डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

टिकेकरांनी शिवसेनाप्रमुखांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘एका करिश्म्याची पंचाहत्तरी’ हा हृदयद्रावक लेख लिहिला,   तेव्हा वैचारिक विरोध किती स्वच्छ आणि स्पष्ट असू शकतो याचे अप्रतिम उदाहरण पाहायला मिळाले, महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्राशीच त्याची तुलना करता येईल, पण त्यानंतरही त्यांनी शिवसेनेबाबत सौम्य धोरण पत्करले नाही. शिवसेनेच्या इतिहासावरील पुस्तकाला प्रस्तावना मागितल्यावर केतकरांनी आपल्या विचारांशी व शैलीशी जराही तडजोड न करता ती लिहिली आणि ती त्या पुस्तकात छापली गेली नाही म्हणून (तसा इंट्रो टाकून) बेधडकपणे ‘लोकसत्ता’त छापून टाकली.

गेल्या आठवड्यात, महाराष्ट्र सरकारच्या वतीने पत्रकारितेसाठी दिला जाणारा एक लाख रुपयांचा लो. टिळक जीवनगौरव पुरस्कार कुमार केतकर यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते, राज्य सरकारच्या मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या आठवड्यात, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने साहित्यासाठी दिला जाणारा दोन लाख रुपयांचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण टिकेकर यांना जाहीर झाला आहे; येत्या 26 जानेवारीला हा पुरस्कार पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या समारंभात ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

टिकेकर आणि केतकर आता अनुक्रमे 66 आणि 64 वर्षांचे आहेत. केतकरांना जीवनगौरव पुरस्कार देताना निवड समितीने त्यांची चाळीस वर्षांची ‘पत्रकार-संपादक’ ही कारकीर्द ध्यानात घेतली आहे; तर टिकेकरांना पुरस्कार देताना निवड समितीने त्यांची तीस वर्षांची ‘अभ्यासक’ व ‘संपादक’ ही कामगिरी ध्यानात घेतली आहे. दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा, कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणे आणि त्यांचे यथायोग्य मूल्यमापन करणे हा दोन स्वतंत्र पुस्तकांचा(!) विषय आहे. अर्थात, हे काम त्यांच्या आयुष्याची वाटचाल जवळून पाहणाऱ्या पण चिकित्सक व विश्लेषक बुद्धी आणि सम्यक व सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींनाच करता येईल. मात्र दोघांनाही मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कारांच्या निमित्ताने, त्यांच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकून त्यांच्यातील ‘उल्लेखनीय व अनुकरणीय’ काय आहे याचा शोध घेण्याचे काम राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक क्षेत्रांतील बदलांकडे आस्थापूर्वक व अभ्यासपूर्वक पाहू शकणाऱ्या कोणालाही करता येईल.

टिकेकरांनी पाच वर्षे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर, त्यापुढील जवळपास दीड दशक ‘द टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई’ आणि ‘अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, नवी दिल्ली’ येथे संदर्भविभागात व संशोधनात घालवली; त्यानंतर दीड दशक मराठी वृत्तपत्रांत संपादक म्हणून काम केले आणि गेल्या पाच वर्षांपासून, दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘एशियाटिक सोसायटी’चे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील ‘अभ्यासक-संशोधक’ या पूर्वार्धात, चार्ल्स व डेनीस या किंकेड (आय.सी.एस.) पितापुत्रांवर पीएच.डी. केली, नंतर त्यांना मुंबई विद्यापीठाचा सव्वाशे वर्षांचा इतिहास (Cloisters Pale : A Biography of Bombay University) लिहिण्याचा मान मिळाला. त्यानंतर त्यांनी स्थानीय इतिहास व सांस्कृतिक इतिहास हे आपल्या अभ्यासाचे व संशोधनाचे विषय बनवले; या अभ्यासावर आधारित असलेली त्यांची ‘जन-मन’ आणि ‘स्थल-काल’ ही दोन पुस्तके मराठी भाषेतील एकमेवाद्वितीय आहेत.

केतकरांनी दोन दशकांहून अधिक काळ द टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स इ. इंग्लिश वृत्तपत्रांत पत्रकार-संपादक म्हणून काम केले आणि गेल्या दीड दशकांपासून मराठी वृत्तपत्रांत संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील ‘इंग्लिश पत्रकारिता’ या पूर्वार्धात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील ऐतिहासिक ठरलेल्या अनेक घटनांचे वार्तांकन विशेष प्रतिनिधी या नात्याने केले. त्यामुळे जागतिक स्तरावरील वेगवान बदल त्यांना पाहता आले, अभ्यासता आले, टिपता आले. त्यातून प्राप्त झालेल्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब त्यांच्या ‘बदलते विश्व’ आणि ‘त्रिकालवेध’ (आगामी) या मराठी भाषेतील अद्वितीय पुस्तकांत पाहावयास मिळते.

टिकेकर आणि केतकर यांची वाटचाल अगदी वेगळ्या पद्धतीने झाली, त्या दोघांच्या विचारांत, कार्यशैलीत व दृष्टिकोनांतही प्रचंड फरक आहे. पण दोघांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील पंधरा वर्षांची वाटचाल एका अर्थाने ‘समांतर’ होती, मराठी पत्रकारितेच्या उत्कर्षासाठी उपकारक होती. टिकेकरांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहसंपादक, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाचे समूह संपादक आणि ‘सकाळ’  वृत्तपत्रसमूहाचे संपादक संचालक म्हणून एकूण चार-पाच वर्षे काम केले असले तरी, त्यांचा ‘लोकसत्ता’ दैनिकाचे संपादक हा अकरा वर्षांचा काळ खऱ्या अर्थाने दैदीप्यमान होता. केतकरांचा ‘लोकमत’चे मुख्य संपादक म्हणून जेमतेम वर्षभराचा कालखंड होता, मात्र ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहा वर्षे आणि ‘लोकसत्ता’चे आठ वर्षे संपादक हा त्यांच्या बहराचा आणि भरभराटीचा काळ राहिला. म्हणजे 1990 ते 2005 ही पंधरा वर्षे टिकेकरांची कारकीर्द आणि 1995 ते 2010 ही पंधरा वर्षे केतकरांची कारकीर्द नीट न्याहाळली तर, 1990 ते 2010 या वीस वर्षांच्या कालखंडाला ‘मराठी पत्रकारितेतील टिकेकर-केतकर पर्व’ असे म्हणता येईल.

टिकेकर-केतकर पर्वाची तुलना तळवलकर-गडकरी पर्वाशी करता येईल आणि आगरकर-टिळक या पर्वाशीही त्याचे नाते सांगता येईल. अर्थातच, अशी ‘तुलना’ करता येणे आणि ‘नाते’ सांगता येणे हा या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी दोन स्वतंत्र लेखांचा विषय आहे, पण टिकेकर-केतकर पर्वाच्या काळात मराठी वृत्तपत्रे बारकाईने वाचत असणाऱ्या कोणालाही काही क्षणचित्रे नोंदवता येतील. एकोणिसावे शतक हा टिकेकरांच्या अभ्यासाचा गाभा राहिला आहे, न्या. रानडे आणि गोपाळराव आगरकर हे त्यांचे आदर्श आहेत. रानडेंना त्यांची धार्मिकता आणि आगरकरांना त्यांची तर्ककठोरता वगळून टिकेकर स्वीकारतात. अभ्यासक-संशोधक म्हणून टिकेकर बोलतात-लिहितात तेव्हा त्यांच्यावर रानडे आरूढ झालेले असतात आणि वृत्तपत्रातील अग्रलेख लिहितात तेव्हा त्यांच्यात आगरकर संचारलेले असतात. संपादक म्हणून काम करताना त्यांनी आगरकरांचे ‘महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र’ सतत समोर ठेवले होते. सौम्य पण नेमके शब्द व शेलकी विशेषणे वापरून कठोर टिका करता येते हे त्यांनी दाखवून दिले. नि:पक्ष आणि उदारमतवादी हे त्यांचे संपादकीय धोरण राहिले आहे, स्लाइटली लेफ्ट टू द सेंटर ही त्यांची भूमिका राहिली आहे.

उदारमतवादाचा पुरस्कार करणारा लोकशाही समाजवाद ही एकविसाव्या शतकासाठी योग्य विचारप्रणाली आहे हे त्यांनी ‘सूचित’ केले आहे. ‘इतक्या चळवळी करूनही समाजवादी अल्पसंख्य का राहिले?’ या शीर्षकाचे धारदार ‘तारतम्य’ त्यांनी लिहिले तेव्हा समाजवाद्यांचा रोष ओढवून घेतला होता. सामाजिक व सांस्कृतिक बदलांकडे त्यांनी आपल्या लेखनातून अधिक लक्ष वेधले आहे. ‘राजकीय क्रांती होऊ शकते, सामाजिक क्रांती होऊ शकत नाही’ हे ठाम प्रतिपादन त्यांनी पुन्हा पुन्हा केले आहे. ‘या देशातील लोकशाही भांडवलदारी वृत्तपत्रांनीच टिकवली आहे’ हे स्फोटक वाटणारे विधान त्यांनी जाहीर व्यासपीठांवरून अतिशय जबाबदारीने मांडले आहे. संपादक-पत्रकारांना स्वत:ची अशी एक आचारसंहिता असली पाहिजे, भारतासारख्या बहुभाषिक-बहुसांस्कृतिक देशात सेन्सॉर बोर्ड अपरिहार्य आहेत, राज्याला सांस्कृतिक धोरण असले पाहिजे, राजकीय पक्षांत ‘नेतृत्वाचे प्रशिक्षण’ सातत्याने चालू राहिले पाहिजे, या आग्रही मतांची मांडणी त्यांनी सातत्याने केली आहे. टिकेकरांचे लोकसत्तामधील ‘तारतम्य’ हे साडेपाच वर्षे चाललेले सदर त्यांची विचारप्रक्रिया चालते तरी कशी हे दाखवते, तर ‘कालमीमांसा’ व ‘सारांश’ ही दोन सदरे (नंतर पुस्तके) त्यांच्या विचारांचा गाभा दाखवतात.

तर विसावे शतक हा केतकरांच्या अभ्यासाचा गाभा राहिला आहे. केतकर डाव्या चळवळीतून पुढे आलेले आहेत, ते स्वत:ला (कम्युनिस्ट नव्हे!) मार्क्सवादी म्हणवतात. बर्टांड रसेल व जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. श्री. अ. डांगे यांची लाईन कम्युनिस्टांनी स्वीकारली असती तर कम्युनिस्टांची इतकी वाताहत झाली नसती, असा रोख त्यांच्या विवेचनात सातत्याने असतो.

नंतरच्या काळात काँग्रेसच्या मध्यममार्गाचे आणि त्यातही नेहरू-गांधी घराण्याचे ते समर्थक राहिले आहेत. भांडवलशाही, साम्राज्यवाद या शब्दांची पेरणी आणि त्यातील बदलांविषयीचे विवेचन सातत्याने त्यांच्या भाषणात असते. इंदिरा गांधी, आणीबाणी यांचे जोरदार समर्थन करून ते समाजवाद्यांना सतत डिवचत असतात, कम्युनिस्टांना त्यांच्या ठोकळेबाजपणाची सतत आठवण करून देत असतात. पण तरीही कम्युनिस्ट व समाजवादी यांच्याशी त्यांचे नाते ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ या प्रकारचे राहिले आहे. हिंदुत्ववाद्यांवर तर ते अनेक वेळा अगदी ठरवून निर्दयी हल्ला करतात. त्यांच्या लेखनातील व भाषणातील शैली इतकी प्रवाही व धारदार असते की शत्रूपक्षाला ते आपल्या युक्तिवादांनी चितपट करण्याच्या पावित्र्यात असतात.

व्यक्ती असो वा वृत्तपत्र त्याला पक्षपाती असावेच लागते, त्यात गैर काहीच नाही असे ते मानतात. त्यांची भाषा साधी सोपी व उपरोधाची असली तरी काही वेळा इतकी जहरी असते की प्रतिपक्षाला जखमी करते. कोणत्याही प्रश्नाकडे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून पाहण्याची सवय त्यांचे लेखन सातत्याने वाचणाऱ्याला लागू शकते. त्यांच्या ‘बदलते विश्व’ या पुस्तकात (या पुस्तकाला गेल्या वर्षी महाराष्ट्र फाऊंडेशनचा ‘वैचारिक ग्रंथ’ पुरस्कार मिळाला आहे.) त्यांच्या विचारांचा गाभा दिसतो. या सर्वांचा विचार केला तर केतकरांमध्ये लोकमान्य टिळकांमधील पत्रकार सतत संचार करीत असतो असेच म्हणावे लागेल.

टिकेकर-केतकर पर्व वीस वर्षांचे मानले तरी दोघेही एकाच वेळी संपादक म्हणून कार्यरत होते असा कालखंड 1995 ते 2005 हा दहा वर्षांचाच आहे. याच दशकात महाराष्ट्रात सेना-भाजप युतीचे आणि केंद्रात भाजप आघाडीचे सरकार होते, त्यामुळे स्वाभाविकच राजकीय बाबतीत दोघांनीही भाजप-शिवसेनेवर कठोर प्रहार केले. त्यामुळेच तर ‘सामना’ दैनिकातून या दोन संपादकांवर असभ्य व शिवराळ भाषेत टीका केली गेली. शिवसेनाप्रमुखांना तर हे दोघे संताजी-धनाजी वाटतात की काय अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. अखेरीस ‘मार्मिक’ साप्ताहिकातून ‘अरुणकुमार टिकेतकर’ (दोघांच्या नावांचा संयोग) या टोपणनावाने टिकेकर व केतकर यांच्याच शैलीने-पद्धतीने त्यांचा समाचार घेणारे सदर चालवले गेले (ते मात्र ‘वाचनीय’ असायचे).

टिकेकरांनी शिवसेनाप्रमुखांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘एका करिश्म्याची पंचाहत्तरी’ हा हृदयद्रावक लेख लिहिला,   तेव्हा वैचारिक विरोध किती स्वच्छ आणि स्पष्ट असू शकतो याचे अप्रतिम उदाहरण पाहायला मिळाले, महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्राशीच त्याची तुलना करता येईल, पण त्यानंतरही त्यांनी शिवसेनेबाबत सौम्य धोरण पत्करले नाही. शिवसेनेच्या इतिहासावरील पुस्तकाला प्रस्तावना मागितल्यावर केतकरांनी आपल्या विचारांशी व शैलीशी जराही तडजोड न करता ती लिहिली आणि ती त्या पुस्तकात छापली गेली नाही म्हणून (तसा इंट्रो टाकून) बेधडकपणे ‘लोकसत्ता’त छापून टाकली.

धमक्या आणि दबाव तर दोघांनाही येत राहिले. ‘या मुंबईची मालकी आहे तरी कोणाकडे?’ हे तारतम्य टिकेकरांनी लिहिले तेव्हा थेट ‘सामना’ कार्यालयातून आलेले धमकीचे फोन, त्यानंतर लोकसत्ता-सामना यांच्या अग्रलेखांतून इतकी खडाजंगी झाली की शिवसेनेच्याच मनोहर जोशी सरकारकडून बराच काळ टिकेकरांना पोलीस संरक्षण दिले गेले होते. ‘दादात दादा अजितदादा’ या आशयाचे ‘तारतम्य’ आले तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही टिकेकरांना धमक्या देण्यास पुढे सरसावले होते. परभणी येथे ब्राह्मण महाअधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून केतकरांनी तेथील भाषणात त्या अधिवेशनावर व जातीय संघटनांवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि हल्ला ओढवून घेतला, तेव्हा तो शत्रूशी गनिमी काव्याने लढण्यासारखाच प्रकार होता. ‘शिवशाही अवतरली’ या अग्रलेखातून राज्य सरकारवर बोचरी टीका केली तेव्हा राष्ट्रवादीच्या विनायक मेटेंनी केतकरांच्या घरावर हल्ला केला, पण तरीही केतकरांचा आवेश कमी झाला नाही.

टिकेकर आणि केतकर या दोघांवरही काही आक्षेप घेतले गेले. उदा. टिकेकरांची भाषा अधिक विद्वतजड असते, केतकरांच्या भाषेत शेरेबाजी जास्त असते... टिकेकर शरद पवारांवर कमी टीका करतात, केतकर सोनियांचा नको तितका उदो उदो करतात... टिकेकर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकोणिसाव्या शतकात शोधायला जातात, केतकर कोणत्याही समस्येला अमेरिका-रशिया-शीतयुद्ध साम्राज्यवाद-भांडवलशाही यांच्याशी जोडतात... हेही बरोबर आणि तेही चूक नाही असे म्हणणाऱ्या टिकेकरांना काही भूमिका आहे की नाही, केतकरांना एकपक्षीय लोकशाही अपेक्षित आहे काय? इत्यादी... पण या प्रकारच्या आक्षेपांना दोघांनीही महत्त्व दिले नाही, उलट या संदर्भातील आपल्या भूमिका ते अधिक ठासून पुन्हा पुन्हा मांडत राहिले.

टिकेकर एका अर्थाने ‘एकांत’ संपादक होते. Editors are to be read and not to be seen अशी त्यांची धारणा होती, मतलबी समाजघटकांपासून दूर राहिल्याशिवाय संपादकाला नि:पक्ष भूमिका निभावता येत नाही, असे त्यांचे याबाबत स्पष्टीकरण राहिले. केतकर मात्र याच्या अगदी दुसऱ्या टोकाला म्हणजे ‘लोकांत’ किंवा लोकाभिमुख पत्रकारितेचे कट्टर पुरस्कर्ते राहिले. हे दोघे अशा दोन टोकांवर राहिले त्याचे मूळ त्या दोघांच्या आयुष्यातील पूर्वार्धात आहे, ते नीट समजून घेतले तर दोघेही आपापल्या भूमिकांबाबत प्रामाणिक तर होतेच, पण आपापल्या जागेवर बरोबरही होते असेच म्हणावे लागेल.

टिकेकरांनी माधव गडकरींनंतर ‘लोकसत्ता’चे संपादकपद स्वीकारले तेव्हा ‘स्वतंत्र विचार, निर्भय उच्चार, चौफेर संचार’ हे घोषवाक्य घेतले तर टिकेकरांनंतर लोकसत्ताच्या संपादकपदावर केतकर आले, तेव्हा ‘उदारमतवादाचा वारसा, निर्भीड पत्रकारितेचा आरसा’ हे घोषवाक्य त्यांनी निवडले. येथे टिकेकरांनी गडकरींचा ‘चौफेर संचार’ कायम ठेवला तर केतकरांनी टिकेकरांचा ‘उदारमतवादाचा वारसा’ कायम ठेवल्याचे दिसले, त्यामुळे टिकेकर व केतकर यांच्यात फरकाचे मुद्दे अनेक असले तरी साम्यस्थळेही कमी नाहीत.

या दोघांनीही राजकीय, सामाजिक बाबतीत विविध समाजघटकांवर प्रखर टीका केली, अनेक प्रकरणे प्रकाशात आणली पण त्यांच्यावर व्यक्तिगत हेव्यादाव्याचा, भ्रष्टाचाराचा, अनैतिक वर्तनाचा आक्षेप कधीही कोणाकडून घेतला गेला नाही. त्यांच्या भूमिकांविषयी तीव्र मतभेद असणाऱ्यांनीही त्यांच्या हेतूंविषयी शंका उपस्थित केल्याचे कधी आढळले नाही. प्रलोभनाला बळी न पडण्याची ताकद आणि गुणवत्ता व विश्वासार्हता याला कार्यक्षमतेची व निर्भयतेची जोड मिळाली तर नैतिक दरारा निर्माण होतो आणि मग दबाव आणणाऱ्यांचे अर्धे अवसान तिथेच गळून पडते. या दोघांचा संपादक म्हणून दरारा राहिला त्यात या गुणांचा निश्चितच मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांनी एखाद्या विषयाच्या बाजूने वा विरोधात भूमिका घेतली तर त्याचा निश्चितच परिणाम होतो.

टिकेकरांनी मुंबईतील दंगलीच्या वेळी सुधाकरराव नाईक यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सर्वप्रथम मागितला, त्यानंतर त्या मागणीला जोर आला. पहिलीपासून इंग्रजी विषय सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करणारा अग्रलेख पहिल्यांदा टिकेकरांनी लिहिला आणि मग त्या निर्णयाच्या विरोधकांची धार बरीच बोथट झाली. केतकरांच्या अलीकडच्या दोन अग्रलेखांची उदाहरणे या संदर्भात देता येतील. जैतापूर प्रकल्पाचे समर्थन करणारा अग्रलेख त्यांनी लिहिला आणि प्रकल्पविरोधकांची धार कमी झाली, त्यामुळे विनायक सेनच्या बाजूने अग्रलेख लिहिला आणि मग विनायक सेनच्या शिक्षेच्या विरोधात लढणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना बळ मिळाले.

महाराष्ट्रात टिळक-आगरकर पर्व मानले जाते, ते पर्व 1880 ते 1895 असे फक्त पंधरा वर्षांचे होते. पण त्यानंतर टिळक व आगरकर या दोन ‘स्कूल ऑफ थॉट’ तयार झाल्या, मात्र एका स्कूलच्या विद्यार्थ्याला दुसऱ्याचे महत्त्व नाकारता येत नाही. टिकेकर व केतकर यासुद्धा 1990 ते 2010 या काळात ज्यांची वैचारिक जडणघडण झाली अशा अनेक मराठी तरुणांसाठी दोन स्कूल ऑफ थॉट आहेत, पण एका स्कूलच्या विद्यार्थ्याला दुसऱ्याचे महत्त्व नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, टिकेकर-केतकर पर्वाची ओळख करून घेणे आवश्यक आहे, त्यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधोरेखित करणे अत्यावश्यक आहे, हाच त्या दोघांना दिलेल्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारांचा सांगावा आहे!  

Tags: जीवनगौरव पुरस्कार टिकेकर-केतकर पर्व तळवलकर-गडकरी पर्व टिळक-आगरकर पर्व संपादकीय कुमार केतकर अरुण टिकेकर lifetime award editorial tikekar-ketkar era tilak-agarkar era editor kumar ketkar aroon tikekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. SG- 08 Jan 2021

    फार सुंदर तुलनात्मक विवेचन, नवीन पिढी ला ही माहिती असणे आवश्यक आहे.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके