डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

विश्वचषक म्हणायचे आणि त्यासाठी स्पर्धा आयोजित केल्यानंतर जर घटक राष्ट्रांतील यादवीलाच स्पर्धेतून प्रोत्साहन मिळू लागले तर निकोप खेळ संपला, आनंदाला ग्रहण लागले आणि उरला तो अमंगळ कोलाहल असे होऊन जायचे! या दृष्टीने भारतामधील उगवत्या पिढ्यांना खिलाडूपणाचे संस्कार दिले पाहिजेत आणि क्रीडांगणावरील वातावरण निर्मळ ठेवण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बालपणापासूनच बिंबवले पाहिजे.

गेले काही दिवस भारतीय उपखंडावरचे आकाश क्रिकेटच्या रोमहर्षक विजयघोषणांनी दुमदुमत होते. उपान्त्यपूर्व सामने म्हणजे निवडक आठ संघांतील विजेत्यांत लागलेली अहमहमिका. क्रमाक्रमाने उपान्त्यपूर्व, उपान्त्य आणि अंतिम सामन्यांची रंगत वाढत जावी हे अपेक्षितच होते. 

भारतीय संघाच्या आशा प्रथम फारशा बलवत्तर नव्हत्या; परंतु भारत उपान्त्य फेरीत आल्यावर आणि उपान्त्य सामन्यातही सचिन तेंडुलकरची दणकेबाज फलंदाजी चालू असेपर्यंत भारतीय आकांक्षांचे विमान चांगलेच गगनापार पोचले होते. पण श्रीलंकेच्या भेदक माऱ्याने भारतीय संघाची दाणादाण उडाली आणि भारत हरणार हे विधिलिखित स्पष्ट दिसू लागले त्या क्षणी प्रेक्षकांचा संयम सुटला आणि त्यांनी अशोभनीय दंगाधोपा सुरू केला. 

साहजिकच श्रीलंका उपान्त्य सामन्यात विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. अंतिम सामना लाहोरला गडाफी स्टेडियमवर झाला. त्यात ऑस्टेलियाच्या बलाढ्य संघाशी श्रीलंकेच्या नवोदित संघाने जिद्दीने आणि हिंमतीने टक्कर दिली आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासात आपल्या संघाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले.

श्रीलंका! देश तो केवढा! शेजारी भारताच्या दृष्टीने तर अगदीच छोटा. देशात गेली कित्येक वर्षे यादवी आणि अस्थिरता. परंतु मनात येते, अशा प्रतिकूल वातावरणातही केवळ्या दृढ निश्चयाने श्रीलंकेच्या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी केली असेल. या निश्चयाचे बळ त्यांना सुवर्णाचे फळ देऊन गेले आणि क्रिकेटमधल्या एका महासत्तेला म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाला हरवून त्यांनी विश्वचषक डौलाने आपल्या देशात मिरवत नेला. 

शाबास पट्टे हो! तुमच्या देशातील अतिरेकी कारवायांच्या धास्तीमुळे तेथे सामना खेळायला नकार देणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तुम्ही नमवलेत हा तुमच्या सुखाच्या धाग्यांतला एक जरीचा धागा. त्यांचा संघही बलाढ्य होता. वॉ बंधू आणि शेन वॉर्न, फ्लेमिंगसारखे विक्रमी खेळाडू त्यात होते. पण तुमच्या परफॉर्मन्सपुढे त्यांचे अवसान गळाले, क्षेत्ररक्षण ढिलावले आणि तुमच्या गळ्यात विजयश्रीने माळ घातली हे पाहाणे त्यांना भागच पडले. 

नावाप्रमाणे तुम्ही जयसूर्या, रणतुंगा, महानामा आणि सूर्यविकासी अरविंद ठरलात. आम्ही तुमचे त्रिवार अभिनंदन करतो. उपान्त्य सामन्यात ते आम्ही करू शकलो नाही याबद्दल आमच्या देशबांधवांना क्षमा करा आणि आमचे अभिनंदन स्वीकारा. कलकत्त्याला उपान्त्य सामन्याच्या वेळी झाला तो प्रकार किळसवाणाच होता. त्याला खेळखंडोबा म्हणावे इतके त्यात हीन अभिरुचीचे प्रदर्शन झाले. प्रेक्षामंडपाला आग लावायला निघालेल्या भारतीय प्रेक्षकांनी स्वदेशाच्या अब्रूलाच आग लावली. श्रीलंकेच्या क्रिकेटचमूने हिंमतीने आणि हिकमतीने भारतीय क्रिकेट संघाचा पराभव अटळ करून ठेवलेला आहे, हे ध्यानात येताच खिलाडूपणाने विजयी संघाचे कौतुक करण्याऐवजी प्रेक्षकांनी अक्षरशः शिमगा सुरू केला. 

ठायी ठायी होळ्या पेटविल्या बोंबाबोंब चालू केली आणि श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांच्या दिशेने बाटल्या वगैरे भिरकावायला मागे पुढे पाहिले नाही. तथाकथित सुरक्षा व्यवस्थेआड दडून असा भ्याड हल्ला चढवू पाहणाऱ्या होळीच्या होळकऱ्यांना पोलिसांनी आणि सुरक्षा सैनिकांनी चौदावे रत्न दाखवले असते तर त्यांची कोणीही निंदा केली नसती. 

खरे म्हणजे डबे बाटल्या भिरकावणाऱ्या भंगार सैनिकांची संख्या तशी दहा-वीसच असते. त्यांच्या आसपास असणारे शे-दोनशे लोक अशा उन्मत्त लीलांना आवर घालत नाहीत. देशाची नाच्चकी करणाऱ्या इसमांचे मनगट धरून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करीत नाहीत ही देखील मोठी शोकांतिका आहे. दंगेखोरांइतकीच जबाबदारी स्थितप्रज्ञासारखे सोशीक जे प्रेक्षक त्यांच्यावरही येते, हेही मान्य केले पाहिजे. त्यामुळेच तर शे- दोनशे गुंडांच्या गुंडगिरीचे काळे डाग एक लाख दहा हजार प्रेक्षकांच्या तोंडाला लागतात आणि दुनिया कलकत्त्यातील एकूण प्रेक्षकांच्या दर्जावर थुंकते. भारत-श्रीलंका सामन्याच्या वेळी भारतीयांच्या हीन मनोवृत्तीचे जे दर्शन घडले त्यामुळे प्रत्येक समंजस भारतीयाची मान शरमेने खाली गेली असल्यास नवल नाही. या सामन्यात मुख्यतः विकेट पडली ती आपल्या देशाच्या इभ्रतीची. परदेशी संघांना खरे भय नव्हते श्रीलंकेत किंवा पाकिस्तानात, ते होते सहिष्णुतेचा आणि खिलाडूपणाचा टेंभा मिरवणाऱ्या भारतात अशी जर आपली जगभर नाच्चकी झाली असती तर आपण काय समर्थन करणार? आपला बचाव तरी कसा करणार?

ही छी थू सामन्याच्या संध्याकाळी संपली असे मानण्याचे कारण नाही. हा संध्याकाळचा शिमगा संपला पण कवित्व पुढेही चालूच राहिले. ज्याने भारतीय क्रिकेटची इमाने इतबारे उत्तम सेवा बजावली, त्या अझरला आणि त्याच्या कुटुंबीयांना फोनवरून धमक्या देणे, शिवीगाळ करणे, भारतीय क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूंची दिसतील तेथे ‘हुर्यो’ करणे, विनोद कांबळीसारख्या होतकरू तडफदार खेळाडूला जीव नकोसा करून टाकणे यात ज्यांता धन्यता वाटते त्यांच्या सांस्कृतिक लायकीबद्दल शंका येते. या शिवाय अझर मुसलमान असल्यामुळे त्याने मुद्दाम भारताचे नाक कापले असणार असे निरर्गळ आरोप होत आहेतच. खरोखर शास्त्री, कपिल देव, गावसकर प्रभृतींनी क्रिकेटचे उच्चांक किती निर्माण केले याची चर्चा आता जगात पुसून टाकली जाईल आणि भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचा कलकत्त्याला दिसलेला हा नीचांक मात्र भारताच्या भाळी तापलेल्या सळईने दिलेल्या डागासारखा चरचरत राहील.

भारतीय प्रेक्षकांची निर्भर्त्सना व्हावी हे स्वाभाविक आहे. परंतु इतरत्रही सर्व आलबेल आहे असे समजण्याचे कारण नाही. पाकिस्तानी क्रिकेटसंघाचा भूतपूर्व कप्तान इम्रान खान याने एकदा मुलाखतीत सांगितले होते, की दुसऱ्या कोणत्या संघाने आमच्या संघाचा पराभव केला तर आमच्या देशात कोणाला फारसे सोयरसुतक नसते, पण भारताकडून पराभव झाला तर मात्र लोक हातात दगड-धोंडे आणि जोडे घेऊन तोंडाने शिवीगाळ करीतच आमचे स्वागत करतात. याशिवाय आपण लाच खाऊन मुद्दाम आउट झाल्याच्या कबुल्याही काही पाकिस्तानी खेळाडू अधूनमधून देत असतात. त्यात त्यांना दिक्कत वाटत नाही. 

नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात जावेद मियांदादने दगलबाजी केली असा त्याच्यावर आरोप आहे. इकडे भारतीय संघ जिंकला आणि पाकिस्तानी संघ हरला यामुळे अहमदाबादमध्ये जातीय दंगली सुरू होतात, या भोगाला काय म्हणावे? एखाद्या सामन्यात भारत हरला आणि पाकिस्तान जिंकले तर भारतातील मुसलमान ‘जश्न’ कशासाठी मनवतात? 

या वर्ल्ड कप मालिकेतही शेवटी पाकिस्तानात लाहोरला सामना झाला, त्यात श्रीलंकेचा विजय व्हावा अशी भारतात आणि पाकिस्तानात सर्वसाधारणपणे लोकेच्छा होती. म्हणजे यात निदान काळे जिंकावेत आणि गोरे हरावेत असा वांशिक विजयाचा दृष्टिकोनच लोक ठेवतात. अशा रीतीने खेळांच्या सामन्यातून राष्ट्राराष्ट्रांतील किंवा वंशावंशांतील संघर्ष जर वाढीला लागणार असतील तर खेळांना शुद्ध आनंदपर्यवसायी म्हणणे कठीण आहे. 

मानवी संस्कृतीमध्ये कला आणि क्रीडा यांना आपण देश आणि काल यांच्या बंधनापलीकडे असणाऱ्या आनंदपर्यवसायी प्रवृत्ती मानतो पण अशा विपरीत घटना घडू लागल्या तर हा सारा खेळ संपला म्हणायचा.

पूर्वी आपल्या देशात हिंदू, मुसलमान, पारशी, युरोपियन्स आणि इतर असे विभाग पाडून आधी चौरंगी व मग पंचरंगी सामने आयोजित केले जात. जातिधर्मनिरपेक्ष नव्या भारतीय समाजाची संकल्पना जसजशी मूळ धरू लागली तसतसे हे भेदाधिष्ठित संघांतील सामने आपण बंद केले. खिलाडूपणाची चुरस त्यात राहत नाही. जातीय वैर-वैमनस्ये त्यातून वाढतात असा अनुभव येऊ लागल्यानंतर या चौरंगी पंचरंगी लढाया थांबवणे क्रमप्राप्तच होते. 

विश्वचषक म्हणायचे आणि त्यासाठी स्पर्धा आयोजित केल्यानंतर जर घटक राष्ट्रांतील यादवीलाच स्पर्धेतून प्रोत्साहन मिळू लागले तर निकोप खेळ संपला, आनंदाला ग्रहण लागले आणि उरला तो अमंगळ कोलाहल असे होऊन जायचे! या दृष्टीने भारतामधील उगवत्या पिढ्यांना खिलाडूपणाचे संस्कार दिले पाहिजेत आणि क्रीडांगणावरील वातावरण निर्मळ ठेवण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बालपणापासूनच बिंबवले पाहिजे. हे आपण करू शकू अशी केवळ आशा आपण करावीच! या क्षणाला मात्र दुःखित अंतःकरणाने आत्मचिंतन करणे एवढेच हाती उरले आहे.

Tags: मोहम्मद अझरुद्दीन सनथ जयसूर्या लाहोर गडाफी स्टेडियम पाकिस्तान भारत श्रीलंका विश्वचषक Mohammad Azaruddin Sanath Jaysurya Gadafi Stadium Pakistan India Shrilanka World Cup weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके