डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार 2014

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने 1994 पासून साहित्यक्षेत्रातील व्यक्ती वा संस्थांना, तर 1996 पासून सामाजिक कार्यक्षेत्रातील व्यक्ती वा संस्थांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. म्हणजे साहित्य पुरस्कारांचे हे 20 वे वर्ष आहे, तर सामाजिक कार्य पुरस्कारांचे 18 वे वर्ष आहे. या पुरस्कारांची कार्यवाही पूर्वी मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टकडून केली जात होती. गेल्या सहा वर्षांपासून या पुरस्कारांची कार्यवाही पुणे येथील साधना ट्रस्टकडून केली जात आहे. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या धुरीणांनी या पुरस्कारांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळवून दिली आणि साधना ट्रस्टने ती जपण्याचा/वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

या पुरस्कारांची कार्यवाही साधना ट्रस्टकडे आल्यानंतर, पहिली चार वर्षे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली पुरस्कारांची कार्यवाही पार पाडली जात होती. दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र फाउंडेशन व साधना ट्रस्ट यांनी संयुक्तपणे काम चालू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. एवढेच नाही तर, डॉ.दाभोलकरांच्या स्मृतिनिमित्त दर वर्षी एक लाख रुपयांचा एक पुरस्कारही प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गेल्या वर्षी एम.के.सी.एल.चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना पुरस्कार दिला, तर या वर्षी लढाऊ पत्रकार-संपादक निखिल वागळे यांना हा पुरस्कार दिला जात आहे.

पुरस्कार प्रदान समारंभाच्या निमित्ताने साधना साप्ताहिकाचा एक विशेषांक काढायचा आणि तो साधनाच्या सात हजार वर्गणीदारांना व समारंभाला उपस्थित राहिलेल्या सर्वांना भेट म्हणून देण्याचा उपक्रमही मागील पाच वर्षांप्रमाणेच या वर्षीही चालू ठेवला आहे. मात्र पुरस्कार विशेषांकाची रचना व निर्मिती यामध्ये प्रत्येकी एक बदल या वर्षी केला आहे. म्हणजे पूर्वीच्या अंकात पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे मनोगत व त्या व्यक्तीची (जवळच्या व्यक्तीने करून दिलेली) ओळख असे प्रत्येकी दोन छोटे लेख छापले जात होते. आता पुरस्कारप्राप्त व्यक्तीची दीर्घ मुलाखत व मुलाखतकाराचे छोटे टिपण अशी रचना केली आहे. ‘मनोगत’ व ‘ओळख’ या दोन लेखांमध्ये होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि अंकाची एकसंधता व वाचनीयता वाढविण्यासाठी हा बदल केला आहे; तो वाचकांना आवडेल, असा विश्वास वाटतो.

शिवाय, या वर्षी संपूर्ण अंक बहुरंगी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मांडणी व सजावट अधिक चांगली करता येऊन अंकाच्या आकर्षकतेत भर टाकता आली आहे. या अंकातील पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती व त्यांच्यावर लिहिलेली टिपणे ही त्यांच्या एकूण कार्याची चर्चा-चिकित्सा करणारी नसून, केवळ काही कवडसे टाकणारी किंवा झलक दाखवणारी आहेत. उपलब्ध वेळेत व जागेत अधिक सखोल व विस्तृत लेखन देण्याला मर्यादा येतात, पण तरीही पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे विचार/कार्य उल्लेखनीय व अनुकरणीय का व कसे आहे याचे प्रतिबिंब मात्र या अंकात निश्चित दिसेल... आणि या सर्व व्यक्तींविषयीचे, त्यांच्या कार्याविषयीचे कुतूहल काहीसे शमेल... बरेच वाढेल!

Tags: विनोद शिरसाठ संपादकीय महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 vinod shirsath sampadakiy editorial Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके