डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चिंताजनक आणि स्वागतार्ह!

वैचारिक आदान-प्रदान सतत चालते अशी जी काही क्षेत्रे आहेत, त्यात राजकारण, साहित्य, संस्कृती (चित्रपट, नाटक व अन्य कला), शिक्षण यांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. या सर्व ठिकाणी गांधी व संविधान या दोनही विषयांवर उलट-सुलट चर्चा चालू असते, अधूनमधून त्याला घमासान लढाईचे स्वरूप येते. परंतु काही वेळा अशा येतात की, गांधी व संविधान यांना दृश्यरूपात तितकासा तीव्र विरोध दिसत नाही; तरीही त्या दोन्हीचे समर्थक अधिक हिरीरीने काम करत असतात, जोरदार शक्तिप्रदर्शन करीत असतात. तसे करण्याची गरज त्यांना वाटते याचे कारण, गांधी व संविधान अडचणीत आले म्हणून नाही तर प्राप्त परिस्थितीत लढण्यासाठी तेच दोन आधार वाटतात.

सामाजिक बदलांची आपली अशी एक गती असतेच, पण त्या बदलांना साह्य करणारे आणि विरोध करणारे घटक एकाच वेळी काम करत असतात. ती एकूण प्रक्रिया बहुआयामी व गुंतागुंतीची असते. त्या प्रक्रियेचे काही इष्ट तर काही अनिष्ट परिणाम होतच असतात. परिणामी एकूण समाज, दोन पावले पुढे व एक पाऊल मागे अशा पद्धतीने मार्गक्रमण करीत असतो. तुकड्या-तुकड्यांनी पाहिले तर एकांगी चित्रच दिसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रचंड भयावह किंवा कमालीचे आशावादी असे चित्रही अधूनमधून दिसत असते. परंतु समग्रपणे पाहता येण्याची वृत्ती अंगी बाणवली आणि भूत, वर्तमान, भविष्य अशा काळाच्या संदर्भात त्या समग्रतेचे काही एक विवेचन- विश्लेषण करता आले तर समाजबदल समजून घेण्यासाठी ते जास्त उपयुक्त ठरते.

तर असे समग्रपणे पाहता येण्यासाठी अनेक कसोट्या सांगता येतील, परंतु समाजमनात खदखदणारे विषय कोणते आहेत, चर्चा कशावर चालू आहे, वाद-संवाद कोणामध्ये आणि कशावरून चालू आहेत याचा शोध घेणे ही एक कसोटी असते. या कसोटीवर विचार केला तर असे लक्षात येते की, काही विषय नव्याने चर्चेत, वादात येत असतात. पण काही विषयांवरील चर्चा सतत या ना त्या स्वरूपात चालूच असते. अशा वेळी समाजस्पंदने ओळखणे अधिक कठीण वाटू शकते. परंतु सतत चर्चेत असणाऱ्या विषयांची तीव्रता, घनता किंवा दाहकता यांचे प्रमाण वाढते आहे की कमी होते आहे, हा उपनिकष तिथे लावता येतो. सध्याच्या काळाच्या संदर्भात उदाहरण देऊन सांगायचे तर गांधी आणि संविधान हे असे दोन विषय आहेत, ज्यांच्यावरील चर्चेच्या, वाद-संवादाच्या तीव्रतेची पातळी बरीच जास्त वाढल्याचे दिसते आहे.

वैचारिक आदान-प्रदान सतत चालते अशी जी काही क्षेत्रे आहेत, त्यात राजकारण, साहित्य, संस्कृती (चित्रपट, नाटक व अन्य कला), शिक्षण यांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. या सर्व ठिकाणी गांधी व संविधान या दोनही विषयांवर उलट-सुलट चर्चा चालू असते, अधूनमधून त्याला घमासान लढाईचे स्वरूप येते. परंतु काही वेळा अशा येतात की, गांधी व संविधान यांना दृश्यरूपात तितकासा तीव्र विरोध दिसत नाही; तरीही त्या दोन्हीचे समर्थक अधिक हिरीरीने काम करत असतात, जोरदार शक्तिप्रदर्शन करीत असतात. तसे करण्याची गरज त्यांना वाटते याचे कारण, गांधी व संविधान अडचणीत आले म्हणून नाही तर प्राप्त परिस्थितीत लढण्यासाठी तेच दोन आधार वाटतात.

आजची स्थिती नेमकी अशीच आहे. गांधी व संविधान हेच आपले खरे आधारस्तंभ आहेत, असे देशभरातील अनेकांना वाटत आहे. या दोन स्तंभांना घट्ट धरून ठेवण्याची गरज त्यांना जास्त वाटते, याचा एक अर्थ लोकशाहीचे चारही स्तंभ डळमळीत झाले आहेत अशी भावना त्यांच्या मनात बळावलेली आहे. आणि म्हणूनच कदाचित सर्व स्तरांवरून व सर्व माध्यमांतून अनेक लेख, पुस्तके, कार्यशाळा, भाषणे-व्याख्याने यांचा अक्षरश: मारा केला जात आहे. आदर्शासाठी गांधी आणि वास्तवासाठी संविधान यांना जवळ करा, त्यांना ढाल करा, त्यांनाच शस्त्रही बनवला असा हा प्रकार आहे. हे चित्र स्वागतार्ह आहे आणि चिंताजनकही. अशी वेळ निर्माण झाली हे चिंताजनक, आणि अशा वेळी विचारी जनसमूह गांधी व संविधान यांच्या अधिक जवळ जातो हे स्वागतार्ह!

व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांची स्पंदने कशी ओळखायची हा गुंतागुंतीचा प्रश्न असतो. परंतु स्वतंत्र विचार करणे व तसा विचार करावयास प्रवृत्त करणे हे व्यक्तिमत्त्व असलेल्यांचे प्रधान लक्षण मानले जाते. असे व्यक्तिमत्त्व असलेल्यांचा समूह समांतर म्हणावी अशी अभिव्यक्ती करतो तेव्हा राष्ट्राची स्पंदने ओळखता येतात. कारण व्यक्तींचा नव्हे तर व्यक्तिमत्त्व असलेल्यांचा समूह म्हणजे राष्ट्र असे आधुनिक काळात मानले जाते.   

Tags: संविधान महात्मा गांधी संपादकीय विनोद शिरसाठ vinod shirsath editorial Constitution Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके