डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सणासुदीच्या दिवशीसुद्धा कोरभर भाकरी आणि उलीसे काही तरी कोरड्यास बिनबोभाट मिळाले तर देवाची कृपा मानावी असे सध्या दिवस आहेत. जलप्रलयासारखी अस्मानी संकट आणि महागाई आणि भ्रष्टाचारासारखी सुलतानी संकटे म्हणजे माणसाची सत्त्वपरीक्षाच. सरकारला कितीही धारेवर धरले तरी त्याला ढिम्म काही होत नाही. इकडे जनताजनार्दन सारे पाहतो

जगात सगळ्यात चिवट गोष्ट कुठली असेल तर माणसाची आशा. त्यातही भारतीय माणसांसारखी निराश न होणारी माणसे इतरत्र सापडणं जरा मुश्किलच. काहीही घडो, कितीही सोसायला लागो, आपण आता प्रसंग किती निमूटपणे निभावून नेतो?

नुकताच खूप पाऊस पडला. कावळ्याचे घरटे शेणाचे आणि चिमणीचे मेणाचे, असला फरक न करता प्रचंड पाणलोटाने घरेदारे उद्ध्वस्त केली. कष्टाने उभे केलेले काड्याकाटक्यांचे संसार एका काळरात्रीत वाहून गेले. पण आपल्याकडचे गरीबगुरीबदेखील, जीवनसंघर्ष कितीही कठोर असो, जिद्दीने उभे राहतात. ‘हेही दिवस जातील’, ही आशा काही सोडत नाहीत.

एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे अंदाधुंदी. पंचमहाभूतांच्या बरोबरच महागाई नावाचे सहावे भूत आज आपला घास घेण्यासाठी टपले आहे. धान्य, भाजीपाला, खाद्यतेल, साखर, गूळ, दूध अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव प्रत्येक दिवशी वाढत जाऊन जनतेला ‘दे माय धरणी ठाय’ होऊन गेले आहे.

सणासुदीच्या दिवशीसुद्धा कोरभर भाकरी आणि उलीसे काही तरी कोरड्यास बिनबोभाट मिळाले तर देवाची कृपा मानावी असे सध्या दिवस आहेत. जलप्रलयासारखी अस्मानी संकट आणि महागाई आणि भ्रष्टाचारासारखी सुलतानी संकटे म्हणजे माणसाची सत्त्वपरीक्षाच. सरकारला कितीही धारेवर धरले तरी त्याला ढिम्म काही होत नाही. इकडे जनताजनार्दन सारे पाहतो अन् सारे साहतो. आपली शक्ती एकच, हे दिवस पालटतील असा दुर्दम्य विश्वास. काळा वर्तमानकाळ संपेल आणि सोन्याचा भविष्यकाळ उजाडेल याची नुसती आशा. 

नवरात्र संपले. दसरा उजाडला. आम्हीच आम्हाला म्हणालो, दिवाळी आलीच की जवळ, कागद महाग, शाई महाग, छपाई महाग, सगळ्याच लहानमोठ्या वस्तूंचे भाव भडकलेले. म्हणून काय झाले? बचेंगे तो और लढेंगे! उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दीपलक्ष्मीला माघारी नाही पाठवायची. कोंड्याचा मांडा आणि कण्यांची खीर, जमल्यास एखाद्या गूळाच्या खड्याबरोबर किंवा चिमूटभर साखरेबरोबर खाऊ. काय वाटेल ते झाले तरी आशा सोडायची नाही. उठा मंडळी, कंबरा कसा, कटोरा घ्या, झोळी खांद्याला अडकवा, चार घरी जाऊन शिवामुठी जमवीत रहा. खरोखर पैशाशिवाय सारी सोंगे व्यर्थ आहेत, हे नाना फडणविशी शहाणपण किती मोलाचे आहे हे अशावेळी कळते. आम्ही यंदा नाउमेद झालो नाही याची कारणे दोनच, चिरंतन आशा हे एक आणि दुसरे म्हणजे आप्तमित्रांच्या सहकार्याची खात्री.

आजच्या जीव कासावीस करणार्‍या काळात आम्ही हिंमत न हरता सुंदर दिवाळी अंक काढण्याची उमेद बाळगली. खूप मेहनतीने केलेल्या या खटाटोपाचे चीज झाले आहे किंवा कसे ते वाचकांनी ठरवायचे आहे. या अंकातील साहित्यसौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या सहृदय रसिकांच्या हाती ही आपली कृती नम्रपणे देत आहोत. ‘रसिकांचे पायी असो. दंडवत, आपुलाले चित्त द्यावे आम्हा.’

या विशेषांकाची सिद्धता करण्यासाठी आम्हाला काही काळपर्यंत नेहमीचे अंक, म्हणजे नित्यकर्तव्य थोडे बाजूला ठेवावे लागले. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आम्ही किंचित् काळ नजरेआड केल्या आणि त्यांवर टीकाटिप्पणी करण्याची प्रबळ इच्छा कह्यात ठेवली. उमलत्या अश्विनाबरोबर विधायक कार्याचे मळे फुलींफळी येऊ लागतात. महाराष्ट्रभर काम करीत असलेल्या विधायक कार्यकर्त्यांचे अहवाल येत असतात. पण त्यांचीही योग्य दखल या काळात घेता आली नाही. याच अवधीत कितीतरी जवळची माणसे काळाच्या पडद्यामागे अंतर्धान पावली आणि आम्ही मात्र, मनात असूनही, आमचे सांत्वनाचे शब्दही त्यांच्या परिवारांपर्यंत पोचवू शकलो नाही. निफाडचे रघुनाथ कोष्टी, श्रीरामपूरचे हरिभाऊ कुलकर्णी, रोह्याचे दादा कुलकर्णी, अन् असेच आणखीही काही सहप्रवासी आम्हाला सोडून गेले.

‘स्निग्धजनसंविभक्तं हि दुःखं सह्यवेदनं भवति’ या न्यायाने आम्ही आमची हळहळ व्यक्त करायला हवी होती, पण ते झाले नाही. जी माणसे गेली त्यांचे निकटवर्ती आप्त आमच्या मनाचे घायाळपण समजून घेणारे आहेत एवढाच दिलासा आज आहे. आमचे मित्र आणि मराठीतील नामवंत कथालेखक विद्याधर पुंडलिक यांचे देहावसानही ‘वरिष्ठाचे आधी कनिष्ठाचे व्हावे’ याच कोटीतले. पण हाती घेतलेले काम पुरे करण्याची निकड आम्हाला अशी जबरदस्त होती की अस्मानी-सुलतानीने खचायलाही सवड नव्हती आणि जवळच्या व्यक्ती गेल्या तरी हळहळत बसणेही अशक्य झाले होते.

मतदार राजा, जागा रहा!
दिवाळी अंकाचे हे संपादकीय निवेदन लिहीत असतानाच 22 नोव्हेंबरला लोकसभेच्या निवडणुका होणार असे जाहीर झाले. हे जरा आधी घडते तर ‘निवडणुकीच्या संदर्भात काही विस्तृत ऊहापोह या अंकातच करता आला असता. दिल्लीला राजीव गांधींची राजवट सुलतानशाही लहरीपणाने चालते. मात्र या लहरीपणातही त्यांचा आपमतलबी हिशेब असतोच, विरोधकांना अडचणीत टाकायचे, त्यांना साधनसामग्रीची जमवाजमव करायलाही फुरसत ठेवायची नाही या हिशेबाने पंतप्रधानांनी अतिरेक्याप्रमाणे हा बाँब एकाएकी भिरकावला. आपल्या प्रसार माध्यमांच्या मदतीने प्रचाराचे ढोल सतत बडवीत राजीव गांधींची काँग्रेस सूक्तासूक्त सर्व मार्गांचा अवलंब करून येती निवडणूक जिंकण्यासाठी शर्थ करणार आहे. कधी प्रलोभने तर कधी धाकदपटशा दाखवून, पैशांची प्रचंड खैरात करून पुन्हा खुर्ची काबीज करणे हा त्यांचा कार्यक्रम आहे. आजतरी त्यांना यशस्वी शह देणाऱ्या शक्ती समजुतीने एकवटण्याची शक्यता दिसत नाही. चार-पाच महिन्यांपूर्वी निर्माण झालेल्या पर्यायी शक्तीविषयीच्या अपेक्षा आज कमालीच्या मंदावलेल्या आहेत. येत्या निवडणुकीत एक अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. ती म्हणजे 18 वर्षांवरील युवकांना प्रथमच मताचा अधिकार बजावता येणार आहे. अशा मतदारांची संख्या 4 कोटींहून अधिक आहे हे ध्यानात घेतले तर नव्याने उदयाला येणारी शक्ती किती प्रबळ आहे याचा काहीसा अंदाज करता येतो. नवयुवकांची अर्थप्रगल्भता आपल्या फायद्याची कशी ठरेल याचा विचार पक्षोपपक्ष करतीलच. गठ्ठा मते विकत घेण्याचा मार्ग काँग्रेस (आय) सारख्या मातबर पक्षाला सुलभ आहे, तर येनकेन प्रकारेण नवतरुणांची माथी भडकवून आपल्या दांडगाईच्या पंथात त्यांना सामील करून घेण्यासाठी जातीय शक्तींमध्ये अहमहमिका लागेल. म्हणून यंदाची निवडणूक हे युवाशक्तीला मोठे आव्हान आहे असे आम्हांस वाटते. पूर्वीप्रमाणे आताही ‘साधना’ कोणत्याही राजकीय पक्षाचा अंधपणे कैवार घेऊ इच्छीत नाही. मात्र सध्याची भ्रष्ट राजवट संपवलीच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. राज्यकर्ते नादान आणि नीतिशून्य अन् विरोधी पक्षांत कुणाचा कुणाला मेळ नाही, अशा अवस्थेत प्रथमच मतदान करणार्‍या नवयुवकांनी करावे तरी काय? त्यांना आम्ही एवढेच सांगू इच्छितो, तुम्ही मतदान केलेच पाहिजे. तो तुमचा अधिकार आहे आणि कर्तव्यही आहे. आपले मत सध्याच्या दिल्लीश्वरांच्या राजवटीच्या विरुद्ध पडेल अशी त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. आपण आधुनिक जगाचे विज्ञाननिष्ठ नागरिक होणार आहोत हे लक्षात घेऊन धर्मवेड्या जातीयवादी शक्तींना त्यांनी निग्रहाने दूर ठेवले पाहिजे. मात्र यापुढे जाऊन, त्यांनी अमूक पक्षाला मत द्यावे असे आम्ही आज सांगणार नाही. आम्ही त्यांना कळकळीने एवढेच सांगू की, तुमच्या मतदारसंघात शुद्ध चारित्र्याच्या आणि कर्तृत्वसंपन्न असलेल्या उमेदवाराची तुम्ही मनोमन निवड करा आणि त्याला मत द्या. असा उमेदवार निवडणुकीला उभा राहील यासाठी त्यांनी प्रथमपासून जागरूक राहणे अगत्याचे आहे.

देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक भयावह बनत चालली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या दंगलीत काही पोलिस अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करून दलितांवर गोळीबार व लाठीमार केला. त्यात मृत्यू पावले आणि जखमी झाले ते सर्व दलितच होते. आणि नंतर पोलिसांवर दगडफेक झाली ती या अमानुष अन्यायाची प्रतिक्रिया म्हणून. आम्ही कोणत्याही दंगलीचे वा दगडफेकीचे समर्थन करणार नाही; परंतु सौम्य छडीमार वा लाठीमार, अश्रुधूर या उपायांनी प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्याऐवजी एकदम गोळीबार करण्यात आला, ही गुन्हेगारीच मानली पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरला विधिमंडळात जे निवेदन केले ते या देशघातकी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारे आहे. समाजात मतभेद आणि तणाव निर्माण होतातच, अशावेळी जबाबदार पुढार्‍यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना शांत करावयाचे असते. परंतु शिवसेनेने ‘दलितांना धडाच शिकवायचा’ असे ठरवून आक्रमक पवित्रा घेऊन गुंडगिरी सुरू केली. अशा परिस्थितीत सामान्य माणसांना संरक्षण देणे व गुंडांना जरब बसविणे हेच पोलिसांचे कर्तव्य असते. परंतु घडले ते नेमके उलटेच. पोलिसांना आपल्या हातातील दंडा आपण कोणावरही वापरू शकतो असा उन्माद चढल्यामुळेच गुजरातमधील एका न्यायाधीशाला हातकड्या घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली. पत्रकार व छायाचित्रकार यांना तर पोलिसांचे दंडुके अनेकवेळा खावे लागतात. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ते पोलिसच जनतेवर अत्याचार करू लागले तर राज्यकर्त्यांनी कठोरपणाने पोलिसदलाचे शुद्धीकरण केले पाहिजे.

केवळ पोलिसदलाचेच नव्हे तर सर्व सार्वजनिक जीवनाचे शुद्धीकरण केले पाहिजे. आजचे राज्यकर्ते हे करू शकणार नाहीत असे आम्हाला वाटते. कारण आपले सत्तास्थान टिकविण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी बड्या गुन्हेगारांना, माफियांना, तस्करांना हाताशी धरले आहे. उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांवर खुनाचे आरोप आहेत आणि काही शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगारांना पक्षामध्ये सामील करून घेतले जात आहे. सत्ता व संपत्ती यांसाठी सर्व दुराचारी मार्गांचा अवलंब केला जात असल्यामुळेच शासन यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे. शासकीय अधिकारी, पोलीस यांनीच कायदा गुंडाळून ठेवला आहे आणि सत्तेच्या बळावर गुन्हेगारांना संरक्षण मिळू लागले आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य जनता असहाय बनून मुकाट्याने अन्याय सोसते, आणि लाचार स्वाभिमानशून्य जीवन जगते हे आपल्या देशातले आजचे चित्र आहे.

देशाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सेनेने आजपर्यंत अतुलनीय त्याग केलेला आहे. परंतु शस्त्र खरेदीबाबत गेल्या दोन वर्षांत ज्या गोष्टी प्रकाशात येत आहेत त्यामुळे स्वार्थासाठी देशहितावर निखारे ठेवणारे सत्ताधारी संरक्षणव्यवस्थेला सुरुंगच लावीत आहेत असे दिसते. बोफोर्स प्रकरणी पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे सहकारी मंत्री यांनी संसदेला खोटी माहिती देऊन देशाची दिशाभूल केली. या व्यवहारात कोणातरी भारतीयाने फार मोठी लाच घेतली असून ती व्यक्ती पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांपैकी आहे हे आता उघड झाले आहे. जर्मन पाणबुड्या खरेदी प्रकरणीही अशाच गैरव्यवहाराचा संशय त्यावेळचे संरक्षणमंत्री श्री. विश्वनाथ प्रतापसिंग यांनी व्यक्त केला असता पंतप्रधानांनी त्यांना बाजूला सारले. बेस्टलॅंड हेलिकॉप्टर ब्रिटिशांकडून खरेदी केले जाणार नाही असे पंतप्रधानांनी जाहीर केले आणि नंतर तीच हेलिकॉप्टर्स विकत घेण्यात आली. निकराच्या लढाईच्या वेळी देवगिरीच्या रामदेवराव यादवाच्या दारुगोळ्याच्या कोठारात पिठाची पोती भरलेली आढळली या इतिहासाचीच येथे पुनरावृत्ती झालेली दिसते. या सर्व भ्रष्टाचाराचे निर्मूलन झालेच पाहिजे. याकरिता प्रथम आजच्या दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना पदभ्रष्ट केले पाहिजे. मतदारांना हे करण्याचे धैर्य प्राप्त होण्यासाठी कार्यक्रमावर एकजूट घडवून आणली पाहिजे. एका बाजूला भ्रष्टाचार आणि दुसरीकडे धर्मवेडातून उफाळून आलेला जातीयवाद या दोन संकटांविरुद्ध एकाचवेळी निकराने व निर्धाराने लढावे लागणार आहे. महात्मा गांधी अगर जयप्रकाश नारायण यांच्यासारखा असामान्य नेता आज आपल्यामध्ये नाही असे म्हणून हतबल होऊन चालणार नाही. विरोधी पक्षातील चारित्र्यवान नेते, कार्यकर्ते, निर्भय पत्रकार, रामशास्त्री बाण्याची न्यायसंस्था आणि बुद्धिवंत यांची भ्रष्टाचाराविरुद्ध एकजूट झाली तर निराशा व अगतिकता यांच्या विळख्यात सापडलेली जनता नव्या जोमाने उभी राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. देशातल्या अक्राळविक्राळ दानवी शक्तींच्यासमोर चिमुकल्या अभिमन्यूंची, बभ्रुवाहनांची, लवकुशांची फौजच्या फौज उभी राहिली पाहिजे आणि तिने सर्व दुष्ट शक्ती नष्ट केल्या पाहिजेत.

दिवाळी जमेल तशी आपण साजरी करू. प्रतीक म्हणून अंधाराचा नाश करणाऱ्या असंख्य पणत्या घरोघर लावू पण राष्ट्रीय जीवनातील अंधारावर मात करणाऱ्या इवल्या इवल्या दिवल्या लक्षावधी हृदयांत चेतलेल्या जेव्हा आम्ही पाहू, तेव्हा दुसरी दिवाळी, देवाची दिवाळी साजरी करू! तो व्हावा सोहळा अनुपम्य!
 

Tags: श्री. विश्वनाथ प्रतापसिंह लोकसभा मुंबई दिवाळी अंक भारत दसरा नवरात्र विरोधीपक्ष भ्रष्टाचार दलित बोफोर्स ब्रिटिश काँग्रेस लवकुश बभ्रुवाहन अभिमन्यू महाराष्ट्र मुख्यमंत्री निवडणूक पंतप्रधान दिल्ली उत्तरप्रदेश दिवाळी शिवसेना राजीव गांधी जयप्रकाश नारायण महात्मा गांधी साधना साप्ताहिक Shri. Vishwanath Pratapsingh Parliament Mumbai Diwali Edition India Bharat Dussehra Navratri Opposition Party Corruption Dalit British Congress Babruvahan Abhimanyu Maharashtra Chief Minister Election Prime Minister Delhi Uttar Pradesh Diwali Shivsena Rajiv Gandhi Jayprakash Narayan Mahatma Gandhi Sadhana Weekly weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके