डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अर्थातच, हे सर्व करताना भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली मूल्ये आणि साने गुरुजींना अपेक्षित असलेले संस्कार पेरण्याचा व रूजवण्याचा प्रयत्न केंद्रस्थानी राहणार आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली बालकुमार अंकाचे अभियान पहिली पाच वर्षे राबवले गेले. आताचा हा दहावा अंक त्यांच्या स्मृतीला अर्पण करीत आहोत.
 

ऑगस्ट १९४८ रोजी, साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाने सत्तराव्या वर्षांत पदार्पण केले आहे. मुख्यत: राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील वैचारिक लेखन प्रसिद्ध करणारे नियतकालिक अशी साधनाची ओळख राहिली आहे. मात्र बालकुमार वाचकांसाठी प्रत्येक अंकात एखादे पान आणि वर्षातून एखादा विशेषांक अशी परंपराही सुरुवातीपासून साठाव्या वर्षापर्यंत राहिली. 


त्यानंतर साधनाने वर्षातून फक्त एकदाच बालकुमार वाचकांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. मात्र त्या अंकाची निर्मिती व वितरण प्रक्रिया जवळपास सहा महिने आणि त्याचा प्रभाव व परिणाम पुढील चार-सहा महिने, असा प्रकार राहिला आहे. २००८ मध्ये पहिला बालकुमार दिवाळी अंक आला, तेव्हा फक्त ११ हजार प्रती काढल्या होत्या. त्यानंतरची आठ वर्षे सरासरी तीन लाख प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात बालकुमार अंक छापावा लागला. (मागील नऊ वर्षांतील अंकांच्या मिळून २५ लाख ८५ हजार प्रती वितरित झाल्या आहेत.)महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत हा अंक कमी-अधिक प्रमाणात जातो. 

आताचा हा दहावा अंक छापायला गेला तोपर्यंत (२० सप्टेंबर) जवळपास दोन लाख प्रतींची प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या बालकुमार अंकात केनियाचा रिचर्ड आणि जालना जिल्ह्यातील ज्ञानेश या दोघांच्या सत्यकथा प्रसिद्ध झाल्या होत्या. या वर्षीचा अंक त्याच प्रकारच्या देश-विदेशांतील मुला-मुलींचा काढावा, असे ठरवले होते. त्याप्रमाणे युरोप-अमेरिका खंडांतील ब्रिटन व कॅनडा या विकसित देशांतील दोघे आहेत. आफ्रिका खंडातील मलावी व केनिया या अविकसित देशांतील दोघे आहेत. आणि दक्षिण आशियातील पाकिस्तान व भारत या विकसनशील देशांतील दोघे आहेत. या सहाही मुला-मुलींची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. 

या सर्वांचे पराक्रम ८ ते १६ वर्षे या वयोगटात असतानाचे आहेत. आता हे सर्वजण २० ते ३५ या वयोगटात आहेत. त्या-त्या वेळी काहीतरी पराक्रम केले आणि नंतर स्मृतिआड झाले, असे यापैकी कोणाच्याच बाबतीत झालेले नाही. हे सहाही जण आपापल्या क्षेत्रात ‘सामाजिक’ म्हणावे असे काही ना काही काम आजही करीत आहेत. या सर्वांची माहिती, छायाचित्रे, त्यांच्या कामासंदर्भातील व्हिडिओ क्लिप्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. टिली स्मिथ या मुलीविषयी विवेक सावंत यांनी तर रायनविषयी सुधाताई बोडा (साने गुरुजींची पुतणी) यांनी गेल्या वर्षीच गप्पांच्या ओघात सांगितले होते. उर्वरित चौघे मात्र बरीच छाननी करून निवडले आहेत. त्यासाठी अनेक पुस्तके 'नजरे'खालून घालावी लागली, इंटरनेटवरून अनेक लिंक्स बघाव्या लागल्या. या सर्व प्रक्रियेतून निवडलेली ही धडपडणारी मुले, साने गुरुजींच्या ‘गोड गोष्टी’मध्ये शोभतील अशी आहेत. 

यानंतर पुढे काय, असा प्रश्न नियमितपणे बालकुमार साधना वाचणारांच्या मनात येईल. तीन नियोजित प्रकल्प सांगता येतील. 
१. एकूण दहा बालकुमार दिवाळी अंकांतील निवडक लेखांचे पुस्तक २४ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित होईल. 
२. पुढील वर्षी म्हणजे २०१८ च्या २३ व २४ डिसेंबरला कुमारांचे साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित करण्याचा विचार आहे.
३. आगामी दोन वर्षांत, अनेक छोटी-छोटी पण आकर्षक पुस्तके ‘कुमार वाचनमाला’ या नावाने साधना प्रकाशनाकडून येतील.
 
अर्थातच, हे सर्व करताना भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली मूल्ये आणि साने गुरुजींना अपेक्षित असलेले संस्कार पेरण्याचा व रूजवण्याचा प्रयत्न केंद्रस्थानी राहणार आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली बालकुमार अंकाचे अभियान पहिली पाच वर्षे राबवले गेले. आताचा हा दहावा अंक त्यांच्या स्मृतीला अर्पण करीत आहोत.
 

Tags: संपादकीय बालकुमार vinod shirsath editorial balkumar 2017 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके