डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अस्सल भारतीयत्वाचा अविष्कार

मुळात सिनेमा हे अनेक कलांचे संयुग असते. त्यामुळे कोणत्याही सिनेमाचा दिग्दर्शक व्हर्सेटाइल असावा लागतो. या पार्श्वभूमीवर सत्यजित राय यांच्याकडे पाहिले तर ‘व्हर्सेटाइल’ या शब्दाचा अर्थच थिटा पडावा असे जाणवते. त्यांनी किती विविध प्रकारच्या कला व विद्या आत्मसात केल्या होत्या, याचा अचंबा वाटत राहतो. विशेष म्हणजे या सर्वांच्या साथीला पक्की विज्ञाननिष्ठा होती आणि राजकीय भानही होते. भारतीय संस्कृतीमधील अस्सल काय आहे हे त्यांना जसे कळलेले होते, तसे त्यातील ‘टाकाऊ’ काय आहे, हेही त्यांनी पुरेपूर ओळखले होते. पूर्व व पश्चिम यांना जोडणारा पूल असे त्यांच्याबाबत म्हणता येईल. त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतरचा व्हर्सेटाइल बंगाली माणूस म्हणून सत्यजित राय यांचे नाव घ्यावे लागेल. भारतरत्न दिला गेला असा सिनेमा क्षेत्रातील सत्यजित राय हा पहिला माणूस होता, तो यामुळेच! 

भारतीय सिनेमाचे शताब्दी वर्ष आले तेव्हा म्हणजे 2013 च्या 15 ऑगस्टला साधना साप्ताहिकाने ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा’ या विषयावर पूर्ण अंक प्रकाशित केला होता. त्या अंकाची थीम उदयाला येण्यास कारणीभूत ठरला होता, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकातील समारोपाच्या प्रकरणातील शेवटचा परिच्छेद! तो परिच्छेद असा आहे- ‘‘भारत हे एक राष्ट्र आहे याचा विचार करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे आजच्या भारताचे भवितव्य परमेश्वराच्या हातात नसून, सामान्य माणसाच्या हातात आहे. त्यामुळे, जोपर्यंत भारतीय संविधान ओळखू न येण्याइतपत बदलले जात नाही, जोपर्यंत निवडणुका नियमितपणे व योग्य पद्धतीने होत राहतील, जोपर्यंत व्यापक अर्थाने धर्मनिरपेक्षतेचे वातावरण टिकवले जाईल, जोपर्यंत देशातील लोक आपल्या पसंतीची भाषा बोलू व लिहू शकतात, जोपर्यंत सर्वसमावेशक बाजारपेठ अस्तित्वात आहे, जोपर्यंत नागरी प्रशासन, सैन्यसेवा उपलब्ध आहे; आणि हो, जोपर्यंत हिंदी सिनेमे सर्वत्र पाहिले जातात व त्यातील गाणी ऐकली जातात, तोपर्यंत भारत या राष्ट्राचे अस्तित्व राहील!’’ 

या परिच्छेदातून भारत देश एकत्रित ठेवणारे प्रमुख घटक (बाईडिंग एजंट) कोणते आहेत हे सांगताना हिंदी चित्रपटाला जे स्थान दिले आहे, ते विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे, एकूणच ‘चित्रपट’ या कोलाज आर्टकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो आणि मग भारतातील अन्य भाषांतील सिनेमे त्या-त्या प्रदेशांत त्याच प्रकारची भूमिका बजावतात हे उघड आहे. दक्षिण भारतात हिंदीचा प्रभाव नाही किंबहुना हिंदीला कडवा विरोध राहिला आहे, म्हणून कन्नड, तमिळ, तेलुगु व मल्याळम्‌ या भाषांमधून आलेले सिनेमे आपापल्या प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून राष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरत राहिले. (तसाच प्रकार काही प्रमाणात, काही चढ-उतारांसह मराठी सिनेमांच्या बाबतीत घडत राहिला.) मात्र दक्षिण भारतातील त्या चार भाषांमधील सिनेमा ज्या प्रकारे प्रगल्भ व लोकप्रिय होत राहिला, त्याचप्रमाणे किंबहुना अधिक प्रमाणात बंगाली सिनेमा तशी भूमिका पश्चिम बंगालमध्ये बजावत राहिला आणि त्याचीही दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जात राहिली. मात्र त्या सर्वांचे अग्रस्थान किंवा शिरोमणी म्हणावेत असे व्यक्तिमत्त्व म्हणजे सत्यजित राय. त्यांनी आपले बहुतांश चित्रपट बंगाली भाषेतच केले, तरीही ते केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरत राहिले. इतके की स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारतीय सिनेमाची’ जी काही ओळख निर्माण झाली ती प्रामुख्याने सत्यजित राय यांच्या बंगाली सिनेमांमुळे! अशा या राय यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 2 मे रोजी संपत आहे. मागील संपूर्ण वर्ष जगाला आणि देशाला कोविड 19 ने प्रभावित केले, त्यामुळे त्या अस्वस्थ वातावरणात सत्यजित राय यांचे जन्मशताब्दी वर्ष आले आणि आता संपलेही! मात्र समारोपाला त्यांच्यावर एक पूर्ण अंक साधनाला काढता आला याचा आनंद आहे. 

2 मे 1921 ते 23 एप्रिल 1992 असे 71 वर्षांचे आयुष्य सत्यजित राय यांना लाभले. वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी ‘पथेर पांचाली’ (Song of Little road) हा सिनेमा तयार केला. त्याला सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमासाठी दिले जाणारे राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ 1956 मध्ये मिळाले. ते सुवर्णकमळ देण्यास सुरुवात झाली 1954 मध्ये, त्या वर्षी ते आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमाला मिळाले होते, नंतरच्या वर्षी सोहराब मोदी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मिर्झा गालिब’ या हिंदी सिनेमाला मिळाले. त्यानंतरच्या म्हणजे तिसऱ्या वर्षी ‘पथेर पांचाली’ या बंगाली सिनेमाला मिळाले. हा क्रम लक्षात घेतला आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले दशक म्हणजे गांधी हत्येनंतरच्या नेहरू कालखंडात घडत असलेला भारत समजून घेण्याचा प्रयत्न केला तर, ‘पथेर पांचाली’चे महत्त्व लक्षात येईल. एवढेच नाही   तर, पथेर पांचालीमधील जीवनसूत्र पुढे चालवणारे ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ हे दोन सिनेमेही सुवर्णकमळ विजेते ठरले. ही अशी हॅटट्रीक म्हणजे काही योगायोग नाही, अपघातही नाही आणि जुगाड तर नाहीच नाही! त्या ‘अपूत्रयी’ने जगभरातील सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांना अचंबित केले. 

सत्यजित राय यांनी एकूण 38 वर्षे काम केले, त्या काळात त्यांचे 36 चित्रपट आले. त्यात पूर्ण लांबीचे चित्रपट, लघुपट, वृत्तचित्र (पट), बालचित्रपट आले. म्हणजे सरासरी वर्षाला एक इतकेच ते प्रमाण राहिले आहे. पण त्या चित्रपटांतून त्यांनी हाताळलेले आशय व विषय पाहिले तर त्यातून भारतीयत्वाचे कोलाज दिसते. 

प्रस्तुत अंकाच्या शेवटी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांची यादी दिली आहे. त्यात पटकथा, संगीत, संकलन, छायाचित्रण व कलादिग्दर्शन करणारांची नावेही दिली आहेत. त्यावरून नजर टाकली तर लक्षात येते, या सर्व 36 चित्रपटांच्या पटकथा स्वत: राय यांनीच लिहिल्या आहेत; शिवाय त्यातील 30 चित्रपटांना संगीत त्यांनी स्वत:च दिले आहे. उर्वरित सहा चित्रपटांना संगीत रवि शंकर, विलायत खां, अली अकबर खां, जोतींद्र मित्रा यांनी दिले आहे. त्यांच्या सर्व 36 चित्रपटांचा संकलक (एडिटर) एकच राहिला आहे- दुलाल दत्ता! कलादिग्दर्शक म्हणून बन्सी चंद्रगुप्त यांनी 19 तर अशोक बोस यांनी 17 चित्रपटांसाठी काम केले आहे. छायाचित्रणाचे काम सुब्रतो मित्रा (9), सौमेंदू रॉय (23) वरुण रहा (4) या तिघांनी केले आहे. असे टीमवर्क भारतीय तर सोडाच जागतिक चित्रपटसृष्टीत क्वचितच असेल; या टीमच्या नेतृत्वासाठीही सत्यजित राय यांना एक मोठा मोठ्ठा पुरस्कार द्यायला हवा होता. 

अर्थातच, या ‘टीमवर्क’मुळे या 36 चित्रपटांची (स्वीकारार्हता कमी-अधिक असेल पण) प्रत्येक फ्रेम मोजून-मापून वापरली गेली आहे. एकही दृश्य, एकही संवाद अनावश्यक आहे असे कुठेही वाटत नाही. दृश्ये विनोदी असोत वा गंभीर,  निसर्गाची असोत वा चेहऱ्यावरील भाव-भावनांची, परिपक्वता कुठेही सुटलेली दिसत नाही. ‘गोपी गाईन बाघा बाईन’ हा बालकुमारांसाठी(?) केलेला विनोदी लघुचित्रपट असो वा ‘सिक्कीम’ ही त्या देशाच्या (भारतात सामील होण्यापूर्वीच्या) राजघराण्यासाठी केलेली भारदस्त डॉक्युमेंटरी असो, अभिजातता कुठेही हरवत नाही. 

मुळात सिनेमा हे अनेक कलांचे संयुग असते. त्यामुळे कोणत्याही सिनेमाचा दिग्दर्शक व्हर्सेटाइल असावा लागतो. या पार्श्वभूमीवर सत्यजित राय यांच्याकडे पाहिले तर ‘व्हर्सेटाइल’ या शब्दाचा अर्थच थिटा पडावा असे जाणवते. त्यांनी किती विविध प्रकारच्या कला व विद्या आत्मसात केल्या होत्या, याचा अचंबा वाटत राहतो. विशेष म्हणजे या सर्वांच्या साथीला पक्की विज्ञाननिष्ठा होती आणि राजकीय भानही होते. भारतीय संस्कृतीमधील अस्सल काय आहे हे त्यांना जसे कळलेले होते, तसे त्यातील ‘टाकाऊ’ काय आहे, हेही त्यांनी पुरेपूर ओळखले होते. पूर्व व पश्चिम यांना जोडणारा पूल असे त्यांच्याबाबत म्हणता येईल. त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतरचा व्हर्सेटाइल बंगाली माणूस म्हणून सत्यजित राय यांचे नाव घ्यावे लागेल. भारतरत्न दिला गेला असा सिनेमा क्षेत्रातील सत्यजित राय हा पहिला माणूस होता, तो यामुळेच! 

टागोरांनी छोट्या सत्यजितला त्याच्या डायरीवर ज्या ओळी लिहून दिल्या होत्या, त्या कमालीच्या भविष्यवेधी ठरल्या. (या अंकात त्या इंग्रजी ओळी तशाच्या तशा आल्या आहेत.) ‘जे ब्रह्मांडी ते पिंडी’ हा त्या ओळींचा गाभा आहे आणि सत्यजित राय यांनी आपल्या सर्व चित्रपटांतून तोच गाभा पुन:पुन्हा अधोरेखित केला आहे. 

अशा या सत्यजित राय यांचे नाव भारतभरात सर्वपरिचित आहे, त्यांचे मोठेपणही निर्विवाद मानले जाते. मात्र त्यांच्या कार्याची ओळख सांगा म्हटले तर बहुतांश लोकांना दहा-बारा वाक्यांपलीकडे जाता येत नाही. त्यांचा परिचय जागतिक स्तरावर भारतीय सिनेमाची ओळख करून देणारा दिग्दर्शक असा करून दिला जातो; मात्र तसा परिचय करून देणाऱ्यांनी सत्यजित राय यांचे किती चित्रपट पाहिलेले असतात, याचा शोध घेतला तर आश्चर्याचा धक्काच बसतो, बहुतांश लोकांनी एकही सिनेमा पाहिलेला नसतो. अशा पार्श्वभूमीवर सत्यजित राय यांच्यावर पूर्ण अंक काढताना त्यांचे अधिक ‘अपरिचित’ पैलू व काम पुढे आणावे असे आम्ही ठरवले होते. याचे एक कारण अंकासाठी पानांची मर्यादा हे असले तरी त्यांच्या विख्यात कलाकृतींविषयी कुठे ना कुठे प्रसिद्ध होत आले आहे आणि ते सर्व तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे आता उपलब्धही आहे. 

या संपूर्ण अंकाचे लेखन व संपादन करण्यासाठी विजय पाडळकर यांना आम्ही विनंती केली, याचे एक कारण उपलब्ध वेळ कमी होता, पण मुख्य कारण मागील दोन दशकांतील त्यांचा अर्ध्याहून अधिक वेळ सत्यजित राय यांचा शोध घेण्यात गेला असावा. जेव्हा एखादा असा तज्ज्ञ हाताशी असतो तेव्हा एकहाती केलेला अंक अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता असते. अपरिचित सत्यजित राय हा अंक सिनेमा क्षेत्रांतील विषेज्ञांना व राय यांच्या चाहत्यांना कदाचित फार काही नवे देणार नाही. पण अनेक नव्या-जुन्या वाचकांना बरेच दिवस मनात असलेले मात्र राहून गेलेले एक दालन खुले करण्यास प्रवृत्त करेल. मुख्य म्हणजे सर्व स्तरांतील तरुण वर्गाला सर्वाधिक जवळचे वाटणारे चित्रपट हे माध्यम असल्याने ‘तरुणाई’ या अंकाचे स्वागत करेल.  

----

साधनाच्या वर्गणीदार वाचकांसाठी सूचना 24 एप्रिल व 1 मे हे दोन अंक अनुक्रमे ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ आणि ‘अपरिचित सत्यजित राय’ या दोन विषयांना वाहिलेले होते. या दोन्ही अंकांच्या पानांची संख्या नियमित अंकाच्या दीडपट होती. त्यामुळे यानंतरचा म्हणजे 8 मे 2021 चा अंक प्रकाशित होणार नाही. 15 मे व त्यानंतरचे अंक नियमितपणे प्रकाशित होत राहतील. कोविडची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रातील जनजीवन ठप्प झाले आहे. मात्र पोस्टाचे कामकाज चालू आहे. त्यामुळे साधना साप्ताहिकाचे छापील अंक नियमितपणे प्रकाशित होत राहतील, प्रत्येक सोमवारी पोस्टाद्वारे रवाना होत राहतील. अंक मिळण्यात काही अडचणी येत असतील तर साधना कार्यालयाशी फोन, मेसेज वा मेलद्वारे संपर्क साधावा. साधनाचा प्रत्येक अंक त्या-त्या आठवड्यात वेबसाइटवर अपलोड केला जातो. वार्षिक वर्गणी संपली/ लवकरच संपणार आहे, त्यांनी नूतनीकरण करताना दोन किंवा तीन वर्षांची वर्गणी भरण्याचा पर्याय स्वीकारल्यास दोन्ही बाजूंनी सोयीचे ठरते. धन्यवाद..!

- संपादक, साधना   

Tags: सिनेमा भारतरत्न दिग्दर्शक चित्रपट कला भारतीय चित्रपट सत्यजित राय weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके