेशात नाव पोहोचते. नवीन ऑर्डर्स मिळतात. एखादी कंपनी टेक्‌ओव्हर करताना या प्रतिमेचा उपयोग होतो.

सत्यममधून या प्रकारे मिळविलेला पैसा मुलांच्या कंपनीत गुंतविणे, हा निव्वळ स्वार्थ झाला. शिवाय फारशी किंमत नसलेली ‘मेटास’ प्रचंड किंमतीने विकत घेणे हा लुच्चेपणा होता. हा जो सर्व निधी आहे, त्यातून राजू यांनी सहा-सात हजार एकर जमीन खरेदी केली. आपण ज्या आयटी क्षेत्रात काम करत आहोत,  त्यात पुनर्गुंतवणूक करण्याऐवजी भलत्याच गोष्टीकडे तो वळविणे, यामधून बनवाबनवीची वृत्ती दिसते. ही लफंगेगिरी झाली.

कंपनीचे उत्पन्न, ऑपरेटिंग प्रॉफिट, येणे असलेले व्याज, रोख शिल्लक हे सर्व आकडे फुगवून दाखविले गेले. आयटी क्षेत्रातील एका अग्रगण्य कंपनीने हे करावे याचा गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे.

सत्यमचे कर्तृत्व इतके उशिरा कसे बाहेर आले? याचे कारण म्हणजे, प्रवर्तकांनीही कंपनी विकायचे ठरवले होते. ‘डीएसपीपेरि लिंच’यला ते काम सोपविले होते. टेक महिंद्र व एचसीएलने सत्यम खरीदण्याची तयारी दर्शविली. पण कंपनीच्या आर्थिक कामगिरीशी निगडित सवाल उपस्थित केले. समजा कंपनी आपण विकली व नंतर ही सारी बनवाबनवी उघडकीस आली, तर बिंग फुटायचे, असे राजू यांना वाटले. त्यामुळे त्यांनी स्वत:हूनच पापांची कबुली देऊन टाकली.

31 मार्च 2008 साठी कंपनीने 8,8२२ कोटी रुपयांच्या मालमत्ता व तेवढीच देणी दाखविली होती. पण फुगवून सांगितलेल्या मालमत्ता वजा केल्या, तर कंपनीच्या निव्वळ मत्ता किंवा नेट वर्थ शन्यवत ठरत असल्याचे स्पष्ट झाले. सेबी, रिझर्व्ह बँक, कंपनी कामकाज खाते अशा विविध यंत्रणा असूनही सत्यमने असत्यमेव जमतेचा कितीही गजर केला, तरी त्याला काडीचा अर्थ नाही.

गंमत म्हणजे सत्यम ही कंपनी दहा वर्षांपासून न्यूयार्क स्टॉक एस्चेंजवर सूचीबद्ध करण्यात आली आहे. तिचे ऑडिट करणारी ‘प्राइस वॉटर हाऊस’ ही मूळ अमेरिकन कंपनी आहे. म्हणजे भारताप्रमाणेच याबाबत अमेरिकेतही आनंदीआनंद आहे. याबाबतीत ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंन्टस ऑफ इंडिया’ तसेच ‘कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’ यांच्यावरही नैतिक जबाबदारी येते. परंतु आपल्याकडे मेडिकल कौन्सिलसारख्या संघटनांप्रमाणेच हिशेब तपासनीसांच्या संस्था-संघटनाही त्यांच्या सदस्यांवर निमंत्रण ठेवण्यात कसूर करतात, अळीमिळी गुपचिळी हे बरे असते...

उदारीकरण आणल्यानंतर तरी कर चुकविणे, खोटे आकडे दाखविणे, हेराफेरी करणे हे प्रकार कमी व्हायला हवे होते, तसे घडलेले नाही. म्हणजे आधुनिकीकरणाबरोबर मानसिकता बदलली नाही. उद्योजकीय नव्हे, तर व्यापारी मनोवृत्ती (ट्रेडिंगमेंटॅलिटी)च राहिली.

कॉर्पोरेट क्षेत्रात पारदर्शकता आलेली नाही. या विषयावर सेमिनार्स होतात, टॉक शोज होतात. ताज-ओबेरॉयमध्ये परिषदा भरवल्या जातात. सी.के.प्रल्हाद, पंकज घेमावत मेघनाद देसाई प्रभृतींची लेचर्स ऐकून सूट-टायवाली मंडळी हाताचे पंजे परस्परांत गुंफून ‘ओह, इट्‌स क्वाएट इंटरेस्टिंग, द चॅलेंज इज टु फिगर आऊट. हाऊ टु डू इट!’ असे उद्‌गार काढतात आणि लगबगीने बारकडे वळतात. नंतर दुसऱ्या पेगपासून ते बराक ओबामा, लिंडसे लोहान, पॅरिस हिल्टन, लॅमे शो व वेळ उरला तर टेररिझमबद्दल बोलू लागतात. काही क्षण चिंताक्रांत होतात व गाडीत बसून निघून जातात... दुसऱ्या दिवशी कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी हे विषय त्यांच्या सिस्टीममधून फ्लश आऊट झालेले असतात.

आपल्याकडे सूचीबद्ध कंपन्यांच्या अनेक उपकंपन्या असतात. प्रवर्तक कंपनीच्या काही सूचीबद्ध न झालेल्या (अन्‌लिस्टेड)कंपन्या असतात. त्यांच्यात आपापसांत गुंतागुंतीचे व्यवहार केले जातात. करचुकवेगिरी, लपवाछपवी यातच चालते. रिॲलिटी कंपन्या स्पेशल परपज वेइकल कंपन्या स्थापन करतात व त्यांच्या मार्फत जमिनी खरेदी करून प्रकल्प राबवितात. हे प्रकल्प मग नवीन मूल्यांकन करून सूचीबद्ध कंपनीकडे हस्तांतरित केले जातात. त्याचे मूल्यांकन फुगवून दाखविले जाते. तसे ते केले की सूचिबद्ध कंपनीच्या मालमत्ता वाढतात. लोकांना वाटते, ‘अरे केवढी मोठी कंपनी आहे.’

गेल्या दोन-चार वर्षांत रिॲलिटी कंपन्यांनी घेतलेल्या जमिनी, त्यांच्या वाढवून दाखविलेल्या किंमती, कृत्रिमपणे वाढविलेले जागांचे भाव आणि हिशेबात केलेली बोगसगिरी हे सर्वच तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. डीएलएफसारखी कंपनी 60-60 हजार कोटी रुपयांच्या जमिनी खरीदते. हे भांडवल येते कुठून आणि ते जाते तरी कुठे?

काही उद्योगपती सूचीबद्ध कंपनीतील आपले शेअर्स प्रकल्पासाठी खर्च करतात. बँकांना मॅनेज केले की हे खपून जाते. कंपनीस तोटा झाल्यास तो दडवायचा व तो विदेशांतील अज्ञात उपकंपनीकडे वर्ग करायचा असले उपद्‌व्यापही चालतात. भारतातील निधी सायफन ऑफ करण्याची नवनवीन तंत्रे उद्योगपतींनी अवगत करून घेतली आहेत.

सत्यम कम्प्युटर्स महाघोटाळा करीत असताना संचालक मंडळावरचे स्वतंत्र संचालक (इंडिपेंडन्ट डिरेटर्स) त्या कडेडोळेझाक करून होते, अथवा त्यांना काम घडले याचा पत्ताच नव्हता. खरे म्हणजे राजू एकट्याच्या बळावर हे करू शकणार नाहीत, चार-दोन कोटी इकडेतिकडे झाले, तर समजू शकते. कारण सत्यमची उलाढालच प्रचंड आहे. पण शेकडो कोटी रुपयांचा ताळमेळ लागत नसतानाही कुणाच्या काहीच लक्षात येऊ नये ? कंपनीचा सीएफओ, सीईओ, सीओओ (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर),संचालक, वरिष्ठ व्यवस्थापन यांची ही साथ होती का हे बघायला हवे.

रोख शिलकीबाबत तर खोटेपणा करता येत नाही. तोही केला गेला. तरीही सीईओ वा सीएफओ यांना त्याचा पत्ता नव्हता, यावर विश्वास बसत नाही. रामलिंगम्‌ राजू आपल्या मुलांची कंपनी भरमसाठ भाव देऊन विकत घेत होते, त्यास स्वतंत्र संचालकांनी आक्षेप कसा घेतला नाही? कंपन्यांच्या स्वतंत्र संचालकांचा दैनंदिन कामकाजाशी संबंध नसतो. त्यामुळे यापुढे त्यांनी फक्त आकडे न पाहता कंपनीस भेट देऊन, संबंधितांशी बोलून वास्तव जाणून घेतले पाहिजे. भारतात हर्षद मेहता, केतन पारेख, सी.आर.भन्साळी असे अनेक ठकसेन झाले. तीन-चार वर्षांपूर्वी डीमॅट घोटाळा झाला. एन्रॉनचा गैरव्यवहार मोठा होता. यात कुणालाही तातडीने शिक्षा झाली नाही.

रोखे गैरव्यवहार झाला तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग म्हणाले की, हे सिस्टीमचे फेल्युअर आहे, पण सिस्टीम सुधारण्याचे प्रयत्न झाले नाहीत. भारतात सर्व प्रकारच्या यंत्रणा आहेत; पण प्रतिबंधक उपाय योजना केली जात नाही. म्हणजे गैर व्यवहाराचा कुणी प्रयत्न केला, तरी तो शोधून लगेच कारवाई होत नाही. गुंतवणूकदार, ठेवीदार वा ग्राहकांच्या प्रभावी संघटना नाहीत. घोटाळ्याचेही राजकारण होते व मग सगळे मिळून प्रकरणच दाबून टाकतात! घोटाळे झाले की उदारीकरणावर बरसणारे नेते पुढे येतात. याचा त्याच्याशी काही संबंध नाही. देखरेख मंत्रणेच्या कार्यक्षमतेशी व एकूण औद्योगिक संस्कृतीशी याचा संबंध येतो.

गेल्या काही वर्षांत आमचे झगमगाटाचे आकर्षण वाढले. चार-दोन वर्षांत करोडो कमावणारे लोक आमचे आयडॉल्स बनले. त्यांच्या सस्केस स्टोऱ्या प्रसिद्ध होऊ लागल्या. ज्याच्याकडे संपत्ती जास्त तो मोठा! समाजात त्याला प्रतिष्ठा. त्याला पुरस्कार. मिडिया त्याच्या भोवती नाचणार. प्रामाणिकपणा, नीतिमत्ता हे चेष्टेचे विषय ठरले. कशा का मार्गे का होईना; पैसे कमवा असे आदर्श तरुणांसमोर ठेवले गेले. फोर्बसच्या श्रीमंतांच्या यादीस महत्त्व आले. कुठल्या मार्गाने धन कमावले यापेक्षा अल्पावधीत कमावले ना, मग झाले. अशी आमची भूमिका बनली.

‘दीवार’मधला विजय इन्स्पेटर भावाला विचारतो की, ‘मेरे पास गाडी है, बंगला है, सबकुछ है, तुम्हारे पास क्या है?’ विजय ने व्यवस्थेचा खोटेपणा अनुभवला आहे, म्हणूनच तो भल्या बुऱ्या मार्गाने धन कमावतो व त्या बळावर लोकांना विकत घेतो. मात्र असल्या पैशामुळे शांती मिळत नाही, हा पैसा पचत नाही, सुख मिळत नाही...

रामलिंगम राजू एकटे नाहीत. असे जंटलमन बनलेले शेकडो राजू कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत. त्यांनाही वठणीवर आणावे लागेल. हे सर्व कायदा, नियम यांच्या बळावर नाही होणार, लोकांच्या मानसिकतेत गुणात्मक परिवर्तन घडवून आणावे लागेल. श्रीमंत व्यक्तीपेक्षा प्रामाणिक, ईमानदार माणसांची यादी प्रसिद्ध करावी. अशी सूचना नारामणमूर्ती यांनी केली आहे. राजकारणी व उद्योगपती एकाच माळेचे मणी आहेत, कुणी कुणालाही बोलावे अशी परिस्थिती उरली नाही.

Tags: हेमंत देसाई आयटी रामलिंगम राजू meghnad desai ramlingam raju सत्यम घोटाळा satyam hemant desai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके