डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सद्‌भावना उपवास, सद्‌बुद्धी देईल?

या तीन दिवसांच्या काळातील मोदींचा वावर पाहिला व भाषणे ऐकली तर त्यांच्या देहबोलीतून व बिटविन द लाइन्स वक्तव्यांतून ते कितीतरी जास्त व खरे सांगून जातात. भाजपच्या अनेक नेत्यांना तर मोदींनी आपल्यामागे फरफटत आणले हे त्यांचे चेहरेच सांगतात. उपवास सुरू करताना मोदींनी केलेल्या अर्ध्या तासाच्या भाषणात विरोधी पक्षांची व नेत्यांची नावे घेतली नाहीत हे अनेकांच्या लक्षात आले, पण त्यांनी भाजप व भाजपचे नेते यांचेही उल्लेख केलेले नाहीत हे लक्षणीय आहे. 

येत्या 7 ऑक्टोबरला गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची दहा वर्षे पूर्ण करणार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आपल्या 62 व्या वाढदिवसाचे निमित्त साधून केलेला तीन दिवसांचा सद्‌भावना उपवास, ही पुढील वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात आहे. 2001 च्या 26 जानेवारीला गुजरातमध्ये झालेल्या महाकाय भूकंपानंतर अप्रिय व अकार्यक्षम ठरलेल्या मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या जागेवर भाजपने नरेंद्र मोदी यांना आणले, याला तीन प्रमुख घटक कारणीभूत होते.

भाजप व रा.स्व.संघ यांच्यातील संघर्ष, अडवाणी व वाजपेयी यांच्यातील शीतयुद्ध आणि 9/11 नंतर अमेरिकेने इस्लामी जगताविरुद्ध पुकारलेले जिहाद. हेच तीन घटक मोदींना आपला जम बसवण्यासही कारणीभूत ठरले.  गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीला मूकसंमती किंवा प्रोत्साहन यासाठी मोदी संपूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावरही बदनाम झाले. इतके की ‘तुमच्या हातात बंदूक आली तर तुम्ही पहिली गोळी कोणाला घालाल?’ या प्रश्नाला विजय तेंडुलकरांनी उत्तर दिले ‘नरेंद्र मोदींना’ आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना व जॉर्ज बुश अध्यक्ष असताना अमेरिकेने मोदी यांना व्हिसा नाकारला होता.

गुजरात दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायाधीशाने त्यांना रोमन सम्राट ‘नीरो’ची उपमा दिली होती आणि सोनिया गांधींनी त्यांना ‘मौत का सौदागर’ संबोधले होते. पंतप्रधान वाजपेयींनी ‘बाहर के लोगों को क्या मुँह दिखाऊ?’ अशी खंत व्यक्त केली होती आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला मोदी येणार असतील तर भाजपबरोबरची युती तोडण्याची धमकी दिली होती. 

गुजरात विधानसभेच्या सलग दोन निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्यामुळे मोदींना पक्षाच्या आतून आव्हान देण्यास कोणी पुढे आलेले नाही आणि गेल्या पाच वर्षांत गुजरातच्या विकासाचे गुणगाण आधी दबक्या आवाजात आणि नंतर उघडपणे गाणारे लोक पुढे येत गेले. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या मोदींची राष्ट्रीय स्तरावर भाजपचे नेतृत्व करण्याची आकांक्षा बळावत चाललेली आहे.

त्यातच सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासादायक निर्णय व अमेरिकन काँग्रेसच्या अभ्यासगटाकडून प्रशंसा या दोन अनुकूल घटना याच आठवड्यातल्या. त्यामुळे प्रतिमा सुधारण्याची ही अभूतपूर्व संधी नरेंद्र मोंदींनी सोडणे शक्यच नव्हते. तीन दिवस सद्‌भावना उपवास (उपोषण नव्हे) करताना मोदींनी केलेले शक्तीप्रदर्शन व वातावरणनिर्मिती अनेकांच्या उपहासाचा विषय ठरला असला तरी याचमुळे भारावून गेलेला वर्गही फार मोठा आहे.

या तीन दिवसांच्या काळातील मोदींचा वावर पाहिला व भाषणे ऐकली तर त्यांच्या देहबोलीतून व बिटविन द लाइन्स वक्तव्यांतून ते कितीतरी जास्त व खरे सांगून जातात. भाजपच्या अनेक नेत्यांना तर मोदींनी आपल्यामागे फरफटत आणले हे त्यांचे चेहरेच सांगतात. उपवास सुरू करताना मोदींनी केलेल्या अर्ध्या तासाच्या भाषणात विरोधी पक्षांची व नेत्यांची नावे घेतली नाहीत हे अनेकांच्या लक्षात आले, पण त्यांनी भाजप व भाजपचे नेते यांचेही उल्लेख केलेले नाहीत हे लक्षणीय आहे. 

संपूर्ण भाषणात गुजरातच्या विकासाबाबत बोलताना ‘तो मी केला आहे’ हा सूर आहे आणि ‘माझी बदनामी ही गुजरातच्या जनतेची बदनामी आहे’ असे सूचित केले आहे. मोदींनी या उपवासाच्या काळात जात-धर्माच्या पलीकडे जाण्याची भाषा केली असली तरी पूर्वी जे झाले त्याबद्दल अभिमानच ध्वनीत केला आहे.  मुळातच ‘जात’ व ‘धर्म’ यावर आधारित राजकारणाच्या बळावर एका मर्यादेपलीकडे जाता येत नाही. खऱ्या अर्थाने विकास व विस्तार करायचा असल्यास त्यापलीकडे जावेच लागते. आणि आता तर भारताच्या राजकारणाचे केंद्र ‘जात-धर्म’ याऐवजी ‘विकास-प्रशासन’ बनू पाहात आहे. 

या पार्श्वभूमीवर मोदींनी आपली मलीन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आणि स्वत:च्या राजकारणाच्या कक्षा रुंदावण्यासाठी वेगळी चाल खेळणे स्वाभाविक आहे, पण हा सद्‌भावना उपवास त्यांना सद्‌बुद्धी देईल काय? शक्यता, जवळपास नाही! कारण मोदी केवळ भावनिक स्तरावर बोलत आहेत, वैचारिक पटलावर नाही!   

Tags: गोध्रा हत्याकांड जात-धर्म नरेंद्र मोदी मुख्यमंत्री गुजरात Godhra massacre caste-religion Narendra Modi Chief Minister Gujarat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके