डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजकारणातील हा अधःपात चिंताजनक आहे. याचे मूळ गेल्या काही वर्षांत राजकारणात वैचारिक निष्ठांचे महत्त्व कमी होऊन राजकारण हा सत्ता संपादनाचा निष्ठुर खेळ बनला आहे, यामध्ये आहे.सत्ता ही त्याज्य आहे असे आम्ही मानीत नाही. सत्ता हे समाज परिवर्तनावे प्रभावी साधन आहे, हे ज्याला समजत नाही त्याने राजकारणाकडे फिरकू नये. परंतु सत्ता हे परिवर्तनाचे, लोककल्याणाचे साधन आहे याचा मात्र कधीही विसर पडणे चालणार नाही.

'राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति स बांधवः।' असे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. जीवनात सुखाचे सोबती अनेक असतात परंतु ज्या वेळी आपण दुःखी असतो, कसोटीच्या प्रसंगातून जात असतो त्या वेळी जो आपली सोबत करतो तोच खरा मित्र. हे सुभाषित सर्वसाधारण माणसांच्या जीवनाला लागू आहे, त्याचप्रमाणे ध्येयवादी कार्यकर्त्यांच्याही जीवनाला लागू आहे. भारतात स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये प्रेम असे, बंधुभाव असे. स्वातंत्र्य हे ध्येय हा कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणारा बळकट दुवा होता; त्याचप्रमाणे या ध्येयासाठी कष्ट करताना, तुरुंगवास भोगताना कार्यकर्त्यांची मनेही जुळत असत. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणाचे स्वरूप बदलले तरी वैचारिक निष्ठेवर आधारलेल्या पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये एक खंबीर एकजूट असे. आता मात्र सत्ता हेच बहुतेक सर्व पक्षांचे उद्दिष्ट झाले असून सत्ता संपादनासाठी माणसे गोळा करण्याचा खेळ राजकारणात सतत सुरू आहे आणि या सत्ताभिलाषी लोकांचा वरील सुभाषिताशी संबंध नाही. त्यांना लागू असलेले सुभाषित 'असतील शिते तर जमतील भुते' हेच आहे.

काँग्रेसने 1947 नंतर हातात आलेल्या राजकीय सत्तेच्या आधारे समाजातील अन्य सत्ता केन्द्रे काबीज करून त्यांच्या भोवती कार्यकर्ते बांधून ठेवले. सत्ता व संपत्तीमुळे आलेले अनेक कार्यकर्ते आज काँग्रेस सोडून जेथे सत्ता मिळण्याची शक्यता आहे तेथे पळत आहेत. बुडणाऱ्या जहाजाला सोडून उंदीर पळतात हे दृश्य आज भारतीय राजकारणात दिसत आहे. ही खेदाची गोष्ट आहे. अर्थात हे आजच घडत आहे असे नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने एकजुटीने निकराचा लढा दिला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. 

परंतु 1960 साली संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्या वेळी काँग्रेसच्या हातांत सत्ता होती याचा फायदा घेऊन 'काँग्रेसनेच संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला' असा प्रचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. 1957च्या निवडणुकीत काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव झाला होता; परंतु 1960 नंतर काँग्रेसने सत्तेच्या आधारे विरोधी पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांना विविध प्रलोभने दाखवून पक्षांतर करावयास लावले. इतकेच नाही तर 1962 च्या निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय आचार संहितेवरील परिसंवादात, 'पक्षांतर करणाऱ्यांना कोणत्याच पक्षाने तिकीट देऊ नये' असा प्रस्ताव मांडला गेला असताना त्या वेळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्या प्रस्तावास विरोध केला. 1960 ते 1967 या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाकडे संधिसाधू कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. आज परिस्थिती पालटली असून काँग्रेस सोडून अनेक संधिसाधू कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात जात आहेत. आम्हाला याचा खेद वाटतो की भाजपचे नेते या संधिसाधूंना मोठेपणा देताना, भाजपमधील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पायदळी तुडवीत आहेत. 

राजकारणातील हा अधःपात चिंताजनक आहे. याचे मूळ गेल्या काही वर्षांत राजकारणात वैचारिक निष्ठांचे महत्त्व कमी होऊन राजकारण हा सत्ता संपादनाचा निष्ठुर खेळ बनला आहे, यामध्ये आहे.सत्ता ही त्याज्य आहे असे आम्ही मानीत नाही. सत्ता हे समाज परिवर्तनावे प्रभावी साधन आहे, हे ज्याला समजत नाही त्याने राजकारणाकडे फिरकू नये. परंतु सत्ता हे परिवर्तनाचे, लोककल्याणाचे साधन आहे याचा मात्र कधीही विसर पडणे चालणार नाही. सध्या भारतीय राजकारणात सत्ता हे स्वार्थ साधण्याचे, पैसा कमावण्याचे आणि इतरांवर हुकमत गाजविण्याचे प्रभावी शस्त्र आहे, असेच बहुतेक सर्व पक्ष मानतात. त्यामुळे सत्ता हे साधन न राहता साध्य बनले आहे. हा सत्तेचा खेळ काही नेते मोठ्या धूर्तपणे खेळतात आणि राजकारणात सर्व मार्ग वापरून सत्ता मिळवितात. 

महात्मा गांधींनी आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जयप्रकाश नारायण यांनी 'ध्येय उदात्त असेल तर ध्येयपूर्तीसाठी वापरावयाची साधने शुद्ध असली पाहिजेत' अशी भूमिका घेतली. कम्युनिस्ट पक्षाने याच्या अगदी उलट वैचारिक भूमिका मांडली आणि ध्येय जर उदात्त असेल तर साधने कोणतीही वापरण्यास हरकत नाही असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, त्यातूनच निर्माण झालेल्या एका वेळच्या जनसंघाने आणि आजच्या भारतीय जनता पक्षाने चाणक्य हाच आदर्श राजकारणात ठेवला पाहिजे असे सांगून साधनशुचितेची व गांधीजींच्या भूमिकेची सतत टवाळीच केली. या त्यांच्या चाणक्य नीतीचे प्रात्यक्षिक आज देशात दिसत आहे. 

उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांनी पक्षबदलूंना हाताशी धरून सत्ता काबीज केली आणि गुन्हेगारांना मंत्रिपदे देऊन 93 जणांचे मंत्रिमंडळ बनवून आपले आसन स्थिर केले. अटलविहारी बाजपायी यांनी सत्ता काबीज करण्यासाठी कल्याणसिंगांनी केलेल्या डावपेचांचे समर्थन केले. आज भारतीय जनता पक्ष अटलबिहारी बाजपायी यांचा उल्लेख भारताचे भावी पंतप्रधान असा करीत आहे आणि हे अटलजी, गेल्या आठवड्यात म्हणाले, 'कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविणे हे आमचे ध्येय आहे. भारताच्या आत्मिक कल्याणाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने घेतलेली नाही.' 

राजकारणाला नैतिक अधिष्ठान असावे या गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेला ठोकरून भारतीय जनता पक्ष दुसऱ्या टोकाला जाऊन, राजकारणात सत्तेसाठी काहीही करणे हा राजकीय पक्षांचा जन्मसिद्ध हक्क आहे असे कंठरवाने सांगत आहे. ज्या सुरेश कलमाडींनी आजवर भाजपला शिव्याशाप दिले, त्या कलमाडींना पुण्यातून भाजपच्या तिकिटावर उभे करण्याचा घाट प्रमोद महाजन- किरीट सोमय्या यांच्या चौकडीने घातला आहे. सुरेश कलमाडी हे विकास आघाडीचे नाटक करीत असले तरी ते फार काळ टिकणार नाही. भाजपची पुण्यातून उमेदवारी मिळेल असे आश्वासन मिळाल्यावरच कलमाडी यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असणार. 

कलमाडी यांना भाजपतर्फे उभे केल्यामुळे भाजपमधील निष्ठावान कार्यकत्यांचा बळी जात असला तरी सत्ता मिळण्यापूर्वीच सत्तेची नशा चढलेल्या महाजन आणि कंपनीस त्यांची पर्वा नाही. मात्र याचा अर्थ केवळ भारतीय जनता पक्षच दोषी आहे असा नाही. काँग्रेसने पूर्वी हेच केले. कांशीराम आणि लालुप्रसाद हेच करू इच्छितात आणि शक्य असते तर शरद यादव यांनी हेच केले असते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांची कार्यपद्धती मात्र वेगळी आहे. फर्नांडीस हे सर्वांत चलाख नेते असल्यामुळे भाजपच्या कारवायांवर पांघरूण घालून त्याचे तात्विक समर्थन उच्च स्वराने करीत आहेत. या परिस्थितीत मतदार मात्र हतबल होत आहे. सर्व राजकीय पक्षांबद्दल जनसामान्यांना वाटते की, 

'उडदा माजी काळे गोरे 

काय निवडावे निवडणारे

कुचलियांची वृक्षफळे 

मधुर कोठोनी असतील?'

पक्षांतराच्या विषवृक्षाला आलेल्या फळांची दुर्गंधी आज भारतीय राजकारणात पसरली आहे. या विषवल्लीचे निर्मूलन करण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतील. म्हणून राजकारणातील या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी पुरोगामी विचारवंतांनी खंबीर भूमिका घेतली पाहिजे.

Tags: पक्षांतर सुरेश कलमाडी अटलबिहारी वाजपायी भाजप कॉंग्रेस राजकारण transposition suresh kalmadi atalbihari vajpayi BJP congress politics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके