डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मलाला आणि सत्यार्थी या दोघांनी शांततेचे नोबेल स्वीकारताना केलेली संपूर्ण भाषणे अनुवाद करून या अंकात घेतली आहेत. पाकिस्तान आणि भारत या दोन देशातील व्यक्तींना पुरस्कार देताना नोबेल समितीने ‘बिटवीन द लाइन्स’ बराच विचार केलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय, जागतिक चर्चा विश्वाच्या / व्यासपीठांच्या अजेंड्यावर आणलेला आहे. या दोघांनी केलेल्या भाषणातील आशय आपल्या परिचयाचा आहे, पण ते ज्या परिप्रेक्ष्यातून या प्रश्नाकडे पाहत आहेत तो मात्र आपल्याकडे नाही अशी खंत कोणाही संवेदनशील वाचकाला वाटणार आहे.

२०१५ या वर्षातला हा पहिला अंक आहे आणि २०१४ च्या २४ डिसेंबरला म्हणजे साने गुरुजींच्या जयंतीदिनी तो छापायला जात आहे. या अंकातील अर्धी पाने, साने गुरुजींना सर्वाधिक अगत्य होते त्या लहान मुलांशी संबंधित मजकुराने भरलेली आहेत. हा अर्धा अंक एकाच बैठकीत वाचता येईल आणि वाचावा असा आहे. कोणत्याही वयोगटातील व कोणत्याही मनोवृत्तीचा वाचक हा अर्धा अंक वाचून जरा अंतर्मुख होईल, इतक्या जवळच्या विषयाशी आपण आवश्यक तितके निगडित नाहीत अशी भावना बहुतांश वाचकांची होईल...

आणि थोडे मागे वळून पाहिले तर, मुलांच्या भावविश्वाशी साने गुरुजी इतके समरस का झाले होते हेही लक्षात येईल. गुरुजींची आंतरभारतीची संकल्पना नेमकी कशातून आली असावी आणि जगभरातील थोरा-मोठ्यांचा परिचय व जागतिक वाङ्‌मयातील वेचक लेखन मराठीत आणण्यासाठी ते इतकी धडपड का करीत होते हेही समजून घेता येईल. आणि म्हणूनच कैलाश सत्यार्थी  व मलाला युसुफझाई यांना नोबेल सन्मान मिळणे हा साने गुरुजींच्या भूमिकेचा, विचारांचा व कार्याचा गौरव आहे, असे आम्हाला वाटते. गुरुजींना जाऊन आता ६५ वर्षे झाली आहेत, पण महाराष्ट्रात तरी मुलांच्या भावविश्वाशी इतके जवळचे नाते असलेली व्यक्ती अद्याप तयार झालेली नाही, यातून गुरुजी किती अनन्य साधारण व्यक्तिमत्व होते हे लक्षात येते.

मलाला आणि सत्यार्थी या दोघांनी शांततेचे नोबेल स्वीकारताना केलेली संपूर्ण भाषणे अनुवाद करून या अंकात घेतली आहेत. पाकिस्तान आणि भारत या दोन देशातील व्यक्तींना पुरस्कार देताना नोबेल समितीने ‘बिटवीन द लाइन्स’ बराच विचार केलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय, जागतिक चर्चा विश्वाच्या / व्यासपीठांच्या अजेंड्यावर आणलेला आहे. या दोघांनी केलेल्या भाषणातील आशय आपल्या परिचयाचा आहे, पण ते ज्या परिप्रेक्ष्यातून या प्रश्नाकडे पाहत आहेत तो मात्र आपल्याकडे नाही अशी खंत कोणाही संवेदनशील वाचकाला वाटणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे दोघेही केवळ प्रश्नाची दाहकता मांडून किंवा वास्तव अधोरेखित करून थांबत नाहीत; तर कृतीला, संघर्षाला, लढ्याला प्रेरणा देतात; आव्हानाला भिडण्याचे आवाहन करतात. त्यांची विचारमौक्तिके साधीच आहेत, पण पेलवण्यासाठी खूप कठीण आहेत आणि म्हणून कदाचित काही वास्तववाद्यांना त्यात भाबडेपणा किंवा सुलभीकरण दिसेल. पण डोंगराएवढी आव्हाने पेलवून, पुरून उरलेले हे साहसी वीर आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

याच अंकात मीना कर्णिक यांनी ‘मुलांचे मनोविश्व’ रेखाटणाऱ्या चार वेगवेगळ्या देशांतील सिनेमांचा परिचय करून दिला आहे. त्या सिनेमांच्या ‘थीम’ पाहिल्या तरी त्यातील अद्‌भुतता आणि रोमांचकता लक्षात येईल. संतोष पद्माकर पवार यांची ‘नागू’ ही कविता, कोल्हापूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे, हे लक्षात घेतले तर आपल्या आजूबाजूला किती आणि काय काय विदारक घडत असते हे पुन्हा एकदा मनात नोंदवले जाईल. या अंकापासून रघुराज मेटकरी या निवृत्त शिक्षकाची ‘माझे विद्यार्थी’ ही लेखमाला सुरू करीत आहोत. या लेखमालेतील १६ लेख विद्यार्थी-पालक-शिक्षक यांना अस्वस्थ करतील आणि प्रेरणाही देतील. यातील काही विद्यार्थी न पेटलेल्या दिव्यांप्रमाणे आहेत तर काही विद्यार्थी आकाशात उंच झेप घेतलेल्या पाखरांप्रमाणे आहेत. पाच वर्षांपूर्वी राजा शिरगुप्पे यांची ‘न पेटलेले दिवे’ ही लेखमाला साधनातून प्रसिद्ध झाली आणि नंतर त्याचे पुस्तकही आले आहे. ‘माझे विद्यार्थी’ ही लेखमाला ‘त्या’ लेखमालेचा उत्तरार्ध आहे, असे म्हणता येईल.

हा अंक प्रसिद्ध होण्याच्या आधीच्या आठवड्यात पाकिस्तान व भारतातील दोघांना नोबेल सन्मान प्रदान केला गेला आहे. (१० डिसेंबर) ही आनंददायक घटना आहे, तशीच पाकिस्तानातील पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेने (१६ डिसेंबरला) हल्ला करून १४० मुला-मुलींचे प्राण घेतले आहेत ही क्रौर्याला लाजवणारी घटनाही आहे... अशा पार्श्वभूमीवर आपण २०१५ या वर्षात पदार्पण करीत आहोत.       

Tags: नोबल पुरस्कार मलाला युसुफझाई मलाला कैलाश सत्यार्थी संपादकीय editorial malala yusufzai kailash satyarthi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके