डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रचनात्मक संघर्षाची आश्वासकता

समाजासमोर समस्या अवघड आहेत ते सर्वांनाच समजते. पण अशी व्यक्तिमत्त्वे एकत्रित बघितली, की सुरेश भट यांच्या गझलाच्या दोन ओळी आठवतात. 
‘‘करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची 
रणात आहेत झुंजणारे अजून काही’’ 

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी व्यक्तींनी महाराष्ट्र फाऊंडेशन स्थापन केले. 1994 पासून त्यामार्फत साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना, तर 1996 पासून सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या भरीव योगदानाबद्दल पुरस्कार देऊन फाऊंडेशनतर्फे गौरवले जाते. गेली चार वर्षे साधना ट्रस्ट याचे संयोजन करते. त्याचबरोबर पुरस्कारप्राप्त लेखकांचा, त्यांच्या साहित्याचा, कार्यकर्त्यांच्या कार्याचा व जीवनगौरवप्राप्त दिग्गजांच्या जीवनकार्याचा साक्षेपी परिचय करून देणारा साधनाचा विशेषांक प्रसिद्ध करते. तो सर्वांना संग्राह्य वाटतो याचे ‘साधना’ला समाधान वाटते. 

सांप्रत महाराष्ट्र देशी असंख्य पुरस्कार दिले जातात. त्यांतील काही भरभक्कम रकमांचे असतात. नामवंत सेलिब्रेटींना त्यासाठी पाचारण केले जाते. दिमाखदार सोहळे संपन्न होतात. अशा पार्श्वभूमीवर आणखी एक पुरस्कार सोहळा असे स्वरूप महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारांना प्राप्त होणे शक्य होते. तसे ते झाले नाही याबद्दल महाराष्ट्रातील चोखंदळ मानसिकतेचे व माध्यमांच्या नीरक्षीर विवेक करण्याच्या भूमिकेचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या पुरस्कारांची माहिती ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांनी ठळकपणे, आपल्या सर्व आवृत्त्यात आणि पुरस्कारप्राप्त सर्व व्यक्तींच्या फोटोसह प्रसिद्ध केली; त्यावरून त्यांनी या वृत्ताला झुकते माप दिले हे खरेच आहे. 

याचे एक कारण म्हणजे सातासमुद्रापलीकडच्या मराठी बांधवांनी केलेला हा सन्मान आहे आणि तेवढीच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे आजतागायत सर्व पुरस्कारांची निवड अत्यंत चोख पद्धतीने झाली आहे. पुरस्कार प्रदान करण्यामागचा अत्यंत स्पष्ट उद्देश हेदेखील त्याला लाभलेल्या मान्यतेचे एक कारण आहे. परिवर्तनाचा झेंडा महाराष्ट्रात फडकत राहिला पाहिजे अशी त्याबाबतची स्पष्ट भूमिका ज्यांच्या भरीव देणगीतून दरवर्षी पुरस्कार दिले जातात, ते सुनील देशमुख यांनी सतत घेतली आहे. नाट्यपुरस्कार श्रीमती रजनी शेंदुरे यांच्या देणगीतून दिला जातो. त्यांनीही नाट्यकृतीला सामाजिक आशय असावा असाच आग्रह धरला आहे. या दोन्ही बाबी पुरोगामी वाटचालीसाठी पथदर्शक ठरतात.   

लोकशाही समाजवाद हे साधनेचे ध्येय आहे. त्यासाठी रचना हवी व संघर्षही हवा. भारतासारख्या देशात या रचनेचा पाया व्यापक परिणामकारक प्रबोधन याच रूपाने व्यक्त होणार. साहित्य-पुरस्कार लाभलेल्या चौघांचीही पुरस्कारप्राप्त पुस्तके व शक्य तर त्यांचे सर्वच लेखन वाचकांनी जरूर वाचावे. परिवर्तनाचा आग्रह धरणारा तळमळीचा अंत:स्वर त्यांना स्पष्टपणे साद घालेल. डॉ.जयंत नारळीकर यांचे कार्य याबाबत आदर्श ठरावे. ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ असून स्वत:च्या संशोधनकार्यात व्यग्र असतात. तरीही त्यांनी विज्ञानविषयक विविध प्रकारचे शास्त्रीय व ललित असे विपुल लेखन केले. सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले. परंतु विज्ञानविषयक जाणीव वाढवणारी भाषणे देण्यासाठी मानधनाशिवाय ते भारतभर फिरले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विज्ञानविषयक शंकांना स्वहस्ताक्षरात उत्तरे दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाचा सतत आग्रह धरला. फलज्योतिषाची शास्त्रीय निकषावर तपासणी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे संपूर्ण सहयोग दिला. कृतिशील प्रबोधन म्हणजेच रचना याचे साक्षात उदाहरण यापेक्षा वेगळे काय असते? 

प्रबोधनाला, रचनेला संघर्षाची जोड लागतेच. माधव बावगे हे त्यांपैकी काही संघर्षक्षेत्रात बिनीचे लढवय्ये आहेत. सर्व जोखीम पत्करून सातत्याने आंतरजातीय/ आंतरधर्मीय विवाह लावणे या त्यांच्या कामाला आज महाराष्ट्रात तोड नाही. शिवाजी कागणीकर यांचे वर्णन ‘माती जागवणारा माणूस’ असेच करावे लागेल. या माणसाने ग्रामीण भागांत सर्वसामान्यांच्या बरोबर त्यांच्या जीवनातील सर्व प्रश्नांना साथ करत, उत्तरे शोधत, संघर्ष करत उभे आयुष्य घालवले आहे. भटक्या विमुक्त जातींची स्थिती ही या देशात सर्वांत भीषण आहे. कारण त्यांना स्वत:चे गाव नाही म्हणून मतदानासह कोणताच हक्क खात्रीने मिळण्याची शक्यता नाही. त्यांच्या माणूसपणाची लढाई बाळकृष्ण रेणके मोठ्या हिमतीने देशपातळीवर लढवत आहेत. ठाकूरदासजी बंग यांचे कार्य वाचल्यानंतर आपल्या तोंडून विनम्रपणे मान झुकवत ‘त्रिवार सलाम’ एवढाच उद्‌गार बाहेर पडू शकतो. रचनात्मक संघर्षाचे ते मुकुटमणी शोभावेत. 

समाजासमोर समस्या अवघड आहेत ते सर्वांनाच समजते. पण अशी व्यक्तिमत्त्वे एकत्रित बघितली, की सुरेश भट यांच्या गझलाच्या दोन ओळी आठवतात. 
‘‘करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची 
रणात आहेत झुंजणारे अजून काही’’ 

सद्य:स्थितीत हा दिलासा लाभणे हेदेखील मोलाचेच नव्हे काय?   

Tags: ठाकूरदासजी बंग बाळकृष्ण रेणके शिवाजी कागणीकर माधव बावगे डॉ.जयंत नारळीकर सुनील देशमुख पुरस्कार महाराष्ट्र फाऊंडेशन संपादकीय Thakurdashi Bang Balkrishna Renake Shivaji Kagnnikar Madhav Bawage Dr Jayant Narlikar Sunil Deshmukh Awards America Maharashtra Foundation Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके