डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नायगाव येथील जातिनिर्मूलन शिबिर

तरुणांनी असे पाहिले पाहिजे की, आपल्या जातीबाहेर आपले जिवलग मित्र किती आहेत? ते आपल्या बरोबर वागताना स्वत:च्या जातीविरुद्ध बोलावयास तयार आहेत काय? माझ्या जातीच्या नसलेल्याच्या घरात मी व माझ्या घरात ते स्वतःचे घर म्हणून वावरू शकतात का? माझ्यावर जर बिकट प्रसंग आला तर त्या प्रसंगात माझ्या मदतीसाठी धावून येणाऱ्या मित्रांत माझ्या जातीबाहेरचे किती जण आहेत? स्वतःच्या जातीबाहेरच्या जिवलग मित्रांची संख्या वाढत जाणे हे समतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल. जर हे झाले तरच त्यापुढचे पाऊल आंतरजातीय विवाहाचे असेल. मग असे विवाह यशस्वीही होतील. हे जर व्हावयाचे नसेल तर सर्वनाश अटळ आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. माणसाचे कर्तृत्व हे जातीवर अवलंबून नसते. तो स्वतःच कर्तृत्ववान असतो, यावर विश्वास निर्माण झाला पाहिजे.

नायगावला (जि. नांदेड ) जातिनिर्मूलन शिबिर घ्यायचे ठरल्यानंतर डॉ. स. रा. गाडगीळ, डॉ. सौ. तारा परांजपे व प्रा. भुजंग गावडे या तिघांची गडबडघाई सुरू झाली. कसे घ्यायचे,  कुठे घ्यायचे, कधी घ्यायचे, कोणते कार्यक्रम ठेवायचे, नियोजन कसे करायचे ? ...प्रश्न आणि प्रश्न.. ; शिबिर पार पडेपर्यंत अस्वस्थता.....आणि अशा मनःस्थितीत आम्ही नायगावच्या बसस्टॅन्डवर उतरलो. जनता हायस्कूलकडे चालू लागलो. अपेक्षा अशी होती की, रस्त्याने कुणी शिबिरार्थी भेटतील, कार्यकर्ते भेटतील. पण रस्त्याने तर सोडाच- पण शाळेतही कुणी नव्हते. नंतर आम्ही गेस्ट हाउसमद्ये गेलो. तिथे भाऊ शिंदे व एक कार्यकर्ता इसाक हे होते. स्वयंपाकाची व्यवस्था पाहण्यासाठी मी व गावडे शाळेत गेलो. तिथं जनता हायस्कूल नायगावचे मुख्याध्यापक श्री. आत्माराम खंडागळे स्वतः जातीने लक्ष घालीत होते. त्यांच्याबरोबर त्या शाळेतील सर्व शिक्षक जणू काही त्यांच्या स्वतःच्याच घरचे कार्य आहे अशा तऱ्हेने राबत होते.

शिबिराच्या या तिन्ही दिवसांत त्या सर्वांनी अपार कष्ट घेतले. सकाळी 11 च्या सुमारास श्री. शिरूभाऊ लिमये येऊन दाखल झाले. सर्व शिबिरार्थी आल्यानंतर स्पांना सूचना देण्यात आल्या. चहा झाला. जेवण झाले. मध्यंतरी श्री. बळवंतराव चव्हाणांनी स्वत: येऊन पाहणी केली. सर्व व्यवस्थित असल्याचे पाहून  ‘‘दुपारी कार्यक्रमास येतो’’ म्हणून गेले. त्यांची आतिथ्यशीलता भारावून टाकणारी होती.दुपारी 2-30 च्या सुमारास उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. शिबिरार्थी, जनता हायस्कूल व नायगाव परिसरातील शाळांचे शिक्षक यांनी शाळेचा परिसर फुलून गेला होता. प्राचार्य नरहर कुरुंदकर उद्घाटक होते. पीपल्स कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. स. रा. गाडगीळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आ. श्री. बळवंतराव चव्हाण, प्राचार्य कुरुंदकर, डॉ. गाडगीळ, शिरुभाऊ लिमये, डॉ. सौ. परांजपे, प्रा. गावडे व नायगाव परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती

विराजमान झालेल्या होत्या. प्रा. गावडेंनी आापल्या प्रास्ताविकात गेल्या 2 वर्षांत जातिनिर्मूलन संस्थेने नायगाव परिसरात चालवलेल्या कार्याचा आढावा घेतला.
शिरुभाऊ लिमये यानी पुण्याच्या जातिनिर्मूलन संस्थेचा इतिहास, स्वरूप व उद्दिष्टे सांगून या कार्यासाठी आम्ही हा परिसर का निवडला, सामाजिक समतेबद्दलची जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी आमच्या  पुढील कोणत्या योजना आहेत, त्या सांगितल्या. आमदार  बळवंतराव चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘सामाजिक समानतेच्या ध्येयाने प्रेरित होऊन आम्हांला मार्गदर्शन करण्यासाठी ही मंडळी आमच्या गावी आली हे मी माझे भाग्य समजतो आणि त्यांची व्यवस्था करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.’’ यानंतर कुरुंदकर बोलावयास उभे राहिले. जातिनिर्मूलनासंबंधी बोलत असताना त्यांनी जाती कशा निर्माण झाल्या त्याबद्दल माहिती दिली. ज्या ज्ञानामुळे राष्ट्राची प्रगती होईल व एक महान राष्ट्र म्हणून आपला देश उदयास येईल असे फारसे ज्ञान ब्राह्मणांजवळ पूर्वी कधीच नव्हते. राष्ट्राच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे फारसे उपयुक्त ज्ञान ते देऊ शकत नव्हते. त्यांच्याजवळील ज्ञानाने कर्मकांडाचे, वर्णवस्थेचेच समर्थन केले आहे. ते ज्ञान समाजात समानता आणण्याऐवजी विषमता निर्माण करण्यास कारणीभूत झाले. त्यामुळे ज्ञानाची मक्तेदारी ब्राह्मणांची झाली. ते ज्ञान त्यांनी स्वतःपुरते कोंडून ठेवले, इतरांना ते ज्ञान मिळू दिले नाही- ह्या म्हणण्यात फारसे तथ्य नाही.

आर्य भारतात टोळ्याटोळ्यांनी आले. प्रत्येक टोळीचे विशिष्ट असे शिष्टाचार, परंपरा, लग्नव्यवस्था होत्या आणि त्या तशाच टिकवून राहाव्यात, बेटी व्यवहार हा आपत्याच टोळीत अगर आपल्यासारख्या रूढी, परंपरा असणाऱ्या टोळीतच व्हावेत असे पाहिले जाई. यातून निरनिराळ्या जाती व त्यांची बंदिस्त वर्तुळे निर्माण झाली आणि प्रत्येक जण आपली जात टिकवण्याचा प्रयत्न करू लागला. इतर जातींना शिव्या देऊ लागला. पण अशा पद्धतीने जातिव्यवस्था कधीच नाहीशी होणार नाही. प्रत्येकाला स्वत:च्या जातीचा अभिमान आहे. मी माझ्या जातीचे कल्याण करतो यात काय गैर आहे, अशी मनोवृत्ती त्याच्यात आढळते. जोपर्यंत माणूस या मनोवृत्तीच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत जाती मोडणार नाहीत. यावर एक उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह हा आहे; पण हा उपाय कठीण आहे. त्याबाबत सक्ती करणे हे स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. तेव्हा दोन सोप्या गोष्टी करणे शक्य आहे. त्या म्हणजे, प्रथम समाजाच्या पटावरून ‘मी माझी जात पुसून टाकीन’, असे तरुणांनी म्हटले पाहिजे.

आपल्या स्वत:च्याच जाती विरुद्धची फळी किती बलवान करता येईल हे त्यांनी पाहिले पाहिजे. असे झाले तरच जातीची चिरेबंदी उखडू लागेल.त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा : तरुणांनी असे पाहिले पाहिजे की, आपल्या जातीबाहेर आपले जिवलग मित्र किती आहेत? ते आपल्या बरोबर वागताना स्वत:च्या जातीविरुद्ध बोलावयास तयार आहेत काय? माझ्या जातीच्या नसलेल्याच्या घरात मी व माझ्या घरात ते स्वतःचे घर म्हणून वावरू शकतात का? माझ्यावर जर बिकट प्रसंग आला तर त्या प्रसंगात माझ्या मदतीसाठी धावून येणाऱ्या मित्रांत माझ्या जातीबाहेरचे किती जण आहेत? स्वतःच्या जातीबाहेरच्या जिवलग मित्रांची संख्या वाढत जाणे हे समतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल. जर हे झाले तरच त्यापुढचे पाऊल आंतरजातीय विवाहाचे असेल. मग असे विवाह यशस्वीही होतील. हे जर व्हावयाचे नसेल तर सर्वनाश अटळ आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. माणसाचे कर्तृत्व हे जातीवर अवलंबून नसते. तो स्वतःच कर्तृत्ववान असतो, यावर विश्वास निर्माण झाला पाहिजे. अध्यक्षीय समारोपात डॉ. स. रा. गाडगीळ यांनी ‘‘आता समतेच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. हजारो वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती आज राहिलेली नाही. आज एक ब्राह्मण ‘जाती मोडून टाका’ हे सांगावयास उभा राहिलेला आहे, ही गोष्ट स्वागतार्ह आहे,’’असे उद्गार काढले. त्यांनंतर शिबिरार्थ्यांशी विविध विषयांवर मुक्त चर्चा झाली.

दूसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच उठून शाळेच्या मैदानावर गेलो असता एक सुंदर दृश्य पाहावयास मिळाले. प्रा. विठ्ठल नारवाड हे शिबिरार्थ्यांकडून कवायत करून घेत होते. त्यांची शिबिरार्थ्यांना कवायतीबद्दल मार्गदर्शन करण्याची शैली, प्रात्यक्षिके प्रत्यक्ष स्वतः करून दाखवण्याची पद्धत इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती की, आम्हांलाही या कवायतीत सहभागी व्हावे असे वाटू लागले. ते वातावरणच असे होते की, कवायत पाहावयास आलेली छोटी छोटी मुलेही उत्स्फूर्तपणे रांगेत उभी राहुन कवायत करीत होती.
त्यांनंतर  भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानाचा कार्यक्रम झाला. हातांत फावडी, कुदळ, टोपले घेऊन शिबिरार्थी झाडांना आळी करणे, शाळेच्या परिसरातील मातीची टेकाडे नाहीशी करून जिथे खड्‌डे असतील ते बुजवणे, कचरा दूर नेऊन टाकणे इ. कामे करीत होते. भाऊ शिंदे यांनी हे श्रम हलके व्हावेत यासाठी एक सामूहिक गीत गावयास सुरुवात केली. खेड्यापाड्यांतून आलेल्या शिबिरार्थ्यांना हा एक नवाच अनुभव होता. तेसुद्धा मोकळेपणाने गीत गाऊ लागले. काम करू लागले.दुपारच्या कार्यक्रमात डॉ. तारा परांजपे यांचे 'स्त्री-मुक्ती आणि जाती निर्मूलन' या विषयावर भाषण होते. या भाषणासाठी प्रामुख्याने स्त्रियांची उपस्थिती जाणवत होती. सौ. परांजपे यांनी स्त्रियांनी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत समानता आवश्यक मानावी तेव्हाच त्यांना पुरुषाबरोबरची समानता मागण्याचा हक्क येतो म्हणून सांगितले. आज बहुतेक ठिकाणी पुरुष हा आपल्या बैठकीपर्यंत जाती मोड़ू शकतो. पण संपूर्ण घरातून जातीयतेची विषवल्ली समूळ नष्ट व्हावयाची असेल तर स्वयंपाकघरातूनही अस्पृश्यता दूर झाली पाहिजे. तिथे स्त्रियांचा अधिकार असतो. मुलांवर प्रामुख्याने संस्कार करणारी स्त्री आहे.

जाती मोडण्याच्या दृष्टीने तिने मुलांवर संस्कार करावेत. आपल्या वागण्या-बोलण्यात चुकूनही जातीविषयीचे उल्लेख येणार नाहीत याबद्दल तिने खबरदारी घ्यावी.
आपल्या भाषणात त्यांनी इतिहासाचा आढावा घेत असताना समाजातील स्त्रीचे महत्त्व हळूहळू कसे कमी होत गेले हे सांगितले. समाज रानटी अवस्थेत असताना पुरुष शिकारीसाठी जंगलात गेला म्हणजे स्त्रिया लाकूड, दगड अगर जनावराच्या शिंगाने जमीन उकरून बिया पेरीत असत व त्यातूनच शेताची कल्पना उदयास आली. अशा रीतीने शेतीचा शोध स्त्रियांनीच लावलेला आहे. शेतीचा शोध लागल्यानंतर मग मालमत्तेची कल्पना उदयास आली आणि समाज स्थिर होऊ लागला. कृषी संस्कृतीत मालमत्तेची कल्पना उदयास येताच स्त्री ही एक उपभोग्य वस्तू समजण्यात येऊन तिची गुलामगिरी वाढत गेली. निरनिराळया संकेतांद्वारे मोठ्या खुबीदारपणे स्त्रियांच्या गुलामगिरीचे समर्थन करण्यात येऊ लागले. तिचा गौरव (?) करण्यात येऊ लागला. यापैकी एक संकेत लक्ष्मीचा आहे. स्त्री ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी ही चंचल आहे. तेव्हा ती कुठे जाणार नाही यासाठी तिला जखडून ठेवणे आवश्यक आहे. लक्ष्मी ही विष्णूचे पाय चेपते त्याप्रमाणे स्त्रियांनी पुरुषांची सेवा करावी. अशा पद्धतीने तिचा शाब्दिक गौरव होतो आणि व्यवहारात तिला दुय्यम स्थान दिले जाते.

पुरुष हे नवे विचार चटकन स्वीकारतात. त्या मानाने नवे विचार स्त्रियांना लवकर आत्मसात करता येत नाहीत. कारण अजूनही स्त्रिया मोठ्या प्रमाणात मानसिक गुलामगिरीत आहेत. स्त्रियांनीसुद्धा जुने विचार टाकून देऊन नव्या विचारांचे स्वागत करण्यास सिद्ध राहावे म्हणून सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गाडगिळांनी मोठमोठे शब्द वापरून स्त्रियांच्या गुलामगिरीच कसे समर्थन केले जाते ते सांगितले. स्त्रिया जे ऋषीपंचमीचे व्रत पाळतात ती ऋषीपंचमी नसून कृषी पंचमी आहे. कारण त्या दिवशी स्त्रिया बैलाच्या कष्टाचे अन्न खात नाहीत. हे व्रत म्हणजे शेतीचा शोध स्त्रियांनी लावला यांचा पुरावा होऊ शकते.शिबिराचा तिसरा दिवस उजाडला. सकाळी श्रमदानाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर समारोपाचा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमासाठी नांदेडहून ॲड.बाऱ्हाळीकर आले होते. तसेच पुणे विद्यापीठातील प्रौढ शिक्षणाचे कोऑर्डिनेटर  विलास वाघ हेही उपस्थित होते.ॲड.बाऱ्हाळीकरांनी आपल्या भाषणात भारताच्या विकासामध्ये जातिव्यवस्थेचा अडसर कसा निर्माण होत आहे हे सांगितले. जात ही सर्वत्र स्वार्थासाठी राबवली जात आहे. ती नष्ट करणे एकट्यादुकट्याचे काम नाही. निरनिराळ्या क्षेत्रांतल्या पुढाऱ्यांनी या कार्यासाठी पुढे आले पाहिजे. आंतरजातीय विवाहासारख्या घटना जातिभेदाच्या उच्चाटन-कार्यास चालना देतात.

जात हा एक मानसिक भ्रम आहे. त्याला कुठेही शास्त्रोक्त आधार नाही. हा भ्रम दूर झाला पाहिजे. कोणत्यातरी ऐतिहासिक अगर पौराणिक घटनांचा आधार घेऊन प्रत्येक जातीतील माणसे स्वतःची थोरवी सांगण्याचा प्रयत्न करतात, हे थांबले पाहिले. राखीव जागा व सवलतीच्या प्रश्नांवरून कर्मचारी संघटनेत फूट पडत आहे. तणाव वाढतो आहे. तिथे आर्थिक हितसंबंध कारणीभूत होत आहेत. त्यांनीही परस्पर समजुतीने वागावयास हवे म्हणून सांगितले. या शिबिरासाठी हिमायतनगरहून भंगी-मुक्ती आंदोलनाचे एक कार्यकर्ते  नखाते आले होते. त्यांनी सोप्या संडासाद्वारे खत निर्माण करण्याची प्रक्रिया सांगितली.विलास वाघ यांनी आपल्या भाषणातून प्रौढ शिक्षणाद्वारे जाती निर्मूलन याबद्दल सांगितले. प्रौढ शिक्षणाचा प्रमुख हेतू जाणीव-जागृती हा आहे. ग्रामीण जनतेचे अंधश्रद्धाळू मन जागृत करणे आवश्यक आहे, हे सांगून जातिनिर्मूलन कार्यातील स्वतःचे काही अनुभव सांगितले. मराठवाड्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच शिबिर. पण त्याला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जातिनिर्मूलनासाठी कार्यकर्त्यांना दुप्पट उत्साह आला व त्यांच्या मनात आपल्या ध्येयाविषयीचा आशावाद दुणावला.

Tags: वृत्तान्त नायगाव (नांदेड) जाती निर्मूलन शिबिर सामाजिक reportaz naigaon (nanded) caste annhilation camp social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके