डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बाबांचे वैशिष्ट्य असे की सध्याच्या व्यावसायिकतेच्या काळातही ध्येयवाद जोपासता येतो हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या काळात त्यांनी 'लोकमत’चे संपादकत्व स्वीकारले होते.

गेल्या आठवड्यात ज्येष्ठ पत्रकार म. य. उर्फ बाबा दळवी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून सर्व मराठी पत्रसृष्टी हळहळली. बाबा दळवी हे एक अभ्यासू, सव्यसाची पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. 1942 सालापासून समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करीत असतानाच त्यांनी पक्षाच्या 'जनवाणी' या मुखपत्राच्या संपादनात हिरीरीने भाग घेऊन पत्र व्यवसायाला सुरुवात केली. पक्षात दहा वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करून बाबा दळवी नंतर काही वर्षे नवशक्ती, लोकसत्ता या वृत्तपत्रांत काम करीत होते. सर्व ठिकाणी पुरोगामी भूमिका घेऊन अन्यायावर प्रहार करीत राहण्याचे व्रत त्यांच्या लेखणीने सांभाळले.

धर्मनिरपेक्षता आणि समानता यांचा पुरस्कार करीत लेखणी झिजवणाऱ्या बाबा दळवींनी नंतर 'मराठवाडा' या वृत्तपत्रात काम करायला सुरुवात केली. मराठवाड्यामध्ये काम करणाऱ्या अनेक पुरोगामी संस्था व संघटना यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. कार्यकर्त्यांना त्यांच्याशी विचार विनिमय करण्यामध्ये आपल्या कामाचे सुस्पष्ट दिशादर्शन होत असे. मराठवाडा विकास आंदोलन, नामांतर आंदोलन या व अशा इतर आंदोलनांत बाबांनी जिगरीने भाग घेतला. नामांतर आंदोलनात 'मराठवाडा' वृत्तपत्राच्या भूमिकेबद्दल मतभेद झाल्यामुळे ते 'मराठवाड्या’तून दूर झाले. 

बाबांनी नागपूर आणि मराठवाड्यामध्ये वृत्तपत्र विद्या विभागात शिक्षक म्हणूनही काही वर्षे काम केले. पत्रव्यवसायात त्यांनी पाऊल टाकले तो काळ ध्येयवादी पत्रकारितेचा होता. पण बाबांचे वैशिष्ट्य असे की सध्याच्या व्यावसायिकतेच्या काळातही ध्येयवाद जोपासता येतो हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या काळात त्यांनी 'लोकमत’चे संपादकत्व स्वीकारले होते.

बाबा दळवींनी जवळ जवळ पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. या काळात त्यांनी सात हजारांहून अधिक अग्रलेख लिहिले. त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. अखंड कृतिशीलता, लढाऊ बाणा आणि सुस्पष्ट विचार यांमुळे त्यांचा पत्रसृष्टीत एक प्रकारचा दबदबा होता. इंग्रजी भाषा, कायदा व राजकारण यांची त्यांना चांगली जाण होती. त्यांनी अनेक पुस्तकांचे अनुवाद केले आणि चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ते लेख किंवा स्फुटेही स्वतःचा व्याप सांभाळून अगदी सहजपणे लिहिली. 'डॉ. लोहियांचे वैचारिक योगदान’ व 'माओ आणि चीन' ही त्यांची गाजलेली पुस्तके.

बाबा दळवी हे मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे एक भक्कम आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकार सृष्टीतील एक महत्त्वाचा दुवा निखळून पडला आहे आणि 'साधने’ ने आपला जवळचा मित्र गमावला आहे. त्यांच्या स्मृतीला आमची विनम्र श्रद्धांजली.

Tags: जनवाणी मराठवाडा पत्रव्यवसाय दळवी बाबा श्रद्धांजली Tribute Dalvi Baba Janwani Marathwada weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके