डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव आहे?

125 वर्षांपूर्वी ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकरांनी प्रश्न विचारला की, लोक हो, तुम्ही विचारकलहाला का घाबरता? सांप्रत महाराष्ट्र देशी विचारकलह करावयाचा नाही, असा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे सारखेच दिसू लागले आहेत. चिपळूण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आणखी एक प्रचिती येईल, प्रश्न आहे तो साहित्यिकांचा. ते कोणतीच भूमिका कशी घेत नाहीत?

हा अंक वाचकांच्या हाती पडेल त्यावेळी चिपळूण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐन भरात आलेले असेल किंवा जिवंतमय अशा थाटात दिमाखदारपणे संपन्न झाले असेल. महाराष्ट्राच्या मानसिकतेला अशा वेळी काही बाबी उच्चारणे हेदेखील त्रासाचे वाटते, अशी पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या मराठी भाषकाची स्थिती आहे. 

32 वर्षांपूर्वी संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व पुरोगामी विचारवंत प्रा.गं.बा.सरदार हे बार्शीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलन साधेपणाने पण नेटकेपणे कसे करावे याचा एक आदर्श त्या संमेलनात बार्शीकरांनी उभा केला; तर दुसरीकडे आपल्या देशात धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक जमतात अशा समाजात भाषा आणि साहित्य याच्या ओढीने हजारो लोक एकत्र येत असतील, तर या स्वरूपाच्या इहवादी सोहळ्याचे स्वागत केले पाहिजे अशी भूमिका प्रा.गं.बा.सरदार यांनी घेतली. 

त्यानंतर जवळपास एक तपाने कोल्हापूरला अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्या संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत इंदिरा संत यांच्यासारख्या अभिजात कवयित्रीला पराभव पत्करावा लागला. ही बाब त्यांच्या या वर्षीच्या जन्मशताब्दीवर्षात सहज आठवतेच. परंतु त्याहीपेक्षा त्या संमेलनाचे उद्‌घाटन संमेलनाचे सर्वेसर्वा असलेल्या डी.वाय.पाटील यांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलित करून झाले. आता कोणी कोणाचे आणि प्रसंगी किती लक्ष जणांचे श्रद्धास्थान असावे हा व्यक्तिगत प्रश्न असला, तरी अधिकृत चरित्राप्रमाणे गजानन महाराजांनी ‘गण गण गणात बोते’ हे एकच वाक्य जन्मभर उच्चारले. मराठी प्रबोधनाचे एक मानदंड मानल्या जाणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन त्यांच्या फोटोसमोर दीप प्रज्वलित करून करणे कितपत योग्य आहे?- असा प्रश्न आमच्यासारखा एखादा करंटा वगळता कोणीही विचारला नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हे सर्व स्वीकारले गेले हे विशेष. 

गेल्या दोन दशकांत तर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. संमेलनाच्या खर्चाने कोटीच्या कोटी उड्डाणे कधीच गाठली आहेत. उत्सव, सोहळा यांतील आनंद हा अधिकाधिक भपकेबाजपणा, दिखाऊगिरी यांवरच अवलंबून असतो अशी खूणगाठ दुर्दैवाने प्रायोजकांनी आणि प्रेक्षकांनीही मनोमनी स्वीकारलेली दिसते. अन्यथा, महाराष्ट्रासमोर पाण्याची अभूतपूर्व टंचाई असताना कोकणातील 15 आमदारांनी आपल्या आमदार निधीतील प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे 75 लाख रुपये सोहळ्यासाठी वर्ग केले नसते. हे सर्व पैसे त्यांना जनतेने दिलेल्या करातून मिळालेले आहेत, याची संवेदनशीलता त्यांनी गमावली आहे याचेच हे वेदनादायी दर्शन आहे. व्यक्तीला संवेदनशील बनविण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या साहित्य क्षेत्राबाबत घडावे ही नाथाच्या घरी उलटी खूणच मानावयास हवी. 

चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालय संमेलनाचे संयोजन करीत आहे. अशा संमेलनातून शिल्लक राहणारा पैसा संयोजन समितीला मिळतो. पाच वर्षांपूर्वी चिपळूणच्या पुरात या ग्रंथालयाची प्रचंड हानी झाली. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील प्रकाशक, लेखक यांनी मदत केली. संमेलन साधेपणाने करून काही रक्कम उरल्यास ती जरूर संस्थेला मिळावी, मात्र आमदार निधीतून हा प्रकार करणे निश्चितपणे अव्यापारेषु व्यापार मानावयास हवा. स्वाभिमानी लोकमान्यांच्या नावाला तर तो नक्कीच शोभणारा नाही. मात्र खरे गांभीर्य यापेक्षा वेगळे आहे. याची सुरुवात ह.मो.मराठे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान नको तो मुद्दा काढून केली होती. त्यामुळे त्यांनी स्वत:चा पराभव नक्की करून घेतला. मात्र त्यापासून कोणताच बोध संयोजकांनी घेतल्याचे दिसत नाही. तो घेतला नाही, का घ्यावयाचा नव्हताच, असा प्रश्न निश्चितपणे विचारता येतो. 

ठाण्याला सन्माननीय ठाणेकरांच्या स्मृतीसाठी जी स्मरणिका काढली गेली, त्यात नथुराम गोडसेचे नाव होते आणि चिपळूणच्या संमेलनात निमंत्रणपत्रिकेवर मागच्या पृष्ठावर परशुरामाचे चित्र व लेखणीस्वरूपात त्याचा परशु मुखपृष्ठावर ठळकपणे छापला आहे. संमेलनस्थळी परशुरामाचा भव्य पुतळाही उभारला जाणार होता. विरोधामुळे तो बेत बारगळला असे कळते. ब्राह्मण असलेल्या परशुरामाने गाजविलेल्या एकाच कर्तृत्वाची(!) जनजमानसात नोंद आहे ती म्हणजे त्याने 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. म्हणूनच अलीकडे दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या ब्राह्मण संमेलनात परशुराम सन्मानाने मिरवला जातो. असे प्रतीक भले त्याला स्थानिक सांस्कृतिक संदर्भ असेलही, परंतु सर्व प्रकारच्या द्वेष जाणिवांच्या पलीकडे जाण्याचे मानस निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या साहित्य संमेलनस्थळी मानाने मिरविण्याचे प्रतीक वाटावे ही गंभीर गफलत मानावयास हवी. 

बाळासाहेब ठाकरे हे पत्रकार व व्यंगचित्रकार होते, त्यामुळे त्यांचे नाव व्यासपीठाला देण्यात काही चूक नाही, तशी भूमिका उद्‌घाटक असलेल्या खुद्द थोरल्या साहेबांनी घेतली आहे. ते ज्यांचे मानसपुत्र मानले जातात, त्या यशवंतरावजींची भूमिका अशी होती की, ‘राष्ट्र बंदुका आणि तोफा याच्या सामर्थ्यावर नाही, तर त्या देशातील साहित्य जे मानस घडवते त्यावर उभे राहते.’ साहित्यनिर्मिती हा पांढऱ्यावर काळे करण्याचा उद्योग नसतो, त्याला हेतूगांभीर्य असते आणि असावेच लागते. ते निर्माण होण्यासाठी साहित्याला तत्त्वज्ञानाचा आणि मानवतावादाचा पाया लागतो जो काही शतकांच्या वाटचालीतून निर्माण होतो आणि मराठी साहित्याला तो निश्चितच लाभला आहे. तत्त्वज्ञान व मानवतावाद या दोन शब्दांची कृतिशील टिंगल बाळासाहेब ठाकरे यांनी जन्मभर केली, त्याबद्दल ब्र उच्चारणाऱ्यांचा सर्व प्रकारे हिंसक समाचार घेतला आणि ती बाब लढाऊ वृत्ती म्हणून गौरविली गेली. 

रत्नागिरीतच जन्माला आलेल्या एका केशवसुतांनी ‘‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत’ अशी वैश्विक जाणिवेची ‘तुतारी’ फुंकली आणि दुसऱ्या ‘केशव’सुताने बाबरी मशीद पाडणारे माझे सैनिक असतील, तर त्याचा अभिमान वाटतो असा पुकारा केला. यातील कोणता केशवसुत निवडावयाचा हे जर मराठी साहित्य संमेलनाला भान नसेल, तर त्यांनी साहित्य या शब्दाला सोडचिठ्ठी देऊन भव्यदिव्य सर्वपक्षीय महासोहळे संयोजित करावेत हेच उत्तम. याच गतीने पुढे जायचे तर मनूलाही महान ग्रंथकार मानावयाची वेळ दूर राहणार नाही. 

मराठी संस्कृती आणि इथले ताणेबाणे याचे अत्यंत प्रत्ययकारी वर्णन हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ या कादंबरीत आले आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कारही लाभलेला आहे. हमीद दलवाई यांचे वैचारिक लेखन व कृतिशील योगदान प्रसिद्ध आहे. रामचंद्र गुहांसारख्या ख्यातनाम इतिहाससंशोधकाने ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या ग्रंथात भारतातील 19 लोकांचा उल्लेख केला आहे. त्यात हमीद दलवाई यांचे विचार व कार्य याची नोंद घेतली आहे. हमीद दलवार्इंचे गाव चिपळूण जवळच्या मिरगलचे. त्यांच्या घरापासून, त्यांच्या नावाने सेंलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी निघणार होती. काही स्थानिक कथित मुस्लिम नेत्यांनी त्या विरोधात भूमिका घेताच ती रद्दच करण्यात आली. अर्थात, यात नवल ते काय? 

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देण्यासाठी विरोध करणाऱ्या पुष्पाताई भावे यांना शिवसेनेने चिपळूण- बंदी जाहीर केली आणि दस्तुरेखुद्द पोलिसांच्यासाठी ठेवण्यात आलेला त्यांचा कार्यक्रम पोलिसांनीच रद्द केला. ही पोलिसांची स्थिती मग बिचाऱ्या संमेलन संयोजकांना का दोष द्यावा? विरोध नोंदविण्यासाठी संमेलन उधळण्याची भूमिका काही संघटनांनी घेतली. ती अर्थातच चूक आहे, कुठल्याही चुकीच्या विचाराला विचारानेच परंतु प्रखरपणे उत्तर द्यावयास हवे. 

125 वर्षांपूर्वी ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकरांनी प्रश्न विचारला की, लोक हो, तुम्ही विचारकलहाला का घाबरता? सांप्रत महाराष्ट्र देशी विचारकलह करावयाचा नाही, असा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे सारखेच दिसू लागले आहेत. चिपळूण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आणखी एक प्रचिती येईल, प्रश्न आहे तो साहित्यिकांचा. ते कोणतीच भूमिका कशी घेत नाहीत? सुरेश भट यांनी आपल्या एका गजलमध्ये म्हटले आहे... 

‘उच्चारणार नाही कोणीच शापवाणी, 
तैसा ऋषीमुनींचा लेख ठराव नाही’ 
अशी स्तब्धता महाराष्ट्र देशी साहित्यिक, विचारवंत यांच्यात का जाणवत आहे? 

याच गजलेच्या पुढच्या दोन वेळी आहेत... 
‘साध्याच माणसांचा एल्गार येत आहे 
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही’ 

कटु वास्तव असे आहे की, साधी माणसे एल्गाराच्या सोडाच, साध्या संघर्षाच्याही पावित्र्यात नाहीत, त्यामुळे एका शब्दाचा बदल करून वेदनेने म्हणावे असे वाटते... 

‘साध्याच माणसांचा एल्गार येत नाही 
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव आहे...?’ 

Tags: सुरेश भट रामचंद्र गुहा हमीद दलवाई केशवसुत बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर इंदिरा संत गं ब सरदार मराठी साहित्य संमेलन चिपळूण Suresh Bhat Ramchandra Guha Hamid Dalwai Keshavsut Balasaheb Thakrey Indira Sant G B Sardar Marathi Sahitya Sanmelan Chipalun weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके