डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तरुण साहित्यिकांस विज्ञापना

मोठ्या समूहापर्यंत आपलं साहित्य पोहोचावं असं वाटत असेल; दीर्घकाळ आपली साहित्यकृती टिकून राहावी असं वाटत असेल आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरेल अरस लेखन करण्याची आकांक्षा असेल, तर 'भाषा व विज्ञान' या दोन विषयांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची खुणगाठ तरुण मराठी साहित्यिकांनी व मराठी साहित्य प्रसवू इच्छिणाऱ्या तरुणांनी मनाशी बांधली पाहिजे!

तरुण मराठी साहित्यिकांनो आणि मराठी साहित्य प्रसवू इच्छिणार्या तरुणांनो, 'विशाखा' या नक्षत्राचं नाव कवी कुसुमाग्रजांनी स्वतःच्या एका काव्यसंग्रहाला दिलं. त्याच काव्यसंग्रहासाठी कुसुमाग्रजांना राष्ट्रीय स्तरावरील साहित्यासाठी दिला जाणारा 'ज्ञानपीठ' हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला; पण त्यांचा वेगळा आणि विशेष सन्मान झाला, स्वीत्झर्लंडमधील 'इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या संस्थेने आकाशातील एका ताऱ्याला 'कुसुमाग्रज' हे नाव बहाल केलं तेव्हा! याच कुसुमाग्रजांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करतो.

‘आकाश निळं का दिसतं’ याचं स्पष्टीकरण देणारा 'स्कॅटरिंग ऑफ लाइट' हा सिद्धांत सी. व्ही. रामन यांनी मांडला. भौतिकशास्त्रातील या कामगिरीसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानला जाणारा 'नोबेल' पुरस्कार मिळाला. 28 फेब्रुवारी हा त्या सिद्धांताचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करतो.

मित्रांनो, या दोन दिवसांचं औचित्य साधून, दोन महत्त्वाच्या मुद्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. सामाजिक बदलांसाठी मागच्या पिढीकडून फार अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही, याची पक्की खात्री पटल्यावर गोपाळराव आगरकरांनी तत्कालीन सुशिक्षित वर्गास उद्देशून ‘तरुण सुशिक्षितांस विज्ञापना’ या शीर्षकाचा लेख ‘सुधारका’ तून लिहिला होता. आज 'साधना'तून 'तरुण साहित्यिकांस विज्ञापना’ लिहिताना आगरकरांसारखा अधिकार नाही याची जाणीव तर आहेच; पण मराठीतील ज्येष्ठ साहित्यिकांचा अधिक्षेप करण्याचा उद्देशही नाही. मराठी साहित्य व साहित्यिक यांचे दोन कच्चे दुवे दाखवून द्यावेत आणि 'ते कच्चे दुवे आपल्यात राहणार नाहीत याची काळजी तरुण साहित्यिकांनी घ्यावी, इतकेच नम्रपणे सांगण्याचा हेतू आहे.

आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्वच बाबतीत आपल्या समाजातील फार मोठा समूह मागासलेला असल्याने, दर्जा नसलेली साहित्यनिर्मिती आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात झाली हे खरं; पण जी काही दर्जेदार साहित्यनिर्मिती झाली ती देखील मोठ्या समूहापर्यंत पोहोचली नाही. हे असं का झालं असावं? समाजधुरीण याची कारणमीमांसा आपापल्या पद्धतीने करतील; ते करताना 'समाज' व 'साहित्यिक' या दोनही घटकांना जबाबदार धरतील, पण दोन महत्त्वाच्या कारणांची दखल प्राधान्याने घेतली पाहिजे. त्यातलं पहिलं कारण आपण 'भाषा' हा विषय पुरेशा गांभीर्याने हाताळला नाही आणि दुसरं कारण - 'विज्ञान' या विषयाकडे जवळपास दुर्लक्ष केलं.

विज्ञानाचा किमान अभ्यास नसेल तर निसर्गाच्या व समाजाविषयीच्या एकूण आकलनालाच मर्यादा पडतात. विज्ञानाचा अभ्यास हा विचारप्रक्रियेवर मूलभूत परिणाम करणारा ठरतो. जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची वृत्ती वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे प्राप्त होऊ शकते. या महत्त्वाच्या घटकाकडे आपण दुर्लक्ष केलं. आपल्या समाजात विज्ञानाची व वैज्ञानिकांची समृद्ध परंपराच नसल्यामुळे, आपल्या शिक्षणात विज्ञान आलं ते पाश्चात्यांकडून. पण तर्कशुद्ध विचार, चिकित्सा यांच्या अभावामुळे विज्ञान आपल्या समाजमनाला जवळचं वाटलं नाही. पर्यायाने आपले साहित्यिकही विज्ञानाशी समरस झाले नाहीत.

काही सन्माननीय अपवाद वगळले तर आपल्या साहित्यिकांनी विज्ञानाचा अभ्यास केलाच नाही, उलट ते विज्ञानाशी फटकून वागले. विज्ञानाचा व साहित्याचा काहीच संबंध नाही अशा आविर्भावात साहित्यनिर्मिती करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे पाल्हाळिक वर्णनं, मोठी विशेषणं, नेमकेपणाचा अभाव हा आपल्या साहित्याचा स्थायीभाव झाला. सत्तर वर्षांपूर्वी श्री. म. माटे यांनी 'विज्ञानबोधाची प्रस्तावना' हे पुस्तक आणि पु. ग. सहस्रबुद्धे यांनी 'विज्ञानप्रणित समाजरचना' हा प्रबंध लिहून योग्य दिशा दाखविली होती. मराठीचे प्राध्यापक असलेल्या माटे-सहस्रबुद्धे या गुरु-शिष्यांनी विज्ञानाचं ओळखलेलं महत्व, नंतरच्या मराठी साहित्यिकांनी अधोरेखित केलं नाही. मराठीत विज्ञानविषयक साहित्यच नव्हतं, सभोवतालची परिस्थितीही अनुकूल नव्हती, हे सर्व खरं असले तरी पाश्चात्यांचे आपण अनेक बाबतींत अनुकरण केले, तसं 'विज्ञान' विषयावाबत झालं नाही.

भाषेच्या बाबतीतही फार मोठ्या प्रमाणात असंच झालं. उत्तम साहित्यनिर्मिती केलेल्या अनेक साहित्यिकांनीही 'भाषा' या विषयाचा पुरेसा अभ्यास केला नाही. फार मोठ्या समूहापर्यंत त्यांचं साहित्य पोहोचलं नाही. त्याचं हेही एक कारण आहे. आज साहित्य प्रसवणाऱ्या अनेक तरुण साहित्यिकांना तर 'भाषा' आणि 'साहित्य' हे दोन स्वतंत्र विषय आहेत, याचीही जाणीव नाही. भाषा ही मानवाला प्राप्त झालेली सर्वात मोठी देणगी आहे; आपल्या मनातील भावना व विचार व्यक्त करणारं सर्वात प्रभावी साधन आहे. पण 'भाषा व जीवन, 'भाषा व समाज’ यांच्या परस्परसंबंधाचे सम्यक् आकलन नसल्याने, अनेकांना क्षमता असूनही दर्जेदार साहित्यनिर्मिती करता आली नाही. 

आपल्याकडे स्वतंत्र अनुवाद करणारे लोक आहेत, पण साहित्यिक असणाऱ्यांनी 'अनुवाद' केल्याची उदाहरणं फार कमी आहेत. अनुवादासाठी स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व असणं जास्त महत्त्वाचं असतं. आपल्याकडे हिंदी व इंग्रजी भाषा बऱ्यापैकी येत असणाऱ्यांची संख्या खूप आहे; पण त्या भाषांतील साहित्य मराठीत आणण्याचे काम आपल्या साहित्यिकांनी फारसं केलं नाही; याचं एक कारण मराठीवर प्रभुत्व नसणं हेही आहे. 

कोणत्याही मोठ्या साहित्यिकाचं व साहित्यकृतीचे 'भाषा' हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असतंच. एखादा साहित्यिक किंवा साहित्यकृती जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, जनमानसावर दीर्घकाळ ठसविण्यासाठी, भाषा प्रभावी असावीच लागते. साने गुरुजी, आचार्य अत्रे, पु.स. देशपांडे, विजय तेंडुलकर या भिन्न प्रवृत्तीच्या साहित्यिकांचा ठसा समाजमनावर दीर्घकाळ टिकून राहिला, त्याचं कारण त्या प्रत्येकाचा स्वतःचा असा विशिष्ट वाचकवर्ग आहे. 'भाषा' हे या प्रत्येकाचं सर्वांत मोठं बलस्थान आहे.

आज सभोवताली पाहिलं तर भाषा व विज्ञान या दोनही विषयांच्या अभ्यासासाठी कधी नव्हे इतकं अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. नारळीकर, माशेलकर, गोवारीकर अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज वैज्ञानिकांची परंपरा आपण सांगू शकतो. प्रियोळकर, कालेलकर, केळकर अशा राष्ट्रीय स्तरावरील भाषाशासखज्ञांचा वारसाही सांगू शकतो. विज्ञान-तंत्रज्ञानाची फळं आपण चाखतो आहोत. 'इंटरनेटवरून माहितीचे ढीग घरात येऊन पडत आहेत. गेल्या दहा-बारा वर्षात घडून आलेल्या माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीचे आपण साक्षीदार आहोत. ही सर्व परिस्थिती विज्ञानाच्या अभ्यासाला पोषक आहे. त्याचा फायदा करून घेणं आणि भाषाशास्त्राचा व भाषाव्यवहाराचा जाणीवपूर्वक अभ्यास करणं, ही सकस साहित्यनिर्मितीची पूर्वतयारी असू शकते.

सारांश, मोठ्या समूहापर्यंत आपलं साहित्य पोहोचावं असं वाटत असेल; दीर्घकाळ आपली साहित्यकृती टिकून राहावी असं वाटत असेल आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र ठरेल अरस लेखन करण्याची आकांक्षा असेल, तर 'भाषा व विज्ञान' या दोन विषयांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याची खुणगाठ तरुण मराठी साहित्यिकांनी व मराठी साहित्य प्रसवू इच्छिणाऱ्या तरुणांनी मनाशी बांधली पाहिजे!

Tags: साहित्यातील विज्ञान वैज्ञानिकी दृष्टीकोन साहित्यिक मराठी साहित्य Science in Literature Scientific Temperament Science Marathi Literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके