डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

100 कोटी भारतीयांचा दोस्तीचा हात

वाजपेयी व नवाज शरीफ यांच्यांत वाटाघाटीच्या दोन-चार फेऱ्या झाल्या म्हणजे भारत-पाक यांच्यांतील सर्व प्रश्न सुटतील असे नाही. पण भारत-पाक संबंध सुधारणे ही काळाची गरज आहे, त्याकरता प्रामाणिक प्रयत्न करावयास हवेत हे दोन्ही देशांतील सरकारांना पटले हेच महत्त्वाचे आहे.

‘‘१०० कोटी भारतीयांच्या वतीने दोस्तीचा हात घेऊन मी चाललो आहे,’’ असे उद्गार भारत-पाक सीमा ओलांडणाऱ्या  प्रवासामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांनी काढले. एकीकडे आनंद आहे. दुसरीकडे ही वेळ येण्यास खूप उशीर झाला याचा खेद होतो, अशा संमिश्र भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. प्रत्यक्ष प्रवासात जो प्रतिसाद मिळाला तो अभूतपूर्व आणि अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त होता. पाकिस्तानच्या पथकाने तर 1940 मध्ये गाजलेल्या 'नाचोगे मेरे साथ तो दिल मिलेगा' या पंजाबी गीताची धून वाजवून फाळणीआधीचे कलेवरील, संगीतावरचे, चित्रपटातील गाण्यावरचे प्रेम आणि त्यातून निर्माण झालेले भावविश्व एकच होते याची आठवण करून दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जन्मगाव, भारताच्या अमृतसर जिल्ह्यातील जाती उमरा हे खेडे आहे. तेथील दोन पसे माती एका कुंभातून नेऊन ती वाजपेयी यांनी शरीफ यांच्या हाती सोपविली.

त्या गावपंचायतीने आपल्या गावाला भेटायला या असे आपल्या भूमिपुत्राच्या नावाने दिलेले पत्रही वाजपेयींनी शरीफ यांना दिले. शरीफ यांचा गळा भरून आला. 'गेली 50 वर्षे आम्ही एकमेकाकडे शत्रू म्हणून पाहत होतो. आमच्यातील मैत्री वाढविण्यासाठी आम्हांला एक संधी या', असे उद्गार वाजपेयी यांनी काढले. तर यापूर्वी पाकिस्तानात काही विपरीत घडले तर त्याचा दोष आम्ही भारताला देत असू किंवा भारतात काही घडले तर पाकिस्तानवर आरोप होत असत. हे सर्व थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे शरीफ यांनी सांगितले.

'उभय देशांतील कोणताही प्रश्न हिंसेने सुटणार नाही, याची खात्री मला पटली आहे. काही महिन्यांतच नव्या सहस्रकात आपण प्रवेश करणार आहोत, त्या वेळी भविष्यकाळ आपल्याला साथ करणार आहे... आपल्या मुलांचे, त्यांच्या मुलांचे आणि पुढील पिढ्यांचे हित आपण जपणार आहोत की नाही? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यावेच लागेल' हे वाजपेयीचे उद्गार बदलाचे वारे स्पष्ट सूचित करतात.

अपघाती अणुयुद्धाचा धोका कमी करणे, अणुचाचण्यांवर प्रतिबंध घालणे, सिमला करारावर विश्वास व्यक्त करून जम्मू आणि काश्मीर प्रश्नासह उभय देशांमधील सर्व द्विपक्षीय वादग्रस्त प्रश्न सोडविण्यासाठी वेगाने पावले उचलणे आणि एकमेकांच्या अंतर्गत कामकाजामध्ये ढवळाढवळ व मध्यस्थी करण्याचे टाळणे या महत्त्वपूर्ण मुद्यांवर भारत व पाकिस्तानमध्ये एकमत झाले. परस्पर विश्वासनिर्मिती संदर्भातील दोन करारांवर उभयतांनी स्वाक्षऱ्या केल्या ही एक चांगली सुरुवात आहे. भारत-पाक (नेपाळ-श्रीलंका-मालदीव) यांचे अनेक क्षेत्रांतील हितसंबंध समान आहेत, समस्या समान आहेत. विकासाची गरजही समान आहे. भारत-पाक संबंध सुधारले तर व्यापारविषयक करार होतील, आर्थिक करार होऊन सहकार्य वाढीला लागेल, संरक्षणावरील खर्च कमी करता येतील. अशा कारणांमुळे उभय देशांतील संबंध सुधारणे ही दोन्ही देशांची गरज आहे. जगापुढे एकसंध उभे राहिले तर त्यांचे बळ दसपटीने वाढणार आहे. 

याच भेटीत पाकिस्तान पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि भारतीय पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल या दोघांनी या दोन प्रांतांत खूप बाबतीत सहकार्य चालावे, सांस्कृतिक बंध पक्के करावेत असे एकमताने जाहीर केले. वाजपेयी यांची पाक भेट निश्चित झाल्याबरोबर श्री. बादल यांची सूचना होती की लाहोरहून पाकमधील नैसर्गिक गॅस पंजाबमध्ये आणण्यासाठी वाटाघाटी करा. याचाच अर्थ दोन्ही देशांत लढाया करण्याऐवजी सहकार्य करून उभय देशांची गरज पूर्ण करण्याची सुरुवात करा असा होतो. अण्वस्त्रांनी कोणत्याच देशांचे भले झाले नाही. शस्त्रसज्जता म्हणून त्यांचे महत्त्व मानले तरी वापरण्यासाठी ते निरुपयोगी ठरत आहे. आर्थिक सत्ता आणि बळ हेच सर्वांत मोठे प्रभावी व तेवढेच विनाशकारी शस्त्र बनले आहे. त्यामुळे आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यास पर्याय राहिलेला नाही. भारत-पाक एकमेकांशी लढून अधिकाधिक दुर्बल होतील. हातात हात घालून मैत्री केली तर सबल होतील व दोन्ही देशांतील जनतेला सुबत्तेचे युग येईल. 

मुस्लीमदेषाचे वातावरण कायम ठेवून भारत-पाक संबंध सुधारणार नाहीत. याचा अर्थ वाजपेयी व नवाज शरीफ यांच्यांत वाटाघाटीच्या दोन-चार फेऱ्या झाल्या म्हणजे भारत-पाक यांच्यांतील सर्व प्रश्न सुटतील असे नाही. पण भारत-पाक संबंध सुधारणे ही काळाची गरज आहे, त्याकरता प्रामाणिक प्रयत्न करावयास हवेत हे दोन्ही देशांतील सरकारांना पटले हेच महत्त्वाचे आहे. पाकिस्तानशी युद्ध करून पाकिस्तान जिंकून घेतले पाहिजे ही भावना गेल्या पन्नास वर्षांत ज्यांनी जोपासली, त्या संघटनेचे वाजपेयी, पाकिस्तानशी लढाई करण्याची भूमिका सोडून वाटाघाटीने प्रश्न सोडवले पाहिजेत असे म्हणत आहेत याला मोल आहेच, पण भारत-पाक संबंध सुधारावयाचे तर भारतातील मुस्लीमद्वेषाचे वातावरण बदलण्यात पुढाकार घेण्याची गरज आहे. हे वातावरण निर्माण करणाऱ्या संस्था-संघटना आज कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर केन्द्र शासनावर दबाव ठेवून आहेत. या बाबत आता सर्वाधिक जबाबदारी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आहे.

भारत-पाकच्या स्वातंत्र्याला ब्रिटनने फाळणीचा कलंक लावला. त्याची सल पन्नास वर्षे लोकांच्या मनात तशीच आहे. या अनैसर्गिक फाळणीला नागरिकांनी कधीच मानसिक मान्यता दिली नाही. राजकीय प्रादेशिक सीमा बदलणे आता अशक्य असले तरी चांगले शेजारी होणे कठीण नाही. जगामधील 11 देश एकत्र येतात. त्यांच्या व्यापारासाठी म्हणून 11 ही देशांत चालणारे युरो चलन अस्तित्वात येऊ शकते. मग भारत-पाकिस्तानमधील दरी कमी करणे शक्य न होण्याचे काय कारण ? यासाठीचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे पाहावयास हवे. ‘गुफ्तगू बंद न हो. बातसे बात चले! सुबह तक शामे मुलाकात चले ।’ ही सरदार अली जाफरी यांची कविता भारत-पाक यांच्यात सुरू झालेल्या संवादाचे सूत्र आहे. संवादाची सायंकाळ अशी अखंड चालू राहावयास हवी. सकाळ निश्चित उजाडेल हे आश्वासन त्यातच आहे. ती सकाळ उजाडावी आणि शांततेच्या सूर्याने दोन्ही देशांतील मैत्रीला उजळावे अशी सदिच्छा दोन्ही देशांतील सामान्य नागरिक फार मोठ्‌या संख्येने व आशेने बाळगून आहेत. ती सुफल संपूर्ण होवो.

Tags: दिल्ली-लाहोर नवाझ शरीफ अटल बिहारी वाजपेयी सांस्कृतिक बंध भारत-पाकिस्तान मैत्री delhi to lahore nawaz sharif atal vihari wajpeyi cultural bonds bharat-pakistan friendship weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके