डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आम आदमी पार्टीला अनपेक्षितपणे मिळालेल्या यशामुळे व सत्ता स्थापन करण्याइतपत स्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांच्या भुवया तर उंचावल्या आहेतच, पण सतत तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असणाऱ्यांच्या आशेला नवी पालवी फुटली आहे. विशेष म्हणजे माध्यमांचे आणि निवडणूक सर्व्हे करणारांचे अंदाज कधी नव्हे इतके जुळून आले आहेत, त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास एक प्रकारे वाढला आहे. पण एकूणात विचार केला, तर भाजप पुढे येत असल्यामुळे चिंता व उत्साह असे दोन प्रमुख प्रवाह आणि आम आदमी पार्टीच्या यशामुळे ओयॉसिस दिसल्याची भावना असणारा एक क्षीण प्रवाह असे सर्वसाधारण चित्र निर्माण झाले आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठीची ‘सेमीफायनल’ लढत असा उल्लेख गेली दोन-अडीच महिने होत होता, ती पाच राज्यांची विधानसभा निवडणूक अखेर पार पडली. काँग्रेसचा सफाया होणार आणि भाजपची लाट येणार, या आशयाची भाकिते मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात होती. ती भाकिते चूक ठरली, असे निकाल पाहून तरी म्हणता येत नाही. मिझोरम हे छोटे राज्य काँग्रेसला मिळाले, पण उर्वरित चारही राज्यांत काँग्रेसला मतदारांनी नाकारले असे म्हणता येईल. अर्थात, छत्तीसगढमध्ये ‘काँटे की टक्कर’ म्हणावी अशी सरळ लढत काँग्रेस व भाजप यांच्यात झाली आणि शेवटी भाजपला काठावर का होईना, बहुमत मिळवून सत्ता स्थापन करता आली.

दिल्ली या छोट्या राज्यात भाजप सत्तेच्या जवळ पोहोचला, पण सत्ता मिळवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र राजस्थान व मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये भाजपला दोन-तृतीयांशच्या आसपासचे बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस, भाजप व आम आदमी पार्टी या तीन पक्षांच्या भोवतीची चर्चा निवडणूक निकालानंतर रंगात आल्या आहेत. अर्थातच, काँग्रेसला सहानुभूती दाखवावी असा प्रवाह कुठेही नजरेला पडत नाही, याचे कारण त्यांच्या भ्रष्ट कारभारात आणि मरगळलेल्या व सुस्तावलेल्या पक्षसंघटनेत दाखवता येईल. भाजपला इतके यश मिळाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे व काही अंशी उन्मादाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

आम आदमी पार्टीला अनपेक्षितपणे मिळालेल्या यशामुळे व सत्ता स्थापन करण्याइतपत स्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांच्या भुवया तर उंचावल्या आहेतच, पण सतत तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असणाऱ्यांच्या आशेला नवी पालवी फुटली आहे. विशेष म्हणजे माध्यमांचे आणि निवडणूक सर्व्हे करणारांचे अंदाज कधी नव्हे इतके जुळून आले आहेत, त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास एक प्रकारे वाढला आहे. पण एकूणात विचार केला, तर भाजप पुढे येत असल्यामुळे चिंता व उत्साह असे दोन प्रमुख प्रवाह आणि आम आदमी पार्टीच्या यशामुळे ओयॉसिस दिसल्याची भावना असणारा एक क्षीण प्रवाह असे सर्वसाधारण चित्र निर्माण झाले आहे.

राजकारणावर बोलताना किंवा विश्लेषण करताना भल्या-भल्यांकडून दोन प्रकारच्या गफलती कळत-नकळत होत असतात. एक म्हणजे- काय होईल, याबाबत भाकीत करताना काय व्हावे असे आपल्याला मनापासून वाटते, तेच सांगितले जाते. दुसरे म्हणजे- वास्तव काय आहे, याबाबत सांगताना वास्तव कसे असले पाहिजे याबाबतची आपली मनोभूमिका सांगितली जाते. त्यामुळे वास्तवाचे आकलन करून घेण्यात मोठाच अडथळा निर्माण होतो. परिणामी, परिस्थितीचे विश्लेषण साफ चुकते आणि दिशाभूल होण्याची शक्यता वाढते. हा मुद्दा एवढ्याचसाठी अधोरेखित करावासा वाटतोय की, भाजप व आप यांचे यश याबाबत फार उत्तेजित होण्याचे कारण नाही आणि काँग्रेसची वाताहत झाल्यामुळे कोणी फार निराश होण्याचेही कारण नाही. दहा वर्षे केंद्रीय सत्ता राबवल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची बरीच दमछाक झालेली आहे आणि देशातील जनतेच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही आणि सारा भार मोदींच्या खांद्यावर टाकून त्यांची प्रतिमा लार्जर दॅन लाइफ केलेली आहे, याचेही भान सोडून चालणार नाही.

राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्तापालट होतो, मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचे काम चांगले होते आणि छत्तीसगढमध्ये माओवाद्यांच्या संदर्भातील भूमिकेमुळे रमण सिंह सरकारला थोडा फटका बसला, अशा मध्यवर्ती आशयाचे विश्लेषण   केले जाते आहे, ते बरेचसे खरे आहे. पण, या निवडणुकीनंतर सर्वांत जास्त आश्चर्य व्यक्त केले जाते त्या ‘आप’च्या यशाचे विश्लेषण करण्यात माध्यमे व अभ्यासक बरेच कमी पडले आहेत. येथे याचे विस्मरण होऊन अजिबात चालणार नाही; ते म्हणजे दिल्ली राज्यातील विधानसभा मतदारसंघाची रचना आणि केजरीवाल व त्यांच्या संघटनांचे गेली काही वर्षे चालू असलेले काम.

माहिती अधिकाराच्या संदर्भातील धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता अशी केजरीवाल यांची ओळख 2005 पासून तरी आहे. त्यानंतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळात संपूर्ण देश हलवून गेला आणि दिल्ली राज्य मात्र ढवळून निघाले होते. म्हणजे गेली तीन वर्षे तरी केजरीवाल व त्यांचे कार्यकर्ते घमासान प्रचार करीत होते. त्यांनी सर्व प्रकारच्या माध्यमांचा उपयोग तर करून घेतलाच, पण दिल्ली राज्याच्या भौगोलिक रचनेमुळे त्यांचे काम फारच सोपे होते. त्यांच्यासाठी कठीण काम होते ते म्हणजे काँग्रेस व भाजप या सर्वार्थाने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी टक्कर घेण्याचे. ते त्यांचे काम सोपे झाले- जेव्हा अण्णा व रामदेवबाबा यांच्या आंदोलनांनी केंद्र सरकार अतिशय दुबळे असल्याचे चित्र पुढे आले.

खरे म्हणजे केंद्र सरकार त्या वेळी इतके गडबडून गेले होते की, त्यांनी ती आंदोलने तर नीट हाताळली नाहीतच, उलट एकामागोमाग एक अशा चुका करीत गेले. काँग्रेसचे नेतृत्व व केंद्र सरकार प्रचंड दुबळे असल्याचा अनुभव घेतल्यानंतर दिल्लीच्या मतदारांच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर व जरब संपुष्टात आली, किंबहुना काँग्रेस व सरकारची काही ‘इज्जत’च राहिली नाही. ही इज्जत गमावल्याने दिल्लीच्या नागरिकांना पर्याय हवा होता. एक पर्याय अर्थातच भाजपचा होता, पण भक्कम पायाभरणीसह दुसरा पर्याय ‘आप’च्या रूपाने दिसल्यावर त्याकडेही मोठा प्रवाह वळला आणि त्याचा परिणाम म्हणून दिल्लीत ‘आप’ सत्तेच्या जवळ पोहोचला.

मात्र, ‘आप’च्या चाहत्यांनी किंवा त्यांच्या यशामुळे उत्तेजित झालेल्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, इतके मोठे यश अनपेक्षितपणे कोणालाही मिळत नसते. त्यासाठी पायाभरणी करावीच लागलेली असते. अशी पायाभरणी ‘आप’ने देशात अन्यत्र कुठेही केलेली नाही, त्यामुळे त्यांना इतरत्र असे यश कुठेही मिळणार नाही. म्हणजे पायाभरणी न करता ‘आप’चे लेबल लावून आपल्याला यश मिळवता येईल, असे सुलभीकरण कोणी करणार असेल तर त्याला अर्थ नसेल!

Tags: अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टी निवडणूक नरेंद्र मोदी बीजेपी कॉंग्रेस आप संपादकीय Election Narendr Modi Bjp Congress AAP Sampadkiy editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके