डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

त्यांचे विचार व मांडणी विवाद्य ठरली तरी एकेरी ठरली नाही. आज आपल्याला अशा निरनिराळया पातळींवरून विचार करून जनजागरण करणाऱ्या लेखकाची गरज आहे. श्री कुरुंदकर गेल्याने अशा लेखकाच्या अल्पसंख्येचा आणखीनच संकोच झाला आहे. ही त्यांच्या अकाली निधनाची वेदना तीव्र करणारी प्रमुख बाब होय.

ता. 11-2-82 कोल्हापूर येथे सकाळी दूरध्वनीवरून माझे मित्र श्री. गं. रा. पटवर्धन (जे सध्या तेथे आयकर आयुक्त आहेत) यांनी प्रा. नरहर कुरुंदकर स्वर्गवासी झाल्याचे सांगितले. ज्यांच्याविषयी चुकूनसुद्धा स्वप्नातही अविश्वास वाटणार नाही, त्या गं. रा. पटवर्धन यांनी अशी ही बातमी दिल्याने त्यांच्यावरचा विश्वास त्या क्षणी उडाला.  कुरुंदकरांबद्दल मृत्यूच्या संबंधात कुणी त्यांचे भाकीत करावे असे ना त्यांचे वय होते, ना त्यांच्याकडे तसे राजकीय पद होते. शिवाय त्यांच्याविषयी तसे भाकीत कधीही आणि कुणीही केले नसते.ज्यांनी कुरुंदकर यांना पाहिले त्यांचे प्रथमदर्शनी त्यांच्याबद्दल एकदम छाप पडून जावे असे मत बनायचे नाही. कारण त्यांची कीर्ती विचागत घेता मूर्ती साधी पण वेगळी वाटायची. ज्यांनी त्यांना पाहिले नाही आणि वाचले त्यांना मात्र कै. नरहर हा एक विज्ञान आणि भारदस्त, गंभीर तसाच भलताच चिकित्सक विचारवंत जाणवायचा.

प्रत्यक्षात सहवास आणि संवाद लाभल्यावर मात्र ही व्यक्ती संवादचंतुर, स्नेहशील आणि कमालीची रसिक आहे याचा प्रत्यय यायचा. वास्तविक कुरुंदकरांचे लेखनाचे वैविध्य पाहिले तर त्यांच्याबद्दल एकेरी व एकांतिक मत बनायचे कारण नाही. सौंदर्यशास्त्र, संगीत, साहित्य, इतिहास, समाजकारण आणि राजकारण इ.च्या भावनेत, भानगडीत आणि भारतात त्यांची लेखणी जी लीलया झरत, मुद्रित आणि प्रकाशित होत राहिली, त्यावरून हे स्पष्ट होते. एक मात्र खरे की, राहणी असो, बोलणे असो किंवा लिहिणे असो, त्यांनी आपल्या निराळेपणाची शैली स्वतंत्रपणे जपली आणि वाढवली.दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा इमला-उभारत असताना अचानक ते गेले. वाढ थांबलेला केवळ शोभेकरता अध्यक्षस्थान भूषवणारा हा अभ्यासू संपला नव्हता. त्यांचा प्रश्न व ज्ञानवेध वर्तमानकाळात वर्धमान होता. सुरुवातीच्या लेखनातील प्रसिद्धीच्या अनिवार ओढीने विचार मांडण्याची खुमखुमी सरत चालली होती आणि वैचारिक आव्हाने अधिकाधिक पेलण्याची क्षमता सातत्याने आणि समर्थपणे प्रकटत होती.

विशेषतः इ. स. 1972 पासून त्यांच्या आविष्काराने कात टाकली म्हणणेच यथार्थ ठरेल. आणीबाणी आणि तदनंतर त्यांचे वाङ्मय याची केवळ साक्ष नाही, तर ते सिद्ध करणारे आहे. या संदर्भात साधना साप्ताहिकाचाउल्लेख समर्पक ठरावा. ‘साधना'बद्दल कुणाचे काही मतभेद असोत, पण साधनेच्या जागरण सत्राविषयी कुणाचे दुमत राहणार नाही. कुंरुंदकर या सत्रात सामील झाले आणि त्यांच्या विवेकाला आणखीन विधायक परिमाण लाभले. ‘जनबोध' प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले त्यांचे 'छायाप्रकाश' हे विचारप्रवर्तक पुस्तक याचे उत्तम उदाहरण होय. एका मजेदार प्रसंगाचे आता स्मरण होते. 'साधना'त जेव्हा कुरुंदकरांना वरचेवर उठाव मिळू लागला तेव्हा मी म्हणालो होतो, ‘‘यदुनाथना कुरुंदकरांचे टेंगूळ उठले आहे!’’ असे म्हणण्यात विनोदाबरोबर जरा तिरकसपणा होता. कुरुंदकरांनी आपल्या मुलाची मुंज सनिमंत्रण साजरी केली. या कालबाह्य संस्काराची कुरुंदकरांसारख्या सामाजिक परिवर्तनाची जाण असणाऱ्या 'साधना’च्या लेखकाने कास धरावी हे कुणाला झाले तरी खटकणारेच होते. मी तसे ‘साधना' ला पत्र लिहिले. ते यदुनाथनी प्रसिद्ध केले नाही. 'साधना'च्या परंपरेत हे बसणारे नव्हते. शिवाय कुरुंदकरांनी त्याचे योग्य ते उत्तर दिलेच असते. यदुनाथजींचे संरक्षण लागावे असे काही कुरुंदकर कच्चे नव्हते, हे मला पक्के ठाऊक होते.

कुरुंदकरांचा-माझा चांगला परिचय होता. साहित्यात आमच्यानंतर येऊन ते आमच्यापेक्षा कितीतरी परीने आणि पटीने पुढे गेले याचा मजसारख्यांना आनंद होता, अभिमान होता. मी जेव्हा हैदराबादला इ. स. 1942 ते इ स. 1956 पर्यंत साहित्य व वृत्तपत्रीय जगात मधून मधून डोकावत आणि लेखावत होतो तेव्हा कुरुंदकर हा तारा उदित होत होता. तेव्हा त्यांच्या बौद्धिक चापल्यापेक्षा औद्धत्यच जास्त चमके. शैक्षणिक प्रगती क्षीण होती. कदाचित बुद्धिवान माणसास परीक्षा पास होण्याकरता अभ्यास करावा लागणे कमीपणाचे वाटण्याचा तो परिणाम असवा. परंतु या काळात कुरुंदकरांचे वाचन, चौकसपणा आणि आव्हानवजा बोलण्याचे धाडस हे लक्षणीय होते. याच काळात त्यांचा त्यांच्या साहित्यिक व राजकीय व्यक्तित्वाच्या जडणघडणीच्या दृष्टीने तीन व्यक्तींशी संपर्क आला. त्या तीन व्यक्ती म्हणजे कै. भालचंद्रपंत कहाळेकर, डॉ. सुरेन्द्र बारलिंगे आणि श्री. अनंत भालेराव ('मराठवाडा'चे संपादक). मराठवाड्याच्या साहित्यिक इतिहास, संस्थेची बांधणी, लेखकांना उत्तेजन देणे, त्याचा विश्वास वाढवणे इ. बाबतीत कै. भालचंद्रपंत कहाळेकर यांनी अविस्मरणीय आणि संस्मरणीय वाटा उचललेला आहे. वैयक्तिक जीवनात वेळ आणि अर्थ या कारणी त्यांनी खर्च केला.

कै. कुरुंदकराना कहाळेकरांच्या संसर्गजन्य विचार प्रचोदकतेचा लाभ झाला आणि त्याने ते गती धारण करते झाले. या अवस्थेतच त्यांचा डॉ. बारलिंगे आणि श्री. अनंत भालेराव यांच्याशी संबंध आला. या दोन व्यक्ती आज महाराष्ट्राच्या सामाजिक व सास्कृतिक आघाडीवर मान्यवर असल्या तरी भिन्न आहेत. डॉ. बारलिंगे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, अनेक संस्तांचे शिल्पकार आणि कोणत्याही प्रमेयाचा मूलभूत विचार करणारे तसेच विधायक व्यवहाराचे अवधान बाळगणारे, तर श्री. अनंत भालेराव सामाजिक आणि राजकीय आव्हान देणारे व घेणारे ऋजू वृत्तीचे खंबीर संपादक. श्री. भालेरावांच्या जगण्यात मानवी संबंध सांभाळण्यापुरताच व्यवहार असून वाचन, साहित्य, पांडित्या या क्षेत्रांत चुकूनही अधिकार सांगण्याची वृत्ती नाही. कुरुंदकरांनी जे नंतर आपल्या साहित्य साधनेबरोबरच शिक्षण पूर्ण केले आणि मास्तरांचे प्राध्यापक झाले. त्याचे पूरक कारण डॉ. बारलिंगे होते असे म्हटल्यास ते फारसे वस्तुस्थितीला सोडून होणार नाही. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान आणि रसशास्त्र यांचा स्पर्श कुरुंदकरांच्या प्रतिभेला जो झाला त्याचे कारण डॉ. बारलिंगे हेच आाहेत.

श्री. अनंत भालेराव सामाजिक आणि राजकीय ध्यास व जागरणात अनवधान न होणारे दुर्मीळ असे विनम्र प्रकरण आहे. 'प्रकरण’ म्हणण्याचे प्रयोजन असे की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वैयक्तिक भाग नष्ट झाला असून संस्था व माणसे यात भले, हेच त्याचे निरंतर पालुपद आहे. कुरुंदकरांनी भालेरावांच्या या सचेतन अस्मिततून बरेच घेतले व या तिघांच्या गुणांच्या प्रेरणेतून स्वत:चे प्रभावकारी व्यक्तिमत्त्व घडवले. या प्रक्रियेचा पूर्णविराम झाला नव्हता. मी इ. स. 1957 साली नांदेडला होतो. तेव्हा माझी आणि कुरुंदकरांची वरचेवर भेट होत असे. चर्चा व्हायच्या. नंतर मुंबई, नागपूर आणि पुणे येथेही आठवणीने ते यायचे. दर वेळेस त्यांचा विकास जाणवे. मात्र 1973 नंतर मात्र ते मजकडे आले नाहीत. मी पुण्यासच असून असे का व्हावे याचा विचार एक-दोनदा आला. असे वाटण्यात त्यांच्या थोरवीची पावती आहे. मात्र उत्तर नाही. नंतरच्या एका घटनेने मला सुखद धक्का बसला. 'ललित' मासिकात त्यांनी त्यांना आवडलेल्या पुस्तकात माझा नव्याने निघालेला कथासंग्रह ('+ सिनिकथा') अंतर्भूत केला होता. त्यांच्या स्वभावात असे धक्के देणे उत्क्रांत होत गेले होते. साहित्य समीक्षा, रसशास्त्र, इतिहास, संगीत, समाजकारण आणि राजकारण यांवर लिहिताना किमानपक्षी एक तरी जागा अशी असायची, की ती धक्का दिल्याखेरीज राहत नसे. या त्यांच्या धक्का देण्याच्या भाषण व लेखनाला ‘स्टंटबाजी' असा आरोप करणारा एक छोटा गट पुण्या-मुंबईत होता व आहे. कुरुंदकरांनी कोणत्याही एका विषयाचा परिश्रम घेऊन सांगोपांग अभ्यास केला नाही आणि त्या अनुषंगाने ग्रंथनिर्मिती केली नाही, असा या मंडळींचा युक्तिवाद तसा सर्वस्वी खोडता येणार नाही. पण महाराष्ट्रातील विचारवंतांकडे पाहिल्यास दोन वर्ग उघड दिसतात. लोकमान्य टिळक, इतिहासाचार्य कै. राजवाडे, प्रा. (कै.) रा. श्री. जोग, प्रा. गं. बा. सरदार,  रा. चिं. ढेरे, कै. दि. के. बेडेकर,  ना. ग. गोरे, प्रा. य. दि. फडके इ.  मंडळी एकीकडे, तर दुसरीकडे कै. शिवराम महादेव परांजपे, प्रा. कै. न. र. फाटक, कै. आचार्य अत्रे, प्रा. कै. श्री. के. क्षीरसागर यांच्यासारखी मंडळी होत. हा दुसरा वर्ग वादळे व वाद यांना प्रवर्तित करणारा आहे. प्रश्नांचा वेध घेत प्रश्न फेकायचे यातही ज्ञान व समाजप्रबोधनाचे काम असते. कै. कुरुंदकर या दुसऱ्या वर्गात मोडणारे होते.

कुरुंदकराचे आकर्षण सर्वांना (म्हणजे एक कम्युनिस्ट सोडून) होते. आर. एस. एस., काँग्रेस, समाजवादी आणि जनसंघाच्या व्यक्तींना त्यांच्या लेखनाविषयी आदर होता. त्यांच्या वक्तृत्वाची आवड होती. खुद्द नांदेड येथील शंकरराव चव्हाण आणि शामराव कदम या दोन्ही काँग्रेस पुढाऱ्यांचे ते चांगले स्नेही होते याचे पुष्कळांना नवल वाटे. काहींची मजल तर कुरुंदकरांना ‘शंकरराव चव्हाणांचे तर्कतीर्थ’ म्हणण्यापर्यंत गेली होती. याची गोम होती की वर्म होते, याची कल्पना कुरुंदकरांना होती. त्यांनी स्वतःच याचे फार छान विश्लेषण केले. ते त्यांच्याच भाषेत वाचण्यासारखे आहे- ‘‘माझे मन मोठे चमत्कारिक आहे. ते एकाच वेळी दोन-दोन, तीन-तीन पातळींवरून भिन्न दिशांनी विचार करत असते.’’त्यामुळेच त्यांचे विचार व मांडणी विवाद्य ठरली तरी एकेरी ठरली नाही. आज आपल्याला अशा निरनिराळया पातळींवरून विचार करून जनजागरण करणाऱ्या लेखकाची गरज आहे. श्री कुरुंदकर गेल्याने अशा लेखकाच्या अल्पसंख्येचा आणखीनच संकोच झाला आहे. ही त्यांच्या अकाली निधनाची वेदना तीव्र करणारी प्रमुख बाब होय.

Tags: साहित्यकार नरहर कुरुंदकर श्रद्धांजली आठवणी man of letters narhar kurundkar homage memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके