डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या अंधश्रद्धांचेही निर्मूलन हवे –

आज पश्चिम बंगाल व बांगला देशाला गंगेच्या पाण्याची गरज आहे. आधीच फराक्का बांध बांधून कलकत्ता पाण्याची पातळी कायम राखावी लागते. त्यामुळे गंगेच्या खालच्या प्रवाहातल्या लोकांत व बांगला देशात पाण्याची समस्या आली व भारताबरोबरचे संबंध बिघडण्यास ते एक मोठे कारण आहे.

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही याचा आणखी एक अनुभव देशभरातील नद्या जोडण्याच्या  भारत सरकारच्या घोषणेनंतर येऊ लागला आहे. आपले मिसाईल राष्ट्रपती अब्दुल कलाम, कवि पंतप्रधान वाजपेयी व  सर्वोच्च  न्यायालय यांनी  गंगा-कावेरी जोडण्याची कल्पना मांडून त्याची तयारीही सुरू केली, त्यावर आयोगही नेमला. मात्र ही कल्पना आहे काय? त्याने खरेच लाभ होणार आहे का? कसा? त्याची किंमत काय द्यावी लागणार? ही योजना व्यवहार्य तरी आहे का?  या कशाचाच विचार व यावर वाद-संवाद न होताच एखाद्या देवदत्त सत्याप्रमाणेच त्याची अंमलबजावणीही सुरू करायचे वाटत आहे.

त्यावरही कडी म्हणजे, या कल्पनेवर कुणी प्रश्न विचारण्यापूर्वी अभियंता-लॉबीने सर्व  प्रसारमाध्यमातून याची गुणवर्णने सुरू केली आहेत. त्यासाठी साध्या व्यावहारिक बाबींकडे पाहण्याचीही त्यांची तयारी नाही. कुणीही थोडे खरबडून पाहिले तर या उद्योगामधील  वास्तवाचे अज्ञान व खऱ्या उपायांबाबत डोळेझाक स्पष्ट होईल. गंगेतून पाणी वळवणे वाटते तितके सहजशक्य नाही. आज पश्चिम बंगाल व बांगला देशाला गंगेच्या पाण्याची गरज आहे. आधीच फराक्का बांध बांधून कलकत्ता पाण्याची पातळी कायम राखावी लागते. त्यामुळे गंगेच्या खालच्या प्रवाहातल्या लोकांत व बांगला देशात पाण्याची समस्या आली व भारताबरोबरचे संबंध बिघडण्यास ते एक मोठे कारण आहे. तिकडे सतलज-यमुना जोडकालव्यासाठी सतलजचे पाणी देण्यास पंजाबचा ठाम नकार आहे. पाणी आहे असे म्हणणाऱ्या महाभागांनी किती व कसे पाणी यमुनेत आहे ते पहावे. दिल्लीपुढे तर जे काही थोडे पाणी येते त्यात पाणी कमी; विष्ठा, घातक रसायने, गदळच जास्त. अशी तर आपल्याकडील प्रत्येकच नदीची स्थिती आहे. अशी गटारे जोडायची; व ती घाण, घातक पदार्थ व रोगराई देशभरात फैलावायची आहे? जलतज्ञ   ए. वैद्यनाथन म्हणतात की देशात नद्यांना पूर एकाच काळात येतो. तेव्हा हे नद्या जोडणे  म्हणजे दुष्काळ जोडणे किंवा पूर जोडणे असेच होईल! महानदी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी या कोणत्याच नदीत अतिरिक्त (सरप्लस) म्हणावे असे पाणी नाही, असे संबंधित राज्य सरकारेच सांगतात. या प्रश्नी राज्याराज्यांत भीषण तंटे उभे राहतील, त्याची या इंजिनियर मंडळींना फिकीर नसावी. विचार करा.

समुद्रसपाटीपासून आग्रा 165 मीटर उंचीवर आहे, तर पुणे कोल्हापूर 550 मीटरवर देशात काय उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम पाणी पपंच करत रहायचे? योजेनेसंबधी कोणतेही मूलभूत अभ्यास अद्यापपर्यंत झाले नाहीत. प्रत्येक नदी-खोऱ्याचा त्याच्या पाणलोट क्षेत्राचा, लाभक्षेत्र यांचा मुलभूत अभ्यास, नद्या अडवल्या–वळवल्याने होणाऱ्या खालच्या प्रवाहावरील (डाऊनस्ट्रीम) परिणाम, समुद्री आक्रमण, गाळ व प्रदुषणाच्या समस्या, योजनेसाठी लागणाच्या धरणांमुळे व 6 हजार कि.मी कालव्यामुळे होणारे विस्थापन, पुनर्वसनाची शक्यता, सुपीक शेती, जंगल, जैवविविधता, प्राणी-पक्षी-जलचर यांचे नुकसान या कशाचाही अभ्यास केल्याशिवाय लाभाचे डींडीम वाजवले जातात. देशात आजच 4 ते 8 कोटी विस्थापित आहेत व त्यापैकी 25 टक्क्यांचेही पुनर्वसन झालेले नाही. मोठया प्रकल्पांमुळे 15 लाख हेक्टर जंगल नष्ट झाले आहे.

अन् या संपूर्ण योजनेसाठी किमान रु. 5,60,000 कोटी रुपये तेही 1990 च्या दशकातल्या किंमतीनुसार लागणार त्याचे काय? भारतात पाचव्या योजनेपासून अधुऱ्या राहिलेल्या 119 मोठया धरणांचा पूर्ण करण्याचा खर्च 75,000 कोटी आहे. दहाव्या योजनेत त्या शिल्लकी धरणांसाठी फक्त रु. 2000 कोटी देणे शक्य झाले. 'नद्या जोडा' म्हणून उड्या मारणाऱ्या इंजिनियर, राजकारणी, नोकरशाहांनाही परिस्थिती माहिती नाही असे नाही, मात्र हे लोकांपासून ते दडवत आहेत. ही शुद्ध फसवाफसवी आहे. 

सर्व्वोच्च न्यायालयाने वस्तुतः असा आदेश देण्यचा अधिकार नाही.  नर्मदा, कॉजेंट्रिक्स, टिहरी, एन्रॉनप्रकरणी याच सर्व्वोच्च न्यायालयाने 'आम्ही सरकारी निर्णयात जाणार' नाही, असे म्हणून सरकारी अन्यायाला मुभा दिली. आता मात्र एखादी योजना करा - 40 वर्षात नाही, तर दहा वर्षातच करा हे म्हणणे विचित्रच आहे. भाजपला निवडणुकीच्या उंबरठ्यावर मिळालेले हे वरदानच होय. ही भयानक व देशाला उद्धस्त करणारी 'राष्ट्रीयता' आहे.  या प्रश्नी सुजाण नागरिकांनी, या योजनेची सर्व बाजूंनी कसून छाननी करावी, प्रश्न विचारावेत व कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता विवेकानेच याबद्दल मत बनवावे.

Tags: जलतज्ञ ए. वैद्यनाथन गंगा- कावेरी कालवा सतलज- यमुना जोडकालवा अटलबिहारी वाजपेयी अब्दुल कलाम नदीजोड प्रकल्प योजना Jaltdny a.Vidynathan ganga-kaveri  jodkalva satlaj-yamuna jodkalava atal bihari vajpyei abdul kalam Ndyajod Prakalp Yojnaa weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके