डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी

अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने 1994 पासून ‘साहित्य’ क्षेत्रातील व्यक्तींना आणि 1996 पासून ‘समाजकार्य’ क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार दिले जातात. पूर्वी या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’च्या वतीने केले जात होते, गेल्या वर्षीपासून या पुरस्कारांचे संयोजन ‘साधना ट्रस्ट’ करीत आहे.

अमेरिकेत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेच्या वतीने 1994 पासून ‘साहित्य’ क्षेत्रातील व्यक्तींना आणि 1996 पासून ‘समाजकार्य’ क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार दिले जातात. पूर्वी या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’च्या वतीने केले जात होते, गेल्या वर्षीपासून या पुरस्कारांचे संयोजन ‘साधना ट्रस्ट’ करीत आहे.

केशव गोरे स्मारक ट्रस्ट व महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थांनी पंधरा वर्षे या पुरस्कारांची कार्यवाही ज्या पद्धतीने केली त्यामुळे या पुरस्कारांना महाराष्ट्राच्या साहित्यिक व सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पुरस्कारांची ही प्रतिष्ठा वृद्धिंगत होत राहील यासाठी यापुढील काळात महाराष्ट्र फाउंडेशनला साधना ट्रस्ट सहकार्य करणार आहे. साहित्य व समाजकार्य या दोन क्षेत्रांत मिळून दरवर्षी दहा ते बारा पुरस्कार अर्ज न मागवता दिले जातात. साहित्य क्षेत्रात एक जीवनगौरव पुरस्कार आणि चार किंवा पाच ग्रंथ पुरस्कार, तर समाजकार्य क्षेत्रात एक जीवनगौरव आणि चार किंवा पाच कार्यकर्ता पुरस्कार अशी सध्याची विभागणी आहे.

या पुरस्कारांसाठी वेगवेगळ्या समित्या असतात आणि त्या समित्यांत त्या-त्या क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश केलेला असतो. या समित्यांतील सदस्यांकडून पुरस्कारांसाठी व्यक्तींचा वा ग्रंथांचा शोध स्वत:हून घेतला जातो, त्यासाठी अन्य मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा केली जाते आणि संबंधित क्षेत्रांतील महाराष्ट्रातील 300 ते 400 जाणकार व्यक्तींना पत्र पाठवून त्यांच्याकडून शिफारसी मागवल्या जातात. या सर्व प्रक्रियेतून प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावे अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या निवड समितीला कळवली जातात, त्यातून प्रत्येक पुरस्कारासाठी एक नाव निश्चित केले जाते. या निवडप्रक्रियेत व्यक्तीने मांडलेला विचार वा प्रत्यक्ष कार्य यांचे वेगळेपण पाहिले जाते, त्याची सामाजिक उपयुक्तता तपासली जाते.

या वर्षी साहित्य व समाजकार्य क्षेत्रांतील एकूण बारा व्यक्ती पुरस्कारासाठी निवडल्या असून, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना लक्षवेधी प्रशासकीय कार्यासाठी गौरविले जात आहे. या सर्व 13 पुरस्कारप्राप्त व्यक्तींवरील प्रत्येकी दोन लेख (‘मनोगत’ आणि ‘ओळख’) समाविष्ट असलेला हा विशेषांक साधना साप्ताहिकाचे सर्व (सात हजार) वर्गणीदार आणि पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित असणाऱ्या सर्वांना (एक ते दीड हजार) दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या विचारांचा व कार्याचा परिचय होईल आणि अशा प्रकारचे काम करू इच्छिणाऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी ‘मनोगत’मध्ये स्वत:चा जीवनविषयक दृष्टिकोन, आपल्या कामामागील प्रेरणा आणि आजच्या सामाजिक जीवनावर भाष्य या तीनपैकी एक-दोन किंवा तीनही घटकांवर लिहावे अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. ‘ओळख’मध्ये पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे विचार व कार्य यांच्याशी उत्तम परिचय असलेल्या व्यक्तीला लिहिण्यास सांगितले होते आणि त्यात त्यांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या विचारांचे व कार्याचे वेगळेपण कशात आहे, त्यांचे नेके योगदान काय आहे आणि आजच्या काळातही त्यांचे विचार व कार्य किती प्रस्तुत आहे या संदर्भात लिहावे अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. वेळ व शब्दसंख्या या दोहोंची मर्यादा असल्याने ‘मनोगत’ व ‘ओळख’मधील प्रत्येक लेखातून विस्तृत मांडणी केलेली नसली तरी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या विचारांची व कार्याची झलक मात्र त्यातून पाहायला मिळते आणि त्यांच्याबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते.

‘मनोगत’ व ‘ओळख’मधील लेखांची शीर्षके त्या-त्या व्यक्तींच्या विचारांचा व कार्याचा गाभा सूचित करणारी आहेत. या अंकाचे मुखपृष्ठ साधे पण अर्थपूर्ण आहे. साहित्यक्षेत्रातील व समाजकार्यातील धागे यांची गुंफण केली तर घट्ट वीण असलेले समाजवस्त्र तयार होते. म्हणजे विचार व कृती यांचा योग्य समन्वय किंवा परस्पर सहकार्य चालू राहिले आणि व्यवस्थेत काम करणारे धागे त्या पार्श्वभूीवर पूरक भूमिका निभावत राहिले तर आपला समाज प्रगतीची-विकासाची वाट चालू लागतो, असा अर्थ मुखपृष्ठातून ध्वनीत होत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार वितरण समारंभाला मालदीवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे आणि ज्येष्ठ नाट्य-चित्रपट अभिनेते नाना पाटेकर हे दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वर्षीच्या समारंभाला ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर आणि अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोघांचाही ‘परिचय’ करून देणारे दोन लेख या अंकाच्या शेवटी आहेत.

‘समाजाभिमुख संशोधक’ आणि ‘मानवी नात्यांचा शोध घेणारा दिग्दर्शक’ ही अनुक्रमे माशेलकर व पालेकर यांच्यावरील लेखांची शीर्षकेच त्यांच्या विचारांचा व कार्याचा गाभा दाखवतात आणि त्यावरूनही, या पुरस्कारांच्या वितरणासाठी ते किती योग्य पाहुणे आहेत हे लक्षात येते. गेल्या वर्षी आणि याही वर्षी राष्ट्रीय स्तरावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्रीय व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला लाभल्या याचा आम्हांला आनंद वाटतो, अभिमान वाटतो. पुरस्कार निवडीची प्रक्रिया, पुरस्कार वितरण समारंभ आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींवरील विशेषांक अशी तिहेरी संधी महाराष्ट्र फाउंडेशन व ज्यांच्या मोठ्या देणगीतून हे पुरस्कार सुरू झाले ते सुनील देशमुख यांनी साधना ट्रस्टला व पर्यायाने साधना साप्ताहिकाला मिळवून दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत! 

Tags: रघुनाथ माशेलकर अमोल पालेकर महाराष्ट्र फौंडेशन संपादकीय महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके