डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शाहू महाराजांच्या कर्मभूमीत त्यांच्या आग्रहामुळे शेगावच्या गजानन महाराजांपुढे दीप प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन झाले. शाहू महाराजांच्या सत्यशोधकी परंपरेला थेट छेद देणारे हे वर्तन संमेलनाच्या प्रबोधनाच्या व्यासपीठावर घडले आणि निषेधाचा ‘ब्र’ही उठला नाही.

दहा वर्षांपूर्वी साहित्यसंमेलनप्रांती मरगळ होती. ज्या स्वरूपाच्या संस्था त्यांचे आयोजन करीत होत्या, त्यांच्या आवाक्याबाहेर संमेलनाचा व्याप, खर्च, साहित्यिकांची कोडकौतुके व अपेक्षापूर्ती गेले होते. त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारण्याऐवजी टाळण्याकडे कल होता. या पोकळीतून संमेलनाचा ठेका कुणा शिक्षणसम्राट, साखरसम्राट, सहकारसम्राट अथवा मंत्रिमंडळातील मोक्याच्या पदाचे सत्तासम्राट यांच्याकडे अलगद गेला. याविरोधात आवाज उठवले गेले. पण सोहळा साजरा करण्याच्या समाजाच्या मानसिकतेपुढे ते क्षीण ठरले. स्वाभाविकच साहित्य संमेलनाची जबाबदारी चालक, मालक, पालक या घाऊक प्रकारे घेणारी ही सम्राट मंडळी आपोआप त्याची स्वागताध्यक्ष बनली.

संमेलनानिमित्ताने अचानक उफाळून आलेले आपले ग्रंथप्रेम सर्वांना खरेच वाटावे ही खबरदारी घेण्याऐवढी ही मंडळी चतुर होतीच. कोल्हापूरच्या साहित्य संमेलनात डी. वाय. पाटील स्वागताध्यक्ष होते. शाहू महाराजांच्या कर्मभूमीत त्यांच्या आग्रहामुळे शेगावच्या गजानन महाराजांपुढे दीप प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन झाले. शाहू महाराजांच्या सत्यशोधकी परंपरेला थेट छेद देणारे हे वर्तन संमेलनाच्या प्रबोधनाच्या व्यासपीठावर घडले आणि निषेधाचा ‘ब्र’ही उठला नाही. त्यानंतर साताऱ्याला अभयसिंहराजे भोसले यांनी नेटके साहित्य संमेलन भरवले, पण त्या वेळी जाहीर केलेले कविवर्य मर्ढेकर स्मारक, कायमस्वरूपी ट्रस्ट, सहकारी प्रकाशन संस्था या सर्वांबाबत उत्साहाचा झरा पूर्णपणे आटला. श्री. कराड आळंदी संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.

वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी त्यांना खुद्द शरद पवारांना साकडे घालावे लागले. त्यापुढील संमेलने नगर, वैजनाथ परळी व आता मुंबई यांमध्ये खर्चाचा आकडा 'कोटीच्या कोटी उड्डाणे' या गतीने झेपावला. भव्य मंडप, देखणी सजावट, कलात्मक प्रवेशद्वारे, दीर्घ काळ लक्षात राहतील अशा भोजनावळी, प्रचंड जल्लोष म्हणजे हा खर्च अटळच. स्वतःचा मुखवटा साफ करून त्याला सरस्वतीची झळाळी देणारी, बुजुर्ग साहित्यिकांकडून धन्य धन्य असे प्रशंसोद्गाराचे संचित गाठीशी बांधणारी ही ‘काँग्रेसी’ युक्ती आता राजकीय नीतीच बनली आहे. एवढी महाराष्ट्रव्यापी प्रसिद्धी मिळवून देणारा, मतदारांना भावणारा दुसरा कोणता सोहळा आहे? त्यापुढे कोटीभर खर्चाची काय मातबरी? साहित्य संमेलनालाच नव्हे तर आपल्या सर्वच सांस्कृतिक जीवनाला या भपकेबाज सोहळ्यांचा रोग फार झपाट्याने लागला आहे आणि तो जवळपास हाताबाहेर गेला आहे.

साधे देशी खेळाचे उदाहरण घ्या. कोणत्याही साधनसामग्रीशिवाय मातीवर चार रेघोट्या मारून खेळल्या जाणाऱ्या मराठमोळ्या कबड्डीत आमची निम्मी हयात गेली. अनेक कबड्डीस्पर्धाही आम्ही भरवल्या. पण मागील वर्षीचे शिवशाही कबड्डी चषकांच्या स्पर्धेचे पन्नास लाख रुपयांचे अंदाजपत्रक पाहून आमचे डोळेच फिरले. खेळाच्या वैभवाचे, विकासाचे नव्हे तर खेळ व खेळाडू धनिकांचे वा सत्तेचे बटीक झाल्याचे आम्हांला ते लक्षण वाटले. (आशियाई कबड्डी स्पर्धा विजेत्या संघात या वेळी एकही महाराष्ट्रीय खेळाडू नसल्यामुळे त्या भपक्याच्या पोकळपणाची प्रचितीही आली.) साहित्य संमेलन तर मुळातच थोरल्या घरची लेक. संमेलनाच्या अमाप व बहुसंख्य वेळा अप्रस्तुत खर्चाला फाटा देऊन पायाभूत, साहित्य व्यवहाराबद्दल काही सकस कृती करा हा कंठशोष अनेकवार करून झाला आहे.

मराठी भाषा मृतावस्थेकडे निघाली आहे का, याची साधार भीती संमेलनाध्यक्षापासून सर्व जण गंभीरपणे व्यक्त करत असताना तर या उपाययोजनांची गरज अधिकच आहे. ग्रंथव्यवहाराशी संबंधित अनेक प्रश्न निकडीने सोडवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पुस्तकाच्या सदैव सान्निध्यात असणारा आणि वाचकांची अभिरुची घडवण्यास मदत करू शकणारा ग्रंथपाल हा दुर्लक्षित व उपेक्षित आहे. ग्रंथ स्वस्तात प्रकाशित व वितरित करण्याच्या योजना कागदावरच आहेत. ग्रंथालयाचे संगोपन ही जणू अनावश्यक बाब म्हणून पाहिली जाते. पण अशा विषयांचे फार तर तोंडी लावण्यापलीकडे साहित्य संमेलनाला सोयरसुतक नसते. साहित्य पंढरीला ग्रंथ रसिकरूपी वारकऱ्यांची हजारोंनी गर्दी उसळली हाच कौतुकाचा राग प्रतिवर्षी आळवला जातो. त्या गर्दीतही ग्रंथनिष्ठेपेक्षा हौशे, नवशे, गवशे म्हणून आलेल्यांची संख्या जास्त असते हे सर्वज्ञात आहे. यंदा तर एक मुद्दा आणखी मूलभूत आहे.

साहित्य हा सर्जनशील मनाचा कलात्मक शब्दबद्ध हुंकार असतो. तो वेदनेशी, वास्तवाशी जेवढ्या सच्चेपणाने नाते सांगणारा असतो तेवढा तो अधिक उत्कट होतो. या मानसिकतेचा थेट आणि अटळ संबंध मूल्य जाणिवेशी आहे आणि ती बांधिलकीदेखील काँग्रेसछाप पोपटपंची असून चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीचा इसार देणारी असावी लागते. अशा अपेक्षा असलेल्या उत्सवाचा स्वागताध्यक्ष कसा असावा हे मग वेगळे सांगावयास हवे काय? या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मनोहर जोशी हे दादरमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. संमेलनाचे निमंत्रण देणाऱ्या साहित्यसंस्थेने त्यांना स्वागताध्यक्ष म्हणून निवडले आहे. ते ग्रंथरसिक आहेत . त्यांनी संमेलनासाठी कायमस्वरूपी पंचवीस लाखांची तरतूद केली आहे, शिवाय ते छान छान, गोड गोड, हजरजवाबी, नर्म विनोदी बोलतात हे सर्व आमच्या मते अप्रस्तुत आहे. आविष्कार-स्वातंत्र्याच्या संदर्भात या माणसाच्या मूल्य जाणिवांचा जो आविष्कार गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात दिसला आहे तो सुसंस्कृत आहे काय ? 'सखाराम बाइंडर या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्यात पूर्वीच्या काळी फक्त झुंजार शिवसेना नेते असतानाही ते आघाडीवर होते, तेथपासून आज 'फायर 'वरील मुस्कटदाबीपर्यंत ही आघाडी त्यांनी टिकविली आहे. मुंबईतील गिरणी कामगार अक्षरशः मातीमोल झाला तर त्याला मातीत घालून मिळणाऱ्या मोकळ्या जागेवर डोळा अशी यांची चालचलणूक. प्रत्यक्ष दंगलींपासून ते विधानसभेपर्यंत आपण हिंदू आहोत याचा अहंकार ते खुन्नस वाढवण्याच्या स्वरूपात मिरवतात.

श्रीकृष्ण आयोगाच्या न्यायमूर्तींवरदेखील धार्मिक पक्षपातीपणाचा आरोप करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. स्वतःच्या कातडी बचाऊपणासाठी आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी नाकारतात. स्वतःच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि स्वतः पदावर असलेले क्रिकेट कार्यालय उद्ध्वस्त केले गेले तरी त्यांची गंधवार्ता न मिळण्याएवढे दक्ष असतात. या घटनेचे वा क्रिकेट खेळपट्टी खोदण्याचे त्यांना वैषम्य नव्हे तर अभिमान वाटतो. मुंबईत मोक्याच्या जागी मोक्याचे धंदे उभारलेल्या व त्यातून मालामाल झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सामान्याच्या हातघाईच्या जगण्याशी काही संबंध उरलेला नाही. मग मूल्य या कल्पनेचे काही देणे-घेणे लागण्याची तरच बातच सोडा. पण ते तरी करतील काय? त्यांचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या लिहिण्यातून, बोलण्यातून, कृतीतून जी मूल्ये (!) निर्धारित करतो ती शिरसावंद्य मानून मनोहर जोशी वर्तन करतात. त्याचा जाहीर अभिमान बाळगतात (आणि तरीही खुर्चीला मुकतात). मानसिकतेच्या मांगल्याला तिलांजली देणाऱ्या, विवेकाला विसरायला लावणाऱ्या, या मानसिकतेचा उदात्त मूल्यभावनेशी संबंध नाही. हाडवैर आहे. अशी व्यक्ती जेव्हा मराठी सारस्वताच्या एका सर्वोच्च सोहळ्याची स्वागताध्यक्ष म्हणून मानाने मिरवते त्या वेळी मूल्याधिष्ठित साहित्य जाणिवांचा अवमान होतो. साने गुरुजींचे नाव मुख्य सभामंडपाला देऊन तो भरून निघत नाही. बुद्धिदेवता सरस्वतीच्या कृपेने हे समजण्याची आणि त्याविरुद्ध उभे राहण्याची शक्ती मराठी सारस्वताला लाभो एवढीच प्रार्थना.

----------

बुडत्याचा पाय खोलात...

युती सरकारला वारे प्रतिकूल आहे हे सर्वांनाच कळून चुकले आहे. ठाकरे कुटुंबीय राज्य चालवितात पण अप्रियतेची कोणतीच जबाबदारी ते घेत नाहीत. पण कोणीतरी ती घ्यावी लागणारच. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा बळी द्यावयाची खेळी करून युतीच्या शासनाला पुन्हा झळाळी प्राप्त करून देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाचा कारभार वाईट आहे यावरचा नेहमीचाच सोपा उपाय कोणता?
युती सरकारला वारे प्रतिकूल आहे हे सर्वांनाच कळून चुकले आहे. ठाकरे कुटुंबीय राज्य चालवितात पण अप्रियतेची कोणतीच जबाबदारी ते घेत नाहीत. पण कोणीतरी ती घ्यावी लागणारच. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा बळी द्यावयाची खेळी करून युतीच्या शासनाला पुन्हा झळाळी प्राप्त करून देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाचा कारभार वाईट आहे यावरचा नेहमीचाच सोपा उपाय कोणता? नेतृत्व बदल, महिनाभरावर निवडणूक आल्यावर दिल्लीत भाजपने हा खेळ केला होता.

महाराष्ट्रातील निवडणुकीला वर्षभर असताना महाराष्ट्रात त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत आहे. भाजपची मनोहर जोशी यांच्याबद्दल धुसफूस होतीच. जोशी जाणार याच्या कमी-जास्त जोरदार वावटळी उठूनही प्रत्येक वेळी ‘सरां’ची सरशी झाल्यामुळे रिमोट कंट्रोलच्या प्रभावावर प्रश्रचिन्ह लागत होते, त्यालाही उत्तर देणे आवश्यक होते. कॉंग्रेस हा बहुजनांचा पक्ष आहे. त्याला राजकीय उत्तर देण्यासाठी युतीचे नेतृत्वही जशास तसे असण्याची गरज होती. अनेक वर्षे रस्त्यावरच वावरलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्याला अवघ्या चाळिशीत मुख्यमंत्री होण्याची संधी शिवसेनेमुळे मिळू शकते हा मेसेज मराठा समाजाला सर्वांत प्रभावी ठरू शकतो. शिवाय उद्धवलाच राज्याभिषेक होणार हा घराणेशाहीचा संशयही आपोआप दूर होतो. 'व्यास' प्रकरणाची टांगती तलवार होतीच. या सर्व कारणांची गोळाबेरीज म्हणजे मनोहर जोशी यांची उचलबांगडी. अपक्ष आमदारांपासून ते बाळासाहेबांपर्यंत सर्वांना सांभाळताना मनोहर जोशींनी बरीच कसरत बराच काळ यशस्वी केली. विधिमंडळ सभागृहात युतीला अडचणीच्या वेळी सावरले. पण समर्थ प्रशासक अशीही त्यांची ख्याती नव्हती आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करणारे नेते तर ते नव्हतेच.

श्रेष्ठींना मान देत व पक्षांतर्गत विरोधाला तोंड देत दिग्विजयसिंहांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्यांच्याशी तुलना केली तर जोशीसरांचे अपयश स्पष्ट होईल. येत्या निवडणुकीत युतीला यशस्वी करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची अवघड जबाबदारी राणे यांच्यावर आहे. त्यामध्ये ते यशस्वी होतील असे आम्हांला वाटत नाही. महाराष्ट्रभर सतत फिरत असल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, झोपडपट्टीवाला, मध्यमवर्गीय हे युती शासनावर किती नाराज आहेत याचा काहीसा अंदाज आम्हांला आहे. शिवसेनेची धडाडी, बाळासाहेबांचा करिष्मा, त्यातून निर्माण झालेली आपुलकी यांमुळे युतीला सत्ता मिळाली. महागाई, गुन्हेगारी, खंडणी यांचा वाढता आलेख आणि झुणका भाकर केंद्रांपासून ते उद्योगधंद्यांपर्यंत उतरता आलेख यामुळे सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया युती शासनाबद्दल: विशेषतः शिवसेनेबद्दल ‘अति झाले’, अशी आहे. शिवसेनेतील तरुणाई लक्षात घेऊन ‘अति करणे,’ याचे आतापर्यंत कौतुक झाले. आता त्याचे रूपांतर क्रोधात होत आहे. सत्ताधिष्ठित होणे याचा अर्थ शिवसैनिकांनी कधी समजून घेतला नाही. त्यांना त्यांच्या नेत्यांनी समजावलंही नाही. त्यामुळे गुंडगिरी, पुंडगिरी, मजबूत मालमत्ता आणि मग्रुरी हेच सामान्य माणसाला त्यांच्याकडून वाट्याला येत आहे.

‘अति झाले,’ ही भावना काँग्रेसबद्दल येण्यास चाळीस वर्षे लागली. युतीने शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी अवघ्या चार वर्षांत केली आहे. रस्त्यावरचा शिवसैनिक ही प्रतिमा असलेले नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यामुळे यावर मात करणे अधिकच अवघड बनेल असे वाटते. शिवाय हा बदल शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेतही नसेल. 'बैल बदलला तरी कासरा धरणारा तोच' ही सामान्य खेडूत स्त्रीची दूरदर्शनवरील प्रतिक्रिया आम्हांला बोलकी वाटते. या बदलानंतरही बुडत्याचा पाय खोलातच जाण्याची शक्यता वाटते.

Tags: नारायण राणे मनोहर जोशी शिवसेनेची गच्छंती राजकारण साहित्य जाणिवेचा अवमान सत्यशोधकी परंपरा कोल्हापूर साहित्य संमेलन वैचारिक narayan rane manohar joshi count down of shivsena politics insult of literary awareness truth-seekingtraditions literary convention ideological weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके