डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या अंकातील दोन लेखही आशादायक व विदारक वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारे आहेत. पण समाजजीवनाचा गाडा हा असाच चालू राहतो. त्याची गती वाढावी यासाठी अनेक महाभाग आपली आयुष्ये खर्ची करतात. तेव्हा कुठे समाजगाडा थोडीशी चपळता दाखवतो. चपळता दाखवतो, कारण मनुष्यप्राण्यांमध्ये एकाच वेळी दोन प्रमुख प्रेरणा कार्यरत असतात, एक स्थितीशीलतेची दुसरी बदलाची. एक त्यागाची, दुसरी भोगाची. एक आत्मसमर्पणाची, दुसरी सूड उगवण्याची. आणि असे बरेच काही. म्हणूनच कदाचित, ‘जीवनवृक्षावर दोन पक्षी असतात’ अशी कल्पना मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळातच मांडली गेली. म्हणजे एक झाड दोन पक्षी. एक फळे चाखणारा, दुसरा उपाशी राहणारा. एक अनुभव घेणारा, दुसरा निरीक्षण- विश्लेषण करणारा. एक सबल, दुसरा दुर्बल. आणि म्हणूनच विश्राम बेडेकर यांनी त्यांच्या ‘एक झाड दोन पक्षी’ या आत्मकथनात (मराठीतील सर्वोत्तम आत्मकथापैकी एक) ‘‘आपले आयुष्य म्हणजे स्त्रियांच्या सहवासातील गोष्टी असतात’’ असे केलेले विधान विशेष अर्थपूर्ण आहे. ‘एक झाड दोन पक्षी’ या कल्पनेचा कितीही विस्तार करता येईल, पण स्त्री आणि पुरुष हेच समाजजीवनाच्या वृक्षावरील दोन पक्षी मानले तर?

कोणत्याही नियतकालिकात, महिलांनी लिहिलेले व महिलांविषयी लिहिलेले अशा प्रकारचे लेखन कमीच असते. साधनाही त्याला अपवाद नाही, ही कमीपणा आणणारीच बाब आहे. बाह्य कारणे काहीही असोत; तसे लेखन मिळवून प्रसिद्ध करण्यात साधना कायमच कमी पडलेली आहे आणि अलीकडच्या पाच-सहा वर्षांत तर ते प्रमाण कधी नव्हे इतके कमी झालेले आहे. हे लक्षात घेऊन, तो बॅकलॉग भरून काढण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करणार आहोत आणि त्या दिशेने टाकलेले एक छोटे, पण महत्त्वाचे पाऊल म्हणून या अंकाकडे पाहता येईल. आणखी दीड वर्षांनी म्हणजे 8 मार्च 2018 चा साधना अंक ‘महिला विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध करून, बालकुमार व युवा दिवाळी अंकांच्या पद्धतीने त्याचे वितरण मोठ्या प्रमाणात घडवून आणले जाईल. 

आशयसंपन्न मजकूर, उच्च दर्जाची निर्मितीमूल्ये आणि तरीही किंमत कमी असा तो अंक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोचविला जाईल. त्यानंतर दरवर्षीच्या 8 मार्चला तसा अंक काढला जाईल आणि ‘बालकुमार’ व ‘युवा’प्रमाणेच ‘महिला’ वर्गही मोठ्या प्रमाणात साधनाशी जोडला जाईल, यासाठीचे दीर्घकालीन नियोजन चालू आहे. आताचा अंक ‘त्या’ विचारसाखळीतूनच निघाला असला तरी, त्याला निमित्त झाले आहेत निवृत्त शिक्षण विस्तारअधिकारी प्रभाकर बटगिरी व ॲड.चिमणदादा लोकूर हे दोन साधनाप्रेमी. सात-आठ महिन्यांपूर्वी या दोघांनी आपापल्या पत्नींच्या स्मरणार्थ प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा निधी साधनाकडे सुपूर्द केला. या निधीच्या खर्चासाठी म्हणून त्यांची अशी काही अट नव्हती. पण सामाजिक जाणीवा प्रखर असलेल्या या दोन निवृत्तांच्या मनात कोणत्या भावना असल्या पाहिजेत हे लक्षात घेऊन, त्या दोघींच्या स्मरणार्थ दोन युवतींना अभ्यासवृत्ती देऊन दोन चांगले लेख मिळवावेत असा निर्णय आम्ही घेतला. 

वर्तमानाशी आणि सामाजिक बदलांशी (किंवा होत नसलेल्या बदलांशी) संबंधित विषय निवडून, त्यावरील लेख मिळवावेत अशी ती कल्पना होती. त्यानुसार स्नेहलता जाधव आणि हिनाकौसर खान या दोघींना प्रत्येकी दहा हजार रुपये अभ्यासवृत्ती देण्यात आली. त्यापैकी एक कुर्डुवाडीला प्राध्यापक तर दुसरी पुणे शहरात पत्रकार आहे. या दोघींचेही शिक्षण विज्ञान शाखेतून झाले आहे. भाषा व साहित्य यांची त्यांना विशेष आवड आहे, त्यांची लेखनशैली थेट व प्रवाही आहे, त्यांच्या सामाजिक जाणीवा चांगल्या विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे दोघींनीही आपापल्या विषयाला पुरेपूर न्याय दिलेला आहे. या दोनही विषयांची समग्र माहिती देणे हा या अभ्यासवृत्तीचा हेतू नव्हता. या विषयांकडे वाचकांचे लक्ष वेधणे, त्यातील अंतर्गत ताणेबाणे दाखवणे इतकाच माफक हेतू होता आणि त्यात या दोनही युवालेखिका यशस्वी झाल्या आहेत. 

महिला बस कंडक्टर हा विषय तसा आता बऱ्यापैकी परिचित झाला आहे. मात्र रोजगाराच्या पलीकडे पाहून, महिला सबलीकरणाच्या संदर्भात या विषयाचा विचार अद्याप फारसा पुढे आलेला नाही. त्यामुळे त्यात दडलेल्या मोठ्या शक्यतांकडे म्हणावे तितके लक्ष, ओपिनियन मेकर क्लासने आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था-संघटनांनीही अद्याप दिलेले नाही. Bicycle is the symbol of women's emancipation असे विधान एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात लोकप्रिय होते. आणि त्यानंतरच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रांत किती भरारी मारली आहे, हे आपण सांगत असतो. पण याच महाराष्ट्रात 1948 मध्ये पुणे-अहमदनगर या मार्गावर पहिली राज्य परिवहन मंडळाची बस (एस.टी.) धावलेली असूनही, एस.टी.मध्ये पहिली महिला कंडक्टर होण्यासाठी तब्बल पन्नास वर्षे जावी लागली. इतकी हाताशी असलेली संधी कोणीच कशी ओळखली नाही? ना राज्यकर्त्यांनी ना समाजधुरिणांनी! आणि गेल्या 15 वर्षांत महिला कंडक्टर्सचे प्रमाण वाढत गेले तरी आजही 35 हजार एस.टी. कंडक्टर्समध्ये महिलांची संख्या जेमतेम साडेचार हजार आहे. 

या नोकरीतही अडचणी आहेत, समस्या आहेत, गैरसोयी आहेत. पण सर्वसामान्य कुटुंबातून वा ग्रामीण भागातून आलेल्या, शिक्षणाची अधिक संधी न मिळालेल्या मुलींसाठी ‘बस कंडक्टर’ ही केवळ नोकरी राहत नाही. ही नोकरी  त्या महिलांना आत्मभान येण्यासाठी तर उपयुक्त आहेच, पण पुरुषांच्या बरोबरीने ‘त्या’ चालताना दिसणे हे चित्रदेखील अन्य लहान मुलींना ‘नवी उमेद, नवा विश्वास’ देणारी असते. शहरी भागांतील स्त्री-पुरुष समानतेविषयीच्या जाणीवा विकसित होण्यासाठी अन्य अनेक घटक उपलब्ध असतात. ग्रामीण भागांत मात्र अशा संधी अपवादात्मक असतात आणि त्या बाबतीत महिला बस कंडक्टर्स हे छोटे, पण महत्त्वाचे पाऊल आहे. 

मात्र पहिले पाऊल खूप उशीरा पडले आहे आणि त्या पावलांची सध्याची गतीही अपेक्षेपेक्षा कमीच आहे. आणि महिला बस ड्रायव्हर हे पाऊल महाराष्ट्राने अद्यापही टाकलेले नाही. दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांनी दहा-पंधरा वर्षांपूर्वी तसे पाऊल टाकले आहे, पण ते केवळ नावापुरतेच. बंगलोर शहराच्या बससेवेत प्रेमा नागप्पा ही महिला पाच वर्षांपूर्वी ड्रायव्हर झाली आणि अद्यापही तिथे ती एकटीच आहे. कर्नाटक राज्य परिवहन सेवेत आणि तमिळनाडू व केरळ या राज्यांत काही ठिकाणी महिला बस ड्रायव्हर आहेत, पण ती संख्या नगण्य म्हणावी इतकी आहे. 

या संदर्भात ‘पुरोगामी’ महाराष्ट्रातील सामाजिक संस्था संघटनांनी आणि शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी पुढाकार घ्यायला हवा आणि राज्य सरकारकडून या क्षेत्रांतील महिलांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण महाराष्ट्रातील 19 हजार मार्गावरून धावणाऱ्या, जवळपास  20 हजार बसगाड्या असलेल्या आणि पाऊण कोटी प्रवाशांची रोज ने-आण करणाऱ्या एसटीने महाराष्ट्रातील खेडे-पाडे, वाड्या-वस्त्या जोडलेल्या आहेत. तशाच प्रकारची विश्वासार्हता व जोडकाम महिला वर्गाच्या संदर्भात एसटी करू शकेल. 

‘बाईपणा’ची भरपाई या लेखात पोटगी या प्रश्नाचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. ‘पोटगी’ हा शब्द नुसता उच्चारला तरी त्यामागे दडलेल्या भयाण वास्तवाची जाणीव होऊ लागते आणि त्याचा विचारही करणे नकोसे वाटते. या प्रश्नावर संबंधितांशी संवाद करणे म्हणजे जखमेवरच्या खपल्या काढत राहणे. त्यातून उलगडत जाणाऱ्या समस्यांची मालिका कोणाही संवेदनशील मनाला फ्रस्ट्रेशन देणारी असते, ‘आपण फार काही करू शकत नाही’ अशी हतबलतेची जाणीव उत्पन्न करणारी असते. 

आर्थिक शोषण, मनोबल खचणे, पोलिस-वकील-प्रशासन यांच्याकडून नागवणूक होणे या सर्व प्रकारांत एकेका व्यक्तीच्या आयुष्याची माती होते आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाची फरफट होते ती वेगळीच. शिवाय या प्रश्नाला इतके नाजूक पदर असतात की, त्यात जवळचे लोक फार काही करू शकत नाहीत आणि बाहेरचे तर ‘बाहेरच’ राहणे पसंत करतात. त्यामुळे या समस्येच्या निवारणासाठी काम करणाऱ्या संस्थासंघटनांचीही संख्या खूपच कमी आहे. महात्मा फुले, गोपाळराव आगरकर इत्यादी समाजसुधारकांनी एकोणिसाव्या  शतकाच्या उत्तरार्धात स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले, पण सव्वाशे-दीडशे वर्षांनंतरही आपल्या समाजजीवनाची स्थिती ‘दयनीय’ म्हणावी अशीच आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला आणि त्याच कारणावरून राजीनामा दिला. नंतर बाबासाहेबांना अपेक्षित असलेले कायदे झाले आणि हिंदू स्त्रियांना लढाईसाठी हत्यार तरी मिळाले. मुस्लिम स्त्रियांच्या वाट्याला तसे हत्यारही अद्याप आलेले नाही. तीस वर्षांपूर्वी शाहबानो प्रकरणात तत्कालीन केंद्र सरकारने कच खाल्ली आणि मुस्लिम समाजातील संख्येने चिमूटभर असलेल्या सुधारणावाद्यांना खडकावर जोराने आपटवले. त्या धक्क्यातून मुस्लिम सुधारणावादी अद्यापही सावरलेले नाहीत, त्यांच्या लढ्याची धारही तेव्हापासून अधिक बोथट झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर, ‘पोटगी’ या संज्ञेअंतर्गत भळभळणाऱ्या जखमांवर मलमपट्टी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखायला हवे, त्यांना बळ द्यायला हवे. 

महिलांचे प्रश्न व समस्या सोडवणे आणि त्यांचे सबलीकरण करून त्यांच्यात आत्मभान जागृत करणे, ही साखळीच मुळात जटिल आहे. तिच्यातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी जरा मुळाशी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली तर अद्याप किती मोठा पल्ला गाठणे बाकी आहे, याचा अंदाज येईल. या संदर्भातील एक साधी आकडेवारी पहा. 2011 च्या जनगणनेनुसार : या देशातील 30 टक्के मुलींचे विवाह 15 ते 17 या वयोगटात असताना होतात, म्हणजे कायद्याने सज्ञान नसताना होतात. आणि 18 ते 21 या वयोगटात असताना विवाह होतात, अशा महिलांची संख्या 60 टक्क्यांच्या आसपास आहे. याचाच अर्थ 21 वर्षे वयाच्या आत या देशातील 90 टक्के महिलांवर घर-संसार, चूल-मूल ही जबाबदारी येऊन पडते. आणि ती जबाबदारी अशी असते की, मागे फिरता येत नाही. ‘दोर कापून टाकले आहेत, लढा आणि जिंका किंवा मरा’ असाच जणू तो सांगावा असतो. या नव्वद टक्क्यांमधील दहा-वीस टक्के महिलांच्या वाट्याला सुखी-समृद्ध वैवाहिक जीवन, किंवा सहजीवन (ही भारदस्त संज्ञा वाट्याला येणाऱ्या खऱ्या भाग्यवान!) येते. उरलेल्या 70 टक्के मात्र कुतरओढीचे किंवा ‘धरले तर चावतेय, सोडले तर पळतेय’ अशा पद्धतीचे आयुष्य निभावतात. 

पण या विदारक वास्तवाला रुपेरी किनारही आहे, ती अशी की 2011 च्या जनगणनेनुसार- 30 टक्के मुलींचे विवाह 15 ते 17 या वयोगटात असताना होतात; मात्र 2001 च्या जनगणनेनुसार 15 ते 17 या वयोगटात विवाह होणाऱ्या मुलींचे प्रमाण 44 टक्के होते. म्हणजे 2000 ते 2010 या दहा वर्षांत, अल्पवयीन मुलींचे किंवा बालविवाहांचे प्रमाण तब्बल 14 टक्क्यांनी घटलेले आहे. हा 14 आकडा क्रांतिकारक म्हणावा असाच आहे, कारण त्यातून प्रत्यक्षातील संख्या निघते ती प्रचंड आहे. अशीच आणखी एक आकडेवारी आश्वासक आहे. 1951 च्या जनगणेनुसार : भारतातील महिलांची साक्षरता नऊ टक्के होती. 2011 च्या जनगणनेनुसार ती साक्षरता 65 टक्के आहे. म्हणजे इथेही 55 टक्क्यांची वाढ दिसेल आणि 1951 च्या लोकसंख्येच्या नऊ टक्के व 2011 च्या लोकसंख्येच्या 65 टक्के यांचे गणित केले तर महिलांच्या साक्षरतेत दोन कोटीपासून 40 कोटींपर्यंत अशी प्रत्यक्षवाढ झाली आहे. ही आकडेवारी सरकारी आहे आणि त्या जनगणनेत अनेक दोष असतात, हे गृहीत धरले तरी आपण बराच लांबचा पल्ला गाठला आहे, असे म्हणायला हरकत नसावी. आणि अर्थातच खूप मजल गाठणे बाकी आहे. 

तर अशी ही एका बाजूला आशादायक आणि दुसऱ्या बाजूला विदारक वस्तुस्थिती आहे. या अंकातील दोन लेखही आशादायक व विदारक वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारे आहेत. पण समाजजीवनाचा गाडा हा असाच चालू राहतो. त्याची गती वाढावी यासाठी अनेक महाभाग आपली आयुष्ये खर्ची करतात. तेव्हा कुठे समाजगाडा थोडीशी चपळता दाखवतो. चपळता दाखवतो, कारण मनुष्यप्राण्यांमध्ये एकाच वेळी दोन प्रमुख प्रेरणा कार्यरत असतात, एक स्थितीशीलतेची दुसरी बदलाची. एक त्यागाची, दुसरी भोगाची. एक आत्मसमर्पणाची, दुसरी सूड उगवण्याची. आणि असे बरेच काही. 

म्हणूनच कदाचित, ‘जीवनवृक्षावर दोन पक्षी असतात’ अशी कल्पना मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळातच मांडली गेली. म्हणजे एक झाड दोन पक्षी. एक फळे चाखणारा, दुसरा उपाशी राहणारा. एक अनुभव घेणारा, दुसरा निरीक्षण- विश्लेषण करणारा. एक सबल, दुसरा दुर्बल. आणि म्हणूनच विश्राम बेडेकर यांनी त्यांच्या ‘एक झाड दोन पक्षी’ या आत्मकथनात (मराठीतील सर्वोत्तम आत्मकथापैकी एक) ‘‘आपले आयुष्य म्हणजे स्त्रियांच्या सहवासातील गोष्टी असतात’’ असे केलेले विधान विशेष अर्थपूर्ण आहे. ‘एक झाड दोन पक्षी’ या कल्पनेचा कितीही विस्तार करता येईल, पण स्त्री आणि पुरुष हेच समाजजीवनाच्या वृक्षावरील दोन पक्षी मानले तर?    

Tags: प्रेमा नागप्पा स्त्रीवाद स्त्री बस कंडक्टर शाहबानो हसीना फराज weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके