डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माध्यमकर्मींनो, सिनिसिझमपासून स्वत:ला वाचवा!

हे तर खरेच आहे की, काळ कितीही बदलला असला आणि माध्यमांचे आंतरबाह्य स्वरूप कितीही बदलले असले तरी, दर्पण व दिग्दर्शन हेच कोणत्याही माध्यमसंस्थेचे मूलभूत वा अंगभूत कार्य राहिले आहे. आता प्रश्न असा की, हे कार्य अधिक चांगले बजावण्याच्या मार्गात कोरोना संकटाने अडथळा आणला आहे, की काही संधी निर्माण केली आहे? त्याचे उत्तर म्हणून ‘कोरोना संकटाने अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला आहे’, हे खरे असले तरी, गुणात्मक वाढीच्या संदर्भात संधीही उपलब्ध होण्याची शक्यता दिसते आहे. ती शक्यता निर्माण होण्याचे कारण, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या व सुलभता यात कमालीही वाढ झालेली आहे आणि मुद्रित माध्यमांची म्हणून अशी काही वेगळी व दीर्घकाळ टिकावू ताकद असतेच. या वस्तुस्थितीकडे लक्ष दिले तर, कोरोनात्तोर कालखंडात सक्षम माध्यमांना अधिक मागणी असणार हे उघड आहे. अर्थातच, त्यासाठी त्यांना आणखी सहा महिने ते वर्षभर आपल्या अस्तित्वाची लढाई अधिक नेटाने करावी लागणार आणि मुख्य म्हणजे पुढील वाटचालीसाठी ऊर्जासंचय करावा लागणार. 

कोरोना संकट जगभर घोंघावू लागल्यावर, भारतात पहिला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला दि.25 मार्च 2020 रोजी. त्यानंतर सहा महिन्यांचा कालखंड उलटला आहे. आधीचे तीन महिने देशातील सर्व जीवनव्यवहार जवळपास ठप्प होते आणि नंतरची तीन महिने हळूहळू व टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मात्र जनजीवन पूर्ण सुरळीत व्हायला आणखी किमान सहा महिने तरी लागतील हे आता स्पष्ट झाले आहे. मागील सहा महिन्यांत देशातील कोणकोणत्या घटकांवर कसा व किती परिणाम झाला, याची चर्चा-चिकित्सा सुरू झाली आहे, यापुढे ती वाढीस लागेल. मात्र यासोबतच हीसुद्धा चर्चा-चिकित्सा सुरू व्हायला हवी, की मागील सहा महिन्यांत कोणत्या घटकांनी कशी व कितपत प्रभावी कामगिरी बजावली आहे. अर्थातच यासंदर्भात राज्यसत्ता, प्रशासन, राजकीय पक्ष, सामाजिक संस्थासंघटना व आरोग्य व्यवस्था यांच्याबरोबरच माध्यमांचाही समावेश अग्रभागी करावा लागेल. कारण वरील सर्व आणि अन्य अनेक घटकांना जोडणारा प्रमुख दुवा माध्यमसंस्था हाच होता. 

आता माध्यमे म्हणतानाही त्यांचे अनेक प्रकार समोर येतात आणि हल्लीच्या काळात समाजमाध्यमे (सोशल मीडिया) जास्तच मध्यवर्ती आल्याचे दिसते आहे. मात्र इथे माध्यमे म्हणताना ज्यांनी स्वत:हून ते काम पूर्ण वेळ व पूर्ण जबाबदारीने करायचे ठरवले आहे, त्यांचाच विचार करायला हवा. त्याची कारणे दोन- एक म्हणजे हवे तेव्हा सुरू वा बंद करणे असा हौशी मामला पूर्ण वेळ काम करणाऱ्या कोणत्याही माध्यमसंस्थेला परवडत नाही. दुसरे कारण असे की, समाजमाध्यमांना संपादक नसतो, त्यामुळे त्यांच्या एकूण दर्जाविषयी व विश्वासार्हतेविषयी कायम प्रश्नचिन्ह उपस्थित असते. म्हणजे ज्यांनी पद्धतशीर नोंदणी करून, माध्यम म्हणून नियमितपणे काम करणार असल्याचे जाहीर केलेले आहे आणि सातत्यपूर्ण वाटचाल केलेली आहे, त्यांचाच विचार इथे अभिप्रेत आहे. 

तर अशा माध्यम-संस्थांमध्ये प्रामुख्याने मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल असे तीन प्रकार येतात. आकाशवाणी हा चौथा प्रकार म्हणून पुढे येतो, पण आताच्या माध्यमकल्लोळात त्यांचे काम नेहमीच्या शांतपणाने व संथपणाने चालू असल्याने आणि अद्यापही सरकारी नियंत्रणातून पूर्णत: बाहेर न आल्याने तो प्रकार थोडा बाजूला ठेवू. आधीच्या तिन्ही प्रकारच्या माध्यमांचे वय पाहिले तर लक्षात येते, भारतातील मुद्रित माध्यम जवळपास दोनशे वर्षे वयाचे आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे वय दूरदर्शन सुरू झाले तेव्हापासून धरले तर पन्नास वर्षे आणि खासगी दूरचित्रवाहिन्यांचा विचार केला तर जेमतेम तीस वर्षांचे आहे. आणि डिजिटल माध्यमांचा प्रारंभ होऊन दोन दशके झाली असली तरी त्याचे खरे वय दहा वर्षेच मानावे लागते. अर्थातच, ‘माध्यमांचा कलकलाट’ हा शब्दप्रयोग वापरला जातो तेव्हा त्याची तीव्रता उलट्या क्रमाने सांगावी लागते. मात्र त्यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. वय वाढत जाते तसतसा कलकलाट कमी होत जातो, हे माध्यमांच्या बाबतीतही खरे ठरत आले आहे.  

कोणत्याही काळातील माध्यमे स्वत:चा असा दावा काहीही करत असतील तरी प्रामुख्याने तीन प्रकारचे काम करतात. माहिती देणे, मनोरंजन करणे, प्रबोधन करणे. अर्थातच, ही तिन्ही प्रकारची कामे एका मर्यादेनंतर स्वतंत्र राहत नाहीत, ती परस्परांमध्ये मिसळलेली असतात. पण हे उघड आहे की, कोणतेही जबाबदार माध्यम वरील तिन्ही प्रकारची कामे कमी-अधिक फरकाने करीत असते. त्यांचे प्रमाण, त्यांची तीव्रता आणि परिणामकारकता स्थल-कालानुसार बदलत असते, एवढाच काय तो फरक. त्यामुळे कोणी कितीही म्हणाले की, ‘आम्ही प्रबोधनासाठी हे करीत नाही’, तर ते खरे नसते. आणि असे कोणी कितीही म्हणाले की, ‘आम्ही हे निव्वळ प्रबोधनाच्या हेतून करतोय’, तर तेही तितकेसे खरे नसते. 

या तिन्हींपैकी मुद्रित माध्यमाचा इतिहास दोन शतकांचा असल्याने आणि त्यातील स्थित्यंतरे बरीच जास्त असल्याने, त्याबाबत ध्येयवादी (मिशन म्हणून काम करणारी), पेशा म्हणून त्याकडे पाहणारी (व्होकेशन) आणि स्वत: त्याकडे व्यवसाय म्हणूनच पाहणारी (प्रोफेशन) अशी तीन प्रकारची दाखवता येतील. अर्थातच हेसुद्धा विवेचनाच्या सोयीसाठी, कारण तिन्ही प्रकारांचा संगम कमी-अधिक प्रमाणात बहुतेक सर्व प्रभावी माध्यमसंस्थांमध्ये असतोच. मात्र वरील वर्गवारी इतक्या ठळकपणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना लावता येत नाही; किंबहुना तिथे व्यावसायिकता हाच भाग मध्यवर्ती येतो. याउलट डिजिटल माध्यमांचे आहे; त्याकडे व्यवसाय म्हणून पाहता येणे अद्याप दूर आहे. 

अशी ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन, या तिन्ही प्रकारच्या माध्यमांचे मागील सहा महिन्यांतील वर्तन व व्यवहार पाहिले तर काय दिसते? सर्वांत जुने, विश्वासार्ह व अद्यापही अनेक बाबतींत सर्वाधिक प्रभावी मानले जाते, त्या मुद्रित माध्यमांचा कणा अद्याप शाबूत आहे; पण कंबरडे मोडले आहे की काय, अशी स्थिती आहे. मुळात, हे माध्यम त्याचा एकूण पसारा लक्षात घेतला तर बरेच जास्त खर्चिक आणि त्या तुलनेत त्याच्या उत्पादन विक्रीतून मिळणारा परतावा अगदीच नगण्य. परिणाम त्याचे जगणे-मरणे सर्वस्वी अवलंबून आहे ते जाहिरातींवर. काही प्रतिष्ठित माध्यमांचा थोडासा वाटा सरकारी जाहिराती भरून काढतात, पण बहुतांश वाटा उचलला जातो तो लहान-मोठे उद्योजक व व्यापारी यांच्याकडून. आणि कोरोना काळात उद्योग-व्यापार यांच्यावर झालेला परिणाम एका बाजूला, तर त्यांचा ग्राहकवर्ग घरातच बंदिस्त असल्याने जीवनोपयोगी वा अत्यावश्यक समजल्या जाणाऱ्या वस्तूंव्यतिरिक्त अन्य उत्पादनांना उठाव नाही. आणि म्हणून अगदी थोडी माध्यमे- ज्यांचा खप भरपूर आहे, जनमानसावर प्रभाव आहे आणि सरकार दरबारी वजन आहे; अशांचे गाडे मागील दोनेक महिन्यांत हळूहळू चालू झाले आहे. मुद्रित माध्यमांतील इतरांची स्थिती चिंताजनक म्हणावी अशीच आहे. अनेकांनी मागील सहा महिने कसाबसा तग धरलेला आहे, पण पुढील सहा महिन्यानंतरही एकूण स्थिती सुरळीत झाली नाही तर, अनेक मुद्रित माध्यमसंस्था मृत्यूपंथाला लागतील किंवा डिजिटलमध्ये रूपांतरित होऊन स्वत:चे अस्तित्व टिकवतील. 

इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्थिती मागील सहा महिन्यांत मुद्रित माध्यमांच्या तुलनेत बरी आहे. पण त्यांचेही अर्थकारण प्रामुख्याने जाहिरातींवरच अवलंबून असल्याने, पूर्वीचा बहर ओसरलेला आहे. घरी बसलेला प्रेक्षकवर्ग त्यांना अधिक प्रमाणात मिळालेला आहे आणि गृहोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींचा ओघ बऱ्यापैकी टिकून आहे; म्हणून त्यांचा गाडा चालू आहे. पण हे माध्यम चालवणेही खर्चिक असल्याने, त्यांच्यासमोरही अडचणी आहेतच. राहिला प्रश्न डिजिटल माध्यमांचा, तिथे ना वर्गणी ना जाहिराती अशीच स्थिती अद्याप असल्याने; त्यांचे अस्तित्व या ना त्या प्रकारच्या देणग्या किंवा ग्रँट्‌स मिळवण्यावर अवलंबून आहे. तिथे खर्च तुलनेने कमी आहेत, हा त्यातल्या त्यात सुसह्य भाग, मात्र सोशल मीडियाने निर्माण केलेले अडथळे त्यांच्या प्रभावी होण्याच्या मार्गात आहेत. 

म्हणजे मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल या तिन्ही प्रकारची माध्यमे आपापले अस्तित्व टिकवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त धडपडत आहेत. इतर वेळीही अस्तित्व टिकविण्यासाठी, प्रभाव पाडण्यासाठी व अर्थकारण जुळवण्यासाठी बहुतांश माध्यमसंस्थांना या ना त्या प्रकारच्या तडजोडी कराव्याच लागतात. कधी जाहिरातदारांसाठी तडजोडी कराव्या लागतात, कधी सत्ताधारी वर्गाचा वरदहस्त राहावा म्हणून वा वक्रदृष्टी पडू नये म्हणून नमत्या वा चढत्या भूमिका घ्याव्या लागतात, कधी मालक/चालक यांचे हितसंबंध सांभाळावे लागतात, कधी प्रायोजित कार्यक्रम करून, कधी पेड न्यूजसारख्या अपप्रकाराला बळी पडून निधी गोळा करावा लागतो, तर अनेक वेळा वाचकानुनयाच्या नावाखाली सवंगपणाला प्रसिद्धी द्यावी लागते. आणि हे सर्व किंवा त्यांपैकी काही प्रकार करतात म्हणून, ‘आपली माध्यमे उथळ आहेत’, अशी टीका सर्वत्र होत असते. 

इतक्या साऱ्या मर्यादांमध्ये आणि प्रचंड गदारोळात काम करताना बहुतेकांना पत्रकारितेच्या नीतिमूल्यांचे जतन करणे हा प्रकार चैन करण्यासारखा तरी भासतो किंवा स्वप्नवत्‌ तरी वाटू लागतो. आणि म्हणून आपली माध्यमे उपलब्ध अवकाशात जे काही करतात ते कमी नाही, असेही एका बाजूने वाटू शकते. कारण उपलब्ध वेळेत, उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये आणि मोठा व व्यामिश्र जनसमूह लक्षात घेऊन त्यांनी केलेले ते काम असते. त्यात ‘दर्जा’ हा मुद्दा कायम टिकेचा राहतो. बातमी असो वा लेख किंवा ध्वनिचित्रफितीवरील चर्चा-संवाद, त्या सर्वांच्यामध्ये माहितीची विश्वासार्हता, तपशीलांची अचूकता आणि वस्तुस्थितीचा विपर्यास नाही याची खात्री, याबाबत कमी-अधिक अनिश्चितता असतेच. त्यातील मुख्य अडचण अशी की, माध्यम जेवढे मोठे व वेगवान तेवढ्या जास्त क्षमतेची माणसे तिथे असावी लागतात, पण तसे करण्याला मनुष्यबळ उपलब्धीच्याच मर्यादा पडतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून, आपली सर्व माध्यमे दर्पणाचे काम नको तितके जास्त पार पाडतात आणि दिग्दर्शनाबाबत मात्र यथातथा भूमिका बजावतात. 

हे तर खरेच आहे की, काळ कितीही बदलला असला आणि माध्यमांचे आंतरबाह्य स्वरूप कितीही बदलले असले तरी, दर्पण व दिग्दर्शन हेच कोणत्याही माध्यमसंस्थेचे मूलभूत वा अंगभूत कार्य राहिले आहे. आता प्रश्न असा की, हे कार्य अधिक चांगले बजावण्याच्या मार्गात कोरोना संकटाने अडथळा आणला आहे, की काही संधी निर्माण केली आहे? त्याचे उत्तर म्हणून ‘कोरोना संकटाने अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला आहे’, हे खरे असले तरी, गुणात्मक वाढीच्या संदर्भात संधीही उपलब्ध होण्याची शक्यता दिसते आहे. ती शक्यता निर्माण होण्याचे कारण, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या व सुलभता यात कमालीही वाढ झालेली आहे आणि मुद्रित माध्यमांची म्हणून अशी काही वेगळी व दीर्घकाळ टिकावू ताकद असतेच. या वस्तुस्थितीकडे लक्ष दिले तर, कोरोनात्तोर कालखंडात सक्षम माध्यमांना अधिक मागणी असणार हे उघड आहे. अर्थातच, त्यासाठी त्यांना आणखी सहा महिने ते वर्षभर आपल्या अस्तित्वाची लढाई अधिक नेटाने करावी लागणार आणि मुख्य म्हणजे पुढील वाटचालीसाठी ऊर्जासंचय करावा लागणार. 

त्यासाठीची पूर्वतयारी व वाटचाल याबाबत नेहमीचे व सर्वपरिचित असे मुद्दे आहेतच. म्हणजे विविध प्रकारचे आशय-विषय व विविध समाजघटक यांना सामावून घेणारे असेच प्रसिद्ध करण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. पण त्या सर्वांच्यापेक्षा महत्त्वाचे ठरणार आहे, नकारात्मकता, तुच्छतावाद, विरोधाला विरोध, ठोकळेबाजपणा, पोथीनिष्ठता, पूर्वग्रह यांना नियंत्रित करणे! By defination journalism is negative या विधानाचा अर्थ आपल्याकडच्या अनेक मान्यवरांनी इतका शब्दश: व चुकीचा घेतला आहे की, त्या एका कारणामुळेसुद्धा दर्पण व दिग्दर्शन या अंगभूत कार्याचे खूप नुकसान झालेले आहे. आणि त्या सर्वांना जोड मिळाली आहे ती आपल्या एका सामाजिक वैगुण्याची. ते वैगुण्य असे की, तुकड्या-तुकड्यांतच विचार करणे आणि काही अर्धवट तुकड्यांच्या आधारावरच निष्कर्ष काढून व भाष्य करून मोकळे होणे! परिणामी ‘निरीक्षणे बरोबर, पण निष्कर्ष चूक’ असा प्रकार सर्रास पहायला मिळतो. आणि म्हणून कोणत्याही लहान-मोठ्या प्रश्नावर किमान सहमती होणेही अवघड बनून जाते. आपल्याला प्राप्त परिस्थितीत व उपलब्ध अवकाशात मार्ग काढायचा आहे आणि पुढे जायचे आहे, या प्रवाही विचाराला त्यामुळे मध्यवर्ती स्थान मिळत नाही. आणि मग एक प्रकारचा सिनिसिझम तज्ज्ञ, हुशार व समाजहितदक्ष समजल्या जाणाऱ्या अनेक लहान-थोरांमध्ये बळावतो. असा सिनिसिझम माध्यमसंस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मनात बळावलेला असणे जास्त धोकादायक असते; कारण ते त्याचीच पेरणी करू लागतात आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी सभोवताली अन्य घटक असतातच!  

Tags: आकाशवाणी वृत्तपत्र समाजमाध्यमे प्रसारमाध्यमे पत्रकारिता विनोद शिरसाठ संपादकीय editorial patrakarita vinod shirsath on today’s journalism todays journalism electronic media newspaper television print media social media sadhana on media vinod shirsath on media sadhana weekly journalism sadhana journalism Journalism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके