डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

15 ऑगस्ट 1997 या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव आहे. पण आपण जिथून निघालो तिथेच पोचलो आहोत असे देखील म्हणता येत नाही. उलट वर्तुळाकार जाणाऱ्या गिरमिटासारख्या जिन्यावरून घसरत आपण खोल खोल आणि खोलच चाललो आहोत.

15 ऑगस्ट 1947. भारतात कुठे शतकाची, कुठे दोन शतकांची गुलामी संपली. गडद अंधाराचे पटल भेदून स्वातंत्र्यसूर्य भारतीय आकाशात तळपू लागला. स्वातंत्र्यप्राप्तीचा क्षण लोकविलक्षण होता. एकीकडे मुक्तीचा उत्कट आनंद जनमानसात मावत नव्हता, पण एखाद्या फुलाला उमलतेवेळीच कीड लागलेली असावी तसे भारतीय स्वातंत्र्याच्या जन्मकाळी हिंदु मुसलमानांतील रक्तरंजित अभद्र दंगलींनी शुद्ध आनंदाला ओंगळ विरजण लावले होते. ब्रिटिशांची हुकूमत नष्ट झाली होती हे खरे पण स्वराज्याचे सुराज्य होईल का, ही आशंका सर्वांनाच व्याकुळ करीत होती. पण म्हणून काय झाले? शतकानंतर पहिली रम्य पहाट आली होती हे तर खरे ना? रक्तवर्ण खळे भोवती पडलेला तो तेजोगोल म्हणजे स्वातंत्र्याचा सूर्यच होता ना?

मेघ वितळले गगन निवळले 
क्षितिजावर नवरंग उसळले

अशी प्रकाशमान गगनमंडलातली रंगांची उधळण पाहून लोकसागराच्या लाटांवरही सोनेरी, आरक्त, केशरी छटांचा रास रंगला असला तर ते स्वाभाविक नाही का? हे खरे आहे की उद्या दिल्लीत स्वातंत्र्याच्या आगमनाचा सोहळा सजणार आहे : बापूजी, आम्ही उद्या काय करू?' असा प्रश्न डॉ. विधनचंद्र रॉय यांनी गांधीजींना केल्यावर खिन्नपणे हसून गांधीजी म्हणाले होते - 'उपास करा उपास! डॉ. रॉय यांनी पुन्हा प्रश्न करण्याचे धैर्य दाखवले नाही. पण ते दाखवले असते तर त्यांनी बहुधा असेच विचारले असते - पण नूतन प्रभात होते आहे हे तर खरे ना?' यानंतरही, स्वातंत्र्य आले असले तरी सामाजिक न्यायाचे वारे कोंडलेले आहे हे पाहून स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य? असा प्रश्न आम्ही तिरीमिरीने विचारत राहिलोच की! पण अष्टदिशांनी आणि अखिल नभोमंडळाने एकच उत्तर दिले असेल - 'भारतमातेच्या सुपुत्रांनो, सुकन्यांनो, तुमच्या मनातलं भय आम्ही समजू शकतो. 

तुमची मंजिल अजून दूर आहे हे आम्ही जाणतो, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता तुम्हांला दिवाभीतासारखे घनदाट अंधारात बसून घूत्कार करीत राहता येणार नाही. नवी पहाट आली आहे. तुमची वाट उजळली आहे. तुमचे डोळे दिव्य अंजन घातल्यासारखे लख्ख झाले आहेत. आता तुम्ही काळोखाच्या काळ्या कातळाच्या ठिकऱ्याठिकऱ्या करा. नुसती कोळिष्टकेच झाडून थांबू नका. जुनाट अंधारे वाडे जमीनदोस्त करा. स्वयंकर्तृत्वाचे गगनभेदी मनोरे उभवा… नव्या आशा, नव्या ऊर्मी, नवा उत्साह, नवा जोम. आम्हाला वाटले होते, हां हां म्हणता भारताचे चित्र आम्ही बदलून टाकू. उज्ज्वल रंगांनी त्याचा कोपरा कोपरा शोभायमान करू. जातीयता नष्ट करू. धर्मभेद जाळू. 

आर्थिक विषमतेची तीक्ष्ण धार बोथट करू. संकुचिततेचे साम्राज्य संपवू. विशाल मानवतावादाचे निशाण फडकवू. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा समूळ निःपात करू. विज्ञान आणि सत्यनिष्ठा या आधारशिलांवर ज्ञानमंदिर निर्माण करू. भारत बलसागर होईल. तो विश्वात शोभून राहील. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी आम्ही निर्भय ठाण मांडू. आता अर्धशतकाची वाटचाल पुरी झाल्यावर त्या वाटेकडे जरा मागे वळून पाहावे तर मात्र काय दिसू लागते? लोकसंख्येचा प्रचंड स्फोट झाला आहे. लोक अन्नासाठी दाही दिशा फिरत आहेत. महागाईचा काळाकभिन्न कडा आपल्या दुबळ्या छातीवर कोसळत असताना आपण जीव मुठीत धरून कसेबसे तगतो आहोत, जगतो आहोत. धर्मांधांनी चालवलेली अज्ञ जनतेची फसवणूक दुप्पटतिप्पट श्रेणीने वाढतच चालली आहे. गावकुसाबाहेर आपल्याच भावंडांना 'त्यक्त बहिष्कृत' जीवन कंठायला लावण्याची कोणाला लाज वाटत नाही. 

अतिरेकी आणि अत्याचारी यांचे सर्वत्र थैमान आहे. भारतीय समाजात स्त्रीयांची विटंबना होणार नाही या विश्वासाला तडा गेला असून अन्याय आणि अत्याचार करणारे मर्द! अधिकाधिक मस्तवाल होत चालले आहेत. धर्मभेद, पक्षभेद, प्रांतभेद, आर्थिक आणि सामाजिक विषमता अशा शेकडो धारदार सुऱ्यांनी भारताच्या मानचित्राच्या अक्षरशः चिरफळ्या उडवल्या आहेत. कोट्यवधी माणसांचा हा विराट देश निराशेच्या खोल गर्तेत दृष्टिहीन झाल्यासारखा चाचपडत, धडपडत, ठेचा खात खुरडत आहे. ऐका हो ऐका! पौरजन ऐका! सर्व ग्रामजन तुम्हीही ऐका. 15 ऑगस्ट 1997 या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव आहे. पण आपण जिथून निघालो तिथेच पोचलो आहोत असे देखील म्हणता येत नाही. उलट वर्तुळाकार जाणाऱ्या गिरमिटासारख्या जिन्यावरून घसरत आपण खोल खोल आणि खोलच चाललो आहोत. 

पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजून एक समर आहे. ते दीर्घ दीर्घ आहे आणि निकराचेही आहे. आपण हिम्मत हरता कामा नये. चला उठा बांधा कमरा सत्त्वाचा उदयोऽस्तु करा. पूर्वी म्हणजे अर्धशतकापूर्वी आपण एक रम्य पहाट पाहिली. आता भरदिवसा अवसेचा अंधार आपण सहन करणार आहोत काय? नाही नाही नाही. हे अर्धशतक संपेल तेव्हा रवीन्द्रनाथांनी आपल्या प्रार्थनेत जशी उत्कट मागणी केली होती तशी आपणही करूया. चित्त जिथे भीतिशून्य उंच जिथे माथा अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात ज्ञानविज्ञानाच्या प्रकाशात आणि प्रेम आणि आनंद यांच्या चांदण्यात महान भारतवर्ष आचंद्रसूर्य नांदो!

Tags: ब्रिटीश   स्वातंत्र स्वयंकर्तृत्व गांधी डॉ. विधनचंद्र रॉय British Indipendent Autonomy Gandhi Dr. Vidhandhandra Roy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके