डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

काकस्पर्श : रूढीबाजपणाचे समर्थन करणारा

चित्रपटाने संदेश द्यायलाच हवा असे मुळीच नाही. पण नकारात्मक गोष्टींचे उदात्तीकरण कधीच श्रेयस्कर नसते. कारण शेवटी हा महाभाग हरी काय म्हणतो, तर शेवटी मी उमेला मंगळसूत्र द्यायला म्हणून आलो त्याच्या आत ती मेली कारण तिचे माझ्यावरचे अपार प्रेम. मी महादेवला दिलेला शब्द मोडू नये म्हणून ती त्या आधीच मरून गेली. म्हणजे मेल्यावरही त्या बिचाऱ्या उमेची अशी विटंबना.

कथानकप्रधान आणि आशयप्रधान कलाकृतीच्या संदर्भात, मग ती कथा-कादंबरी असो अथवा नाटक- चित्रपट असो, श्रेष्ठतेचा एक निकष मला असा वाटतो, की कलाकृतीचा विस्तार कलाकृतीचा गाभा अधिकाधिक प्रभावीपणे आस्वादकासमोर ठेवण्यासाठी असतो आणि त्या कलाकृतीचा प्रोटॅगोनिस्ट त्यात मोलाची भूमिका बजावतो.

उदाहरणार्थ ‘कोसला’चा प्रोटॅगोनिस्ट भालचंद्र नेमाडे यांना अभिप्रेत असे ‘सार्वत्रिक दंभस्फोटा’चे काम प्रभावीपणे करतो. चित्रपटाबाबत दिग्दर्शक प्रोटॅगोनिस्ट ठरवण्याबाबत (आणि त्यासाठी अभिनेता/अभिनेत्री निवडण्याबाबत) चुका करण्याची शक्यता नेहमीच जास्त असते कारण ते काम केवळ लेखक-दिग्दर्शकाचे नसते तर एक अभिनेता ते काम करणार असतो. आणि कित्येक वेळा तो अभिनेता आपल्या अभिनयसामर्थ्याने अथवा कलाकृतिबाह्य प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे कलाकृतीवर स्वार होऊ शकतो. अमिताभ बच्चनचे अनेक चित्रपट याची साक्ष देतील. एखाद्या पात्राला नायकाचे स्थान दिल्यावर त्याचे चित्रण कथेच्या गाभ्याच्या संदर्भात आणि कथेच्या विस्ताराबाबत प्रामाणिक राहते का हे प्रश्न चित्रपट आणि नाटकाबाबत महत्त्वाचे ठरतात.

महेश वामन मांजरेकर यांच्या ‘काकस्पर्श’ या चित्रपटात नेमका हाच गोंधळ झालेला दिसतो.

सचिन खेडेकर या समर्थ अभिनेत्याने साकारलेला हरी हा या चित्रपटाचा नायक असल्याचे सूचित केले गेले आहे. सुरुवातीलाच गावातल्या देवीला रेड्याचा बळी देण्याच्या प्रथेला विरोध करून तो आपले सुधारणावादी स्वरूप प्रकट करतो.

रूढींना विरोध करणारा हा नायक असल्याची प्रेक्षकांची सकारण कल्पना होते आणि जसजसा चित्रपट पुढे जातो तसतशी प्रेक्षकांची ती धारणा अधिकच पक्की केली जाते.

कारण मीलनाच्या पहिल्या रात्रीच अचानक आपला भाऊ मेल्यामुळे कोवळ्या वयातच विधवा झालेल्या धाकट्या भावजयीच्या, दुर्गा ऊर्फ उमेच्या केशवपनाला हा हरी यशस्वी विरोध करतो.

त्यामुळे हरी भलताच पुरोगामी असल्याचे आपल्याला वाटते. याला समांतर म्हणजे आपल्या धाकट्या भावासाठी मुलगी पाहायला गेलेला असताना या हरीची नजर त्या बारा तेरा वर्षांच्या मुलीवरून हटत नाही इतकी त्याला ती आवडते आणि त्या कोवळ्या मुलीलाही हा रुबाबदार आणि आकर्षक मिशा असणारा हरीच खूप आवडतो. ती तसे बोलूनही दाखवते.

पण लगेचच ती गैरसमजाची चुक सुधारली जाते आणि नवरामुलगा त्याचा धाकटा भाऊ आहे हे तिला सांगितले जाते. तीही आनंदाने त्याचा स्वीकार करते.

पण प्रथमदर्शनात काहीतरी घडतेच. म्हणूनच चित्रपटाची जाहिरात आणि सादरीकरण ‘एक हळुवार प्रेकहाणी’ असे केले आहे. पण चित्रपटारंभी सूचित केलेल्या या दोन्ही धाग्यांशी फारकत घेत चित्रपट केवळ एक अंधश्रद्धा बळकट करणारा भावुक चित्रपट म्हणून संपतो तेव्हा निराशेला पारावार राहत नाही. चित्रपट संपतो तेव्हा आपल्या हाती काय उरते?

तर या हरीने आपल्या धाकट्या भावाच्या पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून त्याच्या आत्म्याला वचन दिलेले असते, की तुझ्या बायकोला परपुरुषाचा स्पर्श मी होऊ देणार नाही. आणि हे म्हणताच पिंडाला कावळा स्पर्श करतो.

आणि म्हणून म्हणे, केवळ त्या न्हाव्याचा स्पर्श होऊ नये म्हणून हा हरी उमेचे केशवपन होऊ देत नाही. म्हणून तिला कधी माहेरी जाऊ देत नाही. तिला साधे देवळात जाऊ देत नाही. आणि सर्वांवर कळस म्हणजे अत्यंत सुस्वभावी आणि देशभक्त असलेल्या बळवंत या तिला पित्यासमान असलेल्या आपल्या मित्राला तिच्याशी बोलण्याची बंदी घालतो. 

आणि त्या कळसावर देखील सुपर कळस म्हणजे स्वत: देखील तिच्याशी बोलणे टाकतो. म्हणजे सुरुवातीला सुधारणावादी वाटणारा हा हरी अंधश्रद्धेचा आणि त्यातून होणाऱ्या अमानुष छळाचा सर्वांत मोठा गुन्हेगार ठरतो.

आणि हा हरी तिच्याशी बोलणे का टाकतो, तर लैंगिक भूक उमलण्याआधीच मारल्यामुळे, ती आपल्या पुत्रवत्‌ पुतण्याचे पत्नीबरोबरचे प्रणायालाप ऐकते म्हणून.

खरे तर कोणत्याही स्त्रीच्या दृष्टीने हा एक विलक्षण नाजुक विषय आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे बघितले तरी या हरीचे व्यक्तिमत्त्व एक अमानुष जुलूम करणारा वेडसर डोक्याचा खलनायक या पलीकडे दुसरे कोणते रूप घेऊच शकत नाही आपल्या मनात.

पण सचिन खेडेकरचा उत्तम आवाज, उत्कृष्ट अभिनय आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व यामुळे हरी जणू काही चित्रपटाचा नायक आहे असेच चित्र उभे केले जाते.

आता प्रोटॅगोनिस्टच जर आजच्या काळात म्हणजे एकविसाव्या शतकात बनवलेल्या या चित्रपटात इतका   नकारात्मक, चुकीचा आणि अंधश्रद्ध पण भाबड्या प्रेक्षकांना खूश करणारा संदेश देत असेल तर चित्रपटाचा बाजारू हेतू उघड होणारच.

मृत भावाच्या आत्म्याला दिलेल्या वचनाखातर एका जिवंत स्त्रीचे आयुष्यभर धिंडवडे काढले जात असतील आणि त्याचे समर्थन केले जात असेल तर काय बोलावे?

बरे चित्रपटात हा हरी एक निर्घृण खलनायक किंवा विकृत वेडा म्हणून सादर केला असता तर एक वेळ समजून घेता आले असते. तो एक उत्तम वास्तववादी चित्रपट ठरला असता. पण तसेही आढळत नाही. (म्हणजे उदाहरणच घ्यायचे तर ‘तेरुओ’ या गौरी देशपांडे यांच्या कादंबरीत जसे एका उठवळ, ऐतखाऊ आणि भोळ्या नवऱ्याचा फायदा उठवणाऱ्या व्यभिचारी बाईचे प्रचंड उदात्तीकरण केले आहे तसाच प्रकार इथे होतो. अर्थात एरवी समाज आणि संसारात दबलेल्या आणि दडपलेल्या असंख्य मध्यमवयीन बायकांना ‘तेरुओ’ विलक्षण आवडतेच. तसाच ‘काकस्पर्श’ देखील बहुसंख्यांना आवडायची शक्यता (=धोका) आहेच!)

पण हे सामाजिक विचार क्षणभर बाजूला ठेवले तरी एक कलाकृती म्हणूनही पदरी निराशाच येते.

हरीचा मित्र बळवंत याचे क्रांतिकारक असणे कशासाठी? त्याचे प्रयोजन जर हरीची त्या क्रांतिकार्याला असलेली सहानुभूती दाखवून हरीचे उदात्तीकरण करणे हे असेल तर ते नेमके चित्रपटाच्या आशयाला छेद देते.

शिवाय एकूण क्रांतिकार्याविषयी इतके बाष्कळ संदर्भ आहेत की हसूच यावे.

घरी हरीच्या धाकट्या भावाच्या लग्नाची चर्चा चाललेली असते तेव्हा एरवी अत्यंत खुनशी आणि खुळचट वाटणारी एक म्हातारी विधवा या बळवंतला म्हणते, आता या लग्नाच्या मदतकार्यात ये बाबा, देशाला एक महिना उशीरा स्वातंत्र्य मिळाले तरी चालेल. आणि सगळे जण त्यावर हसतात.

अरे! काय हा सवंग तमाशा!

शिवाय या चित्रपटाला हळुवार प्रेमकहाणी म्हणावे असेही यात काही नाही. वडीलधाऱ्या काका-मामाचे स्पर्श म्हणजे काही परपुरुषाचे स्पर्श नव्हेत हेही न कळणाऱ्या एका वेडगळ माणसाची कसली आलीय डोंबलाची प्रेमकहाणी.

बरे या हरीचे व्यक्तिमत्त्व आणि जडणघडणच अशी वेडसर दाखवली असती तर सयुक्तिक झाले असते. पण हा पार काशीच्या पंडितांना पत्र लिहून शास्त्राधार मागणारा बुद्धिमान दाखवलाय.

शिवाय असल्या वेडगळ कामासाठी भूमिगत क्रांतिकारकांचे नेटवर्क वापरणे म्हणजे अजूनच मोठा खुळेपणा. तो बळवंतही क्रांतिकार्य करताना कधीच दाखवला नाही, तर काशीच्या महादेवशास्त्रीबुवांकडून शास्त्राधार मिळवून आणण्यासारखे खुळचट अंधश्रद्ध उद्योग करणे, लग्नाची मध्यस्थी करणे आणि त्या बापड्या दुर्गेवर गावातला उपाध्याय हल्ला करतो तेव्हा अचानक येऊन लाठ्या-काठ्या चालवून तिला वाचवणे असले उद्योग करतानाच दाखवलाय.

म्हणजे त्याचे क्रांतिकारक असणे केवळ एक-दोन वेळा हरी जे बोलतो त्यावरून आपण गृहीत धरायचे. साहित्याच्या क्षेत्रात जसे निवेदनापेक्षा प्रतीती महत्वाची तसेच चित्रपटात असावे.

बरे अंधश्रद्धेचा पगडा असलेल्या समाजाचे चित्रण करायचे तर त्याचे ‘हळुवार प्रेमकहाणी’ म्हणून आणि सुरुवातीला चवीपुरते सुधारणावादी दृष्य दाखवून विडंबन कशासाठी?

एकूणात हा चित्रपट भावनिक प्रेक्षक आणि अंधश्रद्ध लोक यांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन पूर्णपणे बाजारू हेतूने काढलेला वाटतो.

चित्रपटाने संदेश द्यायलाच हवा असे मुळीच नाही. पण नकारात्मक गोष्टींचे उदात्तीकरण कधीच श्रेयस्कर नसते. कारण शेवटी हा महाभाग हरी काय म्हणतो, तर शेवटी मी उमेला मंगळसूत्र द्यायला म्हणून आलो त्याच्या आत ती मेली कारण तिचे माझ्यावरचे अपार प्रेम. मी महादेवला दिलेला शब्द मोडू नये म्हणून ती त्या आधीच मरून गेली. म्हणजे मेल्यावरही त्या बिचाऱ्या उमेची अशी विटंबना.

अरेरे! भाबड्या प्रेक्षकांच्या खिशाला हात घालण्यासाठी काय या क्लुप्त्या?

आपल्या संस्कृतीतले नहाण येणे, गर्भादान करणे वगैरे जुने सांस्कृतिक सोहळे साग्रसंगीत दाखवून, कोकणात उत्कृष्ट छायाचित्रण करून आणि सचिन खेडेकरसारखा समर्थ अभिनेता घेऊन मोठ्या समूहाला आकर्षित करण्यात यशस्वी झालेला हा चित्रपट आतून मात्र असा अधोगामी आणि रूढीबाजपणाचे समर्थन करणारा बाजारू चित्रपट आहे हे वास्तव आपण ओळखायला हवे.

Tags: केशवपन कावळा आत्मा अंधश्रद्धा जाहिरात चित्रपट Hairdresser Crow Soul Superstition Advertising Movies weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके