डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुंबईतील उपोषणाला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून टीम अण्णा इतकी गर्भगळित झाली आहे की  त्यांना उसने अवसान आणणेही अवघड झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी महिनाभर अण्णांना विश्रांती घ्यायला  सांगितले आहे,  ते बरे झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याचा  अर्थ पुढील महिनाभरात पाच राज्यांतील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचेल तेव्हा काँग्रेसविरोधी प्रचार करण्याची टीम अण्णाची मोहीम बारगळल्यात जमा आहे.

गेल्या नऊ महिन्यांत भारताच्या राजकीय पटलावर कितीतरी अनपेक्षित व नाट्यमय घटना घडत गेल्या आणि त्या कितीतरी वेगवान व चित्तथरारक होत्या. त्यामुळे एखाद्या प्रतिभावान दिग्दर्शकाने त्या सर्व घटनांचे  फक्त तुकडे जुळवले तरी मोठा रोहर्षक चित्रपट तयार होईल. तो चित्रपट संपेल तेव्हा प्रेक्षकांच्या मनात  अनेक प्रश्नांचे काहूर माजेल आणि अखेर त्यांची मती गुंग होईल. या चित्रपटाची सुरुवात 2 एप्रिल 2011  रोजी भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि मध्यमवर्गाने व प्रसारमाध्यमांनी प्रचंड जल्लोष केला,  त्या  दृश्यापासून करावी लागेल. आणि या चित्रपटाचा शेवट,  2 जानेवारी 2012 रोजी अरविंद केजरीवाल,  अण्णा हजारेंना भेटून संचेती हॉस्पिटलमधून बाहेर येऊन पत्रकारांना सामोरे जातात या दृश्याने करावा लागेल. या दरम्यानच्या काळातील दृश्यांची निवड प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या दृष्टिकोनानुसार करील,  आणि  त्यानुसार त्या चित्रपटाचे नाव ठरेल. पण ‘वस्त्रहरण’  ही मध्यवर्ती कल्पना ठेवून जुळवलेली दृश्ये आणि  त्यातून तयार केलेला चित्रपट कदाचित जास्त अर्थपूर्ण होईल. पहिला भाग टीम अण्णा व विरोधी पक्ष यांनी  मिळून केलेले केंद्र सरकारचे वस्त्रहरण,  दुसरा भाग केंद्र सरकार व टीम अण्णा यांनी मिळून केलेले विरोधी  पक्षांचे वस्त्रहरण आणि तिसरा भाग केंद्र सरकार व विरोधी पक्ष यांनी मिळून केलेले ‘टीम अण्णा’चे वस्त्रहरण!  

क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर प्रसारमाध्यमांना ‘कैफ’  चढवणारे काहीतरी हवे होते आणि जनतेच्या  मनात अनेक घोटाळ्यांमुळे सरकार व एकूण राजकीय पक्ष यांच्याविषयी प्रचंड असंतोष खदखदत होता. या  दोहोंचा संयोग झाला आणि त्यामुळे अण्णा हजारे एप्रिलमध्ये दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर उपोषणाला  बसले तेव्हा प्रचंड पाठिंबा मिळाला. हा पाठिंबा टीम अण्णाला अनपेक्षित होता,  तसाच केंद्र सरकारलाही.  त्यामुळे गडबडून गेलेले केंद्र सरकार हादरले आणि चुकीची पावले टाकत गेले. याचा परिणाम टीम अण्णाला  आपल्या शक्तीचा गर्व झाला,  त्यामुळे त्यांची पावले अधिक आक्रमक व बेताल पडू लागली. केंद्र सरकार  अडचणीत येत आहे असे लक्षात येताच सर्वच विरोधी पक्षांनी टीम अण्णांच्या अरेरावीला ‘फूस’ देण्याचाच  प्रयत्न केला. नंतर मिळत असलेला पाठिंबा पाहून टीम अण्णाने चौफेर टोलेबाजी सुरू केल्यावर आणि केंद्र सरकारने विरोधी पक्षांच्या कोर्टात लोकपालाचा चेंडू ढकलायला सुरुवात केल्यावर विरोधी पक्षांना भूमिका  घेणे भाग पडू लागले,  परिणामी ते अडचणीत येत गेले. त्यानंतर ‘टीम अण्णा’चे एक एक सदस्य उघडे पडू  लागले आणि मग सरकार पक्ष व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी टीम अण्णाच्या विरोधात आघाडी उघडली.  या दरम्यानच्या काळात पंतप्रधानांचे अवमूल्यन ते शरद पवारांवरील हल्ल्याच्या संदर्भातील अण्णा हजारेंचे  उद्‌गार,  संसदेने अण्णांनी उपोषण सोडावे यासाठी केलेला ठराव ते राज्यसभेत लोकपाल विधेयकावर 187  दुरुस्त्या सुचवणे आणि किरण बेदी,  केजरीवाल, स्वामी अग्निवेश,  दिग्विजयसिंग,  कपिल सिब्बल,  पी.चिदंबरम्‌, भूषण पिता-पुत्र यांच्यासह अनेकांच्या संदर्भातील कितीतरी सनसनाटी घटना व वक्तव्ये हे सारे जुळवायचा प्रयत्न केला तर मती गुंग नाही होणार तर काय?  

मुंबईतील उपोषणाला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून टीम अण्णा इतकी गर्भगळित झाली आहे की  त्यांना उसने अवसान आणणेही अवघड झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी महिनाभर अण्णांना विश्रांती घ्यायला  सांगितले आहे,  ते बरे झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असे अरविंद केजरीवाल म्हणाले. याचा  अर्थ पुढील महिनाभरात पाच राज्यांतील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचेल तेव्हा काँग्रेसविरोधी प्रचार करण्याची टीम अण्णाची मोहीम बारगळल्यात जमा आहे.  शेवटी,  प्रश्न उरतो तो हाच की या ‘वस्त्रहरण’  चित्रपटाची फलनिष्पत्ती काय?  जनतेध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात जागृती झाली, सरकार व राजकीय पक्षांना धडा शिकवला गेला,  हे सर्व खरे असले तरी सर्वांत  महत्त्वाची उपलब्धी ही आहे की, देशाचा गाडा चालवला जाताना ‘गुंतागुंत’  किती प्रचंड असते याचा अंदाज  सर्वसामान्यांना आला, परिस्थितीचे सिंम्प्लिफिकेशन करून अवास्तव अपेक्षा बाळगणाऱ्यांना चपराक  बसली. त्यामुळे भविष्यात लोकपाल येईल की नाही,  आला तर कोणत्या स्वरूपात येईल व किती प्रभावी  होईल हा भाग बाजूला ठेवला तरी गेल्या नऊ महिन्यात देश खडबडून जागा झाला,  हे खरेच!   

Tags: मुंबई उपोषण अण्णा हजारे संपादकीय mumbai protest anna hajare editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके