डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जैव रसायनशास्त्रातील आद्य भारतीय प्रणेत्या डॉ. कमला सोहोनी

आपले संशोधन आपल्या देशबांधवांसाठीच, ही त्यांची भूमिका ठाम राहिली आणि आपले संशोधन त्यांनी येथेच चालू ठेवले. दिल्लीच्या लेडी हार्डिंग कॉलेजमध्ये त्यांनी इंग्लंडहून परतल्यावर नोकरी धरली आणि आपल्या विषयाचे संशोधन करताना अनेकांना मौलिक मार्गदर्शन केले.

प्रख्यात जैव रासायनिक शास्त्रज्ञ (बायोकेमिस्ट) डॉ. कमला सोहोनी यांचे मागील आठवड्यात म्हणजे 8 सप्टेंबरला दिल्ली येथे निधन झाले, ही घटना वैज्ञानिक जगताला निश्चितच धक्का देणारी आहे. डॉ. कमला सोहोनी या भारतातल्या पहिल्या महिला वैज्ञानिक होत्या आणि जैव रासायनिक क्षेत्र आणि आहारशास्त्र यांच्यामध्ये त्यांनी भरीव कार्य केले होते. सतत ज्ञानसाधन आणि मुक्तविचार ही पार्श्वभूमी असलेल्या भागवत कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रख्यात लेखिका आणि विचारवंत श्रीमती दुर्गा भागवत यांच्या कमलाबाई या कनिष्ठ भगिनी. त्यांचे वडील हे सुप्रसिद्ध रसायनशास्रज्ञ होते आणि बंगलोरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये नोकरी करीत होते. 

मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पदवी घेतलेल्या कमलाबाईंनी बंगलोरला आपल्याच संस्थेत पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा अशा इच्छेने त्यांनी आपल्या मुलीला बंगलोरला नेले. पण केवळ मुलगी म्हणून प्रथम तिला संस्थेत प्रवेश नाकारण्यात आला. पुढे संस्थेचे चालक आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांच्याशी भेट झाल्यावर या मुलीच्या बुद्धिमत्तेचे तेज पाहून ते चकित झाले आणि त्यांनी तिला संस्थेत दाखल करून घेतले. डॉ. रमण आणि कमलाबाई वा दोघांनाही टेनिसची अतिशय आवड. कमलाबाईच्या टेनिसपटुत्वामुळे डॉ. रमण यांच्याशी त्यांची चांगलीच मैत्री जमली. टेनिस कोर्टावर त्यांनी अनेक स्नेही जोडले आणि भोवतालच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या लोकप्रिय झाल्या. याच काळात डॉ. चंद्रशेखर या दुसऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाशी त्यांचा परिचय झाला. 

डॉ. चंद्रशेखर यांनी त्यांना संशोधनात मोठे उत्तेजन दिले. पुढे केंब्रिजला जाऊन डॉक्टरेट घेतल्यावर कमलाबाईंनी अमेरिकेत स्थायिक व्हावे यासाठी डॉ. चंद्रशेखरनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण आपले संशोधन आपल्या देशबांधवांसाठीच, ही त्यांची भूमिका ठाम राहिली आणि आपले संशोधन त्यांनी येथेच चालू ठेवले. दिल्लीच्या लेडी हार्डिंग कॉलेजमध्ये त्यांनी इंग्लंडहून परतल्यावर नोकरी धरली आणि आपल्या विषयाचे संशोधन करताना अनेकांना मौलिक मार्गदर्शन केले. डॉ. सुशिला नय्यर या त्यांच्यापैकी एक. आहारशास्त्र हा कमलाबाईंच्या विशेष आवडीचा विषय. त्यासाठी आहारविषयक मूलभूत संशोधन करणाऱ्या कुन्नूर येथील संस्थेत त्यांनी बरीच वर्षे काम केले व नंतर मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या त्या संचालक झाल्या आणि त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. 

अखिल भारतीय ग्राहक मार्गदर्शन चळवळीच्या त्या अध्यक्षा होत्या. ग्राहकांचे हक्क, अन्नातील भेसळ, गरीब  वर्गाला परवडणाऱ्या पाककृती इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी भरपूर लेखन केले. स्वतंत्र प्रज्ञेच्या कमलाबाई सोहोनी यांनी आणीबाणीला विरोध दर्शविला होता. श्रीमती इंदिरा गांधींनी त्या काळात भरलेल्या सायन्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन केले म्हणून त्या अधिवेशनाला कमलाबाई उपस्थित राहिल्या नाहीत. मृत्यूपूर्वी काही दिवसच आधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चतर्फे त्यांचा दिल्ली येथे सत्कार आयोजित केला होता. जैव रसायन आणि आहारशास्त्रातील आद्य संशोधिका अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला. त्या समारंभातच त्या कोसळल्या आणि पुढे चारच दिवसांनी वयाच्या 86 व्या यर्षी त्यांचे निधन झाले. शेवटपर्यंत कार्यमग्न राहिलेल्या कमलाबाईंनी भारतीय वैज्ञानिकांत एक अढळ स्थान मिळविले आहे.

Tags: दिल्ली  डॉ. चंद्रशेखर नोबेल कॉंग्रेस इंदिरा गांधी दुर्गा भागवत डॉ. सी. व्ही. रमण डॉ. कमला सोहोनी Delhi DR. Chandrashekhar Nobel Indira Gandhi Durga Bhagawat C.V. Raman Dr Dr. Kamla Sohoni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके