डिजिटल अर्काईव्ह

या निवडणुकांनी काय सांगितले?

या पराभवामुळे राजकीय शक्तींची फाटाफूट होण्याचा असा संभव आहे. तसाच प्राप्त झालेल्या नैराश्याच्या आहारी जाऊन इंदिराजी एकादे वेळी अतिसाहस करण्यासही उद्युक्त होण्याचा संभव आहे. या शक्यतेचाही विचार विरोधी नेत्यांना आणि जनतेला करावा लागेल. राष्ट्रापुढील या येऊ घातलेल्या संकटाचा विचार तातडीने आणि गंभीरपणे करण्याची बुद्धी आमच्या विरोधी नेत्यांना होवो, अशीच इच्छा कोणताही सच्चा राष्ट्रभक्त करील.

दोन आठवड्यांपूर्वी 'साधना'मध्ये 'चोराच्या उलट्या बोंबा' हे संपादकीय प्रसिद्ध झाले, तेव्हा त्रिपुरा, आसाम, कर्नाटक या-प्रांतातील निवडणुकांचा प्रचार धूमधडाक्याने सुरु होता. त्या प्रचारा-मध्ये आमच्या पंतप्रधान इंदिराजी ज्या उत्साहाने भाग घेत होत्या, तो त्यांचा उत्साह ऐन पंचविशीतील तरुणालाही लाजवील बसा होता. त्याबद्दल त्यांचे कौतुकच करावयास हवे. परंतु त्यांच्या प्रचारातला कौतुकाचा भाग एवढाच होता; कारण त्यांच्या प्रचाराचा आशय अत्यंत अप्रशस्त, विरोधी पक्षांवर निष्कारण दोषारोप करणारा, इतकेच नाही तर भारतीय राजकारणात ज्या दुष्प्रवृत्ती आज त्यांच्यामुळे आणि त्यांच्या पक्षामुळेच बोकाळल्या आहेत, त्यांनाही विरोधी पक्षच जबाबदार आहेत असे आग्रहपूर्वक सांगणारा होता. म्हणूनच त्यांच्या प्रचारातील हा फसवेपणा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला 'चोराच्या उलट्या बोंबा' हे संपादकीय कडक शब्दांत लिहावे लागले. आपण मतदाराची दिशाभूल करण्यासाठी जो अपप्रचार करीत आहोत, त्यातला फोलपणा काही लोकांच्या जरी पक्षात आला, तरी सर्वसामान्य मतदारांना त्यातली गोम लक्षात येणार नाही, अशी इंदिराजींची ठाम समजूत असावी असे दिसते. हा निराधार अहंकार त्यांच्या मनात निर्माण होण्याला आपले व परदेशातले अनेक पत्रकार कारण झाले आहेत. इंदिराजींचे बोलणे चालणे, डावपेच, त्यांची कर्तबगारी आणि या सर्वांहून अधिक म्हणजे लोकमानसावरील त्यांचा विलक्षण प्रभाव यांचे इतके अतिरिक्त वर्णन त्यांनी सतत चालू ठेवले होते की त्यापुढे एकाद्या देवभक्ताने आपल्या उपास्य देवतेचे चालविलेले संकीर्तनही फिके पडावे. काही दिव्य दृष्टीच्या लोकांना तर त्यांच्या मुखाभोवती सर्वसामान्यांना न दिसणारे तेजोमंडलही दिसू लागले होते. चित्रकार हुसेनसारख्यांनी तर त्यांचे व्यापारूढ 'दुर्गादेवी' म्हणून चित्रही चितारले होते अशी भीती निर्माण झाली होती की या लोकसत्ताक देशात नेहरू घराण्याचा नवा राजवंशच तयार होतो की काय? अशी चौफेर स्तुती होऊ लागल्यावर माणसाचे डोके न फिरेल तरच नवल! त्यामुळे इंदिराबाईंनी मनाची पक्की खात्री करून घेतली होती की काही तरी देवतांश आपणांमध्ये असावा! तिरुपती आणि त्रिपुरसुंदरी आपल्याला त्यांची धाकटी बहीण मानीत असाव्या आणि आपण जेजे करू, त्यापाठीमागे त्यांचा वरदहस्त असावा. एवढी साधनसंपत्ती हाताशी असल्यामुळे त्रिपुरा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील निवडणुका म्हणजे आपल्या हाताचा केवळ मळ आहे, त्या पापण सहजजिक असा त्यांनी साहजिकच अंदाज बांधला. त्यात त्यांचे काय चुकले? परंतु निवडणुकांचे निकाल जे जाहीर झाले आहेत, त्यामुळे इंदिराजींच्या आशीर्वादाने आपणच निर्माण केलेली भ्रष्टाचाराची वैतरणी आपण सहज तरून जाऊ अशी आशा धरून बसलेले ई. कॉ. चे उमेदवार, पुरेसे पैसे पेरले की मते उगवतात असे मानणारे त्यांचे एजंट; इंदिराजींची काँग्रेस निवडणुका हरू शकेल असे स्वप्नातही न मान घजणारे त्यांचे वृत्तपत्रीय भाट, इतकेच नव्हे तर खुद्द इंदिराजी या सर्वांनाच मतदारांनी धोबीपछाड करून अस्मान दाखविले आहे. सर्व- सामान्य मतदार या निवडणुकीत इतक्या शांतपणे पण एवढ्या अचाट ताकदीने उतरेल अशी कल्पना आम्हीही केली नव्हती, हे मान्य करावयास हवे. गेली दोन-अडीचवर्षे ज्यांना आपण स्वत:च्या हाताने राज्याच्या आणि केंद्राच्या सिंहासनावर नेऊन बसविले, त्यांच्या चाळ्याकडे जनता शांतपणाने पण बारीक नजरेने पहात राहिली होती. ती इतकी शांत भासत होती की जणू काही लोकशाहीने प्राप्त झालेला आपला सार्वभौम अधिकारच ती विसरून गेली आहे व ती असहाय, लाचार बनली आहे असे वरकरणी बघणाराला वाढावे. नेमके असेच चित्र 1977 च्या आणीबाणीनंतरच्या काळात दिसत होते. परंतु त्यावेळच्या निवडणुकांनी जे दाखवून दिले, त्याचाच साक्षात्कार या तीन निवडणुकांमुळे पुनश्च पडला आहे. ज्यांना आपण निवडून दिले, ते राज्यकर्ते नसून स्वार्थपिपासू, अधिकारापिपासू असून सर्वसामान्यांसाठी उद्दाम आणि वरिष्ठांसमोर लाचार; नीतिशून्यच नव्हे तर अनीतीचा पुरस्कार करणारे, जनद्रोही बसून आपमतलबापलीकडे त्यांना काही दिसत नाही, समजत नाही हे जनतेच्या लक्षात आले. तेव्हाच तिने निश्चय केला असाशा की निवडणुकीची पटिका माली की आपले सामर्थ्य प्रकट करावे. अशीही खूणगाठ तिने बांधली असावी की राजकारण्यांची ही भुतावळ आणि त्यांचे संचलन करणाऱ्या इंदिराजी यांच्यात खरोखर भेद नाही. त्यांनी ज्याला आपलासा म्हटले, तो कितीही पतित असो, भ्रष्टाचारी असो, कारस्थानी असो, अगदी अंगावर बेतेपर्यंत त्याला दूर करावयाचे नाही. रघुवंशातील राजांचे वर्णन करताना कालिदासाने असे म्हटले आहे की नौतीची बुज ते इतकी राखीत असत की सापाने दंश केलेली करंगळी जरी आपल्याच हाताची असली तरी शहाणा मनुष्य ती जशी छाटून टाकतो, त्याप्रमाणे भ्रष्ट झालेली व्यक्ती जरी स्वकीयांपैकी असली, तरी तिला ते छाटून टाकीत! या मूल्यकठोर वर्तनाशी इंदिराजींच्या वर्तनाची तुलना केली आणि आमदार अंतुल्यापासून तो बिहारचे मुख्यमंत्री श्री. जगन्नाथ मिश्रा-पर्यंतच्या व्यक्तीबाबतचे इंदिराजींचे वर्तन पाहिले, म्हणजे अस्सल भारतीय संस्कृतीपासून त्या किती दूर गेल्या आहेत आणि त्यांचे देवदेवतार्चन किती कोंगी आहे, ते सहजच लक्षात येईल. मतदारांच्याही ते लक्षात आले. असावे आणि म्हणूनच यावेळी त्रिपुरसुंदरीचे दर्शन घेऊन देखील आणि तिरुपतीच्या काकडआरतीला हजर राहनही त्यांची सर्व जागिरी निष्फळ ठरली.

या निवडणुकीसंबंधी लिहिताना इंदिराजींची शक्य तेवढी भलावण करीत राहणाऱ्या मुंबईच्या ' टाईम्स् 'कारांनादेखील असा शेरा मारावा लागला आहे की: 'सब चलता हैच्या या धोरणामुळे इंदिरा काँग्रेसचे खरे स्वरूप उघड झाले. गत्याही निष्ठेची अथवा आचारसी बांधिलकी न मानणारे, राष्ट्राचे काही होवो आपल्या तुंबड्या भरल्याशी कारण असे वागणाऱ्या टोळक्याचे स्वरूप काँग्रेसला प्राप्त झाले. अशा पक्षामध्ये जेव्हा नेता निर्णय घेण्याची टाळाटाळ करतो, तेव्हा तत्वशून्य मतभेदांनी पक्षामध्ये जोर करावा, हे ओघानेच येते. महाराष्ट्रातल्या काही तथाकथित 'निष्ठावंत सैनिका 'नी अशा त-हेचे बंड इंदिरा काँग्रेसमध्ये आध आणि मद्रासमध्ये खरोखरी-मारलेही. खरोखरी आपल्या नेत्याच्या पाठीमध्ये सुरी खुपसण्यासारखेच होते पण त्याकडे दुर्लक्ष करणयालेरीज नेतृत्वही काही करू शकले नाही. 'सब चलता है' धोरणास मिळालेली ही बक्षिसोच होय!'

टाईम्स्कारांची ही टीका बोचक वाटली तरी बोलको बाहे. त्यांनी असेही म्हटले आहे की 1980-81 साली काही अपेक्षा बाळगून जनतेने ज्या उमेदीने इंदिरा काँग्रेसला सिंहासनावर बसविले, त्या सर्व उमेदी जळून खाक झाल्या आहेत.' इंदिरा कांग्रेससारखा एक कमालीचा सत्तालोलुप, स्वार्थाध आणि एकचालकानुवर्ती पक्ष त्रिपुरा, आंध्र, कर्नाटक या राज्यांतून जसा निकालात निघाला बाहे. तसाच तो इतर राज्यांतूनही निघाला तरी आम्हाला अश्रु गाळण्याचे कारण नाही. किंबहुना सर्व राज्यातूनच त्याचे चाटन झाले, तर बरे होईल. पण आमच्या या प्रतिक्रियेचे कारण इंदिरा काँग्रेसबद्दल आम्हाला वाटणारा आंध्द्वेष नव्हे; उलट आमच्या मनातली खरी इच्छा तर अशी आहे की इंदिरा काँग्रेससारखा देशव्यापी आणि समर्थ असा एकच नव्हे तर दोन पक्ष या देशात हवेत. मात्र ते मूल्यांची निष्ठा राखणारे आणि कार्यक्रमाशी इमान ठेवणारे हवे. असा एकही पक्ष हिंदुस्थानात जर राहिण नाही. तर या देशाचे भवितव्य कठीण आहे असे आम्हास वाटते. देशात जर एकही देशव्यापी पक्ष उरला नाही आणि सगळीकडे जर बारमाईच माजले, तर राजा राममोहन रॉवपासून सुभाषचंद्र बोसांपर्यंत हा विस्कळित देश एका राष्ट्राच्या गाठोदयात बांधण्याचे महान यत्न आपल्या प्राणांची बाजी लावून ज्यांनी केले, त्यांच्या प्रयत्नाचा चुराडा होणार असून जर या देशाचे पुनः प्रांतवार विभाजन झाले, तर ते तुकडे पुन: जोडून त्यांचा एक सलग सणंग बनविणे महादुष्कर कार्य होऊन बसणार आहे. इंदिराजींनी सर्व सत्ता अतिकेंद्रित करण्याची जी कारस्थाने केली, त्यामुळे तेलुगु देसम् आणि द्रवोड मुन्नेत्र कळघम सारख्या प्रांतवादाला बळ प्राप्त झाले, यात शंका नाही. पण हा प्रांतवाद जर देशभर सर्वत्र पसरला, जर तो मर्यादेबाहेर वाढला, तर तो राष्ट्रवादालाही घातक ठरू शकेल ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही.

म्हणूनच या निवडणुकींचा फार दूरगामी परिणाम होईल असे आम्हाला वाटते. या निवडणुकांमुळे इंदिराजींमध्ये काही दैवी सामर्थ्य आहे या विश्वासाला झपाट्याने गळती लागेल आणि त्यांच्यातील फुटीरांना अधिक बळ प्राप्त होऊन देशामध्ये एकप्रकारचे निर्णायकीचे वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आजपासून 1985 च्या काळापर्यंतचा म्हणजे पुढील 2 -3 वर्षांचा काळ हा संधिप्रकाशाचा काळ राहण्याचा संभव दिसतो. अशावेळी स्वार्थावाचून दुसरे कोणतेच मूल्प न मानणारी बाजारवणगी मंडळी केव्हा कोणत्या गटात जाऊन सामील होतील, हे सांगता येणार नाही. अनिश्चितता व अस्थिरतेच्या या कालावधीत वर्गसंवर्ष आणि वर्ण संघर्षाला ऊन येण्याचा संभव आहे. पुंडगुंड या अराजकाचा पुरेपूर फायदा उठविण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी लोकशाहीवर दृढ श्रद्धा असणारे, मूल्यांची कदर करणारे आणि गेल्या 100-150 वर्षातील आमच्या राष्ट्र नेत्यांनी जी घटनेची चौकट उभारुन दिली, तिच्यात प्राण ओतणे हे आपले कर्तव्य आहे असे मानणारे जे पक्ष आहेत, त्यांनी काळकाढूपणाचा खेळ थांबवून राष्ट्राच्या भवितव्याच्या विचारास तत्काळ लागले पाहिजे. इंदिरा काँग्रेसचा जो पराभव झाला, त्याच्या आनंदात मश्गूल राहून भागणार नाही. कारण पराभवाचा तो आनंद क्षणिक असून या पराभवामुळे भावी घटनांची जी सूचना मिळत आहे. ती अत्यंत अस्वस्थ करणारी व भयावह आहे. या पराभवामुळे राजकीय शक्तींची फाटाफूट होण्याचा असा संभव आहे. तसाच प्राप्त झालेल्या नैराश्याच्या आहारी जाऊन इंदिराजी एकादे वेळी अतिसाहस करण्यासही उद्युक्त होण्याचा संभव आहे. या शक्यतेचाही विचार विरोधी नेत्यांना आणि जनतेला करावा लागेल. राष्ट्रापुढील या येऊ घातलेल्या संकटाचा विचार तातडीने आणि गंभीरपणे करण्याची बुद्धी आमच्या विरोधी नेत्यांना होवो, अशीच इच्छा कोणताही सच्चा राष्ट्रभक्त करील.

Tags: मतदान लोकशाही इंदिरा गांधी कोन्ग्रेस बिहार निवडणूक संपादकीय Editorial Voting Democracy Communists Indira Gandhi Bihar Election Elections #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी