डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • मुंबई वार्ता 
  • परीक्षांचे काम 
  • डॉ. वसंतराव देशपांडे व पीं. भीमसेन 

मुंबई वार्ता  

एक दरमहा सरासरी सहाशे रुपये प्राप्ती असणारा पत्रकार. ‘82 सालाचे वर्णन उत्पादन वाढीचे वर्ष' या इंदिराप्रिय घोषणेने अथवा ‘संघर्ष वर्ष' या जॉर्जप्रिय घोषणेने करू शकत नाही. माझ्या मते 82 साल हे ‘खर्च वाढ’ वर्ष आहे, इतकी वर्षे अब्रूने कर्ज न काढता जगलो, पण यंदा पोटभर शुद्ध पाणी मिळण्यासाठीही कर्ज काढावे लागणार की काय, या भीतीने धास्तावून गेलो आहे. पत्रकाराला टेलिफोन अत्यावश्यकच असतो. निदान मुंबईत तरी त्यावाचून गाडे अडतेच. त्याच्यासाठी यापूर्वी महिना 66 रु. भाडे पडे (हे भाडे निव्वळ यंत्राचे, किती वेळा बोललो याचा हिशोब अलग ). मार्चपासून ते द. म. 100 रु. मोजावे लागणार आहे. टेलिफोन ही बाब सार्वदेशिक असल्याने खास मुंबईकरच या भाडेवाढीने होरपळून निघणार आहे असे नाही. पण मुंबई महापालिकेने पाणीपट्टी दुप्पट केली तर काय?

आज तसा फक्त प्रस्तावच महापालिकेपुढे आहे. आयुक्त सुकथनकर यांचा प्रस्ताव मंजूर झाला तर मला सालीना 600 रु. (महिन्याला 50 रु. ) महापालिकेस मोजावे लागतील. (सध्या द.म. 25 रु. पडतात) पिण्याचे पाणी आणि टेलिफोन यांवर द.म. 150 रु. खर्च केल्यावर माझ्यापाशी फक्त 450 रु. उरतात. मला प्रपंचासाठी रोज एक लिटर दूध लागते व ते 5 रु. भावाने घ्यावे लागते. म्हणजे द. म. आणखी 150 रु. झाले, श्री. शरद जोशी पांचे दूध-भात आंदोलन (सुधारलेली आवृत्ती दूध-कांदा) यशस्वी झाल्यावर (आणि तसे होणार याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही ) दुधाचा द. म.हा खर्च किमान 180 रु. तरी होईल. म्हणजे या तीन प्रमुख गोष्टी वगळता मजकडे फक्त 270 रु. उरतीत. कांद्याचे भाव माझ्या डोळ्यांस पाणी आणीत नाहीत, कारण या वयात ते न खाण्यानेच प्रकृती ठीक राहण्याचा संभव, पण गहू, तांदूळ, डाळ, मसाले व भाजी आणि पाय धडधाकट ठेवणारे गोडेतेल एवढे तरी किमान जगावयास हवेच. 

गोड्या तेलास लावलेले विशेषण साभिप्राय आहे. कोहिनूर मिलमधील कामगारांना चांगले खाद्यतेल पुरवण्याचे कंत्राट मध्यंतरी तिघांनी घेतले. त्यात एक आमदारही होते म्हणतात. आणि अनेक कामगार कुटुंबे लुळी-पांगळी झाली ते तेल खाऊन. मला तसे होऊन चालणार नाही. कारण आता बेस्टच्या बसेसचेही भाडे वाढणार असल्याने अनेक न्यूज सोर्सेसच्या जागी चालत जाण्यावाचून दुसरा पर्यायच उरणार नाही. अर्थात कमीतकमी चालावे लागावे यासाठी लोकल्स आहेत. पण येत्या 24 तारखेस रेल्वेपासांची भाडी तरी जाग्यावर राहतील हा निर्वाळा कोण देऊ शकेत ? समाजवादाच्या दिशेने जाणारे सरकार असते तर असे पोट बांधून आणि कंबर आवळून काम करण्यासही हुरूप वाटला असता. पण शेतकऱ्यांनी झगडून कांद्याला रास्तभाव मिळवावा. राज्याच्या मार्केटिंग फेडरेशनने 23 कोटी रुपयांचा कांदा खरेदी करावा. तो पाच कोटीला विकला जाऊन 18 कोटी नुकसानी यावी आणि ती भ्रष्टाचारामुळे यावी हे बघितल्यावर हुरूप कसा वाटावा? आपल्या वाढदिवशी पदच्युत माजी मुख्यमंत्री आपले पत्रकार सृष्टीतील चमचे गोळा करून 'नवे विश्वस्त निधी' उभारणार आणि जुने तर गुंडाळणार नाहीच, असे ठामपणे सांगतात तेव्हा कसला कपाळाचा हुरूप येणार? श्री. वि. स. पागे मात्र आता मनमोकळे चार शब्द बोलू लागले आहेत म्हणून परवा थोडासा हुरूप आला.

सहकार या विषयावर एक दिवसाचे अधिवेशन भरले असता देशाची अर्थस्थिती सरकारातील लोकच इतकी बिघडवीत आहेत की नवे घडविण्यासाठी आता कोणाला हुरूप वाटण्याची आशाच नको, असे ते म्हणाले. सरकारी पागेतून मोकळे झाल्यावरदेखील एवढे बोलण्यास धैर्य लागते. (श्री. पागे, श्री. यशवंतरावांना खाजगीत हे विचार ऐकवीत नसतील काय? यशवंतरावांवर त्याचा काय बरे परिणाम होत असेल?)तात्पर्य, या वर्षी मासिक उत्पन्नावर जगणाऱ्यांना कर्ज काढूनच दारिद्र्य रेषेच्यावर राहावे लागणार आहे. दारिद्र्यरेषेच्या खाली असणाऱ्यांनी कसे जगायचे हा प्रश्न विचारात घेण्याचे धाडस अर्थतज्ज्ञांनी करावे, आपली मती गुंग!  आता गिरणकामगारांचा संप गेले 23 दिवस चालू आहे. नायगाव विभागातील एका सहकारी बँकेत चौकशी केली असता या तेवीस दिवसांत कामगारानी दीड लाखाची उचल आपल्या संचित ठेवीतून केल्याचे आढळले. या एका शितावरून भाताची परीक्षा करावी. कामगारांना डॉ. सामंत हवे आहेत असे नसून राष्ट्रीय मिल मजदूर संघ नको आहे, हे संपामागील खरे कारण आहे. साधी महिन्याची रजा गिरणीतून मिळवून देण्यासाठीही रा. मि. म. संघाच्या कार्यकर्त्यांचे हात ओले करावे लागतात असे एक कामगार म्हणाला. बाबासाहेब भोसले यांना म्हणे रडायला आले. पुढ्यात कांदा चिरला जात होता ना? रडायला येणारच. कांद्याच्या व्यवहारात 18 कोटी रु. तोटा ही अंतुले राजवटीची भोसल्यांना भेट! तरी अलीकडचे खतावरचे कांदे कमी तिखट म्हणून थोडे रडू आले. आता त्यांना पाटबंधारे महामंडळाचे अध्यक्ष केले आहेच ना? थोड्याच दिवसांनी अश्रूंचे पाट वाहू लागले नाहीत बाबासाहेबांच्या डोळ्यांतून म्हणजे मिळवली. आम्ही आता कमरा कसून खर्चवाढीचे वर्ष साजरे करायला तयार राहतो. तुम्ही भ्रष्टाचाराच्या नावाने नुसते रडा!

परीक्षांचे काम

वर्षभर प्राध्यापक मंडळी काय, किती आणि कसे शिकवितात या कामाची परीक्षा विद्यार्थी दैनंदित करीत असतातच; पण आता परीक्षांचे कामही यंदा त्यांच्या हातून होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर मंडळी परीक्षांचे काम करणार नसतील तर त्यांचा दोन महिन्यांचा पगार कापावा अशा आशयाची दुरुस्ती सरकार कायद्यात करणार आहे व त्यामुळे शिक्षकी पेशा पत्करलेली मंडळी संतप्त आहेत. सत्याग्रहाची भाषाही बोलली जात आहे. कुलगुरू राम जोशी यांना झेवियर कॉलेजचे प्रा. काझी यांनी सांगितले, “कुलगुररू महाशय, आपण शिक्षक वर्गाच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपले वडीलही एक शिक्षक होते व आपणही एक शिक्षक आहात.’’ यावर प्रा. राम जोशी एवढेच म्हणाले, ‘‘आपण म्हणता ते खरे आहे; पण माझ्या तीर्थरूपांनी अथवा त्यांच्या पुत्राने परीक्षांवर बहिष्कार कधीच घातला नव्हता.’’ प्राध्यापक, चियर प्राध्यापक! माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी परीक्षांचा मोसम आला की संप-बहिष्कार आदीचे हत्यार का उपसतात? व शासन तरी सबंध वर्षभर शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या न सोडवता झोपा का काढते ते कळणे कठीण आहे.

परीक्षांचे काम केलेच पाहिजे एवढीच सुधारणा कायद्यात करू नये. ते विनावेतन केले पाहिजे अशीही करावी. कारण महाराष्ट्रातील कित्येक विद्यापीठे गेल्या पाच वर्षांपासूनची परीक्षकांची प्रवासबिले देखील देऊ शकलेली नाहीत, हे मला ठाऊक आहे. पेपर तपासण्याच्या बिलांचे पैसे प्राध्यापकांना बहुधा त्यांच्या अंत्यविधीसाठी मिळतील असे मला वाटते. एवढी डबघाईची आर्थिक परिस्थिती आली असेल तर त्यावर एकच मार्ग म्हणजे परीक्षकांनी विनामूल्य परीक्षांचे काम करावे. शिकवण्यासाठी पैसा वेगळा आणि परीक्षा घेण्यासाठी वेगळा, हे मुदलातच चूक आहे. परीक्षातून पैसा वजाच केला की गाडे सरळ चालू लागेल. याहून चांगला मार्ग म्हणजे विद्यापीठांकडून सर्व परीक्षांचे काम काढून घेऊन ते उच्च परीक्षा मंडळाकडे सोपवणे. त्यामुळे विद्यापीठ हे खऱ्याखुऱ्या विद्यादानाच्या कामाला लागेल. चार फेब्रुवारी रोजी सिनेटच्या बैठकीत मग जशी वादावादी झाली व तांत्रिक मुद्यावर कुलगुरू राम जोशींना यश मिळाले तसे होणार नाही. परीक्षा घेतल्या जातात त्या काळात प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जर मासिक वेतन दिले जात असेल तर परीक्षेच्या कामासाठी वेगळे पैसे का द्यायचे?

डॉ. वसंतराव देशपांडे व पं. भीमसेन

मराठी नाट्यपरिषदेचे कार्यालय केळेवाडीत असल्याने मुंबई वार्तेत, अकोला संमेलनाध्यक्ष डॉ. वसंतराव देशपांडे यांचा समावेश करून त्यांचे यथोचित अभिनंदन केले पाहिजे असे मला वाटते. आपण प्राधान्याने गायक व गौणत्वाने नट आहोत असे वसंतराव अध्यक्षीय भाषणात म्हणाले असले तरी ते परमार्थाने घ्यावयाचे नाही. ऋजुस्वभावी वसंतराव असेच म्हणणार. उदा. एका वेगळ्या घराण्याचे निर्माते म्हणून त्यांना गायक संमेलनाचे अध्यक्ष केले तर ते म्हणतील की, मी प्राधान्याने नट व गौणत्वाने गायक आहे. पुराव्यादाखल सांगतील, मी प्रथम नाट्यगीतेच शिकलो नाही काय? मा. दीनानाथ माझे गुरू आणि ते खरंच आहे. संगीत नाटकांच्या वाटचालीवर अडीच तास श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान वसंतराव देऊ शकतात आणि 'उद्यांचा ख्याल' या विषयावर प्रबंध लिहूनच त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. ते थोडेसे नट नाहीत. चांगले भक्कम आहेत. आणि गाण्यात जसे त्यांनी दीनानाथांपासून अमानअलीपर्यंत गुरू केले तसेच अभिनय आणि वाक्यांची फेक साधावी म्हणूनही केले आहेत.

पुण्यात गणपतराव बोडस यांनी वसंतरावांना लयबद्ध कसे बोलावे हे शिकवले. संशयकल्लोळमधील अश्विनशेठनी पुढे येणाऱ्या पदाची लय अगोदरच्या गद्यवाक्यातून कशी पकडली हे शिकवले. संशयकल्लोळच्या 60 प्रयोगांतून वसंतरावांनी कामे केली 'मृगनयना' हे दरबारीतील पद गाजले; पण त्याहूनही गाजले ते 'मानिनी मी तुजसि जी’ हे. कारण ते आधीच्या संवादातून लय पकडून येत असे. गोविंदराव टेबे यांच्याकडून सौभद्रमधील कृष्णाच्या भूमिकेचे बारकावे त्यांनी समजावून घेतले. दिनकर कामण्णांकडून भावबंधनमधली भूमिका आणि ‘वाऱ्यावरच्या वराती’चे प्रयोग पु. ल. नी भूमिका करण्याचे सोडल्यावर वसंतरावांनीच दोनशे-एक तरी केले असतील. हा माणूस गौणत्वाने नट म्हणायचा का? मला अभिनय येतो म्हणून मी नाटकात कामे करतो, असे त्यांनी एका मुलाखतीत प्रांजळपणे कबूल केले आहे. त्याच्याशी विसंगत असे उद्गार अध्यक्षीय भाषणात आले आहेत. खरे म्हणजे नट व गायक यांत गायक कांकणभर वसंतरात सरस असतील. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. ‘‘कट्यार काळजात घुसली' व 'हे बंध रेशमाचे', यातील माझ्या भूमिका पाहून स्त्रिया माझ्याकडे आकर्षित झाल्याची उदाहरणे घडली. मी स्वतःला प्रश्न विचारला की, ही स्त्री वसंत देशपांडे या व्यक्तीवर आषक झाली आहे की त्याने केलेल्या भूमिकांवर, हेच उत्तर मला द्यावे लागले.’’ वसंतरावांचे सत्शील या उद्गारात स्वच्छपणे उमटले आहे. नाट्यसंमेलनास  असा सत्शील गायक नट अध्यक्ष म्हणून लाभला, याचा म्हणूनच अभिमान वाटतो. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विवाद्य असे फारसे नाहीच. सेन्सॉर बोर्ड रद्द करून नाटक मंजूर करण्याचे अधिकार नाट्य परिषदेकडे सोपवावेत ही त्यांची सूचना सध्याचे एकाधिकारशाहीप्रेमी सरकार मनावर घेण्याचा सुतराम संभव नसल्याने त्या सूचनेबाबत स्वीकारणीय एवढे म्हणावे आणि गप्प बसावे हेच बरे.

पं. भीमसेन गेल्या रविवारी (14 फेब्रुवारी ) 60 वर्षांचा चौक ओलांडून एकसप्टीत प्रविष्ट झाले. श्रोतृसमाज पकडून ठेवणारा, अजस्र भीमशक्तीचा असा गायक यापूर्वी झाला नसेल. 40 ते 50 या दशकात पं. भीमसेन यांची तान श्रोत्यांचे प्राण कासावीस करी. त्यांचे डोके जमिनीस टेकेपर्यंत ती ताणली जाई. पुढे 'भूनमन' कमी झाले. आता दोन्ही हात हवेत फिरतात. त्याचा गेय रागाच्या भावाशी संबंध असतो. गवई हा स्वरलयीच्या मेळात एक व्याख्यानच देत असतो. वकील ज्याप्रमाणे न्यायालयात आपला मुद्दा पटविण्यासाठी आपसूक हातवारे करतो तसेच सच्चा कलावंत श्रोत्यांशी स्वरसंवाद करीत असता आपसूक त्याच्याकडून घडते. त्यात गैर काही नाही. त्यांचे सर्व शारीरिक अणुरेणू गात असतात. गाण्याचे श्रवणेंद्रिय नसणाऱ्यांनाच ते हातवारे खटकतील. पं. भीमसेन यांनी किराणा घराण्याचे कवच फोडून गाणे वाढविले. अनेकांच्या सूचना आपल्या चिंतनात दाखल करून घेतल्या त्यामुळे ते श्रेष्ठ गायक झाले. किराण्याच्या मर्यादेत राहून गाणारे त्यांच्या एवढे उंच झाले नाहीत. म्हणूनच परवा श्री. विद्याधर गोखले यांनी वसंतरावाच्या गाण्यासंबंधी काय बोलावे, म्हणताच मी त्यांना म्हणालो, नाहीतरी संस्कृत श्लोकावर व्याख्यानात प्रवचन करण्याचा तुमचा स्वभावच आहे. मी एक संस्कृत श्लोक देतो. तो आधाराला घेऊन बोला तो श्लोक असा: भीममेनो, कुमारश्च मन्सूरोऽय वसंतखां। मराठे जसराजश्जितेन्द्रो गायकीततमाः ॥ आणि विद्याधरजी त्या श्लोकावरच बोलले. अनुष्टुप वृत्ताच्या सोयीसाठी नावे या क्रमाने आली असली तरी तो अनुक्रम नव्हे. श्रोतापरत्वे क्रम बदलेल, पण पं. भीमसेन लोकोत्तर गायक आहेत या मतात बदल होणार नाही. पं. भीमसेन यांना 'साधना’तर्फे अभिवादन!

Tags: राजकीय-सामाजिक मुंबई वार्ता social political mumbai news diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके