डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लेख लिहिण्यासाठी मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा निवडल्या आहेत. वाडी-वस्तीवरची द्विशिक्षकी शाळा, अंगावर आसूड ओढून घेणारा नंदीवाला समाज, प्रामुख्याने असलेली शाळा, गोसावी समाजाची मुलं असणारी शाळा...अशा ठिकाणी शिक्षक कसा जिव्हाळा निर्माण करतात, मुलाला त्याचं हरवलेलं बालपण कसं मिळवून देतात, हे यातून दाखवता आले. आईविना पोरकी झालेली गायकवाड-चव्हाण मळ्यातील मुलं एकमेकांना बिलगून राहतात. तिथली भक्ती बालवयातच पोक्त होते, हा लेख वाचताना मुक्ताईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

दि. १९ जुलै २०१४ च्या साधना अंकामध्ये दोन प्राथमिक शिक्षकांचे लेख प्रसिद्ध झाले. सांगली जिल्ह्यातील समडोळी शाळेतील कृष्णात पाटोळे आणि सानप वस्ती शाळेतील विकास देवके या दोघांचे ते लेख होते. वर्षभरामध्ये अशा दहा शिक्षकांचे लेख साधनातून क्रमश: प्रसिद्ध व्हावेत, असा विचार होता. परंतु उत्तम काम असूनही त्याचं लिखाण उत्तम होतंच असं नाही, या माझ्या पूर्वी केलेल्या विधानाला बळकटी मिळत गेली.

एखादा अपवाद वगळता दोन-तीन प्रयत्नांत एकही लेख पूर्ण झाला नाही. पूर्ण समाधान होईपर्यंत लिहीत राहायचं, ही माझी लिखाणाची सवय आहे. त्यामुळे लिहिणाऱ्या शिक्षकांचं आणि माझं पूर्ण समाधान होईपर्यंत आम्ही पुनर्लेखन करीत राहिलो. आता हे लेख वाचकांच्या पसंतीस उतरतील, अशी मला आशा आहे.

या लेखांमधून सरकारी शाळांमध्ये शिक्षक जे प्रयत्न, प्रकल्प, प्रयोग करत आहेत; ते इतरांना समजावं, हा हेतू आहे. याबरोबरच काम करणाऱ्यांना आपलं मत आणि काम मांडता यावं, इतर शिक्षकांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असाही हेतू आहे.

आज सरकारी शाळांमधील शिक्षक झपाटून कामाला लागलाय. मा.नंदकुमार हे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणांमधून शिक्षणक्षेत्रात बदल घडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

एरवी प्रशिक्षणाला दांड्या माणारे शिक्षक स्वत: शिक्षण संमलेने, शिक्षण परिषद मेळाव्यांचे, कार्यशाळांचे आयोजन करीत आहेत. हे सर्व ते स्वत:च्या खर्चाने करत आहेत, ही खूप सकारात्मक आणि शिक्षकांची मान उंचाविणारी बाब आहे. हे पाहून सुयोग्य परिवर्तनाची दिशा घेणारी शिक्षण चळवळ आकारास येत आहे, असे वाटते.

संगणक, डिजिटल तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर शिक्षणामध्ये होत आहे. प्रशिक्षण देण्याच्या निमित्ताने मी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून भंडारा जिल्ह्यापर्यंत सात-आठ जिल्ह्यांमध्ये फिरलो. माझ्यासारखे दुसरे तीन गट प्रशिक्षण देत होते. आम्ही केंद्रप्रमुखांसमोर बोलत होतो. त्याचं ऐकत होते. प्रत्येकाला आता बदल हवाय. एखादा-दुसरा पाठीमागे राहील त्यालाही पुढे यावे लागेल.

सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटमध्ये प्रतिभा भराडे यांनी रचनावादाची सुरुवात केलीय. मूल स्वत: शिकतं, हे दाखवून दिलंय. हे हळूहळू महाराष्ट्रातील इतर शाळांमध्येही होईल. शिक्षणातील या नोंदीही महत्त्वाच्या आहेत. उद्याच्या शिक्षणाचा तो इतिहास आहे. सरकारी शाळांमधील शिक्षक खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात. विविध जाती, धर्म, परंपरा, बोली असणारी मुलं समोर असतात. नवनवी आव्हानं असतात. लेखन, वाचन, गणिती क्रिया यांपेक्षा खूप वेगवेगळे अनुभव इथं मिळतात.

लेख लिहिण्यासाठी मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा निवडल्या आहेत. वाडी-वस्तीवरची द्विशिक्षकी शाळा, अंगावर आसूड ओढून घेणारा नंदीवाला समाज, प्रामुख्याने असलेली शाळा, गोसावी समाजाची मुलं असणारी शाळा...

अशा ठिकाणी शिक्षक कसा जिव्हाळा निर्माण करतात, मुलाला त्याचं हरवलेलं बालपण कसं मिळवून देतात, हे यातून दाखवता आले. आईविना पोरकी झालेली गायकवाड-चव्हाण मळ्यातील मुलं एकमेकांना बिलगून राहतात. तिथली भक्ती बालवयातच पोक्त होते, हा लेख वाचताना मुक्ताईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.

या चारही लेखांमधून शिक्षक काम करताना काय विचार करतात, काय उलथापालथ होत असते, आव्हानांना कसं सामोरं जातात, हे खोलवर डोकावून पाहण्याचा आनंद वाचकांना मिळेल. याशिवाय हे लेख वाचल्यानंतर इतर शिक्षकांनाही असं काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि हे शिक्षक असं काम करीत आहेत त्यांना लिहिण्याचं बळ मिळेल, असा मला विश्वास वाटतो.

Tags: नामदेव माळी शाळाभेट शिक्षण शिक्षक प्राथमिक शिक्षक शिक्षकांची आत्मवृत्ते अतिथी संपादकीय अतिथी संपादक संपादकीय Namdev Mali Autobiogaphical Shalabhet Experiences Education System Education Guest Editorial Guest Editor Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके