डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

विरोधाला विरोध करणारे सहानुभूती गमावतात..!

(साधना साप्ताहिकाचा नियमित अंक 44 पानांचा असतो. नेहमीच्या नियोजनानुसार पुढील तीन-चार अंकांचा बराच मजकूर तपासून तयार ठेवलेला असतो, प्रासंगिक लेखनासाठी काही पाने राखून ठेवलेली असतात. मात्र सध्या  कोरोना संकटाच्या संदर्भात प्रत्येक अंकात काही मजकूर देणे अपरिहार्य झाले आहे, त्यामुळे काही नियोजित मजकूर पुढे ढकलावा लागत आहे. ही अडचण काही अंशी दूर व्हावी म्हणून, या व पुढील तीन अंकांमध्ये प्रत्येकी चार पाने जास्त देत आहोत. हे चारही अंक 48 पानांचे असतील. - संपादक)

कोरोना विषाणूने जगावर आणलेले संकट साडेतीन महिन्यांनंतरही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हा अंक प्रसिद्ध झाला त्यादिवशी (11 एप्रिल) आलेल्या आकडेवारीनुसार, जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 18 लाख इतकी झाली असून, मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. (भारताचे हे आकडे अनुक्रमे आठ हजार व 250, म्हणजे लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहेत). गुणाकारच्या व भूमितीच्या वेगाने ही वाढ होणार असल्याची, अनेक लहान-थोरांनी गेल्या महिन्यात व्यक्त केलेली भाकिते खरी ठरत आहेत. कारण आजपासून सात दिवसांपूर्वी जगातील कोरोनाची लागण झालेले लोक आणि त्यामुळे मृत्यू ओढवलेले लोक यांची संख्या अनुक्रमे 11 लाख व 59 हजार इतकी होती. त्याच्या सात दिवस आधी याच संख्या अनुक्रमे सहा लाख व 28 हजार अशा होत्या. युरोप व अमेरिकेत या संकटामुळे हाहाकार उडालेला असून, तशीच स्थिती अन्य देशांतही उद्भवणार की काय, ही भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. त्यासाठी असे कारण सांगितले जात आहे की, तिकडे कोरोनाचा फैलाव तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत आहे आणि भारत व अन्य काही देशांतील फैलाव पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेत आहे. काही तज्ज्ञांनी या गृहितकाला दुजोरा दिलेला आहे. काही तज्ज्ञांनी मात्र भारत व अन्य देशात बरीच वाताहात होणार असली तरी, युरोप व अमेरिका यांच्याइतकी नाही, असे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यासाठी भारतीयांची प्रतिकारशक्ती अशा विषाणूचा सामना करण्यासाठी जास्त आहे, इथपासून भारत व अन्य देशांतील हवामान कोरोना फैलावण्यासाठी तुलनेने कमी पोषक आहे, इत्यादी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. मात्र अद्याप वैद्यकशास्त्र ठोसपणे काही सांगत नाही. त्यामुळे विनाकारण विविध शक्यता व्यक्त करून, भीतीदायक वातावरणात भर टाकण्यासाठी किंवा जरा निष्काळजी राहायला सांगून आपत्तीत भर टाकण्याला कळत-नकळत हातभार लावला जाणार नाही, याची काळजी सर्वच जबाबदार घटकांनी घ्यायला हवी आहे. 

सर्व क्षेत्रांतील ओपिनियन मेकर वर्गाची त्याहून मोठी जबाबदारी ही आहे की, अशा या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संकटाच्या काळात आपल्या देशातील राज्य सरकारे व केंद्र सरकार योग्य प्रकारे काम करीत आहे की नाही, याचा सातत्याने पाठपुरावा करायला हवा. शतकातील एखाद्याच वेळी येणारे अवाढव्य संकट अचानक उद्भवते तेव्हा प्रगत देशांतील सरकारांची यंत्रणा जिथे सैरभैर होते, तिथे भारतासारख्या देशाची अवस्था बिकट होणार यात विशेष ते काय!  पण तरीही अशा कसोटीच्या वेळीही आपल्या कोणत्याही सरकारचे व प्रशासकीय यंत्रणेचे वर्तन असंवेदनशील वा बेफिकीर असू नये, याबाबत आग्रही राहिलेच पाहिजे. केंद्र व राज्य सरकारे परस्परांशी आवश्यक तेवढा समन्वय, संपर्क साधत आहेत ना, केंद्र सरकारकडून एक वा अधिक राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेश यांना सापत्नभावाची वागणूक मिळत नाही ना, कोणत्याही समजघटकाच्या बाबतीत पक्षपाताचे धोरण अवलंबले जात नाही ना, तळाच्या घटकांना जगण्यासाठी व पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत ना, या सर्व किमान अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नसतील तर कोणत्याही सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार असू शकत नाही. अर्थातच या नैतिक अधिकाराची जाणीव जागती ठेवण्याचे काम ओपिनियन मेकर वर्गाने केलेच पाहिजे. 

मात्र त्याच वेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपले नेते व आपली सरकारे यांच्याबाबत उठसुठ शंका-कुशंका व्यक्त करणे, त्यांच्या प्रत्येक कृती-उक्तीकडे संशयाने पाहणे, अर्धवट माहितीचा विपर्यास करून उपहासात्मक वा शिवराळ टीकाटिप्पणी करणे, आशय विषय समजून न घेता ठोकळेबाज निष्कर्ष काढणे, हे सर्व प्रकार जबाबदार समाजघटकांनी तरी टाळले पाहिजेत. अशा प्रकारांमुळे आपल्या प्रशासकीय यंत्रणांचे खच्चीकरण होऊ शकते, काही यंत्रणा बेफिकीर बनू शकतात, राज्यकर्ते कठोर निर्णय घेण्यास कचरण्याची शक्यता असते. दुसऱ्या बाजूला समाजमनात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ शकते, आधीच्या भीतिग्रस्त वातावरणात भर पडते, अनेकांना निराशा घेरून टाकते, किंवा त्यांच्या मनातील विखार वाढीस लागू शकतो. आपल्या या स्थितीला कोण जबाबदार आहे यासाठी व्यवस्थेचे, सुलभीकरण करून चुकीची उत्तरे काढली जाण्याची शक्यता असते. हे सर्व प्रकार प्रामुख्याने  सिनिकल व नकारात्मक विचारप्रक्रिया असणाऱ्यांकडून घडून येतात. यापलिकडे आणखी एक वर्ग आहे. वरवर पाहता दिसून येत नाही, पण प्रत्यक्षात त्यांच्याही नकळत मोठे नुकसान करण्याची क्षमता असणारा हा वर्ग आहे, विरोधासाठी विरोध करणाऱ्यांचा. त्यांच्या भावना व विचार तसे पाहता प्रामाणिक असतात, पण आपल्या मनातील पूर्वग्रह व शत्रुत्वाच्या भावना, प्रचंड मोठ्या संकटकाळात तरी काबूत ठेवण्याची शक्ती त्यांनी अंगी बाणवायला हवी. 

उदाहरणार्थ : गेल्या  आठवड्यात (5 एप्रिल) या दिवशी, रात्री नऊ वाजता भारतीय लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करून; घराच्या गच्चीवर, बाल्कनीत, अंगणात येऊन पणती, मेणबत्ती वा बॅटरीचा प्रकाश करावा आणि अंधार उजळून काढावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. या आवाहनाला काही ठिकाणी कर्मकांडाचे स्वरूप येणार हे उघड होते, आणि काही बिचारे/भाबडे लोक तर या प्रकाशामुळे कोरोना गायब होणार अशी आशाही बाळगून होते. यातून, आपली संपूर्ण देशावर किती हुकूमत आहे हे सिद्ध करण्याची किंवा दाखवण्याची इच्छा पंतप्रधानांच्या मनात किंचितशी का होईना असणार हेही उघड होते. त्यातून काही अंशी तरी आपल्याला राजकीय फायदा व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी बाळगलेली असणार. आणि म्हणून भाजप व केंद्र सरकारचे समर्थक असणाऱ्यांनी त्या दिवसाच्या त्या घटनेला उत्साहाचे स्वरूप बहाल करणे साहजिक होते. आणि त्याच कारणामुळे अन्य राजकीय पक्षांना त्या आवाहनाकडे औपचारिकता म्हणून तरी, उपहासाने पाहणे किंवा त्याची खिल्ली उडवावी लागणे अपरिहार्य होते. आणि अर्थातच जनताही त्याकडे विरोधी पक्षाचे लोक असे बोलणारच म्हणून तेवढ्याच सहजतेने घेत असते. 

अन्य जबाबदार घटकांबाबत मात्र तसे होत नाही. त्यांनी केलेली टीकाटिप्पणी ही विरोधासाठी विरोध या प्रकारात जमा होते. एकत्र येऊन, अंधारात दिवे पेटवण्याचा तो प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणजे एकता व एकात्मता राखून संकटाचा सामना करण्यासाठीचा निर्धार अशा पद्धतीने पाहायचे सोडून, हे लोक काय भलतेच तर्कट लावताहेत अशीच भावना खूप मोठ्या समूहाची बनते. केंद्र सरकार व पंतप्रधान यांचा समर्थक वा भक्तगण म्हणावा असा वर्ग सध्या या देशात संख्येने खूप मोठा आहे आणि त्यांच्या विरोधातील वर्ग संख्येने खूप लहान आहे. पण विचाराने व मनाने ना इकडे ना तिकडे असणारा म्हणजे ‘जिओे और जिने दो’ म्हणणारा वर्गही खूप मोठा असतो, आजच्या घडीला हा वर्ग पन्नास टक्क्यांहून अधिक  असेल. या तिसऱ्या वर्गाच्या दृष्टीने, पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक कार्यक्रमाला काहीच कारण न देता खिल्ली उडवणारे लोक विरोधासाठी विरोध करतात. या लोकांकडून इतर वेळी केले जाणारे विरोध विखुरलेल्या स्वरूपात असतात, त्यामागे काही पटणारी, काही न पटणारी कारणे असतात; त्यामुळे त्याचे या तिसऱ्या वर्गाला फारसे आश्चर्य वाटत नाही. पण अशा राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी हे विरोधासाठी विरोध करणारे लोक, त्या तिसऱ्या वर्गातील मोठ्या समूहाची सहानुभूती गमावून बसतात. कारण संकटाच्या काळात धावून येतो तो मित्र, असे आपल्या परंपरेत म्हटले जाते; संकटाच्या काळात शत्रूत्वाची भावना दूर सारून संकट निवारण्यासाठी पुढे यावे असेही आपली परंपरा सांगते. या परंपरा आपण समजतो त्यापेक्षा जास्त गाढ प्रभाव जनमानसावर टाकून असतात. त्यामुळे संकटाच्या काळातही ज्यांच्या मनातील शत्रूत्वाची भावना चेतलेलीच असते किंबहुना अधिक प्रखर बनते, तेव्हा ते लोक जरी जनसामान्यांच्या हिताची भाषा बोलणारे असतील तरी जनतेची सहानुभूती गमावून बसतात. याचा परिणाम नेमका उलटा होतो, लोक प्रस्थापितांच्या भजनी लागतात, त्यातून प्रस्थापित शक्ती अधिकच बळकट होतात, पुरोगाम्यांच्या वाट्याला पराभवांमागून पराभव येतात...!

 

Tags: महामारी कोव्हीड 19 कोरोना संपादकीय विनोद शिरसाठ sampadakiy epidemic covid 19 corona vinod shirsath editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात