डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘झोपले अजून माळ वाळवीत काया, असंख्य ह्या नद्या अजून वाहतात वाया अजून हे अपार दुःख वाट पाहताहे, अजून हा प्रचंद्र देश भीक मागताहे।’ हे त्यांचे दुःख आहे आणखी एक खंत त्यांना सतत कोरत आली आहे. ‘अजून हे जवान हात झुंजती रिकामे, अजून वृद्धी आपुलाच वांझ गर्व आहे।’पण बाबा हताश नाहीत. नव्या वाटांच्या निमित्ताची ती धग अजून तेवढीच दाहक आहे.‘फिरून मी तयार सर्व टाकूनी पसारा, अश्रूंच्या वडाचा मजला इशारा’ दुःखाच्या मुलखातल्या प्रकाशयात्रिकाचे हे गाणे आहे. बाबांसारख्या माणसाच्या माथ्यावर असणारे अस्वस्थ असमाधानाचे शाप माणसांच्या जातीचे आशीर्वाद ठरतात. मोठाली स्वप्ने पाहण्याचे वेड घेऊन येणाऱ्या माणसांना समाधान कुठून मिळणार?
 

आनंदवनाच्या गेल्या दोन दशकांतील विस्ताराचा, त्याला फुटलेल्या प्रकाशाच्या धुमाऱ्यांचा, या धुमाऱ्यांनी उजळून टाकलेल्या अंधारक्षेत्राचा आणि सहस्रावधी अंधार-मनांचा मी उपकृत साक्षी आहे. अनेकांनी आनंदवन हे प्रेरणास्थान मानले, काहींनी ते श्रद्धेचे ठिकाण मानले. आपल्या मनांचे आणि आयुष्यांचे अंधारे मार्ग उजळून घ्यायला त्या किरणांच्या वस्तीत जाणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांनी ते प्रकाशाचे माहेर मानले. 
इथे अपंगांनी सपंगांचा अन् पीडितांनी परमेश्वराचा पराभव केला. परित्यक्त आणि रोगजर्जरांच्या पराक्रमाने निष्कारण जुलूस लादणाऱ्या विधात्याचा येथे संदर्भ हिरावून घेतला. आपल्या विजयाच्या कल्याणकारी प्रस्थापनेनंतर पांगळ्यांची ही सेना नव्या क्षितिजांच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्याच्या निवडीतून विकासाच्या नव्या वाटा घडवीत निघाली आहे.
बाबा आमटे हे या अपंग फौजेच्या मुक्तिलढ्याचे अपराजित सेनापती आहेत. आनंदवन ही महारोगी मंडळींनी आरंभापासून स्वयंपूर्ण राखलेली कृषी औद्योगिक वसाहत आहे. काहींनी या वसाहतीची तुलना ‘इस्रायली किबुत्झ’शी केली. या रोगाच्या शापितांनी हिरवीगार आणि भरघोस शेते पिकवली. छोटे छोटे उद्योग उभे केले. आपल्या श्रमातून आलेल्या संपत्तीच्या जोरावर आरोग्यसंपन्न माणसांसाठी महाविद्यालये उभी केली. हे विकासमान नियोजन राबवताना त्यात रुक्षता येऊ न देण्याचा कटाक्ष राखला. आनंदवनाचा परिसर हे रंगीबेरंगी जिवंतपणाचे परिक्षेत्र आहे.
स्वयंपूर्णतेतून येणारी आत्मसंतुष्टताही या मंडळींना शिवली नाही. आपल्यासारख्याच उपेक्षितांच्या दुःखदैन्याचे भान त्यांच्या पराक्रमाला आव्हान देत राहिले. दुःख-दैन्याला आपल्या महान देशात तोटा कुठला? दैन्याची वणवण शोधायला दूर जावे लागत नाही. घराची खिडकी उघडी ठेवली तरी पुरे. आनंदवनच्या मंडळींना चंद्रपूर जिल्ह्यातल्याच आदिवासींच्या अवस्थेचे आव्हान आकर्षित करीत राहिले. मग अशोकवन, सोमनाथचा प्रकल्प, श्रमिक विद्यापीठाचा संकल्प, आंधळ्या मुलांची प्रकाशाची शाळा, नागेपल्ली अन् हेमलकसाचे प्रकल्प उभे राहिले.
हेमलकसाचा प्रकल्प म्हणजे नुसता आदिवासींवर मोफत उपचार करणारा दवाखाना नव्हे. ते एक प्रकाश केंद्र आहे. या केंद्राने 
औषधोपचारच केले नाहीत. तर आदिवासींच्या खेड्यांतून विहिरी खणल्या. त्यावर पंप्स बसवून दिले. शेतीविषयीचे तंत्र नुसते सांगितले नाही, बियाण्यांचे, खतांचे वाटप केले, त्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा उपडल्या. रॉकेल, मिठासारख्या प्राथमिक गरजा भागवण्याची जबाबदारी पत्करली. अधिकारी अन् व्यापाऱ्यांच्या जुलूम-शोषणाविरुद्ध उसे राहायला या केंद्राने आदिवासींना शिकवले. एका सर्वांगीण लोकशिक्षणाचे हेमलकसा हे विद्यापीठ बनले. आनंदवनातल्या मंडळींच्या बोटे नसलेल्या हातांनी यशाच्या सिद्धी प्राप्त केल्या आहेत. संकल्प सोडण्याचा अवकाश, की पूर्तीच त्यांच्याकडे पळत आल्या आहेत. रस्त्याच्या कडेला पडलेले एक अर्भक एका सहृदय म्हातारीने या मंडळींच्या स्वाधीन केले. आनंदवनाने या अजाण जिवाचे स्वागत केले तेव्हा त्या सोहळ्यातली स्वागतगीते गायला पु. ल. देशपांडे अन् वसंतराव देशपांडेंसारखी मान्यवर माणसे आली. या अर्भकाचे 'धरती' असे नामकरण झाले अन् 'गोकुळ'चा आरंभ झाला. वंचकांच्या वर्गांनी जन्माला घालून अनाथ बनविलेल्या निष्याप जीवांना ‘गोकुळ’ने आईबाप दिले. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. आज गोकुळ नांदते-गाजते गजबजलेले आहे. एक दिवस मुंबईच्या फोरास रोडवर शरीर विकणाऱ्या आयांनी आपली मुले आनंदवनाच्या स्वाधीन केली. आनंदवनाने या मुलांना घर दिले. वय ओलांडलेल्या पण मन आणि बुद्धी शाबूत असलेल्यांच्यासाठी आनंदवनाचे उत्तरायण उखडले. त्याला ज्ञानपेढी मानले.

आनंदवन ते हेमलकसा हा एका लोकविलक्षण पराक्रमाचा प्रवास आहे. मुळात आनंदवनाची उभारणी हेच एका भन्नाट कविमनाचे ओजस्वी विलसीत आहे. ‘भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अमलात आणा' असा बाबा आमटे यांचा तरुणाईला संदेश आहे. मुळांत बाबांनी आनंदवनाचे पूर्वनियोजन भानपूर्वक केले असेल असे तेही सांगू शकणार नाहीत. लोकविलक्षण आयुष्ये ही नियोजनबद्ध आयुष्य असतात का? द. आफ्रिकेतून येणारा मोहनदास हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वाची 30 वर्षांची आखणी मनात तयार ठेवून आला का? विनोबांनी भूदानाच्या चळवळीचे प्लॅनिंग केव्हापासून चालवले होते? बाबांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘‘निबीडातून नवी वाट घडविण्याचे आव्हान जीवनाकडून प्रत्येकाला केव्हातरी मिळत असते. जे ते स्वीकारतात ते धन्य!’’ असली आव्हाने प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतीलही; पण ती ओळखणारे डोळे प्रत्येकालाच कुठे असतात? डोळे असणारेही नेमक्या वेळी ते मिटून घेण्याचा करंटेपणा करीत असावेत. एरवी एकलव्य एखादाच का निपजावा? असे आव्हान बाबांसमोर रस्त्याच्या कडेला चिखलात पडलेल्या अंगाची लक्तरे झालेल्या महारोग्याच्या रूपाने जेव्हा आले तेव्हा त्यांनी ते सर्व शक्तीनिशी प्रतिआव्हानासारखे स्वीकारले.

गांधी, सुभाषचंद्र, राजाजी यांसारख्या स्वातंत्र्यसेनानींचा सहवास, साने गुरुजींच्या सेवाजीवनाचा आणि विनोबांच्या मूक क्रांतीचा संस्कार व उदयशंकर ते ग्रेटा गार्बो या कलाक्षेत्रातील मान्यवरांचा स्नेह, असल्या दुर्मीळ गोष्टी वाट्याला येणे हेच मुळी एखाद्याला भाग्यवंत बनवायला पुरेसे आहे. एवढी पुण्याई पाठीशी घेऊन बाबांनी त्या महारोग्याला खांद्यांवर घेतले आणि आनंदवनाचा (आणि बाबा-साधनाताईंचाही) संसार साडेचौदा रुपयांच्या प्रचंड भांडवलावर सुरू ज्ञाला. थोरांचा सहवास, त्यांच्या कार्याचा परिचय वा प्रत्यक्ष मार्गदर्शन इ. गोष्टी नव्या कार्यकर्त्यांना फक्त उपकारक ठरत असतात. प्रेरणा ज्याची त्यानेच जागवायची-ओळखायची असते. बाबांनी प्रेरणा कुठून आणली? काही कविमनाच्या मंडळीनी बाबांना ‘वादळ' म्हटले आहे (आणि हे वादळ मुठीत ठेवणाऱ्या साधनाताईंच्या पराक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे.) बाबा आमटे हे वादळ असेल तर ते फक्त सामर्थ्य आणि गतिमानतेच्या संदर्भातच, एरवी वादळांना स्वतःची दिशा नसते. शिवाय त्यांना अल्पजीवितेचाही शाप असतो. बाबा आमटे नावाचे वादळ स्वरंप्रेरीत, स्वयंचलित आणि स्वयनियंत्रित आहे. या नियंत्रणाची बळ आणि प्रेरणा त्या वादळातच आहेत. शिवाय या वादळाला सातत्याचेही वरदान आहे.

‘‘दान देणाऱ्यांना 'दानशूर' अन् घेणाऱ्यांना ‘नादान’ बनवते. सेवा करणाऱ्यांना ‘सेवापरायण' अन् स्वीकारणाऱ्यांना ‘पंगू’ बनवते,’’  असे बाबांचे सूत्र आहे. ‘‘समाजातल्या दुबळ्या माणसांना दान नको, सेवा नको. या गोष्टींनी ह्यांची आधीच पिचलेली मने आणखी पिचतील. त्यांच्यासाठी काही करू नका. करायचे असले तर त्यांच्या सोबत राहून करा" असे ते म्हणतात. म्हणून दानशूर सेवक यांच्याहून, त्यांच्या मते मित्र श्रेष्ठ आहे. सेवेहून सहभाग मोठा आहेआनंदवनाची कथा ही एकट्या बाबांची वा त्यांच्या पांगळ्या साथीदारांची कहाणी नाही. या वास्तवात साधनाताई नावाची एक तेजाळ चेतना आहे. साधनाताईंना कुटुंबातल्पा साऱ्यांसोबत महारोग्यांचे कपडे धुताना, आनंदवनाच्या अंधाऱ्या रस्त्याचे, हाती सायनाइडची गोळी घेऊन चालताना, महारोग्यांच्या जखमांवर मायेची फुंकर घालताना ज्यांनी पाहिले त्यांना हे वर्णन अतिशयोक्त वाटणार नाही.मला ताईंची अनेक अनेक रूपे ठाऊक आहेत. कधीतरी एका नातेवाइकाकडे जाताना आनंदवनाचे वाहन वापरले म्हणून जास्तीचा खर्च संस्थेत जमा करणाऱ्या साधनाताई, हेमलकशाला राहणाऱ्या मुलांसाठी एखादी जिन्नस पोचवताच त्यांच्याकडून किंमत घेऊन पावत्या देवाऱ्या साधनाताई, बाबा ऑपरेशनसाठी इंग्लंडला गेले तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट होईपर्यंत सात दिवस उपास काढणाऱ्या साधनाताई, आनंदवनातल्या रोगमुक्तांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या हातात पैसे कोंबू पाहणाऱ्या मुंबईच्या अतिविशाल महिलांना कठोरपणे दटावणाऱ्या साधनाताई, कोणत्याही देवाला आपली पूजा हिच्याच हातून घडावी असे वाटायला लावणाऱ्या, रंगीबेरंगी फुलांच्या सुंदर सुंदर माळांनी पूजा बांधणाऱ्या साधनाताई, आपल्या सहजसुंदर भाषेतून आपल्या प्रियाराधनाची बुजरी कथा लिहिणाऱ्या साहित्यिक साधनाताई आणि ‘मी बाबांवर बोलणार’ असल्याचे त्यांना सांगताच ‘अरे, हा माणूस मलाच अद्याप समजायचा आहे!’ असे मला उडवून सांगणाऱ्या साधनाताई.

पू. अण्णासाहेब सहस्रबुद्धे म्हणायचे, ‘‘साधनाताई हे सावित्री या भारतीय स्त्रीच्या सनातन वास्तवाचे प्रतीक आहे.’’ रक्त ओकणाऱ्या आयुष्याची दोन वर्षांहून अधिक शाश्वती देता न येणाच्या बाबांशी कुटुंबाचा विरोध पत्करून त्यांनी विवाह केला. नरहर कुरुंदकरांना त्यांच्यात द्रौपदीची तेजाळ मूर्ती दिसते. बाबांसोबत, महारोग्यांचा सहवास खुशीने पत्करणाऱ्या साधनाताईत पु. ल. देशपांड्यांना नवऱ्यामागून स्मशानात जाऊन राहणाऱ्या पार्वतीची प्रतिमा दिसते.या बड्या मंडळींसारखे ताईचे वर्णन मला करता यायचे नाही. मला त्यांच्यातील 'आई'च सतत जाणवली आहे. उपरोक्त बड्या मंडळींनी त्यांना दिलेल्या उपाधींहून 'आई' हेच साधनाताईचे खरे बिरुद असल्याचे मला सारखे वाटले आहे. हेमलकशाच्या माहारू गोटाची बायको कॅन्सरने मरते. तिच्या शवाला मूठमाती द्यायला सारे जातात, तेव्हा ताईंना माहारूच्या तीन वर्षांच्या मुलाला स्वतः आंघोळ घालून खेळायला लावताना मी पाहिले. स्वत:च्या आईचे शव बाजूला पडले असताना गोकुळातल्या मुलाचे न्हाणे-माखणे करणाऱ्या साधनाताई मी पाहिल्या. आनंदवनातल्या रोगमुक्तांच्या विवाहांच्या वेळी नवऱ्याचे नाव घेणारी नवविवाहिता जेव्हा 'अमुक तमुकाचं नातं नाव घेते ताई-बाबांची लेक’ म्हणतात तेव्हा ताईंच्या डोळ्यांत दाटलेला मातृत्वाचा गहिवरही मी पाहिला. आनंदवन ही ‘संस्था' न होता कुटुंब बनले आहे. या कुटुंबातला जिव्हाळ्याचा स्रोत साधनाताईंचा आहे.

सोमनाथच्या प्रकल्पात असलेले शंकरदादा जुमडे अन् त्यांचे सहकारी, हेमलकशाला प्रकाश-मंदा, रेणुका, विलास, गोपाळ-प्रभा; आनंदवनात विकास, भारती, ताजणे, तळाळे, दादा अन् त्यांचे सहकारी ही सगळी झपाटलेली माणसे आहेत.आज आनंदवनाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. न्यूयॉर्क टाइम्सपासून डायजेस्टपर्यंत साऱ्या मान्यवर नियतकालिकांनी आनंदवनाचा एकमुखी गौरव केला आहे. इंग्रजी, फेंच भाषांतून अनेक प्रतिभावंतांनी त्यावर पुस्तके लिहिली. बाबांना व साधनाताईंना शेकडो पारितोषिके, सन्मान, पदव्या मिळाल्या. कधी कुणाला मिळाला नसेल असा मुलांनी खाऊचे पैसे जमवून दिलेला तीन लाखांचा पुरस्कार त्यांना मिळाला.पण बाबा आमटे अजून अस्वस्थ आहेत. सामाजिक संस्था कशा असाव्यात, राजकारण कसे उभे व्हावे, तरुणाईने कोणती स्वप्ने पाहावी? असल्या विषयावर ते बोलत-लिहीत आहेत. पांगळी माणसे एवढा पराक्रम करू शकतात तर हाती-पायी घड असलेल्यांचा समाज दरिद्री, अर्धपोटी का, या प्रश्नाने त्यांना कायमये डिवचले आहे. आनंदवनातल्या महारोग्यांनी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले अन् पिटाळून लावले. देशातल्या दारिद्र्याचे आव्हान कुणी पिटाळायचे ? बाबा जेव्हा हा सवाल विचारतात तेव्हा तो कृतिशून्य आणि वाचाळ पुढाऱ्यांनी ठोकलेल्या गरिबीविरुद्धच्या आरोळ्यांसारखा हास्यास्पद वाटत नाही. प्रयोगसिद्ध प्रमेयांसारखा तो मंत्रोच्चार वाटतो. 

‘झोपले अजून माळ वाळवीत काया, असंख्य ह्या नद्या अजून वाहतात वाया अजून हे अपार दुःख वाट पाहताहे, अजून हा प्रचंद्र देश भीक मागताहे।’ हे त्यांचे दुःख आहे आणखी एक खंत त्यांना सतत कोरत आली आहे. ‘अजून हे जवान हात झुंजती रिकामे, अजून वृद्धी आपुलाच वांझ गर्व आहे।’पण बाबा हताश नाहीत. नव्या वाटांच्या निमित्ताची ती धग अजून तेवढीच दाहक आहे.‘फिरून मी तयार सर्व टाकूनी पसारा, अश्रूंच्या वडाचा मजला इशारा’ दुःखाच्या मुलखातल्या प्रकाशयात्रिकाचे हे गाणे आहे. बाबांसारख्या माणसाच्या माथ्यावर असणारे अस्वस्थ असमाधानाचे शाप माणसांच्या जातीचे आशीर्वाद ठरतात. मोठाली स्वप्ने पाहण्याचे वेड घेऊन येणाऱ्या माणसांना समाधान कुठून मिळणार?

Tags: हेमलकसा साधनाताई आमटे बाबा आमटे ‘आनंदवन’ आनंदाचे निर्माते hemalkasa sadhanatai aamate baba aamate 'aanandvan' creaters of happyness weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके