डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जब्बार पटेल यांनी ‘सामना’ची पटकथा 1974 मध्ये वाचली, तेव्हा त्यांनी तेंडुलकरांना पहिला प्रश्न हा विचारला होता की, ‘तुम्ही, ‘सामना’मध्ये आमदार, खासदार, मंत्री असे सत्ताकेंद्र न दाखवता; सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन का दाखवला आहे?’ या प्रश्नाला तेंडुलकरांचे उत्तर असे होते की, ‘साखर कारखान्याच्या चेअरमनकडे जी सत्ता असते, ती आमदार-खासदार-मंत्री यांच्याकडे नसते.’

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘माइलस्टोन’ मानला जाणारा आणि राजकारण हा विषय केंद्रस्थानी असलेला पहिला गंभीर मराठी चित्रपट ‘सामना’ प्रदर्शित झाला, त्याला आता 40 वर्षे झाली आहेत. विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेला, जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला आणि डॉ.श्रीराम लागू व निळू फुले यांची जुगलबंदी असलेला हा चित्रपट आहे.

‘सामना’ 40 वर्षांचा होतोय, हे लक्षात घेऊनच आम्ही ‘साधना’च्या 2014 च्या दिवाळी अंकात जब्बार पटेल यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध केली होती आणि सिनेमाच्या आशयाचे समकालीनत्व लक्षात घेऊन, त्या दिवाळी अंकाच्या मुख्यपृष्ठावर ‘सामना’तील ती प्रसिद्ध भावमुद्रा घेतली होती: सामनातील मास्तर (डॉ.लागू), हिंदुरावांना (निळू फुले) म्हणतात, ‘मालक, आता एकदाच सांगा मला, मारुती कांबळेचं नक्की काय केलंत आपण? कसा संपवलात त्याला?’ हा प्रश्न चिरंतन आहे. कसे संपवलेत दाभोलकरांना, कसे संपवलेत पानसरेंना, हे आपल्या मनातले प्रश्न त्याच प्रकारचे आहेत. आणि मास्तर व हिंदुराव या प्रवृत्तीही कायम आहेत.

या ‘सामना’च्या चाळीशीच्या निमित्ताने 18 एप्रिल 2015 रोजी पुणे येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यात निर्माते रामदास फुटाणे, अभिनेते डॉ.लागू व दिग्दर्शक जब्बार पटेल हे तिघे व अन्य काही लोक सामील झाले होते. या कार्यक्रमात राज काझी यांनी सहभागी व्यक्तींशी संवाद साधला आणि अधूनमधून ‘सामना’तील काही दृश्ये, संवाद व गाणी दाखवली/ ऐकवली. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना ‘सामना’ची पार्श्वभूमी कळली, अनेकांची उजळणी झाली, हे सर्व ठीक आहे; पण डॉ.लागू व जब्बार पटेल या दोघांनी मांडलेले काही मुद्दे मात्र या चित्रपटाकडे आणि राजकारणाकडे पाहण्यासाठी नवे आयाम देणारे आणि आपल्या समाजाच्या मानसिकतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहेत.

जब्बार पटेल यांनी ‘सामना’ची पटकथा 1974 मध्ये वाचली, तेव्हा त्यांनी तेंडुलकरांना पहिला प्रश्न हा विचारला होता की, ‘तुम्ही, ‘सामना’मध्ये आमदार, खासदार, मंत्री असे सत्ताकेंद्र न दाखवता; सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन का दाखवला आहे?’ या प्रश्नाला तेंडुलकरांचे उत्तर असे होते की, ‘साखर कारखान्याच्या चेअरमनकडे जी सत्ता असते, ती आमदार-खासदार-मंत्री यांच्याकडे नसते.’ तेंडुलकरांचे हे उत्तर वरवर पाहणाऱ्यांना पटणार नाही. आम्हालाही ते पूर्वी तितकेसे पटले नसते; पण तेंडुलकरांचे हेच आकलन, अगदी आश्चर्यकारक पद्धतीने आप्पासाहेब सा.रे.पाटील यांच्या बोलण्यातून आले आहे. तब्बल 35 वर्षे एका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहिलेल्या आप्पासाहेबांच्या आठवणींचा संग्रह असलेले पुस्तक याच आठवड्यात प्रकाशित होत आहे, त्यात त्यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे की, ‘मला आमदार, खासदार, मंत्री या पदांचे आकर्षक फारसे नव्हते. साखर कारखान्याचा चेअरमन जे करू शकतो ते आमदार, खासदार करू शकत नाही.’ म्हणजे कशी गंमत आहे पहा... अभ्यास-निरीक्षण यातून आकाराला आलेले तेंडुलकरांचे आकलन आणि आप्पासाहेबांचे अनुभवसिद्ध आकलन सारखेच आहे.

या एका निरीक्षणाचे सविस्तर स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला तर राजकारण व समाजकारण यांच्यातील लागेबांधे, ताणेबाणे अधिक चांगले कळू शकतील. आणि महत्त्वाचे म्हणजे राजकीय वास्तवाचे भान अधिक चांगले येऊ शकेल. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, आमदार व खासदार अनुक्रमे विधिमंडळात व संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करतात आणि कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन, राज्याच्या व केंद्रिय सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम करतात. म्हणजे त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक पटावर असते आणि राज्याच्या-देशाच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णयामध्ये ते आपला सहभाग नोंदवू शकतात.

साखर कारखान्याच्या चेअरमनचे तसे नसते; त्याचे कार्यक्षेत्र फारच मर्यादित असते; आपला तालुका आणि फार तर जिल्ह्यातील अन्य काही प्रदेश एवढ्यापुरतीच त्याची सत्ता असते. पण साखर कारखाना व त्या अनुषंगाने येणारे इतर उद्योग किंवा संस्था यांच्या माध्यमातून तो त्या परिसरातील घराघरांत पोहोचलेला असतो. तो त्यांच्या सुख-दु:खाशी  थेट निगडीत असू शकतो, हस्तक्षेप करू शकतो. कारण साखर कारखाना येतो; तेव्हा त्या भागातील शेतकरी आणि कामगार तर त्याच्याशी जोडले जातातच; पण कारखान्याच्या माध्यमातून पाणीयोजना, शाळा-कॉलेज, हॉस्पिटल, पोल्ट्री, वाईनरी, दूध डेअरी, ग्राहक भांडार, सहकारी सोसायट्या, खरेदी-विक्री संघ, बी-बियाणांची केंद्रं, बँका आणि पतसंस्था अशा अनेक लहान-मोठ्या सत्ताकेंद्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असतो.

किंबहुना अशी सर्व लहान-लहान सत्ताकेंद्रे बरोबर असल्याशिवाय साखर कारखाना उभारता येत नाही, चालवता येत नाही, तिथली सत्ता टिकवता येत नाही. शिवाय, हे सर्व मिळवणे आणि सांभाळणे याला अफाट ताकद व अमर्याद क्षमता असाव्या लागतात. आणि म्हणूनच कदाचित, ‘सामना’तील हिंदुराव म्हणतात, ‘‘मास्तर, एक वेळ मुंबईत राहून राज्य चालवणं सोपं आहे, पण गावात राहून गावाचा कारभार करणं हे काम कठीण आहे. खूप तऱ्हेतऱ्हेची माणसं भेटतात, त्या सर्वांना बरोबर घेऊन चालावं लागतं.’’

सहकार चळवळ कोणत्या हेतूने निघाली आणि तिचे आता काय झाले आहे, यावर अतिशय परखड भाष्य आप्पासाहेबांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे. पण सहकाराने त्या-त्या प्रदेशात/भागात विकासाची गंगा पोहोचवली, हे विजय तेंडुलकर व डॉ.जब्बार पटेल यांनीही मान्य केले आहे. आणि म्हणूनच, हिंदुराव पाटील नावाच्या प्रवृत्तीचे आकलन करून घेणे व सतत पुनरावलोकन करीत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी ही प्रवृत्ती कशी बदलत गेली, का बदलत गेली याची चिकित्सा व्हायला हवी. म्हणजे सहकारामध्ये सामील झालेले सुरुवातीचे बहुतांश लोक ध्येयवादीच होते, पण नंतरच्या काळात या ध्येयवादाला सुरुंग कसा लागत गेला, याची मीमांसा करता आली तर आपले समाजजीवन व राजकारण अधिक चांगले समजून घेता येईल. शिवाय राजकारणाकडे पाहताना आपण सर्व काही कळत असूनही, काळ्या किंवा पांढऱ्या रंगातच चित्र रंगवत असतो. मात्र सर्व जीवनव्यवहारच काळ्या-पांढऱ्यांतून तयार झालेल्या करड्या रंगांच्या विविध छटांचा असतो. हे लक्षात घेतले तर करड्या रंगात पांढऱ्याचे अंश जास्त कसे वाढतील किंवा काळ्याचे अंश कमी कसे होतील, याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता अधिक पटू शकेल. आणि अर्थातच, यासाठी झटपट वा ताबडतोबीची उत्तरे असू शकणार नाहीत.

त्या कार्यक्रमात चर्चेला न आलेला, पण अत्यंत महत्त्वाचा असलेला मुद्दा ‘मास्तर’ नावाच्या ध्येयवादी प्रवृत्तीचा आहे. स्वातंत्र्यानंतर, सत्तेत सहभागी न होता समाजकारण करणाऱ्या ध्येयवादी प्रवृत्तींचाही ऱ्हास होत गेल्याचे दिसते. अनेक  ध्येयवादी प्रवृत्तीचे लोक प्रवाहपतित होत गेले किंवा भ्रमनिरासातून नामशेष किंवा निष्प्रभ होत गेले, हे आपणा सर्वांनाच माहीत असते; पण तसे का झाले याचेही विवेचन-विश्लेषण होणे गरजेचे आहे. उदात्त ध्येयवादाने भारावलेल्या लोकांनी टोकाचा संघर्ष करताना वास्तव समजून घेण्यात गफलत केली का, समाजमनावरील जोखडाचा व स्थितीशीलतेचा पुरेसा अंदाज त्यांना आला नाही का, अशा प्रश्नांचा वेध घ्यावा लागेल.

असा वेध घेतला तर कदाचित प्रकर्षाने पुढे येणारा मुद्दा हा असेल की, स्वातंत्र्योत्तर कालखंडात राजकारण व समाजकारण यातील, (म्हणजे सत्तेसह राजकारण व सत्तेशिवायचे राजकारण यातील) दरी दिवसेंदिवस रूंदावत गेली. एवढेच नाही तर त्यांच्यात कटुता निर्माण होत गेली, परस्परांविषयीचा विश्वास कमी होत गेला आणि तुच्छताभाव बळावत गेला. त्यामुळे राजकीय व सामाजिक ही क्षेत्रं नुसतीच वेगळी नाही तर परस्परविरोधी मानली जाऊ लागली. वस्तुत: ती परस्परांना पूरक आहेत. या दोन्हीशिवाय समाजजीवनाचा गाडा सुरळीत चालूच शकणार नाही. आणि म्हणूनच कदाचित, ‘सामना’मध्ये चित्रीत झालेले मास्तर व हिंदुराव पाटील परस्परांना शत्रू नव्हे तर मित्र मानतात. आजची परिस्थिती कशी आहे?

डॉ.श्रीराम लागू यांनी त्या कार्यक्रमात असे विधान केले की, ‘सामना’ हा खूपच मोठा अवकाश असलेला चित्रपट आहे, पण आम्ही तो गांभीर्याने घेतला नाही. चित्रपट करणाऱ्या आम्ही कलाकारांनीही त्याचे अनन्यसाधारणत्व समजून घेतले नाही, आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाही त्याचे महत्त्व कळले नाही. म्हणजे आपल्या आज-कालच्या समाजजीवनातील असंख्य पैलूंचे, गुणदोषांचे, प्रश्नांचे, समस्यांचे आणि अर्थातच वाटचालीच्या दिशादर्शनाचेही सूचन त्या चित्रपटातून होत आहे, असे डॉ.लागूंना त्या विधानातून ध्वनीत करायचे असावे.

डॉ.श्रीराम लागू यांनी त्याच कार्यक्रमात असेही विधान केले की, निळू फुले या नटाची आणि माणसाची कदर या महाराष्ट्राने केलेली नाही. या विधानाचेही स्पष्टीकरण त्यांनी फारसे केले नाही; पण निळू फुले हा जागतिक स्तरावरील अभिनेत्यांच्या तोडीचा कलावंत आहे, हे डॉ.लागू यांनी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे. मात्र या निळूभाऊंच्या अभिनय-क्षमतेला न्याय देतील, अशा भूमिका फारच कमी मिळाल्या आणि ज्या काही भूमिका मिळाल्या त्याकडेही प्रेक्षकांनी आवश्यक तितक्या गांभीर्याने पाहिले नाही, असा डॉ.लागूंच्या विधानाचा आशयविस्तार आहे. याच निळूभाऊंच्या राष्ट्र सेवादलातील संस्कारांचा, कलापथकांतून केलेल्या कामांचा आणि अंनिस व इतर चळवळींच्या माध्यमांतून केलेल्या कार्याचा उल्लेख अधूनमधून होत असतो; पण त्यांचे नेमके मोल महाराष्ट्राला जाणवलेले नाही, हीसुद्धा डॉ.लागू यांची खंत आहे.

निळूभाऊंच्या निर्मळ व मोठ्या मनाचे किस्से/प्रसंग त्यांच्या जवळचे लोक अधूनमधून सांगत असतात. पण एक मोठा प्रसंग मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. 2003 मध्ये निळूभाऊंना ‘महाराष्ट्रभूषण’ हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार देण्याचे ठरले होते आणि त्याप्रमाणे निवड समितीचे लोक निळूभाऊंना त्यांची संमती मिळविण्यासाठी भेटले होते. तेव्हा ‘माझे सार्वजनिक कार्य व कलाक्षेत्रातील योगदान, महाराष्ट्रभूषण द्यावे इतके मोठे नाही’ असे म्हणून त्यांनी नम्र नकार दिला होता. तरीही निवड समितीचे लोक आग्रही राहिले, तेव्हा निळूभाऊ म्हणाले, ‘‘माझे तुम्हाला इतके महत्त्व वाटत असेल तर मी नाव सुचवीत त्या व्यक्तीला तुम्ही महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्या.’’ आणि त्यानंतर त्यांनी डॉ.अभय बंग व डॉ.राणी बंग हे दांपत्य आदिवासीसाठी करीत असलेल्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्रभूषण द्यावा असे सुचवले.

वस्तुत: त्यावेळी डॉ.अभय बंग यांचा कुपोषणाच्या संदर्भातील अहवाल गाजत होता आणि त्यावरून राज्य सरकारवर कठोर ताशेरे ओढले जात होते. त्यामुळे सरकार व अभय बंग यांच्यात तणावाचे वातावरण असल्याचा संदेश जनमानसात पोहोचला होता. त्यानंतर काहीच काळाने अभय बंग यांना पुरस्कार जाहीर झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. सरकारने महाराष्ट्रभूषण का दिला आणि डॉ.बंग यांनी का स्वीकारला असे प्रश्नही उपस्थित झाले होते. पण सरकारला तो पुरस्कार देताना जे अवघडलेपण आले असेल, अपरिहार्यता वाटली असेल त्यामागे निळूभाऊ होते. (2006 मध्ये निळुभाऊंनी एका दीर्घ मुलाखतीच्या वेळी, ही आठवण आम्हाला केवळ दुसऱ्या भेटीत सांगितली होती... याचा अर्थ त्यांच्या जवळच्या काही लोकांना ती निश्चित माहीत असणार, म्हणून त्याचा जाहीर उच्चार येथे करणे अप्रस्तुत वाटत नाही.) असो.

तर अशा या ‘सामना’चे 40 वे वर्ष साजरे करीत असताना राजकारण व समाजकारण, ध्येयवाद व विधायक काम, चळवळी-आंदोलनांचा मार्ग व संस्थात्मक कार्य यांचा सम्यक-सकारात्मक दृष्टिकोनातून आणि व्यापक परिप्रेक्ष्यातून विचार करायला हवा. ‘सामना’चा गौरव करायचा म्हणजे तरी वेगळे काय करणार?  

Tags: विनोद शिरसाठ डॉ. श्रीराम लागू जब्बार पटेल निळू फूले सामना 40 वर्षांचा झाला संपादकीय vinod shirsath editorial Dr. Shriram Lagoo Jabbar Patel Nilu Phule Samana 40 Varshancha Zala Sadhana Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके