डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

निव्वळ गुणवत्तेचा विचार केला तर, फार काही माहीत नसलेले लोकही राव यांना दिलेल्या ‘भारतरत्न’चे स्वागतच करतील. विज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ-जाणकारही त्याविरोधात आवाज काढून औचित्यभंग करणार नाहीत, आणि समजा तसा  राग कोणी आळवलाच तरी त्याकडे अन्य लोक लक्ष देणार नाहीत. म्हणजे राव यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भात काहीच वाद  उरत नाही. राहतो प्रश्न सचिनला भारतरत्न देण्याचा. त्यातही विशेष हे आहे की, कोणीही आणि कितीही आक्षेप घेतले तरी  सचिन तेंडुलकरचे क्रिकेट जगतातील स्थान आणि त्याचे कर्तृत्व अफाट आहे, अलौकिक आहे. येथे प्रश्न येतो तो एवढाच  की, खेळातील कर्तृत्वासाठी भारतरत्न द्यावे का आणि त्यातही क्रिकेटसारख्या (पूर्वी उच्चभ्रूंचा आणि आता बाजारू समजणारा  जाणारा) खेळातील कौशल्याला देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान द्यावा का?

दोन महिन्यांपूर्वी सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी खेळून  निवृत्त झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. पण त्याच वेळी भारतातील ज्येष्ठ वैज्ञानिक सी.एन.आर.राव यांनाही भारतरत्न जाहीर झाला. त्यानंतरचा एक आठवडाभर तरी देशातील सर्व माध्यमांतून या दोघांना मिळालेल्या भारतरत्नविषयी भरपूर उलट-सुलट चर्चा झाली. सचिनला भारतरत्न दिला गेला याबद्दल काही लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सी.एन.आर.राव यांना भारतरत्न दिला गेला याविषयी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही, मात्र सचिनच्या कसोटी  कारकिर्दीच्या समारोपाचा मुहूर्त शोधून राव यांना भारतरत्न जाहीर केला याबद्दल क्षीण आवाजात नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या वेळी माध्यमांवर वेगळ्याच कारणासाठी  कठोर टीका झाली, ती म्हणजे राव यांना जितके महत्त्व द्यायला हवे होते तितके दिले गेले  नाही.

यासंदर्भात स्वत: राव यांनीच दिलेले स्पष्टीकरण समर्पक आहे. ते म्हणाले होते- ‘सचिन ही पब्लिक फिगर आहे.’ मोठ्या जनसमूहाचा क्रिकेटशी संबंध येतो. त्यामुळे सचिनविषयी माध्यमांना जास्त माहिती असणे व मोठ्या जनसमूहालाही त्याच्याविषयी जास्त कुतूहल असणे स्वाभाविक आहे. म्हणजे राव यांना कमी प्रसिद्धी दिली गेली यात काहीच वावगे नाही. पण पहिला आक्षेप मात्र महत्त्वाचा आहे- सचिनच्या निवृत्तीचा मुहूर्त  साधून त्याला भारतरत्न देण्यात गैर काही नसले तरी, राव यांना भारतरत्न देण्याचा निर्णय जाहीर करण्यासाठी तोपर्यंत थांबणे ही केंद्र सरकारच्या बाजूने चूकच झाली. एका मर्यादित अर्थाने ते राव यांचे अवमूल्यनही आहे. या दोघांनाही भारतरत्न देण्याचा निर्णय कधी आणि कसा झाला हे कळावयास मार्ग  नाही. सचिनला भारतरत्न द्यायचे ठरवले आणि त्यावर होणारी संभाव्य टीका टाळण्यासाठी  आणखी कोणाला तरी भारतरत्न द्यायचे ठरले; त्यातून राव यांचे नाव पुढे आले, अशी एक  शक्यता आहे. किंवा राव यांना भारतरत्न देण्याचा विचार बऱ्याच आधीपासून होता आणि  नंतर सचिनलाही याच वेळी भारतरत्न दिले तर फारशी टीका होणार नाही, असा विचार झाला  असावा.

दोनही शक्यता नाकारता येणार नाहीत, कारण सचिनला भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी गेली काही वर्षे चर्चेत होती आणि सी.एन.आर.राव हेही पंतप्रधानांना विज्ञानविषयक सल्ला देणाऱ्या टीममध्ये गेली काही वर्षे होते. त्यामुळे सचिनचे नाव बाहेरून व राव यांचे नाव आतून भारतरत्नसाठी चर्चेत राहिले असावे. दोन्हींपैकी कोणतीही शक्यता  खरी असली आणि राव यांचे अवमूल्यन झाले की नाही हा भाग बाजूला ठेवला तरी ‘विज्ञान’ या विषयाचे महत्त्व सरकारच्या लेखी कमी आहे, असा त्यातून अर्थ निघतो. पण तसा अर्थ  काढायचा असेल तर, जनसामान्यांत व प्रसारमाध्यमांतही राव यांना व विज्ञान या विषयाला  कमी महत्त्व आहे हे मान्य करावे लागते. म्हणजे लोकशाहीत तरी ‘यथा राजा तथा प्रजा’ ही  म्हण उलटी करून घ्यावी लागते.

आता (4 फेब्रुवारी रोजी) त्या दोघांनाही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न  प्रदान केला गेला आहे. त्यामुळे यापुढे औचित्याचा व अवमूल्यनाचा वाद बाजूला ठेवून, त्या दोघांना भारतरत्न का दिले गेले असावे याचा विचार करायला हवा. त्यातून योग्य ते अर्थ  काढायला हवेत आणिअर्थातच योग्य तो संदेश नव्या पिढीपर्यंत जायला हवा. या संदर्भात, एक प्रमुख मुद्दा अजिबात नजरेआड करून चालणार नाही : तो म्हणजे, असे पुरस्कार/  सन्मान देण्यामागे राजकारण असते आणि राजकीय विचारही असतोच. तसे ते इथेही असणार. म्हणजे काँग्रेस आघाडी  सरकारला आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी प्रत्यक्ष वाअप्रत्यक्ष कमी वा अधिक फायदा होईल असा विचार निश्चितच केला गेला असणार. हा विचार करण्यात गैर काहीही नाही, जर पुरस्कार दिलेल्या व्यक्ती त्यासाठी लायक असतील  तर!

निव्वळ गुणवत्तेचा विचार केला तर, फार काही माहीत नसलेले लोकही राव यांना दिलेल्या ‘भारतरत्न’चे स्वागतच करतील. विज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ-जाणकारही त्याविरोधात आवाज काढून औचित्यभंग करणार नाहीत, आणि समजा तसा  राग कोणी आळवलाच तरी त्याकडे अन्य लोक लक्ष देणार नाहीत. म्हणजे राव यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भात काहीच वाद  उरत नाही. राहतो प्रश्न सचिनला भारतरत्न देण्याचा. त्यातही विशेष हे आहे की, कोणीही आणि कितीही आक्षेप घेतले तरी  सचिन तेंडुलकरचे क्रिकेट जगतातील स्थान आणि त्याचे कर्तृत्व अफाट आहे, अलौकिक आहे. येथे प्रश्न येतो तो एवढाच  की, खेळातील कर्तृत्वासाठी भारतरत्न द्यावे का आणि त्यातही क्रिकेटसारख्या (पूर्वी उच्चभ्रूंचा आणि आता बाजारू समजणारा  जाणारा) खेळातील कौशल्याला देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान द्यावा का?

या संदर्भात, आपल्या हाताशी असलेली साधी सत्ये आपण नजरेआड करतो आणि काही चमकदार सत्ये नको तितकी  नजरेसमोर ठेवतो. म्हणजे सचिनचे व्यक्तिगत विक्रम किती झाले आणि जाहिराती करून किंवा वेगवेगळ्या कंपन्यांशी करार  करून त्याने किती कोटी रुपये जमवले हे आपण सतत नजरेसमोर ठेवतो, पण गेल्या दोन दशकांत सचिन तेंडुलकर या खेळाडूने  क्रिकेटच्या माध्यमातून भारतातील करोडो जनतेचे जे मनोरंजन केले, उद्‌बोधन केले, जो आनंद दिला; त्याचे मोल किती आहे, याचे मोजमाप करायचे की नाही? हाच मुद्दा पुढे आणून असे म्हणता येईल की, करोडोंच्या मनातील देशाविषयीच्या भावना उत्तेजित करण्यात, देशप्रेम जागविण्यात त्याचे योगदान कितीतरी मोठे आहे. खेळाचे समाजजीवनातील स्थान लक्षात घेतले  तर हा मुद्दा अधिक प्रकर्षाने लक्षात येईल. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक आरोग्य या संदर्भात प्रत्यक्षात दिसत नसले तरी खेळ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. (त्यामुळे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने भरवणे किंवा न भरवणे याला विशेष महत्त्व असते.) हे लक्षात घेतले तर राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत, विज्ञान इत्यादी क्षेत्रांत जसे  भारतरत्न दिले जातात तसे खेळाला देण्यात काही गैर नाही, किंबहुना ते स्वागतार्हच आहे.

Tags: सी.एन.आर.राव कॉंग्रेस सचिन तेंडुलकर भारतरत्न इंडिया पाकिस्तान भारत क्रिकेट विज्ञान प्रणव मुखर्जी राष्ट्रपती औचित्यभंग आणि अवमूल्यन संपादकीय India Pakisthan Bharat Cricket Vidnyan Pranav Mukharji Rashtrpati C.N.R.Rao Cogress Sachin Tendulkar Bharatratn aouchitybhang Aani Avmulyan Sampadkiy editorial Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके