डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

21 व्या शतकात जाताना स्त्री-मुक्ती

स्त्री-प्रश्नाची पिछेहाट शाहबानो, रूपकुंवर, दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या घटणे अशांसारख्या गोष्टींमधून दिसते आहे. एकीकडे महिला पुनरुज्जीवनवादी शक्तीकडे खेचल्या जात आहेत, तर दुसरीकडे स्त्रियांमधील जागृती वाढताना दिसते आहे. स्त्रीवादी चळवळीच्या संदर्भात दलित/मुस्लीम अल्पसंख्याक स्त्रियांनी प्रश्न उपस्थित करणे, स्वतःची व्यासपीठे स्थापन करणे, नवीन वैचारिक मांडणीचा प्रयत्न करणे हेही एक आशादायक चित्र दिसते आहे.

2001 हे नववर्ष स्त्री चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. या वर्षी जागतिक स्तरावरील स्वायत्त स्त्री-चळवळीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळातील स्त्री-चळवळीच्या उतार-चढावांचे अवलोकन करणे हाही या अंकाचा एक उद्देश आहे. एकीकडे जग एकविसाव्या शतकात प्रवेश करत आहे. दुसरीकडे जगभर स्त्रियांमधली निरक्षरता, गरिबी, दुय्यमत्व अजूनही कायम असल्याचे चित्र जागतिक महिला परिषदांमधून समोर येत आहे. विज्ञान-तंत्रज्ञान पुढे चालले आहे. त्याचा वापर स्त्रीविरोधी होतो आहे. जगातील महिला समाजातही विषमता आहे.

समस्त महिलांची परिस्थिती एक नाही. मूलतत्त्ववाद डोके वर काढतो आहे. चंगळवादासाठी स्त्री एक वस्तू म्हणून वापरली जाताना दिसते आहे. बाजारू व्यवस्थेमध्ये स्त्री-शरीर हे वस्तू खपवण्याचे एक साधन म्हणून वापरले जाते आहे. जागतिकीकरणाचे चक्र वेगाने फिरते आहे आणि खरे म्हणजे सारी स्त्रीजात या चक्राच्या कळीचे साधन बनू पाहत आहे. स्त्रीच्या सौंदर्याची बेगुमान विक्री होऊ लागली आहे आणि शरीरसौष्ठव हेच व्यक्तिमत्त्व, असा आभासही प्रसाधन-साधनांच्या जाहिरातींमधून निर्माण केला जात आहे. स्त्रीच्या माणूस म्हणून जगण्यावर, तिच्या अस्तित्वावर हे फार मोठे आक्रमण आहे. अगदी खेडेगावातली अर्धपोटी स्त्रीसुद्धा या आक्रमणाची शिकार होत चालली आहे. जगभरच एकीकडे धर्मवाद आणि दुसरीकडे उथळ अर्थवाद आणि चंगळवाद यांच्या कात्रीत सापडलेल्या स्त्रीला खरेखुरे आत्मभान आणून देण्यासाठी स्त्री संस्थांची धडपड सुरू असली तरी ती अपुरी आहे, हे आपल्याला ठायीठायी जाणवते आहे. या सर्व धडपडीमागील विचार, तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्षातील अनुभव यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या अंकात केला आहे.

स्त्री-प्रश्नाची पिछेहाट शाहबानो, रूपकुंवर, दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या घटणे अशांसारख्या गोष्टींमधून दिसते आहे. एकीकडे महिला पुनरुज्जीवनवादी शक्तीकडे खेचल्या जात आहेत, तर दुसरीकडे स्त्रियांमधील जागृती वाढताना दिसते आहे. स्त्रीवादी चळवळीच्या संदर्भात दलित/मुस्लीम अल्पसंख्याक स्त्रियांनी प्रश्न उपस्थित करणे, स्वतःची व्यासपीठे स्थापन करणे, नवीन वैचारिक मांडणीचा प्रयत्न करणे हेही एक आशादायक चित्र दिसते आहे.

जगभरातील अंतिम गटात असलेल्या स्त्रियांमध्ये येणारे आत्मभान ही या शतकाची महत्त्वाची सुरुवात आहे. या स्त्रिया पुरुषसत्तेला जसा सवाल करत आहेत, तसा त्या साम्राज्यवादी, वसाहतवादी सत्तेलाही सवाल करत आहेत. कारण त्यांचे कुटुंब, त्यांची मुलेबाळे यांच्यावर होणारा परिणाम त्यांना दिसतो आहे. रशियात कम्युनिझमचा झालेला पाडाव, भारतात बाबरी मशीद, शाहबानो प्रकरणात लोकशाही समाजवादाचा झालेला पराभव ही सर्व परिस्थिती पाहता नवीन वैचारिक मांडणीची गरज महिला संघटनांमध्ये निर्माण झाली आहे. संसदेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या भारताच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण यांकडे जणू काही पाठ फिरवल्याचे दिसते. भारतातील स्त्रीजीवन आजही किती उपेक्षित आहे याचा हा पुरावाच मानावा लागेल. या सर्व परिस्थितीचे प्रतिबिंब या अंकात प्रकट होणाऱ्या विचारांमध्ये दिसेल आणि विचारांना तसेच सक्रियतेला चालना देईल, अशी आशा वाटते. या अंकाच्या निर्मितीसाठी लेखकांचे सहकार्य आवर्जून मिळालेच; परंतु इतर अनेकांचाही महत्त्वाचा हातभार लागला, त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

- रझिया पटेल, नंदिनी आत्मसिद्ध
 

Tags: स्त्री-मुक्ती feminism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके