डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाकिस्तानातील लष्करशाही व लोकशाही दोन्ही धोक्यात आहेत. अफगाणिस्तान व इराकमध्ये कट्टरपंथीयांनी अमेरिकन सैनिकांना सळो की पळो करून सोडले आहे. पाकिस्तानात वायव्य सरहद्द प्रांत व बलुचिस्तानात सरकारचे फारसे काही चालत नाही. इस्लामाबाद, रावळपिंडी, कराची सर्वत्र हिंसाचाराचे थैमान सुरू असते. लष्करी अधिकाऱ्यांवरच हल्ले केले जात आहेत. मुशर्रफना मारण्याचे कैक प्रयत्न झाले. पाकमधील बेनझीर व शरीफ यांच्या पक्षातील वैमनस्य तूर्तास कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या दोघांचे पक्ष फोडून पाकिस्तान मुस्लिम लीग (कायदे-आझम-क्यू)ची स्थापना झाली आहे.काहीही करून निवडणुका जिंकणे हे या जहाल पक्षाचे धोरण आहे. मुशर्रफ यांच्या आशीर्वादानेच यांपैकी काही गोष्टी घडलेल्या आहेत. बेनझीर यांना सुरक्षा देण्यात त्यांचे प्रशासन कमी पडले; पण या नेत्यांनीही थोडी काळजी घेणे इष्ट ठरले असते.मुजीबूर रहमान, प्रेमदास, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. लोकप्रिय नेत्याला जगण्याचा अधिकारच नाकारला जावा, हे क्लेशदायक आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवादाची सूत्रे पाकिस्तानातून हलवली जात असतात. वात पेटवून दुसऱ्या देशात बाँब फेकणाऱ्यांना त्यामुळे इतरांचे कसे व किती नुकसान होत आहे याची फिकीर नसते. हा विस्तवाशी चाललेला खेळ आहे, असा वर्षानुवर्षे इशारा देऊनही उपयोग होत नव्हता. परंतु ज्यांनी हे बीज पेरले वा दशहतवाद्यांकडे दुर्लक्ष केले, त्यांच्यावरच हा भस्मासूर उलटला आहे. बेनझीर भुत्तो दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या; परंतु या काळात भारत-पाक जवळ आले, अशातला भाग नाही.पाकव्याप्त काश्मीरला भेट देऊन त्यांनी ‘आझादी’ ची नारेबाजी केली होती. त्या पंतप्रधान असतानाही पाकमध्ये अतिरेकी तळ होते व जम्मू-काश्मीरात घुसखोरी सुरू होती. कोणताही पाक नेता भारताशी खुली मैत्री करू शकत नव्हता, असे तेव्हाचे वातावरण होते. लष्कर व आय.एस.आय. बेनझीरविरोधी होते. त्यांची ‘समजूत’ काढण्यासाठी भारताला शिव्याशाप देणे त्यांना भागही होते. पण त्यांचा हा देखावा असल्याचे न कळण्याइतके लष्कर व आय.एस.आय. दुधखुळे नव्हते. बेनझीरने भारताबरोबर एकमेकांच्या आण्विक केंद्रांना लक्ष्य न करण्याचा व माहितीच्या देवघेवीचा करार केला होता, तेव्हा राजीव गांधी सत्तेवर होते. या दोन तरुण नेत्यांमुळे उभय देश निकट येण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ‘या वाटाघाटीत बेनझीर यांनी पाकिस्तानच्या वतीने दिलेले शब्द पाळले नाहीत’,असा आरोप भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के. नारायणन यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीस केला होता. त्यावर ‘राजीव गांधी यांनीच सियाचिनबाबत मला दिलेले आश्वासन पाळले नव्हते; परंतु मी त्याबद्दल आजतागायत कधी जाहीर विधान केले नव्हते’,असा खुलासा बेनझीरने केला.त्या देशविदेशांतील मध्यमवर्गीय व बुद्धिमंतांच्या लाडक्या होत्या. परदेशात शिकलेल्या, आंग्लविद्याविभूषित आणि सोफेस्टिकेटेड असल्याने, त्यांनी आपली विशिष्ट प्रतिमा निर्माण केली होती.

इंदिरा गांधींना पूर्वी ‘गुँगी गुडिया’असे संबोधिले जात असे. त्यांनीच पुढे काँग्रेसमधील सिंडिकेटवाल्यांना बाजूला सारले व पक्ष आणि सरकारवर आपले एकछत्री साम्राज्य स्थापन केले.बेनझीर आपले पिता झुल्फिकार अली भुत्तो यांच्यासमवेत सिमला वाटाघाटींच्या वेळी भारतात आल्या होत्या. तेव्हा त्या २० वर्षांच्या आसपास होत्या व ही कोवळी मुग्ध तरुणी उद्या पाकिस्तानात सत्तेवर येईल, असे कोणाला त्यावेळी स्वप्नातही वाटले नसेल. इंदिरा गांधी व बेनझीर दोघीही श्रीमंत उच्चवर्गातल्या, इंदिराजींप्रमाणे त्यांच्याकडेही करिष्मा होता. उभयता अत्यंत आक्रमण व झुंजार, परराष्ट्र राजकारणावर दोघींची पकड. बेनझीर यांच्याकडे बुद्धिचातुर्य, तर्कशुद्ध विचार करण्याचे व ते प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य होते. त्यांचे वाचन उत्तम होते व त्या लिहितही छान. परंतु इंदिराजी देशाच्या कानाकोपऱ्यात व गोरगरीब वर्गात लोकप्रिय होत्या, तसे बेनझीर यांच्याबाबत म्हणता येणार नाही. त्या अत्यंत आग्रही होत्या; परंतु इंदिराजींचा धोरणीपणा व प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची हातोटी आणि राजकीय शहाणपण त्यांच्याकडे फारसे नव्हते.  एक महिला देशाचे नेतृत्व करीत आहे व त्यात ती सिंधी अस्मितेचा पुरस्कार करणारी! पुन्हा विदेशात शिकलेली आणि झुल्फिकार अलींची कन्या.पाकमधल्या तालिबानी व इतर जहालांना हे कसे रूचावे? लष्करात पंजाबांचे वर्चस्व असून, तेथे आजही झिया-उल-हकवादी प्रवृत्ती सक्रिय आहेत. भुत्तोंना फाशीतून माफी द्यावी, असे जगातील अनेक नेत्यांनीआणलेले दडपण झुगारून, झिया यांनी त्यांना रातोरात फासावर चढवले होते. माफी मिळाली असती, तर त्यांना आश्रय देण्याची तयारी तुर्कस्तानने दाखवली होती. झुल्फिकार अलींचे जिवंत राहणे झिया यांना धोकादायक वाटले. हुकुमशहा हा मनातून सदैव भीतिग्रस्त असतो. त्यामुळे त्यांनी भुत्तोंना संपवले. ‘मला फाशी दिले तर मी हुतात्मा होईन’, असे उद्गार भुक्तोंनी काढले होते. परंतु तसे काही घडले नाही. 

पुढे पाकिस्तान पीपल्स पार्टीने सत्ता मिळवली; परंतु भुत्तो हे पं.नेहरूप्रमाणे कधीच देशाचे लाडके नेते नव्हते. पं.नेहरूंशी त्यांची तुलनाही होऊ शकणार नाही. नेहरू शांततावादी तर भुत्तो अशांततावादी. नेहरू लोकशाहीप्रेमी, तर भुत्तोंनी अवामी पक्षाला बहुमत मिळाले, तरीही त्यांच्या हाती सत्ता न देण्याचे धोरण स्वीकारले, त्यामधूनच बांगलादेशची निर्मिती झाली. एअरमार्शल अशगर खान यांचे घर जाळणे, वलीखानांविरुद्ध कट रचणे आणि इतर काहीजणांचे खून पाडणे, ही कृत्ये भुत्तोंनी केली. बेनझीर यांनी हे प्रकार कधी केले नाहीत. परंतु झुल्फिकार अलींनी प्रचंड संपत्ती साठवली.कस्टम्स ड्यूटी न भरता मालाची आयात केली. पैशांचा अपहार केला. तुफानी भ्रष्टाचार केला. बेनझीर यांनी पित्याचा हा गुण मात्र अवश्य घेतला होता.

झुल्फिकार अलींनी सत्तेवर असताना शरीफ कुटुंबासह इतर उद्योगपतींच्या हितसंबंधांना हादरा दिला होता. त्यांनी काही उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले होते. तेव्हा जगभरच समाजवादाचे आकर्षण होते व भारतामध्येही इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. बेनझीर यांच्या पित्याचे अनेक शत्रू होते. त्या राजकारणात आल्या, तेव्हा लष्कर व आय.एस.आय.ने त्यांना कधीच ‘आपले’मानले नाही. त्यामळे त्या सत्तेवर फार काळ टिक शकल्या नाहीत. गेली ११ वर्षे त्या सत्तेबाहेर व मुख्यतः देशाबाहेर होत्या. तरीही त्यांच्या भोवतीचे वलय कमी झाले नव्हते. मात्र गेले काही महिने त्या झपाट्याने अमेरिकेच्या जवळ आल्या होत्या. बुश-बेनझीर मैत्रीमुळे जहाल वृत्ती पिसाळल्या. त्यात बेनझीरचा जनाधार वाढत होता. त्यामुळे बुश यांची दक्षिण आशियामधील व्यूहनीती यशस्वी होईल, अशी धास्ती त्यांना वाटू लागली. या पार्श्वभूमीवर, ज्या सौदी अरेबियाने नवाझ शरीफना आश्रय दिला होता, त्यांनीच त्यांची रवानगी पाकमध्ये करून टाकली! कारण अमेरिकाद्वेष हा इस्लामी राजनीतीचा गाभा आहे. त्यामुळे अमेरिकेशी दोस्ती करणाऱ्या स्त्रीपेक्षा, शरीफ यांच्यासारखा नेता परवडला, असा हिशेब इस्लामी देशांतील कट्टरपंथीयांनी घेतला. शरीफनी लाहोरमध्ये भारताशी मैत्री-करार केला असला, तरी मूलतत्त्ववाद्यांबद्दल त्यांना आत्मीयता होती व आहे. बेनझीरप्रमाणे त्यांनी जहालांना नेस्तनाबूत करण्याच्या गर्जना ठोकलेल्या नाहीत. शरीफ पंतप्रधान असताना त्यांनी मुशर्रफ यांचा ‘गेम’करण्याचे ठरवले होते; परंतु मुशर्रफ यांनी बंड करून सत्ता मिळवली व शरीफना परागंदा व्हावे लागले.मुशर्रफ हेच कारगिलला जबाबदार होते; पण शरीफ यांना या घुसखोरीची माहितीच नव्हती, यावर विश्वास कसा ठेवावा?

बेनझीर, शरीफ व मुशर्रफ हे भारताचे मित्र कधीच नव्हते. मात्र ९/११ नंतर जगातले संदर्भ बदलले. अफगाणिस्तान व इराकमध्ये अमेरिकापुरस्कृत लोकशाही आली. त्याचप्रमाणे पाकिस्तानातही लष्करशाही खतम होऊन बुश-कोंडालिसा राइस यांनी ठरविलेल्या आराखड्यानुसार निवडणुका व्हाव्यात व लोकशाही यावी, अशी योजना होती. खुद्द मुशर्रफ अमेरिकेच्या तालावर नाचायला लागल्यापासून अतिरेक्यांचे लक्ष्य बनलेले आहेत. शरीफ यांच्या सभेजवळही भीषण गोळीबाराची घटना घडली असून, त्यांना सूचक इशारा देण्यात आला आहे. या स्थितीत शरीफ यांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी नेतृत्वहीन आहे. मुशर्रफ यांना भारताशी संबंध, काश्मीर युनो, निवडणुका यांपैकी कोणत्याही विषयांत आता रस उरलेला नसावा. त्यांना फक्त स्वतःच्या जिवाचा घोर लागला आहे ! ‘दहशतगर्दी को खतम करने बगैर हम चैन से सो नहीं सकेंगे’अशी घोषणा करतानाही त्यांचा चेहरा भयग्रस्त दिसत होता. दिवसेंदिवस त्यांना झोप मिळत नाही, असे वाटते.

थोडक्यात पाकिस्तानातील लष्करशाही व लोकशाही दोन्ही धोक्यात आहेत. अफगाणिस्तान व इराकमध्ये कट्टरपंथीयांनी अमेरिकन सैनिकांना सळो की पळो करून सोडले आहे. पाकिस्तानात वायव्य सरहद्द प्रांत व बलुचिस्तानात सरकारचे फारसे काही चालत नाही. इस्लामाबाद, रावळपिंडी, कराची सर्वत्र हिंसाचाराचे थैमान सुरू असते. लष्करी अधिकाऱ्यांवरच हल्ले केले जात आहेत. मुशर्रफना मारण्याचे कैक प्रयत्न झाले. पाकमधील बेनझीर व शरीफ यांच्या पक्षातील वैमनस्य तूर्तास कमी होण्याची शक्यता आहे. मात्र या दोघांचे पक्ष फोडून पाकिस्तान मुस्लिम लीग (कायदे-आझम-क्यू)ची स्थापना झाली आहे.काहीही करून निवडणुका जिंकणे हे या जहाल पक्षाचे धोरण आहे. मुशर्रफ यांच्या आशीर्वादानेच यांपैकी काही गोष्टी घडलेल्या आहेत. बेनझीर यांना सुरक्षा देण्यात त्यांचे प्रशासन कमी पडले; पण या नेत्यांनीही थोडी काळजी घेणे इष्ट ठरले असते.मुजीबूर रहमान, प्रेमदास, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. लोकप्रिय नेत्याला जगण्याचा अधिकारच नाकारला जावा, हे क्लेशदायक आहे. बेनझीर जगल्या असत्या व सत्तेत येत्या, तर त्या व सोनिया गांधी यांनी कदाचित दक्षिण आशियात नवा इतिहास लिहिला असता. परंतु ते होणे नव्हते. पाकच्या इतिहासाची पाने अजूनही रक्तरंजितच आहेत…

Tags: आंतरराष्ट्रीय राजकारण पाकिस्तान पीपल्स पार्टी बेनझीर भुत्तो भारत पाकिस्तान लष्करशाही व लोकशाही sadhana editorial on benzir bhutto narendra dabholkar rajiv gandhi indira gandhi democracy india pakistan pakistan assassination of benzir bhutto weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके