डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कर्तव्य पुन्हा जन्माला येत आहे!

आता नव्या काळाची पावले ओळखून साधनाने डिजिटल माध्यमातही प्रवेश करायचे ठरवले आहे. कारण इंटरनेटचे जाळे देशभर इतके पसरले आहे की, ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांच्या हातातही स्मार्टफोन आलेले आहेत. तरुणाईच्या जगण्यातला तर तो अविभाज्य भाग झाला आहे. माहितीचा अक्षरश: मारा होत आहे. मात्र त्यातही सकस मजकुराची वानवा आहे. माहितीवर(वर्गीकरण, विश्लेषण, निष्कर्ष) प्रक्रिया करून, तिची चिकित्सा करून, समाजाभिमुख दृष्टिकोन देता येणे ही या काळाची मागणी आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. गेली 71 वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. या अंकाबरोबरच हे साप्ताहिक 72 व्या वर्षात पर्दापण करीत आहे.

आतापर्यंतच्या प्रदीर्घ वाटचालीत साधनाची ओळख एक ध्येयवादी व परिवर्तनवादी नियतकालिक अशीच राहिली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रामुख्याने प्रकाशित केले जाते. वैचारिक भूमिकेच्या बाबतीत साधना कायम पुरोगामी राहिली आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत आणि लिंग या पाचही प्रमुख घटकांच्या बाबतीत समाजाने अधिकाधिक उदारमतवादी, सहिष्णू होत जावे, संकुचितपणा अधिकाधिक कमी होत जावा, या आशयाचा सूर साधनातील लेखनाच्या मध्यवर्ती राहिला आहे. आणि सर्व प्रकारच्या उपेक्षित व वंचित घटकांना अधिकाधिक झुकते माप मिळायला हवे, किंबहुना त्यांचे होत असलेले शोषण व त्यांच्यावर होत असलेला अन्याय थांबायला हवा, याबाबत साधना आग्रही राहिली आहे.

साने गुरुजींनी साधनाच्या पहिल्या अंकातील संपादकीय निवेदनात केलेले एक विधान साधनाच्या वाटचालीचा गाभाघटक राहिले आहे. ‘विषमता व वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे’ हेच ते विधान. इथे सर्व प्रकारच्या विषमता आणि सर्व प्रकारचे वैरभाव गुरुजींना अभिप्रेत आहेत. त्याच निवेदनात त्यांनी स्वातंत्र्य या संकल्पनेवरही मूलभूत विधान केले आहे. ‘स्वातंत्र्य म्हणजे संधी, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी’ या विधानातून सत्‌ व असत्‌ यांचे भान सातत्याने राखले पाहिजे असे त्यांनी सूचित केलेले आहे. एकंदरीत विचार करता, भारतीय संविधानाचे प्रतिबिंब त्या निवेदनात पहायला मिळते.

साने गुरुजींच्या नंतर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान व वसंत बापट, नरेंद्र दाभोलकर या संपादकांनी अनेक लहान-थोरांचे सहकार्य/सहभाग मिळवून साधनाची वाटचाल अखंडित व वर्धिष्णू ठेवली. त्या सर्वांना एस.एम.जोशी, सदानंद वर्दे, मोहन धारिया, आप्पासाहेब सा.रे.पाटील व अन्य विश्वस्तांची मोलाची साथ राहिली. आणि अर्थात, गावोगावी विखुरलेल्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना साधनाच्या खंबीर पाठीराख्या राहिल्या आहेत. अन्यथा, हा असा प्रवास होऊच शकला नसता.

साधना साप्ताहिकाने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले तेव्हा डॉ.नरेंद्र दाभोलकर साधना साप्ताहिकाच्या संपादकपदावर आले. पुढील 15 वर्षांत त्यांनी साधनाच्या आतील व बाहेरील अनेक घटकांचे सहकार्य मिळवून, साधनाचे अंतरंग व बहिरंग यांना नवी झळाळी दिली. त्या   बदलांमुळे साधनाच्या गुणात्मक व संख्यात्मक वाढीसाठी अधिक वाव मिळाला. साधनाच्या हीरकमहोत्सवी वर्षात तर डॉक्टरांनी अशी पायाभरणी केली की, अमृतमहोत्सवी वाटचाल सुखकर व्हावी.

त्या वर्षात सुरू केलेले बहुतांश उपक्रम व कार्यक्रम पुढे चालत राहिले. परिणामी बालकुमार व युवा दिवाळी अंक हे जणू काही साधना साप्ताहिकाचे स्वतंत्र युनिट आहे, इथपर्यंत प्रगती साधताआली. आणि साधना साप्ताहिताचे बायप्रॉडक्ट वाटणाऱ्या साधना प्रकाशनाने पुन्हा एकदा नवे रूप धारण केले आहे. आता प्रामुख्याने पुस्तक विक्रीकेंद्र म्हणून कार्यरत असलेल्या साधना मीडिया सेंटरला उर्जितावस्था देण्यासाठी साधना ट्रस्टच्या नियोजनात काही नव्या संकल्पना आहेत. शिवाय साधनाच्या वतीने (नवे लेखक व नवे कार्यकर्ते यांच्यासाठी) रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग सेंटर सुरूकरण्याची कल्पनाही विचाराधीन आहे. याबाबतची प्रक्रिया पुढील एक-दोन वर्षांत आकार घेऊ लागेल. परंतु साधना साप्ताहिक 72 व्या वर्षात पदार्पण करीत असताना दोन महत्त्वाची पावले साधना ट्रस्टमार्फत टाकली जात आहे, त्याबाबत इथे जरा विस्ताराने व संदर्भासह सांगणे आवश्यक वाटते.

साधनाच्या जुन्या-जाणत्या वाचकांना हे चांगले माहीत आहे की, ‘कर्तव्य’ या शब्दसंकल्पनेचे साधनाशी घनिष्ट नाते आहे. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साने गुरुजींनी 21दिवसांचे उपोषण सुरू केले आणि उपोषणाच्या 14 व्या दिवशी त्यांनी ‘कर्तव्य’ नावाचे छोटे सायंदैनिक सुरू केले. मात्र फक्त दोन-चार पानांचे आणि सायंदैनिक असले तरी त्याचा व्याप खूप जास्त असतो, विशेषत: त्यात सातत्य राखणे हे कठीण आव्हान असते. अर्थकारण, मनुष्यबळ आणि सर्जनशीलता या तीनही बाबतीत ती तारेवरची कसरत असते. आणि गुरुजींना तर ते सायंदैनिक ध्येयवादी पद्धतीने चालवायचे होते. त्यामुळे ती कसरत जीवघेणी होतेय हे लक्षात आल्यावर चारच महिन्यांनी त्यांनी ‘कर्तव्य’ बंद केले.

मात्र गुरुजींना स्वस्थ बसवत नव्हते. मग पुन्हा नव्याने जुळवाजुळव करून, त्यानंतर दोनच महिन्यांनी त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. विशेष म्हणजे, साधना साप्ताहिकाच्या पहिल्या अंकातीलसंपादकीय निवेदनात गुरुजींनी हेही लिहून ठेवले आहे की, ‘सर्व काही पुन्हा जुळून आले तर कर्तव्य पुन्हा जन्माला येईलही कदाचित.’ परंतु त्यानंतर जेमतेम पावणेदोन वर्षांनीच गुरुजी गेले. त्यामुळे गुरुजींची साधना जगवणे, वाढवणे व नावारूपाला आणणे हेच त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांनी आपले ध्येय मानले. अनेक वाटा-वळणे व खाच-खळगे पार करून, साधना आता पाऊण शतकाच्या उंबरठ्यावर आली आहे.

दरम्यानच्या काळातील साधनाच्या धुरिणांना ‘कर्तव्य’ची आठवण अधूनमधून होत होती, काहीतरी करायला हवे असे सूरही अधूनमधून उमटत होते. एवढेच नाही तर, 1975 च्या आणीबाणीच्या काळात जेव्हा साधनाच्या काही अंकांवर जप्ती आली, तेव्हा ‘कर्तव्य’ या नावाने काही अंकही छापून वितरित करण्यात आले होते. तेव्हा त्या अंकांमध्ये कुठेही साधनाचा उल्लेख नसला तरी हे‘कर्तव्य’ म्हणजेच साधना, हे जुन्या-जाणत्या वाचकांनी ओळखले होते.

आता नव्या काळाची पावले ओळखून साधनाने डिजिटल माध्यमातही प्रवेश करायचे ठरवले आहे. कारण इंटरनेटचे जाळे देशभर इतके पसरले आहे की, ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांच्या हातातही स्मार्टफोन आलेले आहेत. तरुणाईच्या जगण्यातला तर तो अविभाज्य भाग झाला आहे. माहितीचा अक्षरश: मारा होत आहे. मात्र त्यातही सकस मजकुराची वानवा आहे. माहितीवर(वर्गीकरण, विश्लेषण, निष्कर्ष) प्रक्रिया करून, तिची चिकित्सा करून, समाजाभिमुख दृष्टिकोन देता येणे ही या काळाची मागणी आहे. त्यामुळे ‘सिरियस जर्नालिझम’ ही संज्ञा मुख्य प्रवाहातील माध्यमांकडूनही वापरली जात आहे. त्यामुळेही कदाचित ‘साधनाने डिजिटल क्षेत्रात उतरायला हवे’ असा आग्रह विविध क्षेत्रांतील साधनाच्या हितचिंतकांकडून आणि त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजेनव्या पिढीकडून/तरुणाईकडून सातत्याने धरला जात होता.

बाहेरच्या लोकांना याची नीट कल्पना येणार नाही,   पण हे वास्तव आहे की- मागील दहा वर्षे साधनाचे बालकुमार दिवाळी अंक आणि मागील पाच वर्षे युवा दिवाळी अंक मोठ्या प्रमाणात नव्या पिढीपर्यंत पोहोचले आहेत. तिथे साधनाच्या वाढीला व विकासाला खूप वाव आहे. आणि म्हणून या पिढीच्या हातात अगदी सहज व सुलभ पद्धतीने साधनाला अगत्य असलेले विषय, भूमिका, दृष्टिकोन जायला हवे. त्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करायला हवा. म्हणून आम्ही दूरगामी परिणाम करू शकणारी दोन पावले टाकत आहोत. एक साप्ताहिक साधनाचे डिजिटल अर्काइव्हआणि दुसरे पाऊल- ‘कर्तव्य साधना’ हे डिजिटल पोर्टल.

साप्ताहिकाचे डिजिटल अर्काइव्ह म्हणजे मागील 71 वर्षांच्या अंकांवर बरीच तांत्रिक प्रक्रिया करून, ते सहज व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे. हे काम दोन-तीन टप्प्यांत पूर्ण करावे लागेल. त्यातील पहिला टप्पा आम्ही हाती घेतला आहे. त्यानुसार 2007 ते 2019 या 13 वर्षांच्या सर्व म्हणजे जवळपास साडेसहाशे अंकांचे युनिकोडमध्ये रूपांतर करून (सध्या ते अंक पीडीएफमध्येआहेत.) लेखक, विषय व लेखनप्रकार यानुसार त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम चालू आहे. हे पूर्ण झाले की, कोणालाही व कुठेही तो सर्व ऐवज (जवळपास साडेसहा हजार लेख) मोबाईलवर वाचता येणार आहे.

हा टप्पा पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यानंतर 1948 ते 2006 या 58 वर्षांतील अंकांचे असे आधुनिक अर्काइव्ह करण्याचा प्रकल्प विचाराधीन आहे. ते सर्व (जवळपास 2900) अंक दहा वर्षांपूर्वीच स्कॅन करून ठेवलेले आहेत. परंतु तांत्रिक प्रक्रिया करून त्यांचे पहिल्या टप्प्याप्रमाणेच अर्काइव्ह करण्याचे काम अधिक किचकट, अधिक वेळखाऊ आणि मुख्य म्हणजे अधिकखर्चिकही आहे. त्यामुळे या 58 वर्षांचे अर्काइव्ह पूर्ण व्हायला आणखी किती काळ लागेल हे सध्या तरी सांगता येत नाही.

साधना ट्रस्टकडून टाकले जात असलेले दुसरे पाऊल म्हणजे ‘कर्तव्य साधना’ हे डिजिटल पोर्टल, 9 ऑगस्ट 2019 च्या पूर्वसंध्येला ते कार्यान्वित झाले आहे. त्यावर लेख, मुलाखती, रिपोर्ताज, भाषणे असा लिखित मजकूर असेल आणि ऑडिओ व व्हिडिओही असतील. सध्या तरी रोज संध्याकाळी एक किंवा दोन लेख/ऑडिओ/ व्हिडिओ अपलोड केले जातील, पुढे-पुढे हे प्रमाण वाढत जाईल. त्यामुळे एका मर्यादित अर्थाने याला सायंदैनिक म्हणता येईल.

नियोजन असे आहे की, ‘कर्तव्य’वरील मजकूर साप्ताहिकात नसेल आणि साप्ताहिकातील मजकूर कर्तव्यवर नसेल. कर्तव्यवरील लेखनाची शब्दमर्यादा कमी (800 ते 1500 शब्द) ठेवली आहे. आणि ऑडिओ/ व्हिडिओ यांची वेळमर्यादाही प्रत्येकी जास्तीत जास्त 10 मिनिटे ठेवली आहे. डिजिटल माध्यमावरील वाचक- प्रेक्षकांचा ‘अटेंशन स्पॅन’ लक्षात घेऊन ही मर्यादा आखली आहे. शिवाय, कर्तव्यवर रोज काहीतरी प्रसिद्ध करता येणार असल्याने, ताजे विषय अधिक प्रमाणात हाताळता येणार आहेत. (याबाबत साप्ताहिकाला बऱ्याच मर्यादा येतात, कारण लेखकाकडून लेख येणे ते अंकवाचकांच्या हातात पडणे यात दहा दिवसांचा काळ तरी जातोच.)

एकंदरीत विचार करता साप्ताहिक साधना व कर्तव्य साधना ही दोन भावंडे परस्परांना पूरक भूमिका बजावत राहतील, त्यामुळे दोन्हींचाही उत्कर्ष होण्याची शक्यता वाढीस लागेल अशी आशा आहे.डिजिटल प्रकल्पासाठी (अर्काइव्ह व कर्तव्य) नव्या दमाची तरुणाई साधनात दाखल करून घेतली आहे, आणखी काहींचा सहभाग आवश्यक ठरणार आहे. EVONIX या सॉफ्टवेअर कंपनीकडून डिझाइन करून घेतले आहे. या कामासाठी MKCL या संस्थेने बरेच तांत्रिक साह्य पुरवले आहे, IPSMF या संस्थेने भरीव अर्थसाह्य केले आहे. याशिवायही अनेकांची या ना त्या प्रकारची मदत झालेली आहे. मात्र हा गाडा सातत्यपूर्ण व अधिकाधिक गतीने चालवायचा असेल तर साधना ट्रस्टला आर्थिक व अन्य प्रकारचे सहकार्य देण्यासाठी अधिकाधिक हितचिंतकांनी पुढे यावे अशी विनंती आहे, आवाहन आहे! 

साधना साप्ताहिकाची वेबसाईट http://weeklysadhana.in/ 
‘कर्तव्य साधना’ची वेबसाईट http://kartavyasadhana.in/  
या दोन्ही वेबसाईटस्‌ परस्परांना जोडलेल्या आहेत, त्यामुळे एकीवरून दुसरीवर क्षणात जाता येते.

Tags: कर्तव्य साधना संपादकीय Editorial Kartavya Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके