डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

65 वर्षांपूर्वीचे इंग्रजी पुस्तक मराठीत अवतरले...

महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या प्रस्तावनेत केलेल्या दोन नोंदी विशेष लक्षणीय आहेत. एक-आगरकर यांच्याकडे कल असणाऱ्या दोन अभ्यासकांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. दोन- आशियाला केंद्रस्थानी ठेवून व जागतिक भूमिकेतून लिहिलेले हे पुस्तक आहे. ही दोन्ही निरीक्षणे महत्वाची आहेत. शिवाय, त्यावेळचा देश-विदेशातील इंग्रजी वाचक समोर ठेवून हे पुस्तक लिहिले गेले असणार, हे तर उघड आहे. या तिन्ही वैशिष्ट्‌यांमुळे हे पुस्तक आज उद्याच्या विविध विद्याशाखांमधील अभ्यासकांनी व राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचायला हवे. टिळकांचे 101 वे मृत्यूवर्ष संपत असताना (1 ऑगस्ट) आणि प्रधानांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना (26 ऑगस्ट), हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून येत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.

23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 असे 64 वर्षांचे आयुष्य लाभलेले लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी होते. ‘हिंदी असंतोषाचे जनक’ असे त्यांना संबोधले गेले आणि भारतीय राजकारणातील एक कालखंड ‘टिळक पर्व’ म्हणूनही ओळखला जातो. आधी राजकीय की आधी सामाजिक, हा टिळक-आगरकर वाद संपूर्ण विसाव्या शतकातील महाराष्ट्रात चर्चेचा विषय राहिला. गेल्या वर्षी गोपाळ गणेश आगरकर यांचे सव्वाशेवे मृत्युवर्ष तर बाळ गंगाधर टिळक यांचे शंभरावे मृत्यूवर्ष आले आणि गेले. या वर्षात त्यांच्यावर फार काही झाले नाही, पण त्या दोघांवरही मराठीत काही चांगली चरित्रे पूर्वी येऊन गेली आहेत.

लोकमान्य टिळक यांच्यावर त्यांच्या मृत्यूनंतर काहीच वर्षानी आलेल्या चरित्र ग्रंथांमध्ये न. चिं. केळकर व न. र. फाटक यांनी लिहिलेली चरित्रे विशेष महत्त्वाची मानली गेली. त्यामुळे टिळकांचे जन्मशताब्दीवर्ष 1956 मध्ये आले तेव्हा नवे चरित्र लिहिणाऱ्यांसमोर वेगळे व नवे असे काय मांडायचे असे आव्हान होते. मात्र तरीही त्या वर्षी काही नवी चरित्रे लिहिली गेली आणि प्रकाशितही झाली, त्यातील एक चरित्र होते अ.के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले. ते दोघेही त्यावेळी इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक होते आणि दोघांनीही तेव्हा वयाची पस्तीशी ओलांडली नव्हती. आपले चरित्र वेगळे आणि विश्लेषणात्मक व चिकित्सक व्हावे, अशी आकांक्षा त्यांनी बाळगली होती. त्यासाठी ‘आधुनिक भारत’ हे मराठीतील माईलस्टोन पुस्तक लिहिणारे आचार्य जावडेकर यांच्या घरी (इस्लामपूर, जिल्हा कोल्हापूर) काही काळ जाऊन ते दोघेही राहिले होते.

त्यांचे पुस्तक लिहून पूर्ण होत आले तेव्हा म्हणजे 1956 मध्ये, अखिल भारतीय काँग्रेस समितीने टिळक चरित्रग्रंथ लेखनाची स्पर्धा घोषित केली आणि प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. त्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तीन पुस्तकांना विभागून देण्यात आले. त्यात त्र्यं. वि. पर्वते आणि शि.ल. करंदीकर यांनी लिहिलेली दोन मराठी पुस्तके होती तर अ.के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक होते.

‘लोकमान्य टिळक अ बायोग्राफी’ या नावाने ते पुस्तक 1959 मध्ये जयको पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले.  पण मूळ हस्तलिखितातील एक तृतीयांश भाग वगळण्यात आला होता, तरीही ते पुस्तक 376 पानांचे झाले होते. अर्थातच त्यामागे व्यावहारिक कारणे असणार. म्हणजे 1954 मध्ये ते पुस्तक लेखनास प्रारंभ झाला, 1956 मध्ये ते लिहून पूर्ण झाले, स्पर्धेचा निकाल 1957 मध्ये लागला आणि प्रत्यक्षात पुस्तक प्रकाशित झाले 1959 मध्ये, तेही एक तृतीयांश भाग वगळून. म्हणजे टिळक जन्मशताब्दी वर्षातच टिळकांच्या संदर्भातील लेखनाची हेळसांड सुरू झाली होती. त्या अनुभवामुळे भागवत व प्रधान काहीसे निराश झाले, परिणामी दोघेही मराठीत उत्तम लेखन करीत असूनही त्यांनी ते पुस्तक मराठीत आणण्याचा विचार अंमलात आणला नाही. (या संदर्भातील प्रधान सरांच्या आत्म्‌कथनातील उतारा या पुस्तकात सुरुवातीलाच घेतला आहे.) अर्थात, त्यानंतर ग.प्र.प्रधान यांनी नॅशनल बुक ट्रस्ट व अन्य प्रकाशनसंस्थांसाठी टिळकांची दोन-तीन लहान चरित्रे नव्याने लिहिली. त्यामुळेही हे मोठे पुस्तक मराठीत आणण्याचा विचार मागे पडला.

2006 मध्ये टिळकांचे 150 वे जयंती वर्ष आले तेव्हा अ. के. भागवत यांचे निधन झाले होते, पण ग. प्र. प्रधान हयात होते.. त्यांनी इंग्रजी टिळक चरित्राची नवी आवृत्ती (मूळ हस्तलिखित होते ते सर्व) प्रकाशित करण्यासाठी जयको प्रकाशनाकडे पाठपुरावा केला, त्यांनी तो मान्य केला. पण तरीही ते पुस्तक प्रकाशित व्हायला 2008 हे वर्ष उजाडले, तेव्हा टिळक 150 संपले होते. त्यामुळे, त्यावेळीही त्या पुस्तकाची फारशी चर्चा झाली नाही. त्यावेळी प्रस्तुत संपादक साधना साप्ताहिकात युवा संपादक या नात्याने कार्यरत होता, त्यामुळे या पुस्तकाच्या संदर्भातील प्रधान सरांच्या आठवणी त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाल्या होत्या. आणि तेव्हापासून हे पुस्तक  मराठीत यायला हवे असे वाटत होते.

त्यानंतर गेल्या वर्षी लोकमान्य टिळक यांचे मृत्यूशताब्दी वर्ष आले तेव्हा साधना साप्ताहिकाचा टिळक विशेषांक (1 ऑगस्ट 2020) काढला होता, त्यातच या  संपूर्ण पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचा संकल्प जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच अवधूत डोंगरे या तरुण अनुवादकाकडे ते काम सोपवले. अरुणा रॉय यांच्या ‘द आरटीआय स्टोरी’ या साडेचारशे पानांच्या पुस्तकाचा अचूक व प्रवाही अनुवाद त्यांनी आम्हाला चार महिन्यांत करून दिला होता. त्या अनुभवामुळे, या सहाशे पानांच्या पुस्तकाचाही अचूक व प्रवाही अनुवाद पुढील दहा महिन्यांत करण्याचे आव्हान अवधूत यांच्याकडे आम्ही सोपवले आणि त्यांनी ते समर्थपणे पेलवले आहे.

या मराठी आवृत्तीला प्रस्तावना लिहून घेणे आवश्यक वाटत होते आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना विनंती केली. ‘लोकमान्य ते महात्मा’ हे स्थित्यंतर कसे होत गेले याचा सर्वांगीण परामर्श घेणारा त्यांचा द्विखंडात्मक ग्रंथ तर आहेच, पण अलीकडेच त्यांनी नवे टिळक चरित्रही लिहिले आहे. त्यामुळे ते या अनुवादित पुस्तकाकडे कसे पाहतात याची उत्सुकता होती. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत केलेल्या दोन नोंदी विशेष लक्षणीय आहेत. एक-आगरकर यांच्याकडे कल असणाऱ्या दोन अभ्यासकांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. दोन- आशियाला केंद्रस्थानी ठेवून व जागतिक भूमिकेतून लिहिलेले हे पुस्तक आहे. ही दोन्ही निरीक्षणे महत्वाची आहेत. शिवाय, त्यावेळचा देश-विदेशातील इंग्रजी वाचक समोर ठेवून हे पुस्तक लिहिले गेले असणार, हे तर उघड आहे. या तिन्ही वैशिष्ट्‌यांमुळे हे पुस्तक आज उद्याच्या विविध विद्याशाखांमधील अभ्यासकांनी व राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचायला हवे. टिळकांचे 101 वे मृत्यूवर्ष संपत असताना (1 ऑगस्ट) आणि प्रधानांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना (26 ऑगस्ट), हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून येत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.

हे पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके