डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पहिल्या सोनेरी किरणाच्या निमित्ताने...

पहिले कांस्य पदक मिळाले. पहिले सुवर्णपदक मिळण्यासाठी भारताला तब्बल ५६ वर्षे वाट पहावी लागली. चीनला पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक १९८४ साली प्राप्त केले. तो देश आता अमेरिका, रशिया यांना मागे सारून जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर पोचला आहे. अगदी चिमुकल्या जमैका देशानेदेखील हेवा वाटावा असे यश मिळविले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ऑलिंपिकमध्ये मिळणाऱ्या पदकांचा विचार केला तर भारताचे स्थान तळाशीच आहे, याची नोंद अंतर्मुख होऊन घ्यावयास हवी.

१०८ वर्षाच्या ऑलिंपिक इतिहासात भारताने प्रथमच १ सुवर्ण व २ ब्राँझ असा पदकांचा तिरंगा फडकवला. देशाची मान अभिमानाने उंचावली. यश अनपेक्षित होते. त्यामुळे तर आनंद आणखीनच वाढला. ऑलिंपिक इतिहासातील भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी. ११५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाने एवढेसे तर मिळवले, त्याचे कौतुक कशाला? असे न म्हणता सकारात्मक दृष्टीनेच याकडे पहायला हवे.

हॉकी चा सुवर्णकाळ वगळता दुर्लभ असलेल्या सुवर्णपदकचे दर्शन नेमबाज अभिनव बिंद्राने देशाला घडवले. भारतीय नेमबाजांच्या कर्तृत्वाचा गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर हे यश दृष्टिपथातील होते असेच म्हणावे लागेल. जागतिक अजिंक्यपद आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारतीय नेमबाजांनी आपला दर्जा गेली काही वर्षे उंचावत नेला आहे. अर्थात अभिनव बिंद्राची आर्थिक सुबत्ता हा भागही महत्त्वाचा आहे. नेमबाजी हा खूपच खर्चिक खेळ आहे. बिंद्राला वातानुकूलित शूटिंग रेंज घरीच उपलब्ध होता. मात्र अवघ्या वर्षापूर्वी झालेल्या पाठीच्या जीवघेण्या दुखण्यावर मात करीत त्याने हे यश मिळवले. त्यासाठी करड्या लष्करी शिस्तीसारखे प्रशिक्षण घेतले हेही महत्त्वाचे. 

फ्री स्टाईल कुस्तीच्या ६६ किलो गटात सुशीलकुमारने अनपेक्षितपणे कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय मानसिकतेचा विचार करता हे पदक बरेच समाधान देणारे ठरले यात नवल नाही. सर्वसामान्यांचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या विजेंद्रकुमारनेही ब्राँझ पदकाची कमाई केली. उपांत्य फेरीत विजेंद्र पराभूत झाला, पण तेथपर्यंत त्याने मारलेली धडकही देशातील नव्या खेळाडूंना संजीवनी देणारी ठरावी. क्यूबाच्या ज्या एमिलिओकडून विजेंद्रकुमार पराभूत झाला तो जागतिक क्रमवारीत विजेंद्रपेक्षा कितीतरी पुढे आहे. त्याच्या वडिलांनी १९८२ च्या ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगमध्येच सुवर्णपदक जिंकले होते. क्यूबा आणि बॉक्सिंग हे शब्द जणू एकमेकांना पर्यायी झालेले आहेत. याउलट परिस्थिती भारतात आहे, पहिल्यांदाच भारतीय बॉक्सरने ऑलिंपिकमध्ये पदकापर्यंत 'पंच' मारला. जितेंद्र, अखिल आणि विजेंद्र यांना फक्त चांगल्या मदतीची गरज आहे. २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये क्यूबाच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या त्यांच्या निर्धाराला प्रत्यक्षातले भरीव पाठबळ मिळायला हवे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्याबद्दलही अशीच आशा बागळता येईल. 

मात्र या आनंदात वास्तवाच्या दुसऱ्या बाजूचा विसर पडू देता कामा नये. गेल्या १०८ वर्षांत ऑलिंपिकमध्ये भारताला फक्त १७ पदके मिळाली आहेत. आणि त्यातील अकरा हॉकीतील आहेत. खाशाबा जाधव यांना

पहिले कांस्य पदक मिळाले. पहिले सुवर्णपदक मिळण्यासाठी भारताला तब्बल ५६ वर्षे वाट पहावी लागली. चीनला पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक १९८४ साली प्राप्त केले. तो देश आता अमेरिका, रशिया यांना मागे सारून जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर पोचला आहे. अगदी चिमुकल्या जमैका देशानेदेखील हेवा वाटावा असे यश मिळविले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ऑलिंपिकमध्ये मिळणाऱ्या पदकांचा विचार केला तर भारताचे स्थान तळाशीच आहे, याची नोंद अंतर्मुख होऊन घ्यावयास हवी.

खेळातील यशाबरोबर क्रिडासंस्कृती रूजण्याचे काही अगदी वेगळे फायदे असतात. राष्ट्रीय एकात्मतेचा जेवढा सहजसुंदर व प्रगल्भ आविष्कार खेळाच्या मैदानावर दिसतो तेवढा तो क्वचितच अन्यत्र दिसत असेल. जात, धर्म, भाषा प्रांत या पलीकडे जाऊन एकत्र येण्याची मानसिकता खेळाच्या संस्कृतीत आपोआप घडते. झुंज निकराने द्यावी व पराभवही हसतमुखाने सोसावा हे व्यक्तिमत्त्व घडवणारे बाळकडूही खेळाच्या मैदानावर मिळते. परंतु आजच्या जगात झपाट्याने सर्व बाबींचे व्यावसायीकरण झाले आहे. त्यामुळे खेळाचा हा पैलू दुर्लक्षित झाला आहे. क्रिकेट या खेळाचे अतिरेकी मायाजालही त्याला कारणीभूत आहे. अशी क्रिडासंस्कृती व जागतिक पातळीवरचे देदिप्यमान यश याचा संबंध असेलच असे नाही. मात्र या स्वरूपाची क्रिडासंस्कृती व त्यातून निर्माण होणारी मानसिकता आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न ही एक स्वतंत्र पण महत्त्वाची बाब आहे, याची नोंद तरी आपण घ्यावयास हवी.

सर्वाधिक तरुणांचा देश असलेल्या भारताच्या क्रिडाक्षेत्राच्या पिछेहाटीला कारणीभूत असलेल्या अनेक बाबी आजही कायम आहेत. पायाभूत सुविधा व अत्याधुनिक प्रशिक्षणाचा अभाव, सरकारी पातळीवरील अनास्था, प्रायोजकांची ऑलिंपिक खेळाबद्दलची उदासीनता, क्रिडासंघटनाचे राजकारण अशी न संपणारी यादी आहे. पण यावर मात करण्याचा निर्धार व शहाणपणा शेवटी आपणच दाखवावयास हवा. अमेरिका, रशिया या महासत्तांना मागे टाकून सुवर्णपदकांची लयलूट करणाऱ्या चिनी खेळाडूंची शिस्त काय आहे? अथेन्स ऑलिंपिकनंतर त्यांनी फक्त सहा दिवसांची सुट्टी देऊन सुवर्णपदक विजेत्यांना सरावाला जुंपले. वर्षातून एकदाच आईवडिलांना भेटायला दिले. डझनावारी सुवर्णपदकांची लयलूट करायची तर अशीच करडी (काहींना क्रूरही वाटू शकणारी) शिस्त लागते.

भारतीय क्रिडाक्षेत्रातला आणखी एक पैलू सतत चर्चेला येतो. तो असा की, भारतातील जनजाती, जमाती, उदाहरणार्थ आदिवासी, फासेपारधी यांना जन्मजात काही कौशल्ये लाभलेली असतात. त्यांच्या कौशल्याचा शास्त्रीय विकास हा त्यांना व देशाला यशापर्यंत लवकर पोचवेल. त्यासाठी आदिवासी भागातील गुणवत्ता शोधून त्याला आकार देण्याचे काम भारतीय क्रिडा प्राधिकरणाच्या (साई) माध्यमातून कधीच सुरूही झाले आहे, पण आतापर्यंत अपवाद वगळता त्याला अपेक्षित फळ आलेले नाही. एका बाजूला अत्याधुनिक व शास्त्रीय ट्रेनिंग याचा अभाव, प्रशिक्षकांची मर्यादित कुवत या बाबी आहेत तर दुसरीकडे प्रशिक्षणार्थीही आंतरराष्ट्रीय पातळीवर पराक्रम गाजवण्याच्या इच्छेऐवजी केंद्र शासनाच्या सेवेतील नोकरी मिळणे यातच आत्मसंतुष्ट आहेत.

आजचे अत्युत्तम दर्जाचे क्रिडाशिक्षण विलक्षण महाग आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धात भाग घेण्याचा खर्चही अफाट असतो. चीनमध्ये हा प्रश्न नाही, कारण शासनच हा सर्व भार उचलते. भारतात आरोग्य व शिक्षण यासारख्या अत्यावश्यक बाबीतून सरकार अंग काढून घेत असताना ते क्रिडा क्षेत्रावर किती खर्च करणार? प्रकाश पदुकोन व गीत सेठी या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या कल्पनेतून साकारलेले ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट वा मित्तल चँपियन्स ट्रस्ट यांनी खेळाडू घडवण्याचे चालू केलेले कार्य उत्सावर्धक आहे. अनेक प्रायोजक भारतीय नेमबाजांना जाणीवपूर्वक मदतीचा हात देत आहेत हे आश्वासक आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षात प्रथमच ऑलिंपिकच्या बाबतीत परिवर्तन घडते आहे. आपणही चीनसारखी वा त्यापेक्षा दमदार गतिमान वाटचालीची अपेक्षा का करू नये? तसे झाले तर २०२० च्या ऑलिंपिकमध्ये भारताला खरे सोनेरी यश लाभू शकेल. सुवर्णपदक विजेत्या बिंद्राने अशी भावना व्यक्त केली की.. I sincerely hope my medal changes the face of India's olympic sports हे उद्गार सार्थ ठरावावयास हवेत.

Tags: विजेंद्रकुमार बॉक्सिंग सुशीलकुमार कुस्ती अभिनव बिंद्रा नेमबाजी Vijendrakumar ऑलिंपिक Boxing Sushilkumar Wrestling Abhinav Bindra Shooting Olympics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके