डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चतु:सूत्रीमधील तिसऱ्या सूत्राकडे लक्ष वेधणारा अंक

डॉ. नरेंद्र दाभोलकर अखेरच्या काळात म्हणायचे की, ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावर दीड तासांचे भाषण त्यांना डिझाइन करायचे आणि महाराष्ट्रातील शंभर गावांमध्ये एका वर्षभरात द्यायचे आहे. शिवाय, धर्मचिकित्सा का व कशी करायची या विषयावर त्यांना एक पुस्तकही लिहायचे होते. ते दोन्ही संकल्प राहून गेले, कारण धर्मांध शक्तींनीच त्यांची हत्या घडवली. त्यामुळे हा अंक प्रकाशित करताना आनंदाची नाही तर एक प्रकारच्या खिन्नतेची भावना मनात आहे!

डॉ. नरेंद्र दाभोलकर आज हयात असते तर 75 वर्षांचे झाले असते. आठ वर्षांपूर्वी त्यांची हत्त्या झाली. त्यानंतरच्या काळात त्यांची स्मृती म्हणून दर वर्षी एक विशेषांक काढला जातो. 20 ऑगस्ट हा त्यांचा स्मृतिदिन आणि 15 ऑगस्ट हा साधनाचा वर्धापनदिन, त्यामुळे ती दोन्ही निमित्तं साधली जातील, अशा प्रकारचे विषय त्या अंकांसाठी निवडले जातात. सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांत डॉ.दाभोलकरांचे व्यक्तित्व, विचार व कार्य अधोरेखित करणारे वा उलगडून दाखवणारे विषय विशेषांकासाठी निवडले गेले. नंतरच्या पाच-सहा वर्षांत मात्र त्यांना विशेष अगत्य होते असे विषय निवडून, त्यातील विशिष्ट थीम घेऊन विशेषांक काढले आहेत.

डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे सार्वजनिक आयुष्य चार दशकांचे होते. त्यातील पहिले दशक समाजवादी युवक दलाच्या माध्यमातून शेतकरी, दलित, कामगार व तळागाळातील वर्ग यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काम केले. त्यानंतरची तीन दशके त्यांनी प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात चढत्या क्रमाने काम केले. अखेरच्या पंधरा वर्षांच्या काळात ते साधना साप्ताहिकाचे संपादकही होते. साधनाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आले तेव्हा म्हणजे मे 1998 मध्ये ते साधनाचे संपादक झाले आणि ऑगस्ट 2013 पर्यंत त्या पदावर राहिले. दरम्यानच्या दीड दशकात त्यांनी साधनाची गुणात्मक व संख्यात्मक वाढ व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले. आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्हता हे दोन्ही असेल तरच माध्यमसंस्था टिकून राहू शकतात, या गृहितकावर त्यांचा गाढ विश्वास होता.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना जी चतु:सूत्री आकाराला आली, तिचा उच्चार ते सातत्याने करीत राहिले. ती चतु:सूत्री अशी : शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे.

या चतु:सूत्रीपैकी पहिल्या व दुसऱ्या सूत्रावर आधारित खूप मोठे काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उभारता आले. तिसऱ्या सूत्राच्या संदर्भात डॉक्टरांनी अखेरच्या आठ-दहा वर्षांत बऱ्यापैकी मांडणी केली होती, कृतिकार्यक्रमही राबवले होते. मात्र चौथ्या सूत्राच्या संदर्भात फार काही करता आलेले नाही, असेही ते बोलून दाखवत असत. अर्थात आधीची तीन सूत्रे मोठ्या प्रमाणात राबवली तर चौथ्या सूत्राच्या संदर्भात पायाभूत काम झालेलेच असते, हा मुद्दा त्यांना तत्त्वत: मान्य होता, पण इतके अल्पसंतुष्ट ते नव्हते. त्यामुळेच चौथ्या सूत्राच्या संदर्भात त्यांनी नंतरच्या काळात कदाचित अधिक काम केले असते, किमान त्या दिशेने थेट प्रवास सुरू केला असता. जातपंचायतीला मूठमाती हा उपक्रम त्या दिशेनेच टाकलेले एक पाऊल होते.

अशा पार्श्वभूमीवर पहिले व चौथे सूत्र बाजूला ठेवून, दुसऱ्या व तिसऱ्या सूत्रांना मध्यवर्ती ठेवून साधनाचे दोन विशेषांक करावेत, अशी कल्पना गेल्या वर्षी उदयाला आली. म्हणून ‘विज्ञानाने मला काय दिले?’ ही थीम घेऊन गेल्या वर्षीच्या 20 ऑगस्टला विशेषांक काढला होता. त्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या 12 मान्यवरांचे लेखन प्रसिद्ध केले होते. विज्ञान ही संकल्पना अतिव्याप्त आहे, पण अंकाच्या व वाचकांच्या सोयीसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण झालेले आहे; अशा व्यक्तींना त्यात लेखन करण्यासाठी निवडले होते. अर्थातच, त्या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात या ना त्या प्रकारे विज्ञान वा वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार-प्रसार केलेला होता. त्या निकषांवर ती निवड होती. त्या अंकाचे उत्तम प्रकारे स्वागत झाले.

आणि आता तिसरे सूत्र मध्यवर्ती ठेवून ‘धर्माने मला काय दिले?’ या थीमवर विशेषांक काढला आहे. या अंकात लेखन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील 12 मान्यवरांना विनंती केली होती.

पुढील निकषांवर 12 व्यक्तींना आम्ही आमंत्रित करीत आहोत. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना पत्र पाठवले होते, त्यातील मध्यवर्ती भाग असा होता.

1. ज्यांनी धर्म या संकल्पनेच्या संदर्भात केवळ विचार केलेला आहे असे नाही, तर त्या संदर्भात काही एक लेखन तरी केलेले आहे किंवा फिल्ड वर्क तरी केलेले आहे.

2. ज्यांनी समाजजीवनातील धर्माचे महत्त्व ओळखून त्यातील मूल्यांचा प्रचार-प्रसार केलेला आहे आणि / किंवा धर्माच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात भूमिका घेऊन प्रबोधन केले आहे.

3. भारतातील पाच प्रमुख धर्मांचा संदर्भ अंकात येईल आणि विविध वयोगटातील व विविध कार्यक्षेत्रांतील व्यक्तींचा अंतर्भाव अंकात होईल. 

आपला लेख काहीसा आत्मकथनात्मक होणार हे उघड आहे, किंबहुना ते अपेक्षितच आहे. शिवाय, ‘धर्माने मला काय दिले’ हे सांगताना, धर्माने एकूण समाजाला किंवा मानवजातीला काय दिले/दिले नाही, हेही त्यात येणार हे साहजिक आहे. त्यामुळे लेखन विषयाच्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज इथे  वाटत नाही, अंकाची थीम व अंकाचे निमित्त लक्षात घेऊन आपण आवश्यक ते स्वातंत्र्य घेऊन लिहावे.

अर्थातच, वरील 12 व्यक्ती निवडताना त्यांच्या भूमिकांमध्ये भिन्नता असली तरी या सर्व व्यक्ती मूलतः उदारमतवादी आहेत, असाही एक निकष होताच. म्हणजे खरे धर्मश्रद्ध असणारे लोक धर्माच्या नावाखाली चालू असलेल्या गैरप्रकारांचे समर्थन करणार नाहीत आणि धर्मश्रद्ध नसणारे लोक धर्माचा उपयोग समाजाला या ना त्या प्रकारे होत आला आहे, हे नाकारणार नाहीत. धर्म हा विषय प्रचंड गुंतागुंतीचा व अनेक शतकांपासून चर्चिला जात असलेला आहे. त्यामुळे या सर्वच मान्यवरांची काही बाबतीत सहमती व काही बाबतीत असहमती असणे साहजिक होते. अंकातील मांडणी सम्यक-सकारात्मक होण्याच्या दृष्टीने ते आवश्यक वाटले. अर्थात्‌, त्यासाठी  12 ही संख्या कमी आहे, पण विशेषांकासाठी पानांची मर्यादा घालावी लागते, त्यामुळे नाईलाज होता.

वरील पत्र पाठवल्यानंतर लेख लिहिण्यासाठी आठ-दहा दिवस इतका अल्प कालावधी त्यांना दिला होता. (हे खूप आधी करता आले असते, पण साप्ताहिकाचा ताण असा असतो की, सतत काही ना काही चालू असते.) मात्र दोन-तीन मान्यवरांना काही ना काही अडचणी आल्या, म्हणून ते लिहू शकले नाहीत. शिवाय, ज्यांनी लिहिले त्यातील बहुतेकांचे असे म्हणणे पडले की, ‘आधी हा विषय सहज-सोपा वाटत होता, प्रत्यक्ष लिहायला बसल्यावर ते कागदावर उतरवता येणे अवघड होत गेले.’ याचे एक कारण ‘धर्म’ या विषयाला अनेक बाजू आहेत हे तर आहेच, पण निवडलेल्यांपैकी कोणीही अगदीच टोकाची व एकारलेली मांडणी करणारे नव्हते. त्यामुळे उपलब्ध वेळेत जे नऊ लेख येऊ शकले त्यात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन या तिन्ही धर्माचे प्रतिनिधीत्व आले. जैन व बुद्ध या धर्माचे प्रतिनिधीत्व करणारे किमान एकेक लेख असावेत अशी कल्पना होती, आणि वारकरी संप्रदाय व गांधी-विनोबा यांचा धर्मविचार सांगणारे एकेक लेख असावेत असाही प्रयत्न होता. पण वेळ व अंकाच्या पानांची मर्यादा यामुळे ते बाजूला राहिले.

मात्र इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, या अंकाचा हेतूच मर्यादित आहे. समाजजीवनावर प्रभाव टाकणारे धर्म किंवा त्यांचा प्रचार-प्रसार करणारे धर्मगुरू वा अनुयायी यांच्या वर्तन-व्यवहाराकडे लक्ष वेधले जावे, धर्माचे उपयुक्तता मूल्य अधोरेखित व्हावे आणि धर्माचे उपद्रवमूल्यही ठळकपणे नोंदवले जावे, असा हा हेतू होता. आणि या नऊ लेखांमधून तो हेतू चांगल्या प्रकारे साध्य झाला आहे असे दिसते. आणखी तीन-चार लेख आणि जैन व बुद्ध धर्म यांचा समावेश झाला असता तर अंकाचे वजन वाढले असते हे खरे, पण वेगळ्या शब्दांत सांगायचे तर 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवली असली तरी उत्तरे चांगली लिहिली असा काहीसा हा प्रकार आहे.

आज जगाची लोकसंख्या सातशे कोटी आहे, लहान-मोठे असे जवळपास दोनशे देश आहेत आणि प्रमुख किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या धर्मांची संख्या जरी दोन डझनच्या दरम्यान असली तरी, जगातील एकूण लहान-लहान धर्मांची संख्या दहा हजार असावी असेही सांगितले जाते. आताचे सर्व प्रमुख धर्म काही शतंकापूर्वी जन्माला आले आहेत, मध्ययुगीन कालखंडात उदयाला आलेले बरेच आहेत. हा एकूण पसारा पाहता धर्मचर्चा हे प्रचंड व्यामिश्र व गुंतागुंतीचे प्रकरण आहे.

सामान्यत: साधना साप्ताहिकातून धर्मचर्चा घडवली जात नाही, कारण भारत हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आणि आधुनिक मूल्यांच्या निकषांवर उभारण्याचा संकल्प या देशाचे संविधान अस्तित्वात आले तेव्हाच केला गेला आहे. मात्र तो संकल्प सिद्धीस जाण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा धर्माच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या रूढी, परंपरा, नियम, फतवे आणि कर्मकांडे यांद्वारे होणारे शोषण हाच आहे. त्यातून निर्माण होणारी विषमता व वैरभाव कमालीची त्रासदायक आहे. म्हणून अधूनमधून अशी चर्चा अपरिहार्य होऊन बसते.

डॉ. नरेंद्र दाभोलकर अखेरच्या काळात म्हणायचे की, ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावर दीड तासांचे भाषण त्यांना डिझाइन करायचे आणि महाराष्ट्रातील शंभर गावांमध्ये एका वर्षभरात द्यायचे आहे. शिवाय, धर्मचिकित्सा का व कशी करायची या विषयावर त्यांना एक पुस्तकही लिहायचे होते. ते दोन्ही संकल्प राहून गेले, कारण धर्मांध शक्तींनीच त्यांची हत्या घडवली. त्यामुळे हा अंक प्रकाशित करताना आनंदाची नाही तर एक प्रकारच्या खिन्नतेची भावना मनात आहे!

साधनाचा पुढील अंक

4 सप्टेंबर : प्रा. ग. प्र. प्रधान स्मृती विशेषांक
विषय : ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Akanksha kamble- 28 Aug 2021

    I would like to read article on Buddhism and Jain religion. I hope next time .

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके