डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जैतापूर, लवासा आणि पैलतीर

त्यामुळे भेंडेंनी या कादंबरीमागची कथा लिहिली असती तर त्यांच्या मनातील संपादकाचे व पत्रकारितेचे चित्र, ‘पैलतीर’मधील चित्रापेक्षा कोणत्या बाबतीत व कसे वेगळे होते, हे नेमकेपणाने कळले असते. आता ते शक्य नसले तरी ‘पैलतीर’ वाचून भेंडेंचा तीस वर्षांपूर्वीचा विचार कितपत पुरोगामी व दूरगामी होता, हे तपासता येईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहता येईल! ‘पैलतीर’ ही काळाचा अतिशय लहान पट असलेली जेते एकशेवीस पानांची कादंबरी आहे, एका अर्थाने ती ‘दीर्घकथा’ आहे. सुभाष भेंडे यांनी त्यांचे मित्र आणि त्यावेळी ‘गोमांतक’ दैनिकाचे संपादक असलेले माधव गडकरी यांना ही कादंबरी अर्पण केली आहे. या कादंबरीतील नानासाहेब सरंजामे या ध्येयवादी संपादकाचे चित्र रेखाटताना सुभाष भेंडेंच्या मनात ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक अनंत भालेराव आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक यदुनाथ थत्ते यांच्या व्यक्तिरेखा होत्या.

‘कथेामागची कथा’ ही राजन खान यांची लेखमाला मागील वर्षी साधनातून प्रसिद्ध झाली, तिला मिळालेला प्रतिसाद पाहूनच पुढील वर्षभर ‘कादंबरीमागची कथा’ ही लेखमाला प्रसिद्ध करावी आणि या लेखमालेत मराठीतील निवडक बारा लेखकांनी त्यांच्या प्रत्येकी एका कादंबरीमागची कथा सांगावी असे नियोजन आहे. या लेखमालेत सर्वप्रथम सुभाष भेंडे यांना त्यांच्या ‘पैलतीर’ कादंबरीविषयी लिहायला सांगावे असा विचार होता; या विचारामागे दोन कारणे होती : एक- ‘पैलतीर’चा विषय आणि दुसरे सुभाष भेंडे यांचे पूर्ण न झालेले स्वप्न! सुभाष भेंडे 2003 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य सेंमलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना ‘तुम्हाला आयुष्यात काय व्हायचे होते?’ आणि ‘पुन्हा संधी मिळाली तर काय व्हायला आवडेल?’ असे दोन प्रश्न विचारले गेले होते आणि या दोन्ही प्रश्नांचे त्यांनी दिलेले उत्तर ‘वृत्तपत्राचा संपादक’ असे होते. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळविल्यानंतर त्याच क्षेत्रातील चांगल्या व सुरक्षित नोकरीची उत्तम संधी समोर असल्यामुळे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील अस्थिरता व अनिश्चितता सभोवताली दिसत असल्यामुळे त्यांनी आपले संपादक होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्याचे टाळले होते, पण वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी (1981 मध्ये) त्यांनी ‘पैलतीर’ या कादंबरीतून एका ध्येयवादी संपादकाची कथा सांगितली आहे. गेल्या आठवड्यात सुभाष भेंडेंचे निधन झाले, त्यानंतर वृत्तपत्रांतून त्यांच्याविषयी जे काही छापून आले त्यात ‘पैलतीर’चा उल्लेख विशेषत्वाने झाल्याचे दिसले नाही; पण त्या काळात ‘पैलतीर’ केवळ गाजली नव्हती तर तिच्यावर आधारित दूरचित्रवाणी मालिकाही ‘दूरदर्शन’वरून (1985 मध्ये) प्रसारित झाली होती.

त्यामुळे भेंडेंनी या कादंबरीमागची कथा लिहिली असती तर त्यांच्या मनातील संपादकाचे व पत्रकारितेचे चित्र, ‘पैलतीर’मधील चित्रापेक्षा कोणत्या बाबतीत व कसे वेगळे होते, हे नेमकेपणाने कळले असते. आता ते शक्य नसले तरी ‘पैलतीर’ वाचून भेंडेंचा तीस वर्षांपूर्वीचा विचार कितपत पुरोगामी व दूरगामी होता, हे तपासता येईल आणि त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहता येईल! ‘पैलतीर’ ही काळाचा अतिशय लहान पट असलेली जेते एकशेवीस पानांची कादंबरी आहे, एका अर्थाने ती ‘दीर्घकथा’ आहे. सुभाष भेंडे यांनी त्यांचे मित्र आणि त्यावेळी ‘गोमांतक’ दैनिकाचे संपादक असलेले माधव गडकरी यांना ही कादंबरी अर्पण केली आहे. या कादंबरीतील नानासाहेब सरंजामे या ध्येयवादी संपादकाचे चित्र रेखाटताना सुभाष भेंडेंच्या मनात ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक अनंत भालेराव आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक यदुनाथ थत्ते यांच्या व्यक्तिरेखा होत्या. (हे भेंडेंनी स्वत: नोंदवून ठेवले आहे.) तारुण्यात असताना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले, स्वातंत्र्योत्तर काळात पुरोगामी राजकीय पक्षात काम करून मोर्चे- आंदोलने- धरणे- उपोषणे या माध्यमांतून सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करणारे आणि आयुष्याच्या उत्तरार्धात जिल्हा वृत्तपत्र सुरू करून स्थानिक पातळीवरील प्रस्थापितांविरुद्ध परिणामकारक लढाई करून पैलतीर गाठू पाहणारे नानासाहेब सरंजामे हे या कादंबरीचील मध्यवर्ती पात्र आहे. साहित्यिक मूल्यांचे निकष लावून या कादंबरीविषयी भाष्य करायचे असेल तर तो वेगळा विषय होईल, पण या कादंबरीतील नानासाहेब सरंजामेंचे विचार व कार्य यांची आजच्या काळाशी व वास्तवाशी तुलना केली तर सुभाष भेंडेंचे त्यावेळचे आकलनही फारच परिपक्व होते असे म्हणावे लागेल.

स्वातंत्र्यानंतर शोषणरहित समाजरचनेचे स्वप्न पाहून त्यासाठी राजकीय पक्षांबरोबर पाव शतक काम केल्यानंतर, राजकीय पक्षांतील फाटाफुटीने निराश झालेले आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या  प्रवाहपतीत होण्याने एकटे पडलेले नानासाहेब काही काळ मोठ्या (म्हणजे भांडवलदारांच्या!) वर्तानपत्रात नोकरी करतात, पण तिथे उत्तम आर्थिक प्राप्ती होत असली तरी मनासारखे काम करता येत नसल्याने तडकाफडकी राजीनामा देतात आणि स्वत:च्या मालकीचे जिल्हा वृत्तपत्र सुरू करतात. आयुष्यभर राजसत्तेच्या विरोधात लढलेल्या नानासाहेबांचे वृत्तपत्र स्वाभाविकच ‘राजकीय’ होते आणि अन्याय, अत्याचार व शोषण करणारे (परकीय असोत वा स्वकीय) यांचा सामना करण्याची तयारी सतत असल्याने त्यांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव ‘प्रहार’ ठेवले होते. (नारायण राणे यांनी ‘प्रहार’ हे नाव ‘पैलतीर’मधून तर उचलले नसावे?) प्रहार हे जिल्हा वर्तानपत्र म्हणून चालवताना नानासाहेबांची भूमिका आणि उद्दिष्टे अगदीच स्पष्ट होती. त्या संदर्भातील त्यांची काही विधाने अशी आहेत : ‘मला भारताच्या पंतप्रधानांना डोस पाजायचे नाहीत, अमेरिकेच्या अध्यक्षांना जाब विचारायचे नाहीत, झेकोस्लोव्हाकियामधल्या चळवळीवर लेखांक लिहावयाचे नाहीत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणाची उठाठेव करायची नाही... मला माझ्या मर्यादा ओळखून वागायचे आहे, पण त्याचबरोबर मी स्वत:चे सामर्थ्यही जाणून आहे... समाजात तुंबलेली गटारे साफ करण्याचे- सॅनिटरी इन्स्पेक्टरचे- काम करायचे आहे... समाजात अनेक बांडगुळे निर्माण झालीत, त्यांच्यावर प्रहार करायचे आहेत... अतिशय बिलंदर, तल्लख मेंदूची माणसे छोटीशी चूक करतात आणि कायद्याच्या जाळ्यात अलगद अडकतात, हे मला माहीत आहे... लोकप्रतिनिधींच्या चारित्र्याचा पंचनामा जनतेपुढे मांडण्याचे जाणीवपूर्वक टाळले तर पत्रकार म्हणून कर्तव्यात चुकलो असे होणार आहे... सार्वजनिक क्षेत्रांतील गैरव्यवहारांवर पांघरूण घालणे म्हणजे स्वत:शी, स्वत:च्या व्रताशी द्रोह ठरणार आहे... आपले भांडण मॉडर्न माणसांशी नाही, अप्पलपोट्या माणसांशी आहे! पैशासाठी माणसांच्या जिवाशी खेळणाऱ्या रक्तपिपासू जळवांशी आहे...’ असे हे नानासाहेब सरंजामे जिल्हा स्तरावरील शिक्षण व रोजगार हमी योजना, प्रदूषण व पर्यावरण, गरिबांचे विस्थापन व मोठे प्रकल्प असे प्रश्न आपल्या वृत्तपत्रातून मांडतात; तेव्हा सहकार, साखर, शिक्षण या क्षेत्रांतील सम्राटांशी त्यांना सामना करावा लागतो.

नानासाहेबांचा विकासाला विरोध नाही. त्यांना यंत्र-कारखाने, उद्योग-धंदे हवेतच आहेत पण सर्वसामान्य माणसांची पिळवणूक करून, पर्यावरणाचा नाश करून नव्हे! राजकीय नेते व भांडवलदार हे विकासाची कामे करताना, उद्योग उभारताना, होणाऱ्या व्यवहारात पारदर्शकता ठेवत नाहीत, प्रचंड नफा मिळवायचा असल्याने तसे करणे त्यांना ‘परवडत’ नाही. आणि नानासाहेबांच्या समोर तर सतत आगरकरांनी ‘केसरी’च्या पहिल्या अंकात लिहिलेले वाक्य असते : ‘वर्तानपत्रकर्त्याने आपले काम नि:पक्षपातीपणे व निर्भीडपणे बजावले पाहिजे. रस्तोरस्ती दिवे लागल्याने व पोलिसांची गस्त सारखी फिरत असल्याने जो उपयोग होतो, तोच अशा वर्तानपत्रांचा असतो.’ ‘पैलतीर’मधील नानासाहेब टोकाचा ध्येयवाद पत्करून एकाकी झुंज देतात, पण ‘प्रहार’ला हौतात्म्य पत्करावे लागते; नानासाहेबांची नाव पैलतीरी जातच नाही. ‘पैलतीर’ ही कांदबरी तीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली असली आणि तिचा आवाका अतिशय लहान असला तरी आजच्या सामाजिक- राजकीय- आर्थिक परिस्थितीतील कोंडीचे प्रतिबिंब तिच्यात पाहायला मिळते. आता ती वाचली तर कोणाच्याही नजरेसमोर अगदी पटकन्‌ जैतापूर व लवासा हे दोन महाकाय प्रकल्प येतील.

खरे तर स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिले हील स्टेशन म्हणून लवासा आणि जगातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र म्हणून जैतापूर हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्राचे मानबिंदू ठरायला हवेत, अभिमानाचे विषय बनायला हवेत. पण गेल्या काही महिन्यात हे दोनही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, स्थानिक जनतेच्या रोषाला पात्र ठरले आहेत, माध्यमांतील उलटसुलट चर्चेला कारणीभूत ठरले आहेत. जवळपास दहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती करणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोकणातील पाच गावांच्या परिसरात उभारला जातोय आणि सात टेकड्यांच्या प्रदेशातील लवासा प्रकल्प पुणे शहराच्या जवळ उभारला जातोय. या दोनही भव्यदिव्य प्रकल्पांत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. पण पर्यावरण व पुनर्वसनाचे प्रश्न ज्या पद्धतीने व ज्या जबाबदारीने हाताळायला हवेत, त्यात आपले सत्ताधारी फारच कमी पडत आहेत. मोठा विरोधाभास हा आहे की, विकासाची आणि उद्याच्या पिढ्यांची काळजी सत्ताधारी बोलून दाखवतात, पण आजच्या पिढीतील स्थानिक जनतेची मात्र अवहेलना करतात, भांडवलदारांकडून होणाऱ्या शोषणाला हातभार लावतात, स्वत: त्यात सहभागी होतात. टोकाचा संघर्ष केल्याशिवाय विस्थापितांना नुकसानभरपाई द्यायची नाही, त्यांचे पुनर्वसन करायचे नाही, पर्यावरणाची काळजी नीट घ्यायची नाही, ही सत्ताधाऱ्यांची मानसिकता अधिक बळावत चालली आहे? भारतातील विकासाची वाटचाल अशीच असणार आहे? हीच व्यवहार्यता आणि अपरिहार्यता आहे काय? म्हणजे राज्यकर्त्यांनी सर्व लहान मोठ्या-प्रकल्पांत स्वपक्षाचे व आप्तस्वकीयांचे हितसंबंध प्राधान्यक्रमाने जपायचे आणि जनचळवळी व प्रसारमाध्यमे यांनी अशा प्रकल्पांच्या विरोधात रान उठवायचे, दोनही बाजूंनी शक्य तितके ताणायचे आणि जय पराजय स्वीकारत पुढे जायचे!... हे असेच चालणार असेल तर पैलतीर अजून फारच दूर आहे!

Tags: सुभाष भेंडे कादंबरी पैलतीर राजन खान कथेामागची कथा लवासा जैतापूर  संपादकीय subhash bhende kadambari pailtir rajan khan kathemagachi katha lavasa jaitapur    Sampadikiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके