डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दोन उद्योजक आणि एक इतिहासकार

उद्योजक जमशेटजी टाटा बरोबर होते; त्यांना कमी वेळात, कमी श्रमात, कमी खर्चात जास्त परतावा मिळवण्यासाठी त्या काळात तरी उच्च शिक्षण व संशोधन यांना प्रोत्साहन देणे हा मार्ग योग्य वाटला. अझीम प्रेमजीही त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत; दुर्गम भागातील प्राथमिक शाळा व शिक्षक यांना बळ दिले तर कमी श्रमात व कमी खर्चात जास्तीत जास्त परतावा भविष्यात मिळू शकेल, हा मार्ग त्यांना योग्य वाटतो आहे. आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिणाऱ्या टिकेकरांनी उच्च शिक्षणातील कोंडी अधोरेखित करून प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष वेधले आहे.

डॉ. अभय बंग यांचा दीर्घ लेख या अंकाची मुखपृष्ठकथा म्हणून घेतला आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेतून निर्माण झालेल्या समस्यांची चिकित्सा करणारा व त्यावर भाष्य करणारा हा लेख प्रसिद्ध करण्यासाठीचे त्यांनी कळवलेले औचित्य 11 सप्टेंबर हा विनोबा भावे यांचा जन्मदिवस. कारण या लेखातील विवेचन-विश्लेषण गांधी व विनोबा यांच्या शिक्षणविषयक विचारांना अधोरेखित करणारे आहे. मात्र या लेखाला आणखी एक औचित्य आहे, ते म्हणजे हा अंक वाचकांच्या हातात पडलेला असेल तेव्हा 5 सप्टेंबर हा शिक्षकदिन नुकताच येऊन गेलेला असेल. शिवाय, मागील दीड वर्ष कोविड-19 संकटामुळे दीर्घकालीन दृष्टीने विचार करता सर्वाधिक हानी झाली आहे, ती शिक्षणाची. प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरीय शिक्षणाची. या सर्वांचा एकत्रित विचार करून, प्रस्तुत संपादकीय लेखही याच विषयावर करावा असा विचार मनात आला आणि बरेच दिवस मनात घोळत असलेली त्रिसूत्री शब्दबद्ध करावी असे वाटले. अर्थातच ती त्रिसूत्री थोडी पार्श्वभूमीसह सांगावी आणि पुढील विश्लेषण व निष्कर्ष वाचकांवर सोपवावे असाही विचार आहे. तर ही त्रिसूत्री आकाराला आलेली आहे ती दोन उद्योजक आणि एक इतिहासाचा अभ्यासक (मर्यादित अर्थाने इतिहासकारही) यांच्यामुळे. हे दोन उद्योजक म्हणजे जमदशेटजी टाटा व अझीम प्रेमजी आणि इतिहासकार म्हणजे अरुण टिकेकर. आपल्याकडे उद्योजकांविषयी काही बरे बोलणे-लिहिणे म्हणजे संशयी नजरा स्वत:कडे वळवणे आणि इतिहासकाराचे उल्लेख करणे म्हणजे काही तरी कालबाह्य उगाळत राहणे असे समजले जाते. मात्र तरीही वरील तिघांचे संदर्भ घेऊन आज-उद्याच्या शिक्षणव्यवस्थेकडे अधिक चांगले लक्ष वेधता येईल असे वाटते.

1839 ते 1904 असा कालखंड लाभलेल्या जमशेटजी टाटा यांना भारतातील आधुनिक उद्योगांचे जनक असे संबोधले जाते. स्वातंत्र्यपूर्व पाऊण शतक आणि स्वातंत्र्योत्तर पाऊण शतक अशी एकूण दीड शतक भारताची वाटचाल पाहिली तर ‘टाटा उद्योग समूह’ मध्यवर्ती राहिला आहे, ‘टाटांचे साम्राज्य’ असे म्हणण्याइतपत विस्तार त्यांनी केलेला आहे. त्यांच्या वाटचालीविषयी एकूण जनमत आदराचे राहिले आहे, मात्र त्यांच्यावर प्रखर टीका करणारा एक वर्गही सुरुवातीपासून आतापर्यंत कायम राहिला आहे. तूर्त ते सर्व बाजूला ठेवून टाटांनी शिक्षणविषयक काय विचार केला होता, हे थोडक्यात पाहायचे असेल तर त्यांच्या टाटा ट्रस्टचे धोरण काय राहिले हे पाहायला हवे. 1892 पासून टाटा ट्रस्ट कार्यरत आहे, त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने आणखी काही ट्रस्ट अस्तित्वात आले. त्यांच्यामार्फत ज्या काही देणग्या शिक्षण क्षेत्रांसाठी देण्यात आल्या त्या प्रामुख्याने उच्च शिक्षण आणि संशोधन यासाठीच होत्या. त्यामागे त्यांची भूमिका अशी होती की, उच्च शिक्षणात व संशोधनात केलेल्या गुंतवणुकीचा वा खर्चाचा परतावा लवकर आणि जास्त मिळतो. म्हणजे विविध विद्याशाखांना प्रवेश घेणारे बुद्धिमान विद्यार्थी निवडायचे, त्यांना मोठ्या रकमेच्या शिष्यवृत्त्या द्यायच्या असे त्यांचे धोरण होते. त्यातून विविध क्षेत्रांत कार्य करण्यासाठीचे तज्ज्ञ पुढील चार-पाच वर्षांत तयार झाले पाहिजेत, असा तो विचार होता. तोच विचार समोर ठेवून मागील सव्वाशे वर्षे टाटा ट्रस्ट भारताच्या शिक्षणक्षेत्राला छोटासा पण परिणामकारक हातभार लावत आहे. त्यांनी उच्च शिक्षण व संशोधन यासाठी शिष्यवृत्ती दिलेले हजारो विद्यार्थी (आणि काही संशोधन संस्था) या देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले आहेत. टाटा ट्रस्टची ही भूमिका हा देश प्रगतीशील व्हावा, आधुनिक व्हावा, महान व्हावा यासाठीच आहे. आणि त्यामागचा त्यांचा ठोस विचार ‘हार्टबिट ऑफ अ ट्रस्ट’ या आर.एम.लाला लिखित इंग्रजी पुस्तकात आली आहे. हे पुस्तक मराठीत ‘स्पंदने एका न्यासाची’ या नावाने श्रीविद्या प्रकाशनाकडून तीन दशकांपूर्वी आले आहे (सध्या आऊट ऑफ प्रिंट). तो उत्तम मराठी अनुवाद मराठीतील प्रख्यात साहित्यिक सुभाष भेंडे यांनी केलेला आहे. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवणाऱ्या कोणीही वाचावे असे ते आहे.

टाटांप्रमाणेच मागील पाव शतकात या देशात मोठ्या प्रमाणात आदराने नाव घेतले ते अझीम प्रेमजी यांचे. त्यांचेही उद्योग अनेक आहेत, पण माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या कामाची चर्चा जास्त आहे. त्यांचीही ख्याती दानशूर उद्योगपती अशी आहे. त्यांच्या नावाने सुरू झालेल्या फाउंडेशनमार्फतही अनेकविध उपक्रम पार पाडले जातात, मात्र त्यांनी अधिक लक्षवेधी काम केले आहे ते प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात. विशेष म्हणजे फाउंडेशनमार्फत नव्या शाळा उभारण्याचे काम त्यांनी केलेले नाही आणि बुद्धिमान विद्यार्थी निवडून त्यांना अधिक चांगले शिक्षण देणे असेही त्यांचे धोरण नाही. त्याऐवजी दुर्गम भागातील सरकारी प्राथमिक शाळा निवडायच्या आणि तेथील विद्यार्थी व शिक्षक यांना अधिक सक्षम करायचे असे त्यांचे धोरण राहिले आहे. त्यांचे हे काम कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्या संदर्भातील प्रेमजी यांची भूमिका अशी राहिली आहे की, अशा दुर्गम भागांतील लहान बालकांमध्ये खूप जास्त क्षमता व ऊर्जा दडलेली असते, तिला योग्य खतपाणी योग्यवेळी घातले तर भविष्यात त्यातून मिळणारा परतावा खूप जास्त असेल. म्हणजे सरकारी प्राथमिक शाळा व प्राथमिक शिक्षक यांच्यात कमी गुंतवणूक वा खर्च करूनही समाजाला जास्त फायदा होऊ शकेल, असे ते धोरण आहे. शिवाय, दुर्गम भागातील या बालकांमध्ये आता गुंतवणूक नाही केली तर बरीच राष्ट्रीय संपत्ती वाया जाणार आहे, असाही विचार त्यामागे आहेच. त्याबाबत अझीम प्रेमजी किती ठाम आहेत याची झलक सहा वर्षांपूर्वी त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या एका लेखात पहायला मिळते. गंमत म्हणजे ‘हाऊ टू मेक इंडिया ग्रेट’ या शीर्षकाचा तो लेख म्हणजे त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यांसमोर केलेले भाषण आहे. त्या भाषणात ते बोलले आहेत प्रामुख्याने प्राथमिक शिक्षणाविषयी. त्यातही मध्यवर्ती सूत्र आहे शिक्षकांविषयी. ते सूत्र असे- सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 10 ते 15 टक्के शिक्षक असे आहेत ज्यांना कोणत्याही प्रोत्साहनाची व प्रशिक्षणाची गरज नसते, ते स्वयंप्रेरणनेने अध्ययन व अध्यापन करीत राहतात, नवनवे उपक्रम कल्पकतेने राबवत राहतात. त्याच शाळांमध्ये 10 ते 15 टक्के शिक्षक असे असतात, ज्यांना कोणतेही प्रशिक्षण व प्रोत्साहन देऊन उपयोग होत नाही. काहीही केले तरी त्यांच्यात प्रेरणा ओतणे आणि त्यांना अध्ययन व अध्यापनास उद्युक्त करणे कठीण असते. आणि उर्वरित 70 ते 80 टक्के शिक्षक असे असतात, ज्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन यांची विशेष गरज असते. ते करता आले तर ते शिक्षक उत्तम प्रकारे काम करायला लागतात. त्यामुळे स्वयंप्रेरणेने काम करणारे 10 ते 15 टक्के आणि बाहेरूनही ज्यांच्यात प्रेरणा ओतता येत नाही ते 10 ते 15 टक्के असे एकूण 20 ते 30 टक्के शिक्षक वगळून, उर्वरित 70 ते 80 टक्के शिक्षकांवर काम केले तर मोठा परतावा मिळतो, असा त्या उद्योजकाने प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या कामातून काढलेला निष्कर्ष आहे. प्रेमजी यांनी हे सूत्र आयपीएस अधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात मांडले याचा एक अर्थ, सर्वच क्षेत्रांना ते कमी-अधिक प्रमाणात लागू पडते. म्हणजे त्यांना सापडलेले भारताला महान बनवण्याचे सूत्र त्यांनी सांगितले.

या दोन उद्योजकांना जोडणारा एक दुवा अरुण टिकेकर यांच्या दोन विधानांमध्ये सापडतो. डॉ. टिकेकर यांची ओळख प्रामुख्याने लोकसत्ता दैनिकाचे 11 वर्षे संपादक आणि गंभीर-वैचारिक लेखन करणारे अभ्यासक अशी असली तरी, एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास सांगणारी काही पुस्तके त्यांनी मराठी व इंग्रजीत लिहिली आहेत. त्यातही विशेष लक्षवेधी आहे तो मुंबई विद्यापीठाचा दीडशे वर्षांचा इतिहास. 1857 च्या राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात आणून राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यानंतर लगेच भारतात कलकत्ता, मुंबई, मद्रास या तीन विद्यापीठांची स्थापना झाली. 1858 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाचा सव्वाशे वर्षांचा इतिहास 1983 मध्ये आणि दीडशे वर्षांचा इतिहास 2008 मध्ये टिकेकरांनी लिहिला. त्या इंग्रजी पुस्तकाचे नाव The Cloister's Pale : A Biography of the University of Mumbai असे आहे, त्याचा मराठी अनुवाद त्यांनीच ‘ऐसा ज्ञानसागरू’ या नावाने केला आहे. हा इतिहास नीरस पद्धतीचे वर्णन व रूक्ष आकडेवारी असा नसून, त्या सव्वाशे-दीडशे वर्षांत मुंबई शहर आणि मुंबई विद्यापीठ यांची वाढ कशी समांतर होत गेली, ते दोन्ही परस्परांवर कसा इष्ट परिणाम करीत गेले, याचे ते चैतन्यदायी व उद्‌बोधक वर्णन-विवेचन-विश्लेषण आहे.

अशा या अरुण टिकेकरांनी लोकसत्ता दैनिकात 1992 ते 97 या सहा वर्षांत ‘तारतम्य’ नावाचा साप्ताहिक स्तंभ लिहिला. राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने काही मूलभूत मुद्यांकडे लक्ष वेधणारा तो स्तंभ होता. ते स्तंभलेखन थांबवताना त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या लेखाचे शीर्षक आहे, ‘सारे बदल उच्च शिक्षणापासून सुरू होतील, पण...’ त्या लेखात त्यांनी आपल्या देशातील उच्च शिक्षणाच्या दूरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनतर 20 वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये त्यांचे ‘कालांतर’ या शीर्षकाचे पुस्तक आहे. त्याच्या मनोगतात एक वाक्य असे आहे, ‘आता जर काही आशा असेल तर ती प्राथमिक शिक्षकांकडूनच!’

तर मुंबई विद्यापीठाचा इतिहास लिहिणाऱ्या टिकेकरांनी उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षक यासंदर्भात वीस वर्षांच्या अंतराने व्यक्त केलेले मनोगत मननीय आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेचा इतका ऱ्हास झालेला आहे की, पुन्हा नव्याने व मुळापासून सुरुवात करावी लागेल, असेही त्यातून सूचित होते.

सारांश, उद्योजक जमशेटजी टाटा बरोबर होते; त्यांना कमी वेळात, कमी श्रमात, कमी खर्चात जास्त परतावा मिळवण्यासाठी त्या काळात तरी उच्च शिक्षण व संशोधन यांना प्रोत्साहन देणे हा मार्ग योग्य वाटला. अझीम प्रेमजीही त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत; दुर्गम भागातील प्राथमिक शाळा व शिक्षक यांना बळ दिले तर कमी श्रमात व कमी खर्चात जास्तीत जास्त परतावा भविष्यात मिळू शकेल, हा मार्ग त्यांना योग्य वाटतो आहे. आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिणाऱ्या टिकेकरांनी उच्च शिक्षणातील कोंडी अधोरेखित करून प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष वेधले आहे.

----

वर्गणीदार वाचकांसाठी सूचना :

साधनाचे अंक सवलतीच्या दराने पोस्टाद्वारे पाठवण्यासाठी पोस्टखात्याची एक नियमावली आहे. त्यानुसार, रजिस्ट्रेशन करताना प्रत्येक अंकाची किंमत नोंदवावी लागते. त्यामुळे नियमित अंक, जास्त पानांचे विशेष अंक आणि बालकुमार, युवा व मुख्य  दिवाळी अंक यांचा एकत्रित विचार करून 60 रुपये अशी नोंदवली होती. मात्र पोस्टखात्याने आता असे कळवले आहे की, रजिस्ट्रेशन करताना नोंदवली आहे तीच किंमत अंकावर असली पाहिजे. त्यानुसार या अंकावर व पुढील सहा अंकांवर किंमत 60 रुपये असेल, मात्र किरकोळ अंकाची विक्री पूर्वीच्याच दराने होत राहील. पुढील दीड महिन्यात नव्याने नोंदणी करून योग्य किंमत अंकावर छापली जाईल. केवळ तांत्रिक पूर्ततेसाठी होणार असलेल्या या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

- संपादक, साधना

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके