डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पराभव युतीचा पण विजय कोणाचा?

खेळ हा केवळ व्यवसाय (खरे तर आजच्या क्रिकेटच्या भाषेत किफायतशीर धंदा) नसावा. निदान खेळाडूंची तरी तशी भूमिका नसावी. सामनाबंदीचे राजकारण चालू आहे आणि खेळाडूंचा राजकारणाशी संबंध नसतो अशी भूमिका कातडी बचावूपणाचीच ठरते. ​

शिवसेनेने सपशेल माघार घेतली. डरकाळ्या फोडल्या. धर्मयुद्धाचा आव आणला, पण नेहमीप्रमाणे शेपूट घातले. अर्थात पडलो तरी नाक वर हे आहेच. त्यामुळे खेळपट्टी उखडण्याच्या आणि सामने उधळण्याच्या पुरुषार्थाने शिवसेना आता भारतव्यापी झाली आहे याचा अभिमान मुख्यमंत्री जोशींनी व्यक्त केला. पुन्हा कट्टर पाक विरोधक व खरे हिंदुहितरक्षक आपणच आहोत याचाही टेंभा या निमित्ताने शिवसेनेला मिरवता आला, असे सगळे असूनही माघार का घेतली? काहींच्या मते ‘गर्जेल तो बरसेल काय?’ या न्यायाने शिवसेनेची दमबाजी ही पोकळच असते त्यामुळे या माघारीत नवल नाही.

क्रिकेट नियामक मंडळाच्या मुंबई येथील हल्ल्याची जबाबदारी ‘ते हल्लेखोर नाहीत हो शिवसैनिक’ असा राग आळवत ज्या वेळी शिवसेनेने झटकली त्याच वेळी पुढची कल्पना आली होती. (हल्लेखोरांत शिवसेनेचे आमदार होते, मुख्यमंत्र्यांच्या दादर मतदार संघातील उजवे हात होते आणि हल्लेखोरांपैकी 14 जणांना या घटनेनंतर आठवड्यातच झालेल्या श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मातोश्रीवर थेट प्रवेश देण्यात आला असे वृत्तपत्रांनी छापले आहे.) कचेरीवरील हाल्यामुळे जनमानसावर विपरीत परिणाम झाला हे माघार घेण्याचे एक कारण. दुसरे कारण, ज्या राज्यात सामने होणार तेथील मुख्यमंत्र्यांनी चोख बंदोबस्ताचे आव्हान थेट स्वीकारले. त्यामुळे कृती करण्याची शिवसेनेची इच्छा फसण्याचीच शक्यता होती. मग ‘गाढवही गेले व ब्रह्मचर्यही गेले’ अशी त्यांची स्थिती झाली असती. तिसरे महत्त्वाचे म्हणजे भाजपाने युती तोडण्याची दिलेली धमकी. ही कृती एकाच वेळी युतीच्या दोन्ही पायावर कुऱ्हाड चालवणारी होती हे खरे. परंतु त्यामुळे खंडणी व लूट करण्याची शिवसेनेला लाभलेली पंचवार्षिक संधी वर्षभर आधीच थांबणार होती.

भाजपाचा लिबलिबीत कणा आणि संधिसाधूपणा देखील या निमित्ताने स्पष्ट झाला. ‘हिंमत असेल तर सीमेवर जाऊन लढा’ या पंतप्रधान वाजपेयी यांच्या प्रतिपादनाची बाळ ठाकरे यांनी हिंदुहितविरोधी पंतप्रधान अशी संभावना केली. तरीही त्यांची मनधरणी करण्यासाठी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना धावत-पळत यावे लागले. भाजपा केन्द्रशासनात काठावरच्या बहुमतात आहे. त्यामुळे ‘धरले तर चावते व सोडले तर पळते’, अशी स्थिती त्यांना शिवसेनेकडून सोसावी लागत असल्याने त्याबाबत लाजणे त्यांनी सोडून दिले आहे. परंतु गृहमंत्री अडवाणींना भारताचा दुसरा ‘पोलादी पुरुष’ असे स्वसंबोधन या मंडळींनी यापुढे बंद करावे. याच पद्धतीने तडजोडीतून शांतता आणण्यासाठी अडवाणी यांनी दुबईत दाऊदला भेटावे हा माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा उपरोधिक सल्ला आम्हांला अगदी योग्य वाटतो. युती शासनातील दोन्ही पक्षांचा पराजय या निमित्ताने स्पष्ट झाला, हे एका अर्थाने बरेच झाले. पण मग विजय कोणाचा झाला?

क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष यांची या सर्व प्रकारानंतर प्रतिक्रिया होती की अखेर क्रिकेटचाच विजय झाला. तो खरोखरच झाला आहे काय? खेळ हा जीवनाच्या अभिव्यक्तीचा भाग असतो आणि सुसंस्कृत जीवन जाणिवांचा संबंध मूल्यांशी असतो. खेळ हा केवळ व्यवसाय (खरे तर आजच्या क्रिकेटच्या भाषेत किफायतशीर धंदा) नसावा. निदान खेळाडूंची तरी तशी भूमिका नसावी. सामनाबंदीचे राजकारण चालू आहे आणि खेळाडूंचा राजकारणाशी संबंध नसतो अशी भूमिका कातडी बचावूपणाचीच ठरते. डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाऱ्या या वास्तवाचे दर्शन या निमित्ताने जनसामान्यांना झाले असे आम्ही मानतो.

किंग फिशरची जाहिरात करताना किंवा विल्सचा लोगो लावताना आपण या देशात लोकविघातक व्यसनांचा उदोउदो करत आहोत, आपली लोकप्रियता त्यासाठी खर्ची घालत आहोत हे या खेळाडूंना समजत नाही काय? यामागचे अर्थकारण व राजकारण न कळण्याएवढे ते दुधखुळे आहेत काय? अमूक शांपू, तमूक पेय, तमूक सुटिंग यांना जाहिरातीतून अखंड उत्तेजन देत चंगळवादाचे आंतरराष्ट्रीय राजकारण आपण भारतात घरपोच करत आहोत हे न समजण्याऐवढे खेळाडू बालबुद्धीचे आहेत काय? मुंबईतील कसोटी व रणजी खेळाडू, मुंबई व महाराष्ट्रातील क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, क्रिकेटविषयी लंब्याचौड्या बाता मारणारे समीक्षक, क्रिकेटच्या रंगलेल्या फटकेबाजीचे कार्यक्रम करत तुंबड्या भरणारे कलाकार या सगळ्यांची दातखीळ एकाच वेळी का बसली? केवळ क्रिकेट खेळाडूंचाच प्रश्न नाही, कोणत्या ना कोणत्या क्रीडा प्रकारातील शिवछत्रपती पुरस्कार मानाने मिरवणारे खेळाडू महाराष्ट्रात काही शेकड्यांनी आहेत. तर अर्जुन पुरस्कार विजेते दीड-दोन डझन आहेत. शिवसेनेच्या अखिलाडू वृत्तीचा यांपैकी कोणीही कडाडून निषेध केला नाही. जी कृती केल्याने गुंडांची आणि त्यांना आशीर्वाद देणाऱ्या शासनकर्त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल असे वाटते आणि त्या पोटी अर्थ पूर्ण मौन बाळगले जाते तेथे खेळाडू खेळातील कौशल्याला कदाधित जागत असतील पण निधडया छातीने आव्हानाचा मुकाबला करावयाच्या कोणत्याही खेळाच्या आत्मतत्वाचे काय?

आता वादासाठी काहीजण शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा आहे असेही म्हणतील. पण मग ठाकरेंच्या या राष्ट्राभिमानाच्या कल्पनेशी सहमत असणाऱ्या आजीमाजी खेळाडू पदाधिकारी, लेखक, वक्ते, भाट व कंत्राटदार मंडळींनी एवढ्यावरच थांबू नये. निदान याबाबत तरी स्वतःची तत्त्वनिष्ठा क्षुद्र स्वार्थापेक्षा मोठी आहे हे शब्दांचे बुडबुडे न उडवता कृतीने दाखवावे. क्रिकेट खेळाडूंनी सहारा कप स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेले मानधन, इतर बक्षिसे परत करावीत. शारजा स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल पश्च्याताप व्यक्त करावा व यापुढे आपण त्यासाठी उपलब्ध नाही हे जाहीर करावे. दहशतवादी पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश दिल्याबद्दल आंतरराष्ट्रीय संघटनेचा निषेध करावा. अर्थात ही तत्त्वनिष्ठाही त्यांच्यात नाही हे आम्ही जाणून आहोत. क्रिकेट सामन्यावर बंदी घालण्याच्या निमित्ताने युतीचा पराजय झाला हे खरेच. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि खरे तर विवेकी विचाराचा विजय कधी व कसा होणार आणि आपण त्यासाठी काय करणार, हा अधिक मूलगामी प्रश्न आहे.

Tags: क्रिकेट बाळासाहेब ठाकरे भाजपा शिवसेना संपादकीय Cricket Balasaheb Thakare BJP Shivsena Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके