Diwali_4 शतकातील सर्वात मोठे आव्हान !
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

शतकातील सर्वात मोठे आव्हान !

आपण निसर्ग हा शब्द वापरतो तेव्हा आपल्या मनात पृथ्वी आणि तिचा सभोवताल एवढेच प्रामुख्याने असते. वस्तुतः सूर्य, चंद्र, तारे आणि असंख्य ग्रह उपग्रह पृथ्वीवरील निसर्गावर परिणाम करीत असतात. शिवाय या पृथ्वीवर माणूस नावाच्या प्राण्याने उभारलेली संस्कृती जरी मध्यवर्ती असली तरी, पृथ्वीचा 71 टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि तिथे वेगळी सृष्टी आहे, त्यात असंख्य प्राणी व असंख्य वनस्पती आहेत. पृथ्वीच्या 29 टक्के भूभागातील खूप मोठा प्रदेश जंगलाने व्यापलेला आहे आणि तिथेही वेगळी प्राणी व वनस्पती सृष्टी आहे. त्यात किती प्रकार व उपप्रकार आहेत, याची अद्याप नीट गणती व संगती लावता आलेली नाही, त्याचा उपघटक म्हणून आकाशात विहार करणारे हजारो प्रकारचे पक्षी आहेत...आणि सूक्ष्म जीवसृष्टी तर काय, मती गुंग करणारीच!

तीन महिन्यांपूर्वी चीनमध्ये उगम पावलेले कोरोना विषाणूचे संकट क्रमाक्रमाने व वादळी वेगाने एकएक देश पादाक्रांत करीत सुटले आणि आता संपूर्ण जग त्याच्या विळख्यात सापडले आहे. हा अंक प्रसिद्धीला जात असताना (28 मार्च ) आलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली असून, 28 हजारांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.  ही लागण व हे मृत्यू आधी बेरजेच्या पद्धतीने, नंतर गुणाकाराच्या पद्धतीने वाढत गेले आहेत. आणि यापुढे ही वाढ भूमितीच्या पद्धतीने होणार आहे, अशी भीती जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. परिणामी संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. आधी मास्क वापरण्याच्या सूचना, नंतर रस्त्यावर कमीत कमी येण्याच्या सूचना, त्यानंतर लोकांनी समुहामध्ये न वावरण्याच्या सूचना आणि अखेरीस घराबाहेर न पडण्याच्या सूचना, हे सारे अतिशय वेगाने घडत आले आहे. आणि मग 25 मार्च ते 14 एप्रिल असे पूर्ण 21 दिवस संपूर्ण भारत देश लॉक डाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे अहोरात्र काम करीत आहेत.

भारताच्या केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक तरतूद आताच्या संकटावर मात करण्यासाठी केली आहे. सर्व राज्य सरकारांची सर्व रसद पुढील काही महिने याच संकटाच्या निराकरणासाठी वापरावी लागणार आहे. मागील एक दीड महिना अर्धवट पद्धतीने चाललेला आणि आताचे तीन आठवडे पूर्णतः ठप्प राहणारा जीवन व्यवहार पहिला, तर हे संकट किती दूरगामी परिणाम करून जाणार आहे, याची कल्पना आज तरी कोणालाही करता येणार नाही. आर्थिक आघाडीवर किती वाताहात होईल याची गणती केवळ अशक्य आहे, मानसिक आरोग्य व सामाजिक आरोग्य या आघाड्यांवरील परिणामांचा अंदाज येणेही शक्यच नाही. त्यामुळे कोरोना हे जगाला आव्हान आहे. शतकातील सर्वांत मोठे!

जगभरातील सर्व 195 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि चीन पाठोपाठ इटली, इराण, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका हे देश अधिक मोठ्या त्रासातून जात आहेत. इटलीतील मृतांचा आकडा दहा हजारापर्यंत आलेला असून उर्वरीत सहा देशांमधील मृतांचे आकडे एक हजारांच्या पुढे गेले आहेत. (भारतात आत्तापर्यंत 20 मृत्यू झाले असून, 900 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.) आजच्या जगातील सर्वात बलाढ्य शक्ती/ महाशक्ती मानली जाणारी अमेरिका काय अवस्थेत आहे, हे  सांगणारा सुनील देशमुख यांचा लेख या अंकाची मुखपृष्ठकथा म्हणून घेतला आहे. 9/11 चा हल्ला झाला तेव्हा तो अमेरिकेच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे, असे सार्थ वर्णन केले गेले होते. तो हल्ला सुलतानी होता. त्यानंतर वीस वर्षांनी अमेरिकेवर झालेला हा हल्ला अस्मानी आहे, याचे वर्णन देशमुख यांनी अगदी सार्थ शब्दांत केले आहे : ‘किंग कोरोना अमेरिकेची सत्वपरीक्षा पाहतो आहे!’

अन्य देशांची अवस्था तर भयानक म्हणावी अशीच होणार आहे, पाकिस्तान सारख्या देशालाही एक लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी लागते आहे, यातून तो देश कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अन्य अनेक लहान व आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या देशांचेही काय होणार, ही जगातील पुढारलेल्या देशांच्या दृष्टीनेही चिंतेची बाब आहे. तुलनेने आफ्रिका खंडातील 56 देशांमध्ये हे संकट सध्या तरी कमी दिसते आहे. मात्र तिथे जर हे संकट वाऱ्याच्या वेगाने घोंगावत राहिले तर त्या खंडाचे काही खरे नाही. ज्ञात मानवी इतिहासात झाला नाही इतका मानवी संहार तिथे पाहायला मिळेल.

अशा पार्श्वभूमीवर या संकटाला धैर्याने सामोरे जायचे कसे हाच प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. आपापल्या सरकारवर विश्वास, वैद्यकीय क्षेत्रातील तञ्ज्ञांवर विश्वास, मानवजातीने आतापर्यंत अशा अनेक संकटांवर मात केलेली आहे असा इतिहासातून मिळणारा विश्वास, आणि या सर्वांच्या जोडीला निसर्गाच्या अगाध लीलांवर विश्वास, असे अजब मिश्रण मनामनात ठसत राहिले, तरच प्राप्त परिस्थितीत तग धरून राहता येईल. या निमित्ताने तीन गहन व गूढ प्रश्न पुढे येतात. एक- कोरोना हा विषाणू इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या वेगाने व  इतक्या सर्वदूर कसा पोहचला? दोन- जगभरात वैद्यकीय शास्त्रात इतके सारे संशोधन झाले आहे, तरीही वैज्ञानिकांनी हात कसे टेकलेत? तीन-निसर्गामध्ये लहरीपणा सोबतच तोल साधण्याचा अंगभूत गुणधर्म आहे, मग आता तो का ढळला?

या तिन्ही प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरांसाठी यापुढील काळात तसे प्रयत्न निश्चित होतील. पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळणे कदाचित सोपे जाईल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रचंड मोठ्या घोडदौडीमुळे जग हेच एक मोठे खेडे झाले असल्याने, चांगल्याबरोबर वाईटही तेवढ्याच वेगाने फैलावणार हे उघड आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर यथावकाश मिळेल. आज अगदीच साधे वाटणारे रोग/आजार पूर्वी जीवघेणे व असाध्य म्हणून ओळखले जात होते, मात्र त्यावर संशोधन झाले आणि मग त्यावरील उपचार अगदीच सोपे होऊन गेले. तसे आताचे वैद्यकशास्त्र कोरोनाबाबत करू शकेल यात शंकाच नाही. पण याचा अर्थ हाही आहे की, विश्वाची उत्पत्ती व त्याचा पसारा हा वेध घेत जावे तसे वाढत असल्याची प्रचिती येते. त्याचप्रमाणे अणु-रेणू आणि सूक्ष्मजीवसृष्टी यांचा वेध घेत जावे, तसे त्यातील पसाराही वाढत असल्याची प्रचिती येते आहे. आणि तिसरा प्रश्न निसर्गाचा लहरीपणा व तोल साधण्याचा गुणधर्म, हे मात्र अधिकाधिक कल्पनातीत होत आहे.

आपण निसर्ग हा शब्द वापरतो तेव्हा आपल्या मनात पृथ्वी आणि तिचा सभोवताल एवढेच प्रामुख्याने असते. वस्तुतः सूर्य, चंद्र, तारे आणि असंख्य ग्रह उपग्रह पृथ्वीवरील निसर्गावर परिणाम करीत असतात. शिवाय या पृथ्वीवर माणूस नावाच्या प्राण्याने उभारलेली संस्कृती जरी मध्यवर्ती असली तरी, पृथ्वीचा 71 टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे आणि तिथे वेगळी सृष्टी आहे, त्यात असंख्य प्राणी व असंख्य वनस्पती आहेत. पृथ्वीच्या 29 टक्के भूभागातील खूप मोठा प्रदेश जंगलाने व्यापलेला आहे आणि तिथेही वेगळी प्राणी व वनस्पती सृष्टी आहे. त्यात किती प्रकार व उपप्रकार आहेत, याची अद्याप नीट गणती व संगती लावता आलेली नाही, त्याचा उपघटक म्हणून आकाशात विहार करणारे हजारो प्रकारचे पक्षी आहेत...आणि सूक्ष्म जीवसृष्टी तर काय, मती गुंग करणारीच!

तर असा हा अद्भुत व अचंबित करणारा निसर्गाचा पसारा समजून घेण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी आताचा हा लॉक डाऊनचा काळ काही अंशी उपयुक्त ठरू शकतो. या अफाट व अनाकलनीय पसाऱ्यात आपले स्थान नगण्य आहे ही जाणीव एका बाजूला,  तर अणु रेणू व जिवाणू विषाणूही किती मोठा परिणाम करू शकतात ही जाणीव दुसऱ्या बाजूला असेल. अर्थातच हे सर्व घटक  रचनात्मक व विध्वंसक अशा दोन्ही भूमिका पार पाडू शकतात,  त्यामुळे प्रश्न एवढाच की, आपण कोणत्या बाजूने? अर्थातच पहिल्या! तर आताचा हा घरात बसून राहण्याचा काळ नीट उपयोगात आणता आला, उर्जासंचय करता आला, आणि शरीर व मन खंबीर ठेवून या संकटातून बाहेर पडता आले तर नव्या दमाने व नव्या विश्वासाने समाजाच्या, राष्ट्राच्या व मानवतेच्या पुनर्बांधणीसाठी हातभार लावता येईल!

Tags: महामारी कॉरोना कोव्हीड 19 विनोद शिरसाठ संपादकीय corona covid 19 vinod shirsath editorial sampadakiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात