डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ज्योती बसूंना पंतप्रधान होऊ न देणे ही ‘माकप’ची ऐतिहासिक चूक आहे?..

म्हणजे वाजपेयींनी जे करून दाखवले ते आपण करू शकलो असतो याची तीव्र जाणीव ज्योतीबाबूंना झाली तेव्हाच ते ‘ती ऐतिहासिक चूक होती’ असे म्हणाले असावेत. पण लाखमोलाचा मुद्दा राहतोच, तो म्हणजे वाजपेयींनी हे करताना भाजपची ‘अ पार्टी विथ डिफरन्स’ ही प्रतिमा संपुष्टात आणली. बसूंनाही असेच करताना ‘अ पार्टी विथ प्रिन्सिपल्स’ ही कम्युनिस्टांची प्रतिमा मोडीत काढावी लागली असती. पण भाजपचे झपाट्याने काँग्रेसीकरण झाले तसे कम्युनिस्टांचे करता आले असते?

भारतातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वांत ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांचे 17 जानेवारीला, वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. दुसऱ्या दिवशीच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांतील बातम्यांतून वा अग्रलेखांतून ज्योती बसू यांच्याविषयी चार उल्लेख प्रामुख्याने केले गेले. 1- ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहिलेले नेते होते. 2-ते तत्त्वनिष्ठ पण व्यवहारवादी होते. 3- ते लोकप्रिय असूनही शिस्त पाळणारे होते. 4- त्यांना पक्षाने पंतप्रधान होऊ दिले नाही.

कम्युनिझमशी जराही संबंध नसलेल्या आणि कम्युनिझमला ठाम विरोध असलेल्या लोकांच्या मनातही ज्योती बसू यांच्याविषयी आदर, आपुलकी व आकर्षण होते, त्याला वरीलपैकी तीन वैशिष्ट्ये कारणीभूत होती आणि चौथ्या कारणामुळे त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती होती. आणि त्यामुळेच, त्यांच्या निधनानंतर ‘‘ज्योती बसूंना पंतप्रधान होऊ न देणे ही ‘माकप’ची ऐतिहासिक चूक होती’’ हा मुद्दा मुख्य प्रवाहातील सर्व प्रसारमाध्यमांनी अगदी ठळकपणे व ठासून मांडला. शिवाय, स्वत: ज्योती बसूंनीच ‘‘ती ऐतिहासिक चूक (मूळ शब्द ‘हिस्टॉरिक ब्लंडर’) होती’’ अशी जाहीर कबुली दिलेली असल्याने आणि माकपने त्याचा ठोस प्रतिवाद केलेला नसल्याने, त्या विधानाची पुरेशी चिकित्सा तर सोडाच, पण त्यावर नीट चर्चाही झाली नाही. अर्थातच, ही चर्चा तात्त्विक व व्यावहारिक या दोनही दृष्टिकोनांतून करावी लागेल.

ज्योती बसू किती तत्त्वनिष्ठ होते, हे त्यांच्या आयुष्यातील पूर्वार्धावर नजर टाकली तर पटकन्‌ लक्षात येते. 1914ला जन्मलेल्या ज्योती बसूंचे बालपण व शालेय जडणघडण, पहिले जागतिक महायुद्ध व बंगालमधील क्रांतिकारकांच्या चळवळी या पार्श्वभूमीवर झाली. इंग्लंडमध्ये बॅरिस्टर व्हायला गेल्यानंतर त्यांचा तारुण्यातील भावनिक व वैचारिक विकास दुसरे महायुद्ध व भारतीय स्वातंत्त्र्यलढा या पार्श्वभूमीवर झाला. इंग्लंडमधील पाच वर्षांच्या वास्तव्यात, रजनी पाम दत्त यांचा प्रभाव, भुपेश गुप्ता यांच्यासारख्या अनेक तरुण कॉम्रेड्‌सचा सहवास आणि कार्ल मार्क्सचे अनेक वर्षे वास्तव्य होते त्या लंडनमधील परिसरात वावर यामुळे ज्योती बसू कम्युनिस्ट झाले. त्याचवेळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा साम्राज्यवाद आणि जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या हिटलरचा फॅसिझम यांच्या विरोधातील लढा कम्युनिझमच्या माध्यमातूनच होऊ शकतो हे ज्योतीबाबूंना मनोमन पटले. त्यामुळेच 1940 मध्ये भारतात आल्यावरही त्यांनी ‘चले जाव’ चळवळीत भाग घेण्याऐवजी त्यावेळी बंदी असलेल्या कम्युनिस्ट पक्षाशीच जोडून घेतले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्षात फूट पडल्यावर जहाल व अधिक तत्त्वनिष्ठ भूमिका घेणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात जाणे पसंत केले.

ज्योती बसू किती व्यावहारिक होते, याचा प्रत्यय त्यांच्या 23 वर्षांच्या (1977-2000) मुख्यमंत्रिपदाच्या काळातील भूमिकांवरून येतो. 1980 ते 89 या दशकभराच्या काळात पूर्ण बहुमत असलेल्या इंदिरा गांधी व राजीव गांधी या पंतप्रधानांशी त्यांनी उत्तम संबंध ठेवले होते. 1991 ते 95 मध्ये अल्पमतात असलेल्या नरसिंहराव सरकारला माकपने बाहेरून पाठिंबा दिला होता. 1989 मध्ये व्ही.पी. सिंग, 96-97मध्ये देवेगौडा व गुजराल पंतप्रधान असताना माकप तिसऱ्या आघाडीसोबत होता आणि 1978 मध्ये मोरारजी देसाई मंत्रिमंडळाला त्यांचे समर्थन होते. म्हणजे 23 वर्षे मुख्यमंत्रिपदावर असताना ज्योतीबाबूंनी 20 वर्षे तरी केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी जुळवूनच घेतले होते. त्यांचा केंद्रीय सत्तेला विरोध राहिला तो केवळ 1998 ते 2000 या काळात भाजप सत्तेवर असताना. 1959 मध्ये केरळमधील कम्युनिस्ट सरकार त्यावेळच्या नेहरू सरकारने इंदिरा गांधींच्या आग्रहास्तव बरखास्त केले होते, त्याचे साक्षीदार असलेल्या ज्योती बसूंनी ‘केंद्राशी जुळवून घेतल्याशिवाय राज्य करता येणार नाही’ याचे भान शेवटपर्यंत सोडले नाही. (2004 मध्ये सोनिया गांधींशी उत्तम संबंध ठेवून काँग्रेस सरकारला पाठिंबा देण्यासाठीचा पुढाकारही ज्योती बसूंचाच होता.) शिवाय, प.बंगालमध्ये कम्युनिस्ट आघाडीचे सरकार असूनही कधीही घटनात्मक पेच निर्माण होणार नाही, याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली. अशी व्यवहारवादी भूमिका घेणे सोपे होते, पण ती पक्षाच्या गळी उतरवणे यात त्यांचे खरे कौशल्य होते. आणि म्हणूनच कदाचित प.बंगालचे विद्यमान मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य बसूंच्या निधनानंतर दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेत म्हणाले, ‘‘ज्योती बसूंच्या ‘कन्व्हीन्सिंग पॉवर’चे मला विशेष आकर्षण वाटते. याबाबत मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो.’’ याचा अर्थ, तात्त्विक नव्हे तर व्यावहारिक भूमिका पक्षाला पटवून देण्याची बसूंची क्षमता अफाट होती.

असे हे ज्योती बसू 1996 साली त्यांना पंतप्रधान होण्याची संधी आली तेव्हा आपल्या पक्षाला का पटवून देऊ शकले नाहीत, याचा विचार करायला हवा. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्योती बसूंना पंतप्रधान होण्याची संधी देणे म्हणजे माकपने केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेणे; पण केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची संधी तर माकपला त्याआधी तीन वेळा आली होती आणि नंतर एकदा म्हणजे 2004 सालीही होती. पण 1996 ची संधी (पंतप्रधानपदासह मंत्रिमंडळात सहभाग) अभूतपूर्व होती, हे खरेच आहे. ती नाकारण्याची पार्श्वभूमी तितकीच गंभीर होती. मे 1996च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत नरसिंहरावांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव झाला होता. (तेव्हा सोनिया गांधी राजकारणात नव्हत्या.) काँग्रेसचे ऱ्हासपर्व वेगाने चालू होते. अनेक प्रकारचे भ्रष्टाचार आणि बाबरी मशिदीचा विध्वंस यामुळे अप्रिय व बदनाम झालेले नरसिंहरावांचे काँग्रेस सरकार गेल्यावर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली होती. लोकसभेतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपने वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले, पण अकाली दल व शिवसेना वगळता एकही मित्रपक्ष न मिळाल्याने अवघ्या 13 दिवसांत ते सरकार कोसळले होते. त्यामुळे भाजप सोडून इतर सर्व पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा देणे किंवा इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवणे व त्याला काँग्रेसने पाठिंबा देणे असे दोनच पर्याय होते.

यातील दुसऱ्या पर्यायातून ज्योती बसूंना पंतप्रधानपदाची संधी आली होती. पण स्वत:चे चाळीस-पन्नास खासदार व इतर विविध तऱ्हेच्या तेरा पक्षांचे खासदार यांच्या साह्याने सरकार बनवणे आणि ते भ्रष्ट व बदनाम झालेल्या काँग्रेसच्या इशाऱ्यानुसार चालवणे अशी ती माकपला ऑफर होती. शिवाय, अशा प्रकारच्या काँग्रेसच्या पाठिंब्याचा पूर्वेतिहास नाचक्कीपूर्ण होता. 1980 मध्ये इंदिरा गांधींनी चरणसिंग यांना पंतप्रधान केले खरे, पण विश्वासदर्शक ठराव मांडायच्या आत पाठिंबा काढून घेतला होता आणि 1990 मध्ये राजीव गांधींनी चंद्रशेखर यांना पंतप्रधान केले, पण अवघ्या चार महिन्यांत पाठिंबा मागे घेतला होता. म्हणजे काँग्रेसच्या पाठिंब्याचा इतिहास व ज्योती बसूंना पंतप्रधानपदाच्या ऑफरची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर ज्योती बसू सरकार दोन-चार-सहा महिन्यांचेच राहणार होते. शिवाय, नव्यानेच आलेले व प्रचंड वादग्रस्त ठरलेले उदार आर्थिक धोरणापुढे रेटण्याची काँग्रेसची सक्ती राहणार होती, मग बसू सरकार कसे काम करणार होते? याचा परिणाम ज्योती बसू हे चंद्रशेखर व चरणसिंग यांच्याच पंक्तीत बसणार होते. आणि जनता पार्टी व जनता दल यांची वाताहत झाली तशी कम्युनिस्टांची होणार होती. याचाच अर्थ, ज्योती बसूंना पंतप्रधानपदाची ऑफर म्हणजे डाव्यांना त्यांचे डावेपण सोडण्याचा आग्रह. थोडक्यात, डाव्यांचा तात्त्विक व व्यावहारिक या दोनही पातळींवर तो मोठा पराभव झाला असता. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत त्या मोहापासून माकपने ज्योती बसूंना व स्वत:ला वाचवले.

पण मग प्रश्न उरतो तो हाच की, ज्योती बसूंनी या निर्णयाची संभावना ‘हिस्टॉरिक ब्लंडर’ अशी का केली असावी? ज्योती बसूंचे हे मत त्या निर्णयाच्या वेळचे की नंतर बनले, हे कळावयस मार्ग नाही, पण त्यांनी हे मत पुढे चार-पाच वर्षांनंतर म्हणजे वयाच्या नव्वदीत (मुख्यमंत्रिपद सोडल्यावर) व्यक्त केले. पक्षाने त्यांना त्याबाबत जाब विचारला असणार आणि बुद्धदेव भट्टाचार्य म्हणतात त्याप्रमाणे ज्योतीबसूंनी त्याबाबत पॉलिट ब्युरोला कन्व्हिन्सही केले असणार. पण तात्त्विक नाही तर व्यावहारिक दृष्टिकोनातून ती ऐतिहासिक चूक होती, असेच त्यांना म्हणायचे असावे.

ज्योती बसूंनी हे मत व्यक्त केले तेव्हा अटलबिहारी वाजपेयींचे सरकार चांगले स्थिरावले होते. पहिल्यांदा तेरा दिवस, नंतर तेरा महिने व त्यानंतर साडेचार वर्षे केंद्रीय सत्तेवर राहिलेल्या भाजपने दोन मित्रपक्षांपासून चोवीस मित्रपक्षांपर्यंतचा प्रवास अवघ्या चार वर्षांत केला. हा सारा बदल वाजपेयींच्या व्यावहारिक नेतृत्वामुळे झाला. उजव्यांचे मध्यममार्गी नेते वाजपेयी यांना जे साधता आले ते डाव्यांचे मध्यममार्गी नेते असलेल्या आपल्याला साधता आले असते, असे ज्योती बसूंना वाटले असावे. त्यावेळी कम्युनिस्ट सोडले तर बहुतेक सर्व लहान मोठे पक्ष भाजपला मिळाले होते, काँग्रेसमधून फुटलेले नेते व लहान पक्षही! भाजपबरोबर गेलेले सर्व पक्ष व नेते त्याआधी तिसऱ्या आघाडीचे भाग होते.दरम्यानच्या काळात भाजप देशभर विस्तारला, त्याची अस्पृश्यता संपुष्टात आली.

म्हणजे वाजपेयींनी जे करून दाखवले ते आपण करू शकलो असतो याची तीव्र जाणीव ज्योतीबाबूंना झाली तेव्हाच ते ‘ती ऐतिहासिक चूक होती’ असे म्हणाले असावेत. पण लाखमोलाचा मुद्दा राहतोच, तो म्हणजे वाजपेयींनी हे करताना भाजपची ‘अ पार्टी विथ डिफरन्स’ ही प्रतिमा संपुष्टात आणली. बसूंनाही असेच करताना ‘अ पार्टी विथ प्रिन्सिपल्स’ ही कम्युनिस्टांची प्रतिमा मोडीत काढावी लागली असती. पण भाजपचे झपाट्याने काँग्रेसीकरण झाले तसे कम्युनिस्टांचे करता आले असते?

खरे तर या जर तर ला अर्थ नाही. पण ज्योती बसूंना पंतप्रधानपद व माकपने सरकारमध्ये सहभागी होणे, असा निर्णय झालाच असता तर मोठी शक्यता ही होती की माकपमध्ये उभी फूट पडली असती, 1964ची पुनरावृत्ती झाली असती. ती फूट व ज्योती बसूंचे चरणसिंग वा चंद्रशेखर होणे टाळण्यासाठी त्यावेळच्या पॉलिट ब्युरोने ज्योती बसूंना पंतप्रधान होऊ दिले नाही, असे म्हणावे लागते. त्यामुळे ‘ती ऐतिहासिक चूक होती’ असे निर्विवादपणे म्हणता येणार नाही, जरी स्वत: ज्योती बसू म्हणाले असले तरी!

Tags: पॉलिट ब्युरो निर्णय माकप मार्क्सवादी नेते पंतप्रधानपद नाकारणे ऐतिहासिक चूक kolkataज्योती बसू Chief Minster Political Incident Historic Blunder 2004 1996 Prime Minister Core Team Being Leader Indian Politics MCP Marxist Leader Jyothi Basu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके