डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मागील ८ नोव्हेंबरला भारताच्या चलनातून आधीच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करून नव्या नोटा चलनात आणण्याचा जो अभूतपूर्व प्रयोग केला, तेव्हा अतिशय दबक्या आवाजात काही लोकांना मुहम्मद-बिन-तुघलक या मध्ययुगीन कालखंडातील सुलतानाची आठवण झाली. त्यानंतरही काही लोकांनी तसा सूर लावला खरा, पण त्याची चर्चा- चिकित्सा फार झालेली नाही. अर्थातच, सातशे वर्षांपूर्वीच्या तुघलकाच्या राजवटीची आताच्या भारतातील केंद्रिय राजवटीशी तुलना करणे योग्य नाही. आणि सुलतान मुहम्मद आणि पंतप्रधान मोदी यांच्यातही साम्यस्थळे शोधणे हे त्या दोघांवरही वेगवेगळ्या कारणांनी अन्याय करण्यासारखे आहे. मात्र तरीही एकविसाव्या शतकातील लोकशाही राजवटीच्या काळात सात शतकापूर्वीच्या सुलतानशाहीची आठवण निघत असेल तर ती गंभीरच बाब मानली पाहिजे. दरम्यानच्या सातशे वर्षांत खूप काही बदलले असले तरी मूळ गाभा अद्यापही उद्‌ध्वस्त झालेला नाही असे लक्षात येते. हा गाभा सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा आहे, तसा जनतेच्या मनोवृत्तीचाही आहे.

वैयक्तिक जीवनात माणसांना वर्तमानाचा विचार करत भविष्याच्या दिशेने वाटचाल करावी लागते, पण सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना मात्र वर्तमान बदलण्यासाठी पुन:पुन्हा भूतकाळाकडे म्हणजेच पर्यायाने इतिहासाकडे वळावे लागते. इतिहासातच रममाण होणारे लोक जिद्द गमावून बसण्याची शक्यता असते, मात्र वर्तमान समजून घेण्यासाठी इतिहासाची पाने चाळणारे लोक वर्तमानाला कलाटणी देऊन भविष्याची दिशा बदलवू शकतात. त्यातही विशेष हे आहे की, आपला इतिहास काही तेवढा स्पृहणीय नाही, असे मानणारे लोक आज-उद्याच्या बदलांसाठी धडपडत असतात. तर आपला इतिहास फार दैदिप्यमान आहे असे समजणारे लोक एकूण समाजबदलाच्या गतीला रोखण्याचे काम कळत-नकळत करीत असतात. अर्थातच, या प्रक्रियेला अनेक आयाम आहेत आणि इतिहासातील तथ्यांची मोडतोड करून, किंवा अर्धवट तथ्ये पुढे करून किंवा वेगळेच अर्थ लावून इतिहासाचा वापर आपल्या सोयीप्रमाणे करत राहण्याचा प्रकारही सर्वत्र व सर्व स्तरांवर चालूच असतो. मात्र जेव्हा देशात पुनरुज्जीवनवादी शक्ती सत्तेवर येतात किंवा त्यांची चलती असते तेव्हा इतिहास नको तितका उगाळला जातो. त्यामुळे भारताच्या संदर्भात मागील तीन वर्षांपासून हा प्रकार जास्तच होतो आहे.

भारताच्या इतिहासाबाबत बोलताना प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे तीन प्रकार ढोबळ मानाने सांगितले जातात. जेव्हा पुनरुज्जीवनवादी शक्तींचा विशेष जोर नसतो तेव्हा आधुनिक इतिहासाचीच चर्चा-चिकित्सा प्रामुख्याने होते. म्हणजे ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवले त्यानंतरच्या दोनशे वर्षांच्याच इतिहासाची उजळणी नॉनॲकॅडमिक स्तरावर होत असते. त्यात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन भाग केले जातात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाची मीमांसा करताना स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना-प्रसंग यांचे पुरावे-दाखले सादर केले जातात. त्यांच्याकडून क्वचितच प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे संदर्भ वापरले जातात. पुनरुज्जीवनवादी शक्ती मात्र वर्तमानाबाबत बोलताना-लिहिताना आपल्या प्राचीन इतिहासाचे वा भव्यदिव्य वारशाचे गोडवे गात राहतात. आणि तो सुवर्णकाळ पुन्हा आणण्याची आकांक्षा व्यक्त करतात. वस्तुत: भारत तर सोडाच, जगातल्या कोणत्याही देशात कधीही सुवर्णकाळ अस्तित्वात नव्हता. म्हणजे तुलनेने परिस्थिती कमी-अधिक चांगली होती, पण सुजलाम्‌-सुफलाम्‌ किंवा शांतीचा-समृद्धीचा असा काळ कधीही कुठेही नव्हता. म्हणजे पुनरुज्जीवनवादी शक्ती एक आभासी जग निर्माण करतात आणि तसे ते प्रत्यक्षात होते असे पटवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सत्यापलाप करणाऱ्या गोष्टी सांगतात, हास्यास्पद वाटणाऱ्या कहाण्या रचतात. महाकाव्ये आणि पुराणे यांना इतिहास म्हणून सादर करण्याचा आडदांड प्रयत्न करतात. अलीकडच्या अडीच-तीन वर्षांत भारतात हा प्रकार मोठ्या जोमाने चालू आहे. त्याची अनेक उदाहरणे आपण विविध माध्यमांतून ऐकली-वाचली आहेत. या पार्श्वभूमीवर मागील अडीचतीन महिन्यांत मध्ययुगीन इतिहासाची आठवण व्हावी असे काही प्रसंग घडले आहेत.

वस्तुत: मध्ययुगीन इतिहासाला ‘अंधायुग’ म्हटले जाते, पण त्याचेही उदात्तीकरण करण्याचे प्रकार आता होत आहेत. मागील ८ नोव्हेंबरला भारताच्या चलनातून आधीच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करून नव्या नोटा चलनात आणण्याचा जो अभूतपूर्व प्रयोग केला, तेव्हा अतिशय दबक्या आवाजात काही लोकांना मुहम्मद-बिन-तुघलक या मध्ययुगीन कालखंडातील सुलतानाची आठवण झाली. त्यानंतरही काही लोकांनी तसा सूर लावला खरा, पण त्याची चर्चा- चिकित्सा फार झालेली नाही. अर्थातच, सातशे वर्षांपूर्वीच्या तुघलकाच्या राजवटीची आताच्या भारतातील केंद्रिय राजवटीशी तुलना करणे योग्य नाही. आणि सुलतान मुहम्मद आणि पंतप्रधान मोदी यांच्यातही साम्यस्थळे शोधणे हे त्या दोघांवरही वेगवेगळ्या कारणांनी अन्याय करण्यासारखे आहे. मात्र तरीही एकविसाव्या शतकातील लोकशाही राजवटीच्या काळात सात शतकापूर्वीच्या सुलतानशाहीची आठवण निघत असेल तर ती गंभीरच बाब मानली पाहिजे. दरम्यानच्या सातशे वर्षांत खूप काही बदलले असले तरी मूळ गाभा अद्यापही उद्‌ध्वस्त झालेला नाही असे लक्षात येते. हा गाभा सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा आहे, तसा जनतेच्या मनोवृत्तीचाही आहे.

हा संदर्भ अधिक ताजा होण्याचे कारण कालच्या १४ जानेवारीला ‘तुघलक’ या तमिळ साप्ताहिकाचा ४७वा वर्धापनदिन झाला. त्या कार्यक्रमाला भारताच्या पंतप्रधानांनी संबोधित केले. पाच दशकांपूर्वी चो-रामास्वामी या कलाकाराने तुघलक या शीर्षकाचे नाटक व चित्रपट केले आणि नंतर त्याच शीर्षकाचे साप्ताहिकही सुरू केले. त्या साप्ताहिकाने आपल्या राजकीय-सामाजिक जीवनातील विसंगती व विरोधाभास मांडण्याचे काम केले. चो-रामास्वामी यांचे अलीकडेच निधन झाले, त्यांनी ‘तुघलक’चा वापर आपल्या त्या-त्या वेळच्या सोयीप्रमाणे केला. इतका की, दोन वर्षांपूर्वी ‘मौत का सौदागर’ या विशेषणाचा वापर त्यांनी मोदींचा गौरव करण्यासाठी खुबीने केला होता. भ्रष्टाचारी, गुन्हेगार, अकार्यक्षम, देशद्रोही या लोकांसाठी मोदी हे ‘मौत का सौदागर’ आहेत, अशी कलाटणी त्यांनी दिली होती. त्याच मोदींनी ‘तुघलक’च्या वर्धापनदिनाला जे भाषण केले त्यातून असेच लक्षात येते की, तुघलक हे विशेषणही मोदींना गौरवास्पद वाटते आहे. किंबहुना सातशे वर्षांपूर्वीच्या शक्तिशाली सुलतानाशी आपले नाव जोडले जाणे याचा त्यांना आनंद होत आहे. देशातील जनतेच्या दृष्टीने ही बाब आनंदाची आहे की दु:खाची? 

Tags: विनोद शिरसाठ संपादकीय नरेंद्र मोदी तमिळ तुघलक aadhunik Madhyayugin Prachin Tamil Tughalak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके