डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मिल्खा सिंग यांना अभिवादन

वयाच्या 21 व्या वर्षी लष्करात आलेल्या मिल्खाला ॲथलेटिक्स व इतर स्पर्धांची ओळख झाली. शाळेत जाण्यासाठी रोज दहा-दहा किलोमीटर चालणाऱ्या-धावणाऱ्या मिल्खाने धावण्याच्या स्पर्धेत लक्ष वेधून घेणे साहजिक ठरले. आणि मग पुढील 15 वर्षे त्याने देश-विदेशांतील अनेक स्पर्धा गाजवल्या. 1958 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेत 400 मीटर धावण्यात (46.5 सेकंदात) त्याने सुवर्णपदक मिळवले, या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पुढील भारतीय तब्बल 56 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये उगवला.

20 नोव्हेंबर 1929 रोजी ब्रिटिश इंडियातील पंजाब प्रांतात (आताच्या पाकिस्तानात) जन्माला आलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धावपटू मिल्खा सिंग यांचे 18 जून 2021 रोजी चंदीगड येथे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षीही ते तंदुरुस्त होते, पण कोविडने त्यांचा घात केला आणि गेल्या आठवड्यातच त्यांच्या पत्नीचेही कोविडमुळेच निधन झाले. भारताची फाळणी झाली तेव्हा झालेल्या हिंसाचारामध्ये आई, वडील, भाऊ, बहिणी आणि अन्य नातेवाईक एकाच वेळी मारले गेल्यावर 16 वर्षांचा मिल्खा पळून भारतात आला, अनेक दिवस निर्वासितांच्या छावणीमध्ये राहिला. नंतर लग्न झालेल्या बहिणीची भेट झाली. दरम्यान विनातिकीट रेल्वेप्रवास केला म्हणून काही दिवस दिल्लीतील तिहार जेलमध्ये राहिला. बहिणीने बराच आटापिटा करून त्याची सुटका केली. त्याच्या मनात चोरी, डकैतीचे विचार घोळू लागले. पण लष्करात भरती होण्यासाठी जवळच्यांनी प्रोत्साहित केले. चार वेळा अपयश पदरी आल्यावर अखेर 1951 मध्ये लष्करात दाखल झाला.

वयाच्या 21 व्या वर्षी लष्करात आलेल्या मिल्खाला ॲथलेटिक्स व इतर स्पर्धांची ओळख झाली. शाळेत जाण्यासाठी रोज दहा-दहा किलोमीटर चालणाऱ्या-धावणाऱ्या मिल्खाने धावण्याच्या स्पर्धेत लक्ष वेधून घेणे साहजिक ठरले. आणि मग पुढील 15 वर्षे त्याने देश-विदेशांतील अनेक स्पर्धा गाजवल्या. 1958 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेत 400 मीटर धावण्यात (46.5 सेकंदात) त्याने सुवर्णपदक मिळवले, या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पुढील भारतीय तब्बल 56 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये उगवला. मिल्खाने मेलबॉर्न, रोम, टोकियो या तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यातील 1960 च्या रोम ऑलिंपिकमधील सुवर्णपदक अर्धा सेकंदाच्या फरकाने हुकले (मिल्खा सिंग यांनी ते अंतर 45.73 सेकंदात पार केले). तो पराभव त्याच्या इतक्या जिव्हारी लागला की, संघासोबत भारतात परत येण्याची लाज वाटत होती म्हणून, काही दिवस युरोपातच राहून तिथल्या स्पर्धांमध्ये खेळत राहिला. अखेर भारतात आला आणि दुसऱ्याच दिवशी खेळातून निवृत्ती जाहीर केली. अनेकांनी केलेल्या आग्रहामुळे निवृत्ती मागे घेऊन पुढील सहा वर्षे आंतरराष्ट्रीय कारकीर्द चालू ठेवली. दरम्यान पाकिस्तानातील एका स्पर्धेत खेळायला जाण्यासाठी निघाला तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी त्याला सल्ला दिला, ‘फाळणीच्या वेदना मनात घेऊन तिथे खेळू नकोस.’

लष्करातील निवृत्तीनंतर पंजाब राज्य सरकारमध्ये क्रिडा संचालक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आणि तिथून निवृत्त झाल्यावर खेळाडूंसाठी प्रशिक्षण अकादमी चालवली. The Race of My Life  हे त्यांचे छोटेसे आत्मकथन 2013 मध्ये प्रकाशित झाले, त्यात त्यांनी आपल्या आयुष्याचा धावता आढावा घेतला आहे, तो कमालीचा वाचनीय आहे. त्यातीलच So near yet so far  या प्रकरणात त्यांनी लिहिले आहे, ‘माझ्या आयुष्यात दोन पराभव खूपच जिव्हारी लागले आहेत, एक भारताची फाळणी आणि दुसरा रोम ऑलिंपिकमधील अपयश’ (या प्रकरणाचा मराठी अनुवाद साधना बालकुमार दिवाळी अंक 2013 मध्ये आला आहे.) आणि त्यांच्या या आत्मकथनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा हिंदी चित्रपटही त्याच वर्षी आला. राकेश मेहरा यांचे दिग्दर्शन, प्रसून जोशी यांची पटकथा आणि फरहान अख्तर यांनी केलेली मिल्खाची भूमिका असा संयोग असलेला तो चित्रपट तुफान गाजला, तिकीट खिडकीवर प्रचंड यशस्वी झाला. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर व सातत्याने केलेले परिश्रम यामुळे माणूस किती अडथळ्यांवर मात करू शकतो व किती अलौकिक काम करू शकतो, याचे ते प्रात्यक्षिक आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात हे सूत्र लागू पडते, हा त्या चित्रपटाचा आणि मिल्खा सिंग यांचा संदेश आहे. या संदर्भात राकेश मेहरा, फरहान अख्तर आणि मिल्खा सिंग या तिघांची India Today  ने घेतलेली दीर्घ मुलाखत त्यांची लाईफ फिलॉसोफी म्हणावी अशी आहे. (त्या संपूर्ण मुलाखतीचा अनुवाद 5 जुलै 2013 च्या साधनात प्रसिद्ध केला आहे.) केवळ खेळाडू म्हणून नाही तर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या मिल्खा सिंग यांना विनम्र अभिवादन!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके