डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

टिळकांना समजून घ्यायचे ते यामुळे...!

टिळकांचे ब्राह्मण असणे किंवा बहुजन नसणे हेच त्यांचा पुतळा न उभारण्याचे मुख्य कारण आहे, हे त्यातून ध्वनित होते आहे आणि ती चूक आहे, हे त्यात निःसंदिग्धपणे बजावले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या सरकारने ती चूक पुढील दीड वर्ष आणि भाजप सेना-युती सरकारने त्यापुढील साडेचार वर्षे तशीच दुर्लक्षित ठेवली. गेल्या वर्षी (18 जून 2019 रोजी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा उभारला जाईल’, असा सरकारचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यापुढील सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी आणि नंतरच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाआघाडी सरकारनेही त्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. इतर वेळी अशी दिरंगाई क्षम्य मानता आली असती, पण लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आले आणि गेले तरी वैचारिक क्षुद्रपणा काँग्रेस व राष्ट्रवादीला सोडता आलेला नाही, आणि ‘आम्ही उशिरा का होईना घेतलेल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी करा’ अशी मागणी करण्याचे शौर्य व धैर्य भाजपला (व शिवसेनेला) दाखवता आलेले नाही. महाराष्ट्राचे राज्यकर्ते किती संकुचित व मतलबी आहेत, याचा हा आणखी एक पुरावा.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856 - 1 ऑगस्ट 1920) यांना 64 वर्षांचे आयुष्य लाभले. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी सार्वजनिक कार्यास आरंभ केला. लोकशिक्षण हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले, त्यासाठी काही समविचारी मित्रांसह दोन आघाड्यांवर काम सुरू केले. न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज यांची स्थापना केली आणि त्याच वेळी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही अनुक्रमे मराठी व इंग्रजी साप्ताहिक वृत्तपत्रे सुरू केली. शाळा-महाविद्यालये सुरू करताना, देशकार्यासाठी नवी पिढी तयार करता येईल, असा अंत:स्थ हेतू होता. वृत्तपत्रे सुरू करण्यामागे कालच्या व आजच्या पिढ्यांचे प्रबोधन करणे, हा उघड हेतू होता. इथपासून सुरू झालेला सार्वजनिक कार्याचा त्यांचा प्रवास अनेक वाटा-वळणे व चढ-उतार पार करीत पुढील 40 वर्षे (1880 ते 1920) अखंड चालू राहिला. यातील साडेसात वर्षे तुरुंगवासाची होती.

या चार दशकांचे ठळक असे दोन भाग दिसतात. पूर्वार्धात ते प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत होते, उत्तरार्धात मात्र ते राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेते झाले. इतके की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगताना ‘टिळक पर्व’ असा उल्लेख केला जातो आणि त्यांच्या मृत्यूनंतर ‘गांधी पर्व’ सुरू झाले, असे मानले जाते. टिळक व गांधी या दोघांच्या धारणा व कार्यशैली यांमध्ये फरक दिसत असला तरी, त्यांच्यात आंतरिक संगती कशी होती, याबाबत देश-विदेशांतील अनेक अभ्यासकांनी नोंदवून ठेवले आहे. मराठीतही आचार्य जावडेकर ते सदानंद मोरे इथपर्यंतच्या अभ्यासकांनी ते अधिक चांगले अधोरेखित केले आहे. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही टिळकांनी सांगितलेली चतु:सूत्री गांधींच्या राजकारणाशी नाते सांगणारीच आहे. त्यामुळे एवढे तरी निश्चित की, गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ देशभर सर्वत्र पोहोचवली, त्याची पायाभरणी करण्याच्या कामात टिळकांचे मोठेच योगदान होते आणि म्हणूनच त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे संबोधले गेले.

अशा या टिळकांचे जन्मशताब्दी वर्ष 1955-56 मध्ये आले, तेव्हा देशभर विविध कार्यक्रम व उपक्रमांनी जल्लोषात साजरे झाले. स्वातंत्र्य मिळून दशकभराचाही कालखंड उलटला नसल्याने ते साहजिक होते. त्यानंतर मात्र टिळकांचे स्मरण क्रमाक्रमाने कमी होऊ लागले. हे खरे आहे की, कोणत्याही महनीय व्यक्तीच्या जन्मशताब्दीनंतर तिचे स्मरण कमी होऊ लागते. याचे मुख्य कारण, समाजजीवनात बदल खूप झालेले असतात आणि त्या व्यक्तीचे विचारकार्य समाजाने आत्मसात केलेले असते. दुसरे कारण, समाजाने आपल्या गरजांनुसार पूर्णतः नव्यांना किंवा जुन्यांपैकी काहींना नव्याने समजून घेतलेले असते. तिसरे कारण असे की, त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी ठरलेल्या असतात, त्यामुळे  त्यांच्याशी नाते सांगणे अडचणीचे किंवा अवघड वाटू लागते. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत तिसरे कारण जास्त परिणाम करून गेले.

म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दीनंतरच्या काळात ब्राह्मणेतर व बहुजन चळवळी आकार घेऊ लागल्या आणि प्रत्येक समाजघटकांच्या अस्मिता जाग्या होऊ लागल्या, नवे आदर्श पुढे येऊ लागले. त्या चळवळी व अस्मिता योग्यच होत्या. त्यांचे आदर्श पुढे येणेही आवश्यकच होते. मात्र त्या जल्लोषात, अलौकिक कर्तृत्व गाजवलेल्या (काही महनीय व्यक्तींप्रमाणेच) टिळकांचे काही विचार व वर्तन टीकेचा विषय होऊ लागले. ती टीका काही प्रमाणात रास्त होतीच, मात्र टीकाकारांना वाटणारा आकस व त्यांनी केलेला विपर्यास यांचाही वाटा मोठा होता. शिवाय, काळाच्या परिप्रेक्ष्यात महापुरुषांचे आकलन करून घेण्याची सवय भल्याभल्यांना नसणे, याचाही काही परिणाम झाला. त्यामुळे कार्यकर्ते, अभ्यासक व जनसामान्य यांच्यात तो कैफ इतका चढत गेला की, त्यातील काहींनी टिळकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मग टिळकांच्या उर्वरित कार्याच्या समर्थनार्थ वा बचावासाठी पुढे येऊ पाहणाऱ्यांना निकालात काढले जाऊ लागले. आणि ‘तेवढ्या कारणावरून त्यांचे कर्तृत्व मातीमोल कसे ठरवता येईल’ असे विचारणाऱ्यांना प्रतिगाम्यांचे समर्थक समजले जाण्याइतपत मजल मारली जाऊ लागली. या प्रक्रियेमुळे दखल न घेतली जाणे किंवा अनुल्लेखाने मारणे किंवा दुर्लक्ष करणे हे प्रकार मागील पाव शतकात सर्वाधिक घडले ते लोकमान्य टिळकांबाबत!

म्हणून लोकमान्य टिळक यांचे स्मृतिशताब्दी वर्ष (2019-2020) आले आणि गेले. काँग्रेस पक्षाचा झालेला अभूतपूर्व ऱ्हास पाहता राष्ट्रीय पातळीवर त्यांच्याकडून काही घडवले जाण्याची अपेक्षा नव्हतीच. पण ज्या महाराष्ट्राने अनेक कार्यक्रम व उपक्रम याद्वारे गांधी 150 मागील दोन वर्षे साजरी केली, त्या महाराष्ट्राने टिळक स्मृतिशताब्दीची उपेक्षाच केली. हे खरे आहे की, या स्मृतीवर्षातील अखेरचे चार महिने कोरोना संकटामुळे फार काही करायला वाव नव्हता, मात्र हे संकट नसते तरी फार काही घडले नसते...!

अशा पार्श्वभूमीवर साधनाचा हा टिळकस्मृती अंक येत आहे. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते. त्या सर्वांवर एकेक रोचक लेख होऊ शकेल. उदाहरणार्थ, टिळक आणि आगरकर, टिळक आणि केसरी व मराठा, टिळक आणि गीतारहस्य, टिळक आणि संस्कृत, टिळक आणि काँग्रेस, टिळक आणि बॅरिस्टर जीना व अन्य कायदेतज्ज्ञ इत्यादी. ते सर्व अधोरेखित करायचे म्हणजे स्वतंत्र पुस्तकच करावे लागेल (आणि तशी बरीच पुस्तके आधीपासून उपलब्ध आहेत.) आणि म्हणून टिळकांच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका याबाबत कुतूहल निर्माण करावे, असा माफक हेतू समोर ठेवला. त्याप्रमाणे या अंकात प्रातिनिधिक म्हणावेत असे सहाच लेख घेतले आहेत.

टिळकांच्या भाषेची, शैलीची व विचारप्रतिपादनाची झलक दाखवणारा त्यांचा स्वतःचा एकच लेख या अंकात सादर करायचा असे ठरवले होते. त्यासाठी अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध होते, मात्र त्यातील न्या.रानडे यांच्यावरील मृत्युलेख आम्हाला अनेक कारणांमुळे महत्त्वाचा वाटला. टिळकांसाठी सुरुवातीच्या पाच-सात वर्षांच्या काळात रानडे हे मेन्टॉरसारखेच होते. नंतर मात्र त्यांच्यातील वैचारिक दरी इतकी रुंदावत गेली की, ते दोघे परस्परविरुद्ध पक्षांचे वाटावेत असे झाले, विशेष म्हणजे त्यात आक्रमकाच्या भूमिकेत टिळक होते. परिणामी, नंतरची दहा-बारा वर्षे रानडे व त्यांचे समर्थक यांच्यावर टिळकांनी अनेक वेळा जहरी व बोचरी टीका केली. रानड्यांचा मृत्यू 1901 मध्ये झाला, तेव्हा केसरीमध्ये टिळकांनी लिहिलेला हा लेख आहे. यातून रानड्यांचे मोठेपण व योगदान अधोरेखित करताना टिळकांनी हातचे राखून ठेवलेले नाही आणि एकही विशेषण औचित्याचा भाग म्हणून वापरल्याचे जाणवत नाही. टिळक किती परिपक्व व दूरदृष्टीचे होते हेही यातून प्रकर्षाने पुढे येते. (त्या वेळी टिळक अवघे 45 वर्षांचे होते.)

‘लोकमान्य ते महात्मा’ हे मन्वंतर कसे घडून आले, याचा विस्तृत व स्तिमित करणारा पट ज्यांना पकडता आला त्या सदानंद मोरे यांची दीर्घ मुलाखत जाणीवपूर्वक अशा पद्धतीने घेतली आहे की, लोकमान्य टिळक व त्यांचा काळ यांचे चांगले भान वाचकांना येईल. त्यांची मुलाखत जेथे थांबली आहे, तोच धागा पुढे घेऊन जाईल असा लेख कुमार केतकर यांच्याकडून आला आहे. त्यांनी एकोणिसाव्या व विसाव्या शतकांना जोडणारा भारतीय राजकारणातील दुवा हे टिळकांचे स्थान अधोरेखित केले आहे. जुन्या व नव्यांना जोडणारा दुवा, हा मुद्दा लक्षात घेतला तर टिळकांच्या भूमिकेतील काही भाग नव्या संदर्भात कालबाह्य व मागे खेचणारा वाटणे साहजिक आहे, असेही त्यातून समजून घेता येईल.

टिळक आणि मंडाले या विषयाची जुजबी तोंडओळख सर्वांनाच असते, पण त्याविषयी नेमके आकलन फार कमी लोकांना असते. म्हणून अरविंद गोखले यांना अशी विनंती केली होती की, मंडालेतील टिळकांची सहा वर्षे आणि त्याचा मागचा-पुढचा पट सविस्तरपणे वाचकांसमोर यायला हवा. त्यांनी तो असा मांडला आहे की, कल्पनारम्य नाटकापेक्षा अधिक रोचक झाला आहे. त्यातून टिळकांच्या अनेक गुणांची नव्याने खात्री पटते. असाच काहीसा प्रकार ‘टिळक व गणित’ हा विषय निवडण्यामागे होता. टिळकांच्या बुद्धिमत्तेचे व पांडित्याचे उल्लेख सर्वत्र येत असतात, त्यामुळे गणिताला स्पर्श करून त्याबाबत काही दिशादर्शन करता येते का, असा तो विचार होता. त्या संदर्भात तपशील कमी मिळतात आणि जे मिळतात ते त्रोटक, त्यामुळे टिळक व गणित हे प्रकरण समजून घ्यायला मर्यादा पडतात. मात्र त्याबाबत अधिक संशोधन व्हायला हवे, असे तीव्रतेने वाटायला लावणारा हा लेख आहे.

या अंकात अखेरचा लेख वस्तुतः पुनर्मुद्रण आहे. सात वर्षांपूर्वी तो साधना साप्ताहिकातच प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख पुनर्मुद्रित करताना आनंद झालेला नसून, मोठी खंत वाटलेली आहे. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे उद्‌घाटन 4 जून 2013 रोजी झाले. तेव्हा तेथील प्रांगणात महाराष्ट्राचे प्रातिनिधिक महापुरुष म्हणून शिवाजीमहाराज, महात्मा फुले, शाहूमहाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण या पांच जणांचे पुतळे उभारले आहेत. यामध्ये टिळकांचा पुतळा का नाही, असा मार्मिक सवाल उपस्थित करणारा (नाट्यरूपातील) लेख सदानंद मोरे यांनी लिहिला होता.

टिळकांचे ब्राह्मण असणे किंवा बहुजन नसणे हेच त्यांचा पुतळा न उभारण्याचे मुख्य कारण आहे, हे त्यातून ध्वनित होते आहे आणि ती चूक आहे, हे त्यात निःसंदिग्धपणे बजावले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या सरकारने ती चूक पुढील दीड वर्ष आणि भाजप सेना-युती सरकारने त्यापुढील साडेचार वर्षे तशीच दुर्लक्षित ठेवली. गेल्या वर्षी (18 जून 2019 रोजी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा उभारला जाईल’, असा सरकारचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यापुढील सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी आणि नंतरच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाआघाडी सरकारनेही त्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. इतर वेळी अशी दिरंगाई क्षम्य मानता आली असती, पण लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आले आणि गेले तरी वैचारिक क्षुद्रपणा काँग्रेस व राष्ट्रवादीला सोडता आलेला नाही, आणि ‘आम्ही उशिरा का होईना घेतलेल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी करा’ अशी मागणी करण्याचे शौर्य व धैर्य भाजपला (व शिवसेनेला) दाखवता आलेले नाही. महाराष्ट्राचे राज्यकर्ते किती संकुचित व मतलबी आहेत, याचा हा आणखी एक पुरावा.

असो. टिळकांच्या संदर्भात असे अनेक विषय उपस्थित करता येतील. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आणखी वेगळ्या बाजूने प्रकाश टाकणारा विनय हर्डीकर यांचा एक दीर्घ लेख साधनाच्या येत्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करणार आहोत. टिळकांचे जीवन व कार्य अनोख्या पद्धतीने सांगणारे एक महत्त्वाचे पुस्तक आणखी वर्षभराने म्हणजे टिळकांच्या 101 व्या स्मृतिदिनी आणणार आहोत. त्याविषयी इथे थोडक्यात नोंद करणे आवश्यक वाटते.

लोकमान्य टिळक यांचे जन्मशताब्दी वर्ष 1955-56 मध्ये साजरे होणार होते, तेव्हा त्यांच्यावर कोणत्याही भाषेत पुस्तक लिहिण्याची स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर घोषित झाली होती. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने ती स्पर्धा आयोजित केली होती, त्यासाठी दहा हजार रुपयांचे पारितोषिक घोषित झाले होते. त्या स्पर्धेत अव्वल म्हणून निवडले गेलेले पुस्तक होते अ.के. भागवत व ग.प्र. प्रधान यांनी लिहिलेले ‘लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी’. ते दोघेही त्या वेळी वयाच्या पस्तिशीतील इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांनी साडेसहाशे पानांचे ते पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिले आहे. ते लिहीत असताना मार्गदर्शनासाठी त्या दोघांनी महिनाभर आचार्य जावडेकर यांच्या घरी (इस्लामपूर, जिल्हा सांगली) मुक्काम ठोकला होता. त्या पुस्तकात टिळकांच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका नेमकेपणाने पकडलेला आहे. त्याला तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी प्रास्ताविक लिहिले आहे. ते पुस्तक नंतरच्या काळात बाजूला पडले, त्यानंतर बरीच वर्षे ते आऊट ऑफ प्रिंट होते. बारा वर्षांपूर्वी त्याची नवी आवृत्ती जयको पब्लिकेशन्सकडून आली आहे, मात्र त्याचा मराठी अनुवाद अद्यापही आलेला नाही. साधनाचे संपादक राहिलेले ग.प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणखी वर्षभराने सुरू होत आहे, ते औचित्य लक्षात घेऊन त्याचा मराठी अनुवाद साधना प्रकाशनाकडून आणणार आहोत.

Tags: बाळ गंगाधर टिळक संपादकीय टिळक स्मृती अंक स्मृतिशताब्दी लोकमान्य टिळक vinod shirsath sadhana editorial on tilak lokmanya bal gangadhar tilak tilak 100 tilak death anniversary editorial on tilak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके