बरोबर नऊ महिन्यांपूर्वी म्हणजे 20 मे, 2014 रोजी नीतिशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि जीतनराम मांझी या आपल्या विश्वासू सहकाऱ्याकडे ते पद सोपवले होते. राजीनाम्याचे नीतिशकुमारांनी दिलेले कारण, लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) पक्षाला 40 पैकी केवळ 2 जागा मिळाल्या होत्या म्हणजे दारुण अपयश वाट्याला आले होते. त्या अपयशाची नैतिक जबाबदारी नीतिशकुमारांनी स्वीकारली होती. तेव्हा दोन प्रश्न निर्माण झाले होते. एक म्हणजे- आता नीतिशकुमार कोणते राजकारण करणार? आणि दुसरे- जीतनराम मांझी यांना किती काळ मुख्यमंत्री म्हणून काम करू देणार?
हा अंक वाचकांच्या हातात पडलेला असेल तेव्हा (20 फेब्रुवारी) बिहारमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात आलेली असेल, म्हणजे चार शक्यतांपैकी काही तरी घडलेले असेल. एक- मुख्यमंत्री जीतनराम मांझी बहुमत सिद्ध करू शकले नाहीत म्हणून राजीनामा देऊन मोकळे झालेले असतील आणि नीतिशकुमार यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रित केलेले असेल. दुसरी शक्यता- संयुक्त जनता दलात फूट पाडून, भाजपच्या पाठिंब्याने सरकार वाचले असेल, त्यामुळे पुढील आठ महिने (नियोजित विधानसभा निवडणुकीपर्यंत) जीतनराम मांझी मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार, हे स्पष्ट झालेले असेल. तिसरी शक्यता- एकूण गदारोळ आणि फोडा-फोडीचे राजकारण लक्षात घेऊन, विधानसभा बरखास्त करण्याची राज्यपालांची शिफारस राष्ट्रपतींनी मंजूर केलेली असेल. आणि चौथी शक्यता राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींकडून पुनर्विचार किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवण्यासाठी नीतिशकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांकडून जोरदार तयारी चालू असेल. अर्थातच, हा अंक छापायला गेला तोपर्यंत पहिली शक्यता खरी ठरणार असे दिसत होते. म्हणजे नीतिशकुमार मुख्यमंत्री होणार आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू करणार. पण ते काहीही ठरो; भविष्यात काय होईल याचे अंदाज बांधण्यापेक्षा मागच्या नऊ महिन्यांत काय घडले, यावर एक ओझरता दृष्टिक्षेप टाकून काहीएक बोध हाती लागतोय का, ते पाहायला हवे.
बरोबर नऊ महिन्यांपूर्वी म्हणजे 20 मे, 2014 रोजी नीतिशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि जीतनराम मांझी या आपल्या विश्वासू सहकाऱ्याकडे ते पद सोपवले होते. राजीनाम्याचे नीतिशकुमारांनी दिलेले कारण, लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) पक्षाला 40 पैकी केवळ 2 जागा मिळाल्या होत्या म्हणजे दारुण अपयश वाट्याला आले होते. त्या अपयशाची नैतिक जबाबदारी नीतिशकुमारांनी स्वीकारली होती. तेव्हा दोन प्रश्न निर्माण झाले होते. एक म्हणजे- आता नीतिशकुमार कोणते राजकारण करणार? आणि दुसरे- जीतनराम मांझी यांना किती काळ मुख्यमंत्री म्हणून काम करू देणार? नीतिशकुमार यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाविषयी बऱ्यापैकी मत असणाऱ्यांनी असे गृहीत धरले होते की, यानंतर ते पुन्हा राष्ट्रीय स्तरावर संयुक्त जनता दलाचे नेतृत्व करणार आणि तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार (किमान नरेंद्र मोदी व भाजप सरकार यांना विरोध करण्याची भूमिका दिल्लीत राहून बजावणार.) आणि मांझी यांना आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत (नोव्हेंबर 2015) मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवणार. पण हा अंदाज फोल ठरला आणि गेल्या आठ-नऊ महिन्यांत नीतिशकुमारांची वाटचाल ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच राहिली आहे. राष्ट्रीय स्तरावर वावरणे तर सोडाच, लालूप्रसाद व मुलायमसिंह या दोन यादवांच्या संगतीत काहीबाही उलाढाली करत करत नीतिशकुमारांनी आपले अवमूल्यन तेवढे करून घेतले. याचा अर्थच हा आहे की, राज्याच्या बाहेर पडणे नीतिशकुमारांना शक्य झाले नाही किंवा त्यांची तशी इच्छाच नव्हती. त्यामुळेच मग प्रश्न असा आहे की, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरजच काय होती? केवळ स्वत:ची प्रतिमा उंचावणे आणि आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करणे यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता का? त्याचाच भाग म्हणून आपल्या ताब्यात राहू शकतील अशा जीतनराम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले आणि महादलिताला मुख्यमंत्री केल्याचे श्रेयही मिळवले, असे काही आहे का? ते काहीही असो; भारतीय राजकारणात तुलनेने स्वच्छ प्रतिमा असलेले, बिहारचे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून चांगलेच कौतुक झालेले आणि तत्त्व व व्यवहार यांची सांगड घालणारे (चाणक्य म्हणवले जाणारे) नीतिशकुमार गेल्या आठ-नऊ महिन्यांत सैरभैर झाले, हे खरे! याचे कारण जीतनराम मांझी यांच्याबाबतचे त्यांचे आडाखे चुकले, असे तरी म्हणावे लागेल; किंवा लालू-मुलायमसिंह यांच्या नादाला लागून त्यांची घसरण होत राहिली, असे म्हणावे लागेल.
नीतिशकुमारांच्या या फसलेल्या रणनीतीचा विचार करताना यालाच समांतर म्हणावे असे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक ठळक उदाहरण आठवते. बावीस वर्षांपूर्वी असाच प्रकार शरद पवार व सुधाकरराव नाईक यांच्याबाबत घडला होता. 1991 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात संरक्षणमंत्री झालेल्या शरद पवार यांचे वजन राज्यात व काँग्रेस पक्षातही खूपच वाढले होते. त्यामुळे सुधाकरराव नाईक या आपल्या विश्वासू सहकाऱ्याला त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले होते. तेव्हा त्यांनीही असाच विचार केला होता की, सुधाकरराव नाईक आपल्या ताब्यात राहतील आणि नॉनमराठा व विदर्भातील व्यक्तीला मुख्यमंत्रिपद दिल्याचे श्रेय मिळवता येईल. पण सरकार चालवताना सुधाकरराव स्वतंत्र बाणा दाखवू लागले आणि त्यामुळे शरद पवारांशी त्यांचे खटके उडू लागले आणि जेमतेम वर्ष होत नाही, तोच त्यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला. तेव्हा पंतप्रधान नरसिंह रावांनी सुधाकररावांना छुपे पाठबळ दिले होते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेल्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळातही डोईजड असलेल्या पवारांना आवरण्यासाठी नरसिंह रावांनी ती खेळी केली होती किंवा होऊ दिली होती. त्या वेळी पवार व नाईक यांच्यातील संघर्ष विकोपाला जात असतानाच, मुंबईत (1993) बाँबस्फोट मालिका घडून आली. त्यामुळे ‘‘नाईकांना बदलण्याची मागणी मान्य करायची असेल तर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर तुम्हाला जावे लागेल’’ अशा कोंडीत नरसिंह रावांनी पवारांना पकडले होते. त्यानंतर देशाचे संरक्षणमंत्रिपद सोडून पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळायला पुन्हा मुंबईत आले होते. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतला तो सर्वांत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता आणि त्यानंतर पवारांचे एकूण राजकीय व नैतिक वजन यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या, त्यातून ते पुन्हा कधीच बाहेर पडू शकले नाहीत. आता नीतिशकुमारांच्या बाबतीतही तसेच होणार का? त्यांच्या राजकीय व नैतिक वजनाच्या मर्यादा आताच्या या घटनेने निश्चित झाल्या आहेत, असा अर्थ घेता येईल का? पुढे काय होईल हे कळेलच, पण सध्या तरी तशीच शक्यता स्पष्ट दिसते आहे.
नाईकांनी पवारांच्या विरोधात केलेले बंड आणि मांझी यांनी नीतिशकुमारांच्या विरोधात केलेले बंड यांत काही साम्यस्थळे दिसतात. नाईकांनी बंड केले तेव्हा पंतप्रधान नरसिंह रावांचा छुपा पाठिंबा होता आणि आता मांझी यांच्या बंडाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आहेत, हे लपून राहिलेले नाहीत; पण तरीही नाईक व मांझी यांच्या बंडखोरीचे महत्त्व कमी होत नाही, किंबहुना त्या दोघांनाही त्यांचे रास्त श्रेय द्यावेच लागेल. ‘‘मी रबरस्टँप मुख्यमंत्री म्हणून काम करावे, अशी त्यांची इच्छा होती’’ हे वाक्य नाईक व मांझी या दोघांकडूनही आले. ‘‘गुन्हेगारांवर कडक कारवाई करायला निघालो, तेव्हा माझ्यावर दबाव आणला गेला.’’ असे विधानही त्या दोघांकडून आले. पवारांना उघड आव्हान देताना नाईक म्हणाले होते, ‘‘मी पूर्वाश्रमीचा शिकारी आहे; सावज टप्प्यात आल्याशिवाय गोळी झाडायची नाही, हे मला माहीत आहे.’’ तर नीतिशकुमारांना उघड आव्हान देताना मांझी म्हणाले, ‘‘मी पूर्वाश्रमीचा पहिलवान आहे, त्यामुळे समोरच्याला चीतपट कसे करायचे, ते मला माहीत आहे.’’ त्या वेळी नाईकांनी बलाढ्य पवारांची प्रतिमा बरीच खराब करून टाकली आणि राजीनामा दिला, त्यानंतर हिमाचल प्रदेशचे राज्यपालपद पदरात पाडून घेतले. आताही नीतिशकुमारांचा नैतिकतेचा मुखवटा खराब करून मांझी सत्तेवरून पायउतार होतील तेव्हा थेट भाजपमध्ये जाऊन कोणते पद मिळवतात, हे पाहायला हवे. (आता 70 वर्षांचे असलेले मांझी यांना भाजपने राज्यपालपद दिले, तर आश्चर्य वाटू नये.)
नाईक आणि मांझी या दोघांच्या बंडखोरीकडे जरा अधिक सूक्ष्मात विचार करूनही पाहायला हवे. दोघांच्याही पाठीशी म्हणावे असे राजकीय बळ नव्हते; पण दोघेही तीन दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहून, वेगवेगळी मंत्रिपदे सांभाळून नंतर मुख्यमंत्री झाले होते; म्हणजे बऱ्यापैकी अनुभवी राजकारणी होते, त्यामुळे दोघांनीही राजकारणाचे सर्व रंग पाहिले होते आणि आपल्याला मुख्यमंत्री करणाऱ्या नेत्याला ते दोघेही चांगलेच ओळखून होते. त्यामुळे त्यांना बंडखोरी करणे सोपे गेले, हे खरे! पण त्यांना तशी बंडखोरी का करावीशी वाटली असावी? ते आपल्या नेत्याविषयी कृतघ्नपणे वागले का? आपल्याला मोठे करणाऱ्या नेत्याचेच वस्त्रहरण त्यांना का करावेसे वाटले? असे करण्याने आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती त्यांना वाटली नाही का? यामुळे आपले एका छोट्या गटाकडून/समूहाकडून कौतुक होईल, पण फार मोठ्या समूहाच्या दृष्टीने आपण विश्वासघातकी ठरणार नाही का? हे सर्व प्रश्न नाईक व मांझी या दोघांनाही निश्चितच पडले असणार; किंबहुना या दोघांचाही संघर्ष काही महिने चालू होता, त्यामुळे त्यांना या व अशा प्रश्नांनी खूपच सतावले असणार. पण तरीही त्या दोघांनी आपल्या संघर्षाकडे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची लढाई म्हणून पाहिले आणि आपण पराभूत होणार आहोत, हेही त्यांना माहीत होते. किंबहुना, या दोघांनीही हरणारी लढाई लढायचा निश्चय केला, कारण ती त्यांच्या आत्मसन्मानाची लढाई होती. ते ज्या पदावर बसले होते, त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याचा आणि मुख्यमंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेशी एकनिष्ठ राहण्याचाही तो प्रश्न होता.
भटक्या-विमुक्त समाजातील व विदर्भातील नेते अशी विशेषणे सुधाकरराव नाईक यांना निश्चितच आवडली नसणार आणि मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या आमदार व अन्य मंत्र्यांकडून कळत-नकळत त्यांचा वारंवार अवमान झाला असणार. शरद पवारांच्या जवळचे व खास असे नेते-कार्यकर्ते पवारसाहेबांनी नेमलेले मुख्यमंत्री म्हणून नाईकांकडे पाहत असणार, तशा प्रकारचा दबावही आणत असणार. हे सर्व क्रमाक्रमाने वाढत गेले आणि सहन करणे अवघड झाले, तेव्हा नाईकांनी प्रतिशोध घेण्याचा निश्चय केला असणार; त्याशिवाय अशा एकाकी लढाईला बळ कसे मिळाले असणार? जीतनराम मांझी यांच्याबाबतही असेच घडले असणार. एका महादलिताला मुख्यमंत्रिपद बहाल करणारे नीतिशकुमार, ही प्रतिमा संपूर्ण बिहारच्या तळागाळात निर्माण झाली. त्यामुळे दाता आणि याचक असे काही तरी चित्र निर्माण झाले असणार. सर्व यादव मंडळी, मंत्री, आमदार, कार्यकर्ते-नेते नीतिशबाबूंनी उभा केलेला म्हणजे त्यांची मर्जी असेपर्यंत टिकणारा मुख्यमंत्री अशा नजरेनेच मांझी यांच्याकडे पाहत असणार. यातूनही अनेक वेळा अनेकांकडून कळत-नकळत मांझी यांचा अवमान झाला असणार, आत्मसन्मान दुखावला गेला असणार. आणि ते रोखण्यात नीतिशकुमार कमी पडले असणार किंवा त्यांच्याकडूनही तशा प्रकारचे वर्तन काही वेळा घडले असणार. म्हणजे हा सर्व राग साचून राहिला, खदखदत राहिला आणि त्यातूनच बंडखोरी करण्याची मांझी यांची ऊर्मी प्रबळ झाली असणार.
सुधाकरराव नाईक आणि जीतनराम मांझी या दोघांचीही ओळख त्यांच्या तीस-पस्तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ‘विशेष कर्तबगार’ अशी नव्हती, त्या दोघांकडूनही अनेक चुका घडल्या असतील, त्यांनी आयुष्यभर प्रवाहपतित व संधिसाधू राजकारण केले असेल. दोघांनाही आपापला समूह किंवा मतदारसंघ सोडून राज्यात अन्यत्र फारसे स्थान नसेलही कदाचित. पण दोघांनीही आपल्या उत्तरायुष्यात दिलेले लढे कौतुकास पात्र ठरणारे आहेत. कारण या त्यांच्या बंडखोरीमुळे त्यांचे स्वत:चे आणि ज्यांच्या विरोधात बंडखोरी केली त्यांचेही नुकसान झाले, पण भारतीय लोकशाहीचा मात्र फायदाच झाला आहे. आता 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल, तेव्हा त्यांच्या एककल्ली स्वभावावर किंवा त्यांच्या वर्तनावर, कारभारावर बरीच टीका होईल; पण तो ठराव मांडताना त्यांना जर सविस्तर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपली कैफियत प्रामाणिकपणे मांडली तर अनेकांच्या काळजाला घरे पडतील.
हा अंक छापायला जात असताना (16 फेब्रुवारी), भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी आली आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. यासंदर्भातील सविस्तर लेखन पुढील अंकात...
Tags: सुधाकरराव नाईक शरद पवार महाराष्ट्र जीतनराम मांझी नीतिशकुमार मुख्यमंत्री राजकारण बिहार संपादकीय Sudhakarrao Naik Sharad Pawar Maharashtra Jeetanram Manzi Neetishkumar Chief Minister Politics Bihar Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या